Sunday, January 22, 2023

कोरोना आणि काळजी ...


@doctorforbeggars 

आपण भारतात राहतोय... त्यातुन महाराष्ट्रात राहतोय... ! 

चायनाचा हा "माल" आपलं काय वाकडं करणार आहे ... ?

भावनेच्या भरात लिहीत नाहीय मी... ! अभ्यास करुन लिहिलंय ! 

आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांची Immunity System पहिल्यापासुनच कणखर आहे... !

रस्ते खराब आहेत... रस्त्यावरनं जातोच ना आपण ?
 
खड्डे आले... खड्ड्यातनं कुणाच्यातरी आईची आठवण काढत का होईना... जातोच ना ?

सासुनं टोमणा हाणला... सून पचवतेच ... ! 

सुनेची गुगली सासु टोलवतेच !

सरकारी कार्यालयात झालेले अपमान पचवतोच ना ? 

बायकोने चारचौघांत केलेला पाणउतारा... (जावु दे ना राव... कश्शाला आठवण करुन देताय... )

एकुण काय, कोणत्याही संकटाला आपण तोंड द्यायला सरावले आहोत... !

आपली प्रतिकार शक्ती लय स्ट्राँग आहे ! 

आमच्याकडचा (म्हणजे कुठला ते कळलंच असेल ) टोमणा एकीकडे आणि कोरोनाचे 100 virus दुसरीकडे ! 

कोरोना झक्क मारेल !

मला तर वाटतं, कोरोनाला अस्सं समोर खुर्चीत बसवावं आणि दे दणादण टोमणे हाणावेत... ! 

काय थांबतोय आमच्यात तो ... !

तर कोरोनाला घाबरु नका...

2003 मध्ये SARS नावाचा असाच एक येडा Virus आला होता... 29 देशात अक्षरशः नागडा नाचला तो... हजारो लोकांना मारलं .... पण भारत ... ? 

भारतात यायची औकात नव्हती त्याची ! 

भारतातल्या फक्त तीन लोकांच्या नादी लागला तो... लागण झालेले ते तिघेही मस्त मजेत आहेत ! 

मेला तो SARS चा Virus, आपल्या नादी लागून ! 

MERS नावानं कुणीतरी अजुन एक येडपट Virus आलं हुतं.... त्ये तर आपल्यालाच येवडं घाबरलं ... भारतात आलं पण न्हाई... !

तर, आत्ताही घाबरुन जावु नका... !

चायना माल आपण Use आणि Throw करतो... ! 

असंच याला पण use करुन throw करायचंय आपल्याला ! 

हा Virus सपाट भागावर जास्त टिकतो... ! 

म्हणजे कपाटं, दारं, भिंती, कडी, गाडीचं स्टिअरींग, कोणतीही हाताळण्यासारखी वस्तु ... म्हणजे हातात येणारी किंवा हात लागणारी वस्तु (सगळंच लिव्हा असा प्रेमळ आग्रह धरु नका... )

या सर्व ठिकाणी आपण नाक, डोळे, तोंड आणि जीभ लावायला जात नाही... लागतो तो पहिला हातच... !

तेव्हा, समोरच्या वस्तुला हात लागल्यावर हा येडा चायनाचा माल, कोरोनाचा जंतु चिकटला आहे असं समजुन शक्य असेल तेव्हा हात धुवावेत ... नसेल शक्य तर सॕनीटायझारचा वापर करावा. (लोकांनी येडं म्हटलं तरी हे करावं... नाहीतरी इतरवेळा ते म्हणतातच )

उगाच मास्क लावुन मिरवु नये... ! 

N95 नावाचे मास्क मिळतात, हे मास्क घेवुन आणि लावुन आमच्याकडे पण पैसे आहेत... हे दाखवण्याची गरज नाही... ! 

हे मास्क कोरोना बाधीत व्यक्तीवर उपचार करणाऱ्या डाॕक्टर अथवा त्या विभागात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गासाठी आहेत, किंवा ज्यांना हा आजार झाल्याचे तपासणीनंतर निश्चित झालं आहे, त्यांच्यासाठी आहेत !

शिवाय मास्क लावल्यानंतर होतं काय, की... माझा मास्क नीट बसलाय का नाही , हे पाहण्यासाठी शंभरवेळा हात, नाक आणि तोंडाकडे जातोच... हात न्यायचा नाही ना राव तोंडाकडे आणि नाकाकडे ... ! 

मास्क मध्ये मी कशी दिसते गं... याची उत्सुकता असतेच... त्यात तोंडाचा चंबु करुन फटाफट 7-8 सेल्फ्या निघतातच... ता.क. मास्क असल्यामुळे तोंडाचा चंबु दिसत नाही गं माय.... !

एखाद्या बाईनं पहिल्यांदाच नाकात नथ घातली असेल तर शंभरदा ती चाचपून बघते... तसंच काहीसं हे... !

मास्क लावायचा आणि शंभरदा चाचपून बघायचा... ! 

"टिंग" वाजलं की व्हाॕट्सअॕपवर काय आलंय का धडपडून चाचपून बघायचं, हे ही त्यातलंच ! 

गर्दीत नाकाला दुपदरी रुमाल बांधा... (आता तरी घ्या ना राव रुमाल ) मास्क लावु नका !

आंबट गोष्टी दिवसभरांत जास्त चघळा उदा. लिंबु, चींच, आवळा ("आंबट गोष्टी चघळा" याचा अर्थ लिमिटेड घेणे... अन्यथा होणाऱ्या परिणामांस आम्ही जबाबदार नाही याची नोंद घ्यावी) याने प्रतिकार शक्ती वाढेल ! 

नाॕन व्हेज टाळावे... ! 

अगदीच सहन होत नसेल तर ... घरी व्यवस्थित शीजवुन खावे... (जमल्यास इकडेही पाठवावे... डबल पुण्यप्राप्ती होण्याची शक्यता जास्त)

कोरोना आजार झालेला माणुस पार आपल्या तोंडाजवळ येवुन खोकला तरच त्याच्या तोंडातुन हा virus आपल्याकडे येईल... 

तोंडावर नुस्तं कुणी बोललं तर आपण आय माय काढतो त्याची... !

मायला, आपल्या तोंडावर खोकायची कुणाची बिशाद आहे ... ? तवा ती पन काळजी करु नगा ! (तरी पण रुमाल घ्या राजेहो )

आधीच सांगीतल्याप्रमाणं, हातालाच ह्यो जंतु जास्त चिकटतो... म्हणुन दुसऱ्याचा हात हातात घेवु नका (उगंच कारण नसतांना, कायबाय कारण काढुन दुसऱ्याचा {दुसरीचा} हात हातात घ्यायची नेहमीची सवय बंद करा...) 

हात जोडुन नमस्कार करा... रामराम म्हणा... ! (हे शीकवायला चीनच्या कोरोनाला हितवर यावं लागलं )

तर... मला वाटतंय राजेहो जवळपास सगळंच सांगितलं मी ... !

काही नसेलच कळलं तर कळवावे , प्रत्यक्ष कोरोनाग्रस्त व्यक्तींना भेटण्यासाठी चीनला जायची व्यवस्था तयार आहे... खर्च माझा... ! 

*डाॕ. अभिजीत सोनवणे*
*डाॕक्टर फाॕर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट, पुणे*
*9822267357* 
*Facebook : SOHAM TRUST*
==============================

: 1)दुधाची पिशवी हातात घेतली की लगेच धुवा आणि लगेच आपले हातसुद्धा. 
2)वर्तमान पत्र शक्यतो बंद ठेवा. त्यावरसुद्धा इन्फेकशन असू शकते. 
3)कुरियर साठी ट्रे ठेवा. लगेच हात न लावता 24 तासानंतर लावा. 
4)कामवाली बाई ला सूचना द्या की मुख्य दरवाजा च्या हॅन्डल ला हात लावू नका. घरात येताच त्यांना हात स्वच्छ धुवायला सांगा. 
5)डोअरबेल चं बटण स्वच्छ पुसून काढा. 
6)स्विगी, ऍमेझॉन इ.कडून ऑर्डर करणे बंद करा. 
7)सर्व भाज्या, फळं स्वच्छ धुवून घ्या. 
8)रिमोट कंट्रोल, फोन, कीबोर्ड चाव्या हे सगळ्यात जास्त दूषित असतात. दिवसातून कमीत कमी एकदा स्वच्छ पुसा. 
9)घरी किंवा ऑफिस प्रत्येक तासात किमान एकदा हात धुवा. 
10)सार्वजनिक वाहतुकीची साधनं शक्यतो टाळा. अपरिहार्य असल्यास ओला, उबेर वापरा. 
11)जिम, तरणतलाव आणि गर्दीची ठिकाणं, जिथे स्पर्श आणि हवेतून इन्फेकशन होण्याची शक्यता जास्त, अशा ठिकाणी जाणं टाळा. 
12)ट्युशन, डान्स, म्युझिक, कराओके क्लास बंद ठेवा. 
13)ऑफिस किंवा बाहेरून घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवावे आणि अंगावरील कपडे पुन्हा धुवूनच वापरावे. 
14)आपल्या किंवा कोणाच्याही चेहऱ्यावर हात फिरवू नये. हे लहान मुलांना आणि आजी आजोबांना सांगा. 
15)ज्येष्ठ नागरिकांनी बाहेर पडणे पूर्णपणे बंद करावे. 
16)सार्वजनिक ठिकाणी दरवाजे, जिने, टेबलं खुर्च्या, विजेची बटणं इ. ना शक्यतो स्पर्श करूच नये. तोंडावर हात न ठेवता शिंकणाऱ्यांना स्पष्ट बोला आणि आपणसुद्धा तसें वागू नये. 
17)हात मिळवणे पूर्ण बंद. कोणाचाही मोबाईल हातात घेऊ नये.👍
🙏🇮🇳 जय भारत 🇮🇳🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...