खाद्य भ्रमंती

आषाढी एकादशी स्पेशल  

उपासाच्या पदार्थांच्या  संपूर्ण रेसिपीज 

 घरातच झटपट बनवा उपवासाचे हे रुचकर पदार्थ, जाणून घ्या पाककृती.  


       उपवास म्हटले तर साबुदाणा खाऊन कंटाला येतो. तर आपण उपवासाचे नविन पदार्थ खाऊया. थोडा कसरत केली की, उपवासाचे विविध पदार्थ बनवता येतात. अगदी झटपट आणि चविष्ट पदार्थ आपण बनवु शकतो. चला तर मग पाहुया अशेच काही रुचकर उपवासाचे पदार्थ...

@ साबुदाणा खिचडी.@


साहित्य :-

१)दोन वाट्या साबुदाणा

२)एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

३)सहा-सात हिरव्या मिरच्या

४)चवीला मीठ , साखर , पाव वाटी तूप

५)एक चमचा जिरं , एक चमचा लिंबाचा रस.


कृती :-

१) साबुदाणा आठ-दहा तास भिजवावा .  साबुदाणा धुतल्यानंतर थोडं वरती दिसेल इतकं पाणी ठेवावं म्हणजे साबुदाणा चांगला भिजतो .

२) तुपाची फोडणी करून मिरच्यांचे तुकडे घालून परतावे .

३) साबुदाण्यात मीठ , साखर , शेंगदाण्याचा कूट , लिंबाचा रस आणि फोडणी घालून कालवावं .

४) हे मिश्रण दोन-तीन दिवसच ठेवायचं असेल तर फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजरमध्ये ठेवावं .

५) फ्रीजमधील मिश्रण काढून कुकरमध्ये एका ताटलीवर पसरून दोन-तीन मिनिटं वाफ दिली , की खिचडी तयार होते .

६) मायक्रोवेव्ह असेल तर दोन वाट्या मिश्रण झाकण ठेवून तीन-चार मिनिटं मायक्रो केलं तर मऊ मोकळी खिचडी तयार . ( दीड वाटी मिश्रणाची दोन प्लेट खिचडी होते . )

७) मिश्रण फ्रीजमधून काढल्यास ते घरातल्या तापमानाला आलं की एक वाफ द्यायची . 

मायक्रोवेव्हमध्ये पहिल्यांदा डीफ्रास्त करायचं आणि मग झकण ठेवून वाफ द्यायची.


************************************************************


@ साबुदाणा वडा.@

साहित्य :-

१) २ १/२ वाट्या साबुदाणा

२) १ १/४ वाटी दाण्याचे कूट

३) ५-६ मध्यम आकाराचे बटाटे

४) तिखट

५) मीठ

६) जीरे.


कृती :-

१) साबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा.

२) बटाटे उकडून साले काढून घ्यावीत.

३) ताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि चांगले मळून घ्यावेत.

४) मळून झाल्यावर छोटे छोटे वडे करुन लालसर तळून घ्यावेत.

५) हे गरमागरम वडे कोथिंबीरच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.


********


  @ उपवासाचे घावन.@


साहित्य :-

१) १ वाटी वरी तांदूळ

२) १ वाटी साबुदाणे

३) २ हिरव्या मिरच्या

४) २ चमचे नारळाचा चव

५) २ चमचे दाण्याचे कूट

६) १ चमचा जिरे

७) चवीपुरते मिठ

८) साजूक तूप.


कृती :-

१) साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे.

२) दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे.

३) नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी.

गरम गरम घावन नारळाच्या चटणी सर्व्ह करावे.


*******


@ रताळी आणि व-याच्या तांदळाचे पिठ चकल्या.@

साहित्य :-

रताळी.

वरयाचे तांदूळ.

हिरव्या मिरच्या.

आले.

मीठ.


कृती :-

रताळी उकडून, सोलून, किसून घ्या.नंतर त्यात वर्‍याच्या तांदळाचे पीठ हिरव्या मिरच्या थोडे वाटलेले आले व मीठ घालून पीठ तयार करा. नंतर ह्या पिठाच्या चकल्या करून गरमा-गरम खायला द्या.


********


@  वऱ्याचे तांदूळ व दाण्याची आमटी. / Varyache tandul wa danyachi amti. @


वऱ्याचे तांदूळ व दाण्याची आमटी :-

( सर्व सामग्री रेखांकित केली आहे. )

तांदुळासाठी :-

१. एक वाटी  वऱ्याचे तांदूळ धुऊन घ्यावेत व त्यात ४ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर उकळायला ठेवावेत. 

२. पाणी उकळून तांदुळापर्यंत आल्यावर गॅस बारीक करावा व झाकण ठेऊन पूर्ण पाणी अटेपर्यंत शिजवावे. 


आमटी साठी :-

१.)  एक वाटी दाण्याचे कूट घेऊन त्यात लागेल तसे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. 

२.) त्यात ३ वाट्या पाणी घालून थोड्यावेळ बाजूला ठेवावे. 

३.) एका पातेल्यात २ टीस्पून तेल गरम करून त्यात १/२ टीस्पून जिरे घालावेत. जिरे चुरचुरल्यावर त्यात ३/४ वाटी पाणी घालावे. 

४.) त्यातच ४-५ वाळलेली आमसुले घालून उकळी आणावी व ३-४ मिनिटे उकळू द्यावे. 

५.) आता वर तयार केलेली दाण्याच्या कुटाची पेस्ट त्यात घालावी व गॅस बारीक करावा. 

६.) चवीप्रमाणे मीठ व तिखट घालावे व मधे मधे हलवत आमटीला उकळी आणावी. 


वाढण्यासाठी :-

गरम गरम वऱ्याचे तांदूळ दाण्याच्या आमटी बरोबर वाढावेत. सोबत उपासाचे गोड लोणचे, बटाट्याचे किंव्हा साबूदाण्याचे पापड, व बटाट्याची उपासाची भाजी ही वाढावी. 


********


@ केळीचा रायता. @

साहित्य :-

1.पिकलेली केळी:३

2.वाळलेले बारीक खोबरे:१/२ कप

3.लिंबू:१

4.वेनिला किंवा साधे दही:१ कप

5.बारीक कापलेले बदाम:१ टेबल स्पून.


कृती :-

-वाळलेले बारीक खोबरे कोरडे च तांबुस होईपर्यंत भाजा.

-केळ्यांचे तुमच्या आवडीनुसार काप करा.त्या कापांना लिंबाचा रस चांगला लावा म्हणजे केळी काळी पडणार नाहीत.

-त्या कापांमधे दही,खोबरे आणि बदाम टाकून चांगले एकत्र करा.झाला तुमचा रायता तयार.

-तुम्ही हा रायता गार करून किंवा तसाच खाऊ शकता.तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्यात थोडी साखर घालू शकता.

-हा रायता तुम्ही साइड डिश म्हणून किंवा स्नॅक म्हणून तसेच खाऊ शकता.


**************

@ उपवासाचा बटाटा वडा @

सारणासाठी साहित्य :-

1. 1 किलो उकडलेले बटाटे

2. 1 कच्चा बटाटा किंवा १ रताळे किसलेले

3.  आले

4. हिरव्या मिरच्या(उपवासाला चालत असल्यास)

5. बारीक कापलेली कोथिंबीर

6. चवीप्रमाणे मीठ

7. साखर

8. एक चमचा लिंबू रस

9. दाण्याचा कुट

10. खवलेला ओला नारळ.


कव्हरसाठीचे साहित्य :-

1. राजगिरा पीठ

2. शिंगाडा पीठ

3. साबूदाणा पीठ (नसले तरी चालेल).

कृती :-

- प्रथम हिरव्या मिरच्या, आले व थोडेसे जीरे घालून वाटून घ्या. बटाटे गरम असतानाच सोलून घ्या व बारीक करा.

- नंतर ते गार झाल्यावरच त्यात चवीप्रमाणे आल्यासह मिरचीचा ठेचा, दाण्याचा कुट, खोवलेला ओला नारळ घाला.

- नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व एक चमचा साखर घाला वर लिंबाचा रस टाका व सर्व मिश्रण हाताने एकजीव करा.

- एकजीव झालेल्या सारणाचे तळहाताला थोडे पाणी लावून चपटे वडे थापून घ्या. सर्व पीठे एकत्र करुन त्यात पाणी घालून सरबरीत करा.

- त्यात थोडेसे मीठ, तिखट व किसलेला बटाटा किंवा रताळे घाला. कढईत तेल घालून तापवा.

- तेल गरम होताच त्यातून एक चमचा तेल काढून सरबरीत केलेल्या पिठात टाका.

- नंतर तापलेल्या तेलात चिमुटभर मीठ टाका म्हणजे वडे तेलकट होत नाहीत. वडे पिठात घोळवून तळून काढा व गरमागरम वडे खोबर्‍याच्या चटणी सोबत सर्व्ह करा.


****************


@ रताळ्याची कचोरी @


सारण :-

1. १ मूठ चिरलेली कोथिंबीर

2. १ वाटी खवलेले खोबरे

3. ४-५ हिरव्या मिरच्या

4. ५० ग्रॅम बेदाणा

5. मीठ

6. साखर.


कव्हरसाठीचे साहित्य :-

1.  २५० ग्रॅम रताळी

2. १ मोठा बटाटा

3. थोडेसे मीठ.


कृती :-

- रताळी व बटाटे उकडून घ्यावेत व सोलून, हाताने कुस्करून बारीक करावे.

- त्यात थोडे मीठ घालावे. १/२ चमचा तुपावर मिरच्यांचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर गॅसवरुन खाली उतरवून, त्यात इतर सर्व वस्तू घालुन सारण करावे.

- रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण करून कचोर्‍या ठेवाव्यात. नंतर आयत्या वेळी वर्‍याच्या तांदळाच्या

- पिठात घोळवून तुपात तळाव्यात.

- गरमगरम खायला द्याव्या. फार सुंदर लागतात. उपवासाला एकदम चांगल्या.


****************

@ खजूर मिल्क शेक. @

साहित्य :-

1. २ कप दूध, १२ खजूर, ३ ते ४ काजू, २ हिरवी वेलची,

2. तुम्हाला थंड चालत असल्यास १ कप बर्फाचे तुकडे.

कृती :-

- खजूर चांगला साफ करून त्याचे बारीक तुकडे करा.

- काजूचे बारीक तुकडे करून, हिरव्या वेलचीच्या दाण्यांची पुड करून घ्या.

- मिक्सरमध्ये खजुराचे बारीक केलेले तुकडे आणि थोडे दूध घालून चांगले फिरवून घ्या.

- आता त्यात वेलची पावडर आणि उरलेले दूध घालून पुन्हा मिक्समधून फिरवा.

- शेवटी बर्फाचे तुकडे घालून पुन्हा एकदा मिक्समधून फिरवून घ्या.

-तयार झालेले खजूराचे मिल्क शेक एका ग्लासात ओतून काजूच्या तुकड्यांनी गार्निश करून सर्वकरा .


***************

@ रताळा स्वीट. @

साहित्य:- 

1.  अर्धा किलो रताळी

2. साखर एक वाटी

3. ओला नारळ चव दीड वाटी

4. चार/पाच वेलदोडे

5.  तूप.


कृती :-

-  रताळ्याच्या साली काढा.

-  त्याचे पातळसर गोल काप करा नंतर काप धुवा. बाजूला ठेवा.

- मंदाग्नीवर जाड बुडाच्या पातेल्यात थोडे तूप गरम करा. त्यात रताळे काप घाला.

- झाकण ठेवून शिजत ठेवा.झाकणावर थोडे पाणी ओतून ठेवा म्हणजे आत रताळी मऊसर शिजतात.

- रताळी शिजली की त्यावर नारळ चव,साखर आणि वेलची पूड टाका.

-  थोडा वेळ मंदाग्नीवर शिजवा. थोड्या वेळाने भांडे उतरवून ठेवा.

- हे रताळा स्वीट सर्वांनाच आवडतात.


**********


@ बटाटा पूरी @

साहित्य :-

1. २ मोठे बटाटे, उकडलेले

2. १/२ कप साबुदाणा

3. ७ ते ८ मिरच्या

4. १/४ कप कोथिंबीर, चिरून

5. १/२ टिस्पून जिरे

6. ३ टेस्पून शेंगदाणा कूट

7. १ टिस्पून जिरेपूड

8. १ ते २ टेस्पून शिंगाडा पिठ (टीप)

9. चवीपुरते मिठ

10. तळण्यासाठी तेल.


कृती :-

-  १/२ कप साबुदाणा पाण्यात भिजवावा. अधिकचे पाणी काढून टाकावे. नंतर किंचीत पाणी घालावे.

- साबुदाण्याच्यावर १/२ सेमी येईल इतपत पाण्याची पातळी ठेवावी. साधारण ३-४ तास अशाप्रकारे भिजवून ठेवावे. भांडे वरून झाकावे.

- मिक्सरमध्ये ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडे मिठ घालून बारीक करावे. पाणी घालू नये.

- जर मिक्सर नसेल तर मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.

- शिजवलेले बटाटे किसून घ्यावे. त्यात मिरची-कोथिंबीरीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेले साबुदाणे, जिरेपूड आणि शिंगाडा पिठ घालून निट मळून गोळा बनवावा. चव पाहुन, लागल्यास मिठ घालावे.

-  मध्यम दिड इंचाचे गोळे करावे. तेल तापत ठेवावे. तेल तापले कि आच मिडीयम हायवर ठेवावी. एक प्लास्टिकचा जाड तुकडा घ्यावा. त्याला तेलाचा हात लावावा. प्रत्येक गोळा त्यावर जाडसर थापावा आणि मध्यभागी बोटाने भोक पाडावे. पातळ थापू नये, नाहीतर तेलात टाकल्यावर पुरी तुटते आणि विरघळते.

-  पुरी तेलात टाकल्यावर ती झार्‍याने अजिबात पलटू नये. पुरी पलटली ती हमखास तुटते. त्यावेळी झार्‍याने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईल. तळलेल्या पुर्‍या चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.


***********

@ दाण्याची आमटी @

साहित्य :-

1. 1 1/2 कप दाण्याचा कुट

2. ३ कप पाणी

3. मीठ चवीप्रमाणे

4. २ टीस्पून साखर

5. २-३ आमसुलं  

6. १/२ टीस्पून जिरे

7. २ हिरव्या मिरच्या

8. २ टेबलस्पून कोथिंबीर

9. ३ टेबलस्पून ओलं खोबरं

10. २ टेबलस्पून तूप.


कृती :-

-  दाण्याचा कुट पाण्यात मिक्स करा. त्यात मीठ, साखर, आमसुलं,  ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून उकळुन घ्या.

- फोडणीच्या कढईत तूप गरम करा. तूप कडकडीत तापले कि मिरची घाला.मिरची पांढरी झाली. कि जिरे घालून आमटीला फोडणी द्या.

-  दाण्याची आमटी व-याच्या  तांदुळा बरोबर सर्व्ह करा.


 **********

@ अ‍ॅपल रबडी. @

साहित्य :-

1.   गोड जातीची सफरचंदे, लहान असतील तर दोन आणि मोठे असेल तर १.

2.  लिंबाचा रस ४/५ थेंब किंवा चिमूटभर सायट्रीक अ‍ॅसिड

3.  आवडत असेल तर चिमूटभर दालचिनी पावडर ( किंवा आवडता स्वाद )

4.  १ टिस्पून बारीक केलेले अगर अगर

5.  एक कपभरून मिल्क पावडर

6.  १ टिस्पून साखर

7. १ टिस्पून साजूक तूप.

कृती :-

-  एका पातेल्यात पाव कप पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस  किंवा सायट्रीक अ‍ॅसिड आणि दालचिनी पूड एकत्र करा.

-  सफरचंदाचा मधलाच गोलाकार भाग कापून वेगळा करा.

- मग ते वरील पाण्यातच किसा.

- आता हे मिश्रण शिजत ठेवा. सतत ढवळत रहा. करकरीत सफरचंदे असतील तर मिश्रण शिजायला वेळ लागेल. पिठूळ असतील तर लगेच शिजतील. शिजवून जॅम करायचा नाही. सगळे मिश्रण छान एकजीव झाले आणि पाणी आटले कि आच बंद करा. सफरचंदाच्या गोडीवर अवलंबून साखर वापरायची आहे कि नाही ते ठरवा.

- साखर या मिश्रणातच घालून शिजवा.

- एका जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत १ टिस्पून साखर टाका आणि मंद आचेवर ठेवा. थोड्याच वेळात साखर वितळेल आणि ती सोनेरी रंगावर जाईल. आणखी थोड्याच वेळात काही भागात तपकिरी होऊ लागेल.

- तसे होऊ लाहले कि त्यात अर्धा कप पाणी टाका.

-  त्यात साजूक तूप टाका. पाण्याला छान उकळी आली कि त्यात मिल्क पावडर टाका आणि डावेने भराभर ढवळा. पाणी गरम असल्याने मिल्क पावडर चटकन मिसळने आणि मिश्रणाला आटीव दूधाचा रंग आणि स्वादही येतो.

- आच बंद करून त्यात सफरचंदाचे मिश्रण टाका आणि गरज वाटली तर हँड मिक्सरने ब्लेंड करा. आणि चमच्या चमच्याने आस्वाद घ्या.


***********

@ उपवासाचे अनारसे.@

साहित्य :-

1. जरुरीप्रमाणे वरई तांदूळ

2. साखर किंवा गूळ

3. खसखस

4. तूप.


 कृती :-

- वरई तांदूळ तीन दिवस भिजत ठेवावेत. मग उपसून स्वच्छ कपड्यावर अर्धवट वाळवावे. - नंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घ्यावे. झाकून ठेवावे.

- नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी.

- लालासर रंगावर तळून घ्यावेत. सुंदर दिसतात. आणि लागतातही चविष्ट.

*****************


@ दाण्याची चिक्की.@

साहित्य :-

1. दाणेकूट एक वाटी

2. साखर एक वाटी

3. तूप दोन चमचे

4. चिमुटभर मीठ


कृती :-

- मंद आचेवर पातेले ठेवून त्यात मीठ घाला. परता. नंतर त्यात साखर टाकून परता. साखर जळणार नाही

- याची दक्षता घा. पाणी घालायचे नसते. साखर विरघळू लागेल त्यावेळी एक चमचा तूप घाला. - दाणेकूट घाला.

- ढवळून घ्या. पोळपाटाला तुपाचा हलका हात लावून घ्या. दाण्याचे मिश्रण पोळपाटावर घाला. - लाटण्याचे मिश्रण पोळपाटावर सम पातळीवर लाटून घ्या. लगेच त्याच्या वड्या करा.


************

@ बटाट्याचा कीस.@

साहित्य :-

१) चार मोठे बटाटे,

२) दाण्याचे कूट,

३) चवीपुरते मीठ,

४) चिमुटभर साखर,

५) तूप एक मोठा चमचा,

६) जिरे फोडणीपुरते,

७) तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे,

८) बारीक चिरलेली कोथिंबीर,

९) खवणलेला ओला नारळ


कृती :

१) सर्वप्रथम बटाटे किसून घ्यावेत. त्यानंतर एक पातेली गॅसवर गरम करत ठेवावी.

२) पातेली थोडी गरम झाल्यावर त्यात तूप घालावे. तूप गरम झाल्यावर जिरे घालावे.

३) आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. मिरच्याचा रंग पांढरा झाल्यावर त्यावर बटाट्याचा कीस घालावा.

४) आता झाकण टाकून बटाट्याचा कीस शिजवावा. मग झाकण काढून त्यात मीठ, साखर, दाण्याचे कूट घालावे. व परत एक वाफ काढावी. गॅस बंद करावा. बटाट्याचा कीस तयार आहे.

५) आता ओला नारळ व कोथिंबीर

 घालून गरम गरमच खायला द्यावा.


******

@ फोडणीचे भगर.@

साहित्य :-

१) वरीचे तांदूळ एक वाटी,

२) हिरव्या मिरचीचे तुकडे,

३) जिरे,

४) मीठ,

५) साखर,

६) पाणी,

७) दाण्याचे कूट.


कृती :-

१) वरीच्या तांदुळाप्रमाणे तांदूळ धुवून परतून घ्यावेत. त्यानंतर एका पातेलीत तूप गरम करत ठेवावे.

२) त्यातच जिरे आणि मिरचीचे तुकडे घालावेत. त्यावर वरीचे तांदूळ घालून परत एकदा परतून घ्यावे.

३) आणि साधारण दुप्पट उकळते पाणी घालून फोडणीचे भगर शिजवून घ्यावे.

४) भगर शिजल्यानंतर त्यात दाण्याचे कूट घालावे. तूप सोडावे. म्हणजे भात मोकळा होईल.

५) गरम गरम फोडणीचे भगर खायला द्यावे.


******


@ उपवासाची बटाट्याची भाजी@

साहित्य :-

१) ३-४ मध्यम आकाराचे बटाटे

२) ३ टेबलस्पून दाण्याचा कुट

३) २ टेबलस्पून ओलं खोबरं

४) १  टीस्पून जिरे

५) २-३ हिरव्या मिरच्या

६) १ टीस्पून साखर

७) १ टेबलस्पून कोथिंबीर

८) २ टेबलस्पून तूप

९) मीठ चवीप्रमाणे


कृती :-

१) बटाटे कुकरमध्ये उकडून त्याची साले काढा आणि बारीक फोडी करा.साधारण १/२" x १/२" च्या चौकोनी फोडी करा.

२) बटाट्याच्या फोडींना मीठ साखर दाण्याचा कुट चोळून ठेवा.

३) कढईत  तूप कडकडीत गरम करा आणि जिरे आणि हिरवी मिरची फोडणीला घाला.  लगेच बटाट्याच्या फोडी घालून परता.

४) ओलं खोबरं कोथिंबीर घालून १ वाफ आणा आणि सर्व्ह करा.


✧═══❁❁═══✧✧═══❁❁═══✧✧═══❁❁═══✧✧═══❁❁═══✧


1.   चॉकलेट केक.   

साहित्य.   1. दीड कप मैदा

2. १/२ कप कोको पावडर

3. १ कप पीठी साखर

4. २ अंडी

5. १/२ चमचा खायचा सोडा

6. १ कप ताजे दही

7. १/२ कप वितळलेले लोणी

8. १ लहान चमचा व्हॅनिला इसेंस.    

कृती.   १) मैदा गाळून त्यात कोको पावडर व खायचा सोडा मिसळा.

२) लोणी व अंड्याध्ये साखर घालून फेटा. त्यात दही मिसळा.

३) आता यात मैदा थोडा-थोडा घालून मिसळत रहा. आता यात थोडेसे पाणी व इसेंस टाकून लाकडी चमच्याने हलवा.

४) आता केक पॉट मध्ये तूप लावून मैदा लावा.

५) मिश्रण पॉट मध्ये भरून ओव्हन मध्ये ३५० डिग्री फे. वर बेक करावे.

६) केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट बटर आइसिंग करावे..    


2.    फ्रूट केक.    

साहित्य.   1. २ संत्री

2. १ कप साखर

3. १ १/२ कप लोणी किंवा डालडा 

4. ५ अंडी

5. १ टी स्पून बेकिंग पावडर

6. १/२ चमचा मीठ

7. २ १/२ कप मैदा

8. ५० ग्रॅम बारीक चिरलेले काजू

9. ५० ग्रॅम करंट्स

10. २५ ग्रॅम संत्र्याची पाकवलेली साल

11. १० ग्रॅम साल काढलेले बदाम

12. ५० ग्रॅम बेदाणा

13. २५ ग्रॅम चेरीज्.    

कृती.   १) डब्याला पातळ डालडा लावून ठेवावा. ओव्हनचे तापमान ३७५ डि.F असावे किंवा १५० डि.C असावे. लोणी व साखर खूप फेसून घ्यावे.

२) अंड्यातले पिवळे व पांढरे बाजूला करुन पांढरे खूप फेसून घ्यावे. पिवळेही थोडे फेसून घ्यावे व लोणी साखरेत मिसळावे, नंतर त्यात चाळलेला मैदा, मीठ व बेकिंग पावडर हळुहळु घालावे.

३) थोड्या मैद्यात (१ टे.स्पू) फ्रूटचे तुकडे घोळवून तेही घालावेत. संत्र्याचा रस थोडा थोडा घालत मिश्रण सारखे करावे.

४) नंतर डालडा लावलेल्या डब्यात घालून वरच्या बाजूला बदामाचे काप लावावेत.

५) नंतर १ ते दीड तास बेक करावा. केकमध्ये विणायची सुई घालून काढावी, स्वच्छ आली की केक झाला असे समजावे..    


3.   स्पेशल प्लम केक.   

साहित्य.   1. 1-1/2 कप प्लरम स्लााइस

2. 1 कप मैदा

3. 3 फेटलेली अंडी 

4. 1/2 कप बटर

5. 1/2 कप साखर

6. 1 चमचा लेमन जेस्टप

7. चिमुटभर बेकिंग पाउडर.    

कृती.   १) ओव्हनला 325 डिग्रीवर प्रीहीट करुन घ्या.

२) आता केकच्या पॅनला बटर लावून ग्रीस करुन घ्या.

३) एका बाऊलमध्ये साखर आणि बटरला मिक्स करुन घ्या.

४)दुस-या बाउलमध्ये अंडे आणि लेमन जेस्टला मिक्स करा आणि हे मिश्रण बटर असलेल्या मिश्रणात मिक्स करा.

५)आता बटर असलेल्या मिश्रणात मैदा आणि बेकिंग पावडर टाका.

६) हे मिश्रण केकच्या भांड्यात पसरवा. आता या मिश्रणावर स्लाइस केले प्लम ठेवा आणि हव्या तशा पध्दतीने सजवा.

७) हे ४५ मिनिट बेक करा आणि थंड झाल्यावर सर्व्ह करा..   


4.   एगलेस कॅरेट केक.   

साहित्य.  1. 3-4 कप मैदा

2. 1-4 कप गव्हाचे पीठ

3. 1-2 कप किसलेले गाजर

4. 3-4 कप दही

5. 1-4 कप ऑलिव्ह ऑइल

6. 2.5 चमचे दूध

7. 1-2 चमचे साखर

8. 1-2 चमचे वेनीला इसेंस

9. 1-4 चमचे दालचीनी पावडर

10. 1-2 चमचे बेकिंग पावडर

11. 1-4 चमचे मीठ

12. मुठ्ठीभर अखरोड बारीक केलेले.   

कृती.   १) मैदा आणि गव्हाच्या पीठाला बेकिंगसोडा आणि बेंकिंग पावडरसोबत गाळून घ्या आणि एका वाटीत दही, साखर, दूध आणि ऑलिव्हि ऑइल सोबत मिक्स करुन फेटून घ्या.

२) लक्षात ठेवा की, साखर चांगल्या प्रकारे मिक्स झाली पाहिजे.

३) मग यामध्ये दालचीनी पावडर, वेनिला इसेंस टाकून पुन्हा फेटा. शेवटी गाजर आणि मैदा, गहूचे मिश्रण यामध्ये टाका.

४) हे चांगल्या प्रकारे फेटून घ्या आणि यामध्ये बारीक केले अखरोट टाका.

५) ओव्हनला 182 डिग्री वर 10 मिनिटांसाठी प्रीहीट करा.

६) तोपर्यंत टिनमध्ये बटर पेपर लावून त्यावर तूप लावून मैदा कोरडा मैदा टाका.

७) आता केकला 20 -25 मिनिटे ठेवा आणि शेवटी चेक करुन पाहा, तयार झाले की नाही.

८) तुमचे मफिन तयार आहेत. हे लगेच एखाद्या ओल्या कपड्यावर काढून १५ मिनिटांपर्यंत गार होऊ द्या.

९) मग या मधून बटर पेपर काढा आणि पुन्हा हे थंड होण्यासाठी एक तासभर ठेवा. तुमचा एगलेस कॅरेट केक तयार आहे..    

5.    भोपळ्याचा केक.   

साहित्य.   1. 250 ग्रॅम तांबडा भोपळा

2. अर्धी वाटी गूळ

3. वाटीभर कणीक

4. चिमूटभर खाण्याचा सोडा

5. दोन चमचे तेल.    

कृती.   १) २५० ग्रॅम तांबडा भोपळा किसून घ्यावा.

२) त्यात अर्धी वाटी गूळ, वाटीभर कणीक घालून कालवावे. त्यातच चिमूटभर खाण्याचा सोडा व दोन चमचे गोडतेल घालावे.

३) सर्व मिश्रण कालवून घ्यावे. केकच्या भांड्याला आतून थोडे तेल लावावे. वरील गोळा त्यात घालावा व ओव्हनमध्ये 40 मिनिटे बेक करावा..     


6.   स्पंज केक.    

साहित्य.   1.दीड कप पिठी साखर

2. एक चमचा बेकिंग पावडर

3. एक चमचा vanila इन्सेस

4. अर्धी वाटी टूटी फ्रुटी (ऐच्छिक)

5. सव्वा कप लोणी

6. चार फेटलेली अंडी

7. दोन कप मैदा

8. चिमुटभर मीठ.    

कृती.    १) प्रथम परातीत लोणी आणि पिठी साखर हलकी होईपर्यंत फेसावं. त्यात अंडी आणि मीठ, तसंच इन्सेस घालून सर्व एकजीव होईपर्यंत फेसावं.

२) मैदा आणि बेकिंग पूड एकत्र करून तीन वेळा चाळावं. थोडया मैदयात टूटी फ्रुटी घोळवून बाजूला ठेवावी.

३) चाळलेला मैदा लोणी-साखरेच्या मिश्रणात हलक्या हातानं मिसळून एकजीव करावा. नंतर 

त्यात टूटी फ्रुटी मिसळावी.

४) एका ऐलुमिनियमच्या भांडयाला लोण्याचा हात फिरवून त्यात केकचं मिश्रण ओतावं. गैसवर कुकरचं मुख्य भांडं तापत ठेवून त्यात वाळू पसरावी.

५) वाळू चांगली तापल्यावर त्यावर केकचं भांडं ठेवून गैस बारीक करावा.

६) दरम्यान शेजारच्या बर्नरवर बीडाचा किंवा लोखंडी तवा चांगला तापवून टो कुकरच्या तोंडावर ठेवावा.

७) शक्य असल्यास दोन तवे आलटून पालटून वापरावेत. त्यामुळं केकला वरच्या बाजूनंही लालसर रंग येतो.

८) केक कडेनं सुटला आणि सुरी खुपसली असता कोरडी निघाली की केक भाजला गेलं असं समजावं.. 


0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000


1.   कांद्याच्या पातीचा झुणका.    

साहित्य.    • कांद्याची पात एक जुडी

• हरभरा डाळीचं पीठ एक वाटी

• हळद अर्धा चमचा

• मिरची पावडर एक चमचा

• तेल पळीभर

• जिरं एक चमचा

• मोहरी , पाणी

• चवीनुसार मीठ.    

कृती.    • कांद्याच्या पातीपासून कांदे वेगळे काढावेत .  पात स्वच्छ धुवून चिरून घ्यावी . 

• त्यामध्ये डाळीचं पीठ , तिखट , मीठ घालून एकत्र करावं .  जिरं-मोहरीची  फोडणी करावी . 

• मग एकत्र केलेलं पात आणि पीठ टाकावं .  अर्धा कप पाण्याचा हबका मरवा .  अलगद मिश्रण हलवावं . 

• झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ येऊ दयावी .  मग परत हलवून पाच मिनिटं झाकण न ठेवता झुणका होऊ दयावा..     


2.     काजूची उसळ.     

साहित्य.    • ओले काजू एक वाटी

• धने-जिरं एक एक चमचा

• सुक्या मिरच्या एक-दोन

• ओलं खोबरं अर्धी वाटी

• चवीनुसार मीठ.    

कृती.     • ओले काजू पाण्यात टाकून नीट सोलून व धुऊन घ्यावे .  (त्यावर चिक असल्यानं घसा खवखवतो .)

• धने , जिरं , सुक्या मिरच्या गरम करून घ्याव्या .  अर्धी वाटी ओलं खोबरं  आणि वरील सर्व पदार्थ वाटून घ्यावे . 

• काजू फोडणीला टाकून त्यात एक वाटी पाणी ओतावं .  उकळी आल्याबरोबर  मीठ टाकावं . 

• काजू शिजत आले की त्यात वाटलेला मसाला घालून ढवळावं .  आवश्यक असेल तर थोडं पाणी , आवडत असल्यास थोडा गूळ व जराशी चिंच घालावी .  या उसळीत गरम मसाला व भाजून कांदाही चांगला लागतो.     


3.    काबुली चण्याचा चटका.    

साहित्य.    • २ वाट्या शिजलेले चणे

• ३ लिंबे (रस)

• ४ चमचे भाजलेल्या तिळाची पूड

• २ चमचे तिळाचे तेल किंवा रिफाईंड तेल

• २-३ लसूण पाकळ्या

• अर्धा चमचा मीठ.     

कृती.    • १ वाटी काबुली चणे आदल्या रात्री भिजत टाकावेत. दुसर्या दिवशी किंवा १०-१२ तासानंतर निथळावे व दुसरे पाणी व मीठ घालून कुकरमध्ये शिजवावे. 

• काबुली चणे डब्यातले वापरल्यास ही खिटखिट करावी लागत नाही.

• लिंबाचा रस काढावा. लसूण पाकळ्या वाटाव्या. सर्व जिन्नस मिक्सरमधे घालावेत व मिश्रण एकजीव होईपर्यंत मऊ वाटून घ्यावे. 

• लहान वाडग्यात झाकून ठेवावे व गार करावे. एका डिन्नर प्लेटमध्ये गाजरे, मुळा, काकड्या, पातीचे कांदे, कॉलीफ्लॉवरचे अर्धवट उकडलेले तुरे अशा भाज्याचे उभट लांबट तुकडे मांडावे, मध्यभागी छोट्या वाटीत किंवा बोलमध्ये हा चटका ठेवावा..     


4.     कारल्याची भरून भाजी.     

साहित्य.    • छोटी कोवळी कारली पाव किलो

• तीळकूट चार चमचे

• खोबऱ्याची पूड चार चमचे

• लाल तिखट दोन चमचे

• धने-जीऱ्याची पूड दोन चमचे

• खसखस भाजून दोन चमचे

• दोन छोटे कांदे चिरून तेलावर परतून

• कच्चा मसाला दोन चमचे (एक चमचा धने + तीन-चार लवंगा + एक तुकडा जायपत्री + तीन वेलदोडे + अर्धा चमचा जिरं मिक्सरवर बारीक करून घेऊन ती पूड)

• चिंच-गुळाचा कोळ अर्धी वाटी.     

कृती.    • आदल्या रात्री किंवा करण्याच्या दोन दिवस आधी कारली सोलून त्याचे बरोबर दोन भाग करावेत .  दोन्ही टोकाकडील भाग काढून टाकावेत .

• आतल्या बिया काढून टाकाव्यात .  नंतर कारल्यांना मीठ व हळद लावून काही वेळ तसंच ठेवावं .

• साधारण दोन तासांनी कारली व्यवस्थित पिळून घ्यावीत .  ज्यांना त्याचा कडवटपणा आवडत असेल त्यांनी कमी पिळावीत .

• पिळलेली कारली पसरून घेऊन त्याच्या खोलगट भागात तीळकूट , खोबऱ्याची  पूड , खसखशीची पूड , धने-जिरे पूड , कच्चा मसाला , कांदा परतलेला व कोथिंबीर यांचं मिश्रण त्यात भरावं .

• चवीपुरतं मीठ व हळदही घालावी .  मोठया पसरट भांड्यात तेलाची फोडणी करून त्यात कारली घालावीत .

• मंद आचेवर भाजी शिजू द्यावी व शिजतानाच त्यात चिंचगुळाचा कोळ घालावा .

• कारल्याचे जर दोन भाग करायचे नसतील तर कारल्याच्या पाठीवर एक छेद देऊन आतल्या बिया काढून टाकून साधारणपणे कारली पिळून घ्यावी .

• कारल्याम्ध्ये वरील मसाला भरून मसाला बाहेर येऊ नये यासाठी कारलं दोऱ्यानं बांधून ठेवावं .  रश्श्यासाठी कढईत फोडणी करून त्यात तीन-चार वाट्या पाणी घालावं .

• पाणी उकळत असतानाच त्यात तिखट , मीठ , कोथिंबीर , चिंच-गुळाचा कोळ घालावा .

• रश्श्याला दाटपणा येण्यासाठी थोडंसं म्हणजे दोन छोटे चमचे डाळीचं पीठ व तीळकूट त्यात घालावं .

• रश्श्यात बांधलेली कारली मऊ होईपर्यंत शिजू द्यावी .  सगळी कारली शिजल्यावर त्यावर बांधलेला दोरा कापून टाकावा.      


5.    कुरकुरीत कारली    

साहित्य.    • सुकं खोबरं एक वाटी

• तीळ एक चमचा

• जिरं एक चमचा भाजलेलं

• हरभरा डाळ पाच चमचे

• उडीद डाळ एक चिमुट

• लाल मिरची एक हे सर्व जिन्नस खमंग,  कोरडे भाजून घ्यावेत .  नंतर सर्व साहित्य एकत्र वाटून घ्यावं..     

कृती.    • कारल्याची फक्त देठं काढून बोटभर लांबीचे एकसारखे काप करावेत . 

• उकळत्या पाण्यात एक चिमुट हळद व एक चिमुट मीठ घालून कारल्याचे     तुकडे टाकावेत . 

• झाकण ठेवून पाच मिनिटं सळसळ उकळून घ्यावेत .  नंतर चाळणीत किंवा रोवळीत ओतून पाणी काढून टाकावं . त्यावर लगेच गार पाणी ओतावं .  पाणी पूर्णपणे निथळल्यावर तुकडे मुठीत    दाबून पाणी काढून टाकावं . 

• हे करताना तुकडे मोडू देऊ नयेत .  ते सर्व तुकडे कागदावर दहा            मिनिटं पसरावेत .    

• एक ते दीड डाव तेल गरम करून कारल्याचे तुकडे चुरचुरीत-कुरकुरीत तळून काढावेत .  बारीक चिरलेला कांदा त्याच तेलात परतावा . 

• कारली-कांदा काढून घेऊन त्याच कढाईत किंवा दुसऱ्या पैनमध्ये गूळ (आवडीप्रमाणे) घ्यावा व दीड वाटी पाणी घालून गरम करावं .  पाक करू नये . 

• गूळ विरघळला की त्यात तिखट , मीठ , हळद , हिंग , आमचूर , जिरेपूड , कोथिंबीर आणि वरील मसाला यांचं एकत्रित मिश्रण करून टाकावं . 

• कारली व कांदा घालवा .  सर्व मसाला , गूळ सॉस कारल्याच्या फोडींना लागला पाहिजे..     


6.    कुर्डूची भाजी    

साहित्य.   • कुर्डूचा कोवळा पाला (टीक्षा) चार वाटया

• कांदे दोन

• हिरव्या मिरच्या एक-दोन

• मीठ , तिखट

• गुळ , तेल

• फोडणीचं साहित्य

• चवीनुसार मीठ.     

कृती.    • पाला बारीक चिरावा .  कोवळे देठ असल्यास चालतील.

• तेलाच्या फोडणीत बारीक चिरलेला कांदा एक वाटी , मिरचीचे तुकडे टाकून तांबूस परतावे.

• त्यावर पाला टाकून परतावं .  चवीला तिखट , मीठ , गुळ , खोबरं घालून मंद आचेवर वाफा येऊ द्याव्यात.. 


@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@


1.   खव्याचे गुलाबजाम.  

साहित्य.    • ५०० ग्रॅम खवा

• १ वाटी बारीक रवा

• ७५० ग्रॅम साखर

• थोडा रोझ इसेन्स

• चिमूटभर खायचा सोडा..     

कृती.    • खवा पुरणयंत्रातून काढा. नंतर त्यात रवा व सोडा घालून मळा. 

• वरील मिश्रणाचे ५० ग्रॅम करा. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करून त्यात रोझ इसेन्स घाला. 

• वरील गोळे तुपात तळा व पाकात टाका. 

• गोळे पाकात टाकताना पाक गरम असावा. 

• अर्धा तास मुरल्यानंतर वाढा..     


2.    तिळाच्या वड्या  

साहित्य.    • १/२ कप भाजलेले तीळ

१/२ कप किसून भाजलेले सुके खोबरे

१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट

४ टेस्पून मिल्क पावडर

१/२ कप साखर, वरपर्यंत भरून

१/४ कप पाणी

१/२ टीस्पून वेलची पूड.     

कृती.    • भाजलेले तीळ मिक्सरमध्ये भरडसर वाटा. पूर्ण पावडर करू नका. फक्त तीळ मोडायचे आहेत.

भरड तीळ, खोबरे, शेंगदाणे कूट, वेलची पूड आणि मिल्क पावडर तयार ठेवावे. टीनचा ट्रे तयार ठेवावा. आतून तूप लावून घ्यावे. जर टीन ट्रे नसेल तर पोळपाटाला तूप लावून घ्यावे.

साखर आणि पाणी एकत्र करावे. उकळी काढून एक तारी पाक करावा. यात वरील मिश्रण घालावे. ढवळून ट्रेमध्ये ओतावे. समान पसरवून घ्यावे. वाटल्यास वरून थोडे किसलेले खोबरे घालावे. प्लास्टिक पेपरला तुपाचा हात लावून खोबरे थोडे प्रेस करावे.

गरम असतानाच तुपाचा हात लावलेल्या सुरीने चौकोनी काप करून खुणा आखून घ्याव्यात. मिश्रण थंड झाले कि वड्या विलग कराव्यात..     


3.    खजुराचे लाडू    

साहित्य.    • २५ खजूर, बिया काढून (मिक्सरमध्ये भरडसर वाटून १ कप)

१/२ कप बदाम, भरडसर वाटून

१/२ कप किसलेले सुके खोबरे, गुलाबीसर भाजून

१ टेस्पून तूप

१ टीस्पून खसखस.    

कृती.   • खजुराच्या बिया काढून खजूर मिक्सरमध्ये भरडसर वाटून घ्यावे. नॉनस्टिक पॅनमध्ये तूप गरम करावे त्यात खसखस घालून काही सेकंद परतावे. त्यात भरडसर वाटलेले बदाम, खोबरे आणि खजूर घालून मंद आचेवर गरम करावे.

नीट मिक्स झाले कि थाळीमध्ये काढून ठेवावे. हाताच्या तळव्यांना थोडे तूप लावून मिश्रण कोमटसर असतानाच लाडू बांधावेत.

शक्यतो एक ते दोन घासात संपेल इतपतच लाडूचा आकार असावा. खजूर उष्ण असतात एक लाडू आणि त्यावर ग्लासभर दुध प्यायल्यास शरीराला भरपूर उष्मांक मिळतात.

टीपा:

१) साध्या खजूराप्रमाणेच काळ्या खजूराचेही अशाप्रकारे लाडू करू शकतो.

२) मी फक्त बदामच वापरले होते. आवडीनुसार पिस्ता किंवा काजू असे सर्व मिळून अर्धा कप वापरू शकतो. जर जास्त ड्राय फ्रुट्स वापरायची असतील तर खजूराचे प्रमाणही वाढवावे. नाहीतर लाडू नीट बांधले जात नाहीत.

३) तुपाचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.

४) मी बदामाच्या रेडीमेड काप मिळतात ते वापरले होते. ते शक्यतो वापरू नयेत कारण लाडू बांधायला थोडे त्रासदायक पडते.

५) खजूराला ओलसरपणा असावा. कोरडे खडखडीत खजूर लाडवांसाठी चांगले लागत नाहीत..            


00000000000000000000000000000000000000000000000000000000000000000


पौष्टिक आहे भाताची पेज; जाणून घ्या 'हे' फायदे, 

भाताची पेज प्यायल्यामुळे 'या' ८ समस्या होतील दूर....    

कोणत्याही आजारपणा हलकं आणि पौष्टिक आहार घेणं गरजेचं असतं. त्यामुळे अशक्तपणा दूर होतो आणि लवकर बरं वाटतं. आता या आजारपणा हलका आहारा घ्यायचा असतो त्यामुळे अनेक आई किंवा आजी भाताची पेज करून देतात. परंतु, भाताची पेज म्हणजे आजारी व्यक्तीचं खाणं असा अनेकांचा समज असतो. परंतु, असं नसून पेज पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे पेज ही आजारी व्यक्तीच नव्हे तर ठणठणीत बरे असणारे, लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही पिऊ शकतात. त्यामुळे पेज पिण्याचे फायदे कोणते ते जाणून घेऊयात..    


१. पेज प्यायल्यामुळे अशक्तपणा दूर होतो..    

२. भूक वाढते..    

३.थकवा दूर होतो..   

४. शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते..    

५. पचायला हलकी असल्यामुळे सहज अन्नपचन होतं..    

६. तांदळाच्या पेजेमध्ये थोडासा गूळ घातल्यास रक्ताची कमतरता दूर होते..   

७. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो..   

८. वजन कमी असल्यास पेजेमध्ये थोडं साजूक तूप घालावं. त्यामुळे वजन वाढतं..    


(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.).    

%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


 मित्रांनो आरोग्यवर्धक काही टॉनिक आपल्या स्वयंपाक घरात किंवा आपल्या खाऊच्या डब्यात असतात. 

 असेच काही टॉनिक व त्यांचे उपयोग आपण पुढील लेखात पाहणार आहोत.      


टाॅनीक्स घरातली

गूळ + खोबरे = बुद्धीवर्धक

(म्हणून बाप्पाचा नैवेद्य).


गूळ + शेंगदाणे = शक्तिवर्धक

(म्हणूनच श्री हनुमानाचा नैवेद्य).

तिळ + गुळ = कॅल्शियम, मॅग्नेशियम,आयर्न + झिंक + सेलेनियम.

(हृदयासाठी फायदेशीर आणि थंडीमध्ये शरीर गरम ठेवायला उपयोगी,) (यातले सेलेनियम - कॅन्सर पेशींची वाढ रोखण्यास मदत करते) म्हणून संक्रांतीला गुळ पोळी.

थंडीत बाजरीची तिळ लावलेली भाकरी  - शरीरात उर्जा (उष्णता) निर्माण करण्यासाठी.

डिंकाचे लाडू किंवा राजगिरा लाडू

गुळतुप पोळी, शेंगदाणा चिक्की किंवा भिजवलेले हरबरे - ताकद मिळण्यासाठी.


उन्हाळ्यात नाचणीचे अंबिल, ताक, मठ्ठा, लिंबु सरबत, सोलकढी, इतर सरबते  - शरीरात थंडावा निर्माण करुन दाह कमी करण्यासाठी.


असे अनेक पदार्थ मिश्रणाचे केमिकल कंपोजिशन पाहिल्यास त्या शरीरासाठी फायदेशीर दिसतील.


आपल्याला फक्त सण साजरे करायला शिकवले जाते त्यामागचे सायन्स, त्याच वातावरणात तेच पदार्थ का खावेत? हे  शिकवले जात नाही, कारण हे जर शिकवले तर Born vita कोण पिणार?

आपले पूर्वज, लढाऊ योद्धे तर bornvita, कॉम्प्लेन पीत नव्हते ना? मग त्यांच्यात कमजोरी, ताकद कमी होती का? 


अहो, आपला एक एक मावळा ५० शत्रूंशी एकटा लढायचा! कुठले व्हे - प्रोटीन, क्रिएटिन होते का तेव्हा? 

शिवाय आपले पुर्वज एवढे हुशार होते, ज्यांनी अफाट शोध लावले, ते कुठले व्हिटॅमिन, टॉनिक पीत होते का?


आपले पूर्वज हे सर्व देशी पदार्थ, नियमित नक्कीच खात असतील, म्हणूनच आताच्या आपल्या पिढी पेक्षा त्यांच्यात ताकद जास्त होती, जास्त निरोगी होते आणि जास्त बुद्धिमान पण होते. अहो वयाच्या १८-१९ वर्षी वागभट्टांचे संपुर्ण आयुर्वेद, आर्यभट्ट यांचे संपूर्ण भूमिती बीजगणित ज्ञान,  ज्ञानेश्वरी लिहले राव तेव्हाच्या लोकांनी,

कुठले टॉनिक पीत होते का ते? स्वतःला प्रश्न विचारा!


आणि शिवाय तेव्हा कुठलेही हानिकारक केमिकल मारलेले पण अन्न नसायचे, गाईचे दूध पण प्युअर... 


आपण हजारो वर्षांपासूनचं सायन्स मध्ये ऍडव्हान्स होतो. आपल्याला या सर्वांची गरज नाही...


स्वदेशी खा, ताकद वाढवा, आपल्या संस्कृतीवर विश्वास ठेवा!   


0000000000000000000000000000000000000000000000000000000000000000


1.   अननसाचा हलवा

साहित्य.    • १ किलो ताज्या अननसाचे लहान तुकडे

• २५० ग्रॅम खवा

• एक-दीड वाटी ताजी घोटलेली साय किंवा क्रीम

• ५०० ग्रॅम साखर

• ४ मोठे चमचे तूप

• पाव च्मचा केशर (ऐच्छिक)

• १ वाटी पाणी

• २-३ चमचे काजू बदामाचे पातळ काप.    

कृती.    • साखरेत पाणी घालून दोनतारी जाड पाक मंद आंचेवर करावा. 

• पाक तयार झाला की त्यात अननसाचे तुकडे घालावेत. त्यांना सुटलेले पाणीही त्यात घालावे. 

• मंद आंचेवर अननस शिजवावा. अधूनमधून ढवळावे. गरम पाण्यात केशर भिजत ठेवावे. 

• उन्हाळ्यात केशर वापरू नये. उष्ण पडते. अननस शिजत आला की पाकही आळतो व मिश्रण घट्ट होऊ लागते. 

• केशर घालायचे असल्यास त्यात घालावे. 

• दुसऱ्या जाड बुडाच्या पातेल्यात तूप तापले की अननसाचे मिश्रण घालून परतावे. 

• खवा त्यातच कुस्करून घालावा व मिसळेपर्यंत सतत ढवळावे. 

• ३-४ मिनिटे ढवळून खाली उतरवावे व कोमट होऊ द्यावे. पुडिंग बोलमधे घालून त्यावर साय व काजू-बदामाचे काप घालावे.

• पार्टीसाठी करायचा असल्यास साय किंवा क्रीमऐवजी बरोबर व्हॅनिला किंवा दुसरे रंगसंगती व स्वादसंगती साधणारे आईस्क्रीम द्यावे. हा हलवा दोनतीन दिवस अगोदर करून ठेवला तरी चालतो. मात्र अननस ताजा, पूर्ण पिकलेला व रसाळ हवा. डब्यातला घेऊ नये. हे पुडिंग मोठ्या पार्ट्यात करायलाही हरकत नाही..    


2.    बदाम-सुजीचा हलवा.

साहित्य.   • एक वाटी जाडसर रवा (सुजी)

• अर्धी वाटी तूप

• एक वाटी दुध

• अडीच वाटी साखर

• अडीच वाटी बदाम (बदाम ब्लांच करून त्याचे तुकडे करावेत)

• दीड चमचे वेलचीपूड

• केशरच्या काही काडया..    

कृती.  • कढाई तापवून त्यात रवा भाजून घ्यावा .  बदाम ब्लांच करून पुसून घ्यावेत . 

• त्याची सालं काढावीत आणि मिक्सरवर त्याची जाडसर पूड करावी . 

• कढाईत तूप गरम करून त्यात ही बदामाची पूड लालसर सोनेरी रंगावर परतावी . 

• त्यात भाजलेला रवा घालून नीट ढवळावा .  त्यावर साखर आणि नंतर दुध घालून हे मिश्रण नीट मिसळून एकजीव करावं . 

• वरती झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दयावं .  एक-दोन दणदणीत वाफा काढल्यावर त्यात केशर मिसळून हलवा . 

• थलथलीत होईपर्यंत शिजवावा .  वरून वेलचीपूड घालून हलवा नीट एकत्र करावं .  खायला देताना वरून थोडं तूप सोडून गरम गरम वाढावा.    


3.    मुगाच्या डाळीचा हलवा   

साहित्य.   • २ वाट्या मुगाची डाळ

• २ वाट्या साखर

• ३ वाट्या दूध

• १ १/२ वाटी डालडा

• १५० ग्रॅम खवा

• ७-८ वेलदोड्याची पूड

• २५ ग्रॅम बेदाणा

• थोडा पिवळा रंग.    

कृती.    • मुगाची डाळ भिजत घालून वाटावी. नंतर वाटालेल्या डाळीत २ वाट्या दूध घालून कालवावे व तूप तापल्यावर त्यात हे डाळीचे मिश्रण घालून चांगले मोकळे होईपर्यंत परतावे.

• मग त्यात रंग घालावा. नंतर साखर घालून मिश्रण जरा घट्ट झाले कि उतरावे.नंतर त्यात बेदाणा व वेलचीपूड घालावी. 

• खव्यामध्ये १ वाटी दूध घालून सारखा करावा व खवा गॅसवर ठेवून जरा आटवून घ्यावा.आयत्या वेळी मुगाच्या डाळीच्या हलव्यात खवा घालून सर्व्ह करावे..    


4.   कलाकंद

साहित्य.   • १ लिटर दुध

• १/२ टीस्पून सायट्रिक अॅसीड किंवा एका लिंबाचा रस

• दीडशे ग्राम खवा

• ३/४ कप साखर (साधारण १५० ते १७५ ग्राम)

• १/२ टीस्पून वेलची पुड

• पिस्त्याचे पातळ काप.    

कृती.    • दुध जाड बुडाच्या पातेल्यात गरम करत ठेवावे. दुध गरम झाले कि त्यात चिमटीचिमटीने सायट्रिक अॅसीड घालून तळापासून ढवळावे. दुध फाटले कि सुती कपड्यावर पनीर गाळून घ्यावे.

• गाळलेले पनीर फडक्यातच असताना गार पाण्याने थोडे धुवून घ्यावे म्हणजे लिंबाची/ सायट्रिक अॅसीडची आंबट चव आणि वास निघून जाईल. गच्च पिळून पनीर लगेच काढून एका वाडग्यात ठेवून द्यावे.

• खवा आणि साखर एकत्र करून नॉनस्टिक भांड्यात मध्यम आचेवर गरम करत ठेवावे. साखर वितळली कि मिश्रण पातळ होईल. सतत ढवळत राहावे. ५ मिनिटांनी पनीर आणि वेलची पुड घालावी.

• पनीर घातल्यावरही ढवळत राहावे. मिश्रण आळून गोळा बनायला सुरुवात झाली कि लगेच टीनच्या ट्रेमध्ये मिश्रण जाडसर पण एकसमान पसरवावे. वरून पिस्त्याचे काप घालावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.

• वड्या उरल्या तर फ्रीजमध्ये ठेवाव्यात.

टिप्स:

• आवडीनुसार खवा किंवा पनीरचे प्रमाण कमीजास्त करावे.

• पनीर ताजेच बनवावे. तसेच दुध फाटल्यावर गाळून, घट्ट पिळून लगेच पनीर वापरावा. पाणी निथळण्यासाठी खूप वेळ टांगून ठेवू नये.

• मी वेलची-केशर यांचे रेडीमेड सिरप मिळते ते चमचाभर वापरले होते. त्यामुळे रंगही पिवळसर येतो आणि केशर वेलचीचा स्वादही छान येतो.

• मी खवा रिकोटा चीजपासून बनवला होता. साधारण ४२५ ग्राम रिकोटा चीजपासून पावणे दोनशे ग्राम खवा बनतो.

• ३/४ कप साखरेमुळे बेताचे गोड होते. अजून गोड हवे असेल तर २ ते ३ टेस्पून साखर वाढवावी.

• मिश्रण ट्रेमध्ये थापल्यानंतर वरून चांदीचा वर्खही लावू शकतो. त्यामुळे कलाकंद अधिक आकर्षक दिसेल..    


5.    काजू कतली

साहित्य.    • सव्वा कप काजूची बारीक पूड

• ३/४ कप पिठी साखर

• १/२ कप मिल्क पावडर

• १/४ कप दूध

• १ टीस्पून तूप

• १/४ टीस्पून वेलचीपूड

• चांदीचा वर्ख सजावटीसाठी.     

कृती.    • सव्वा कपपैकी १ कप काजू पूड, तूप, पिठी साखर, मिल्क पावडर, दुध आणि वेलची पावडर एका काचेच्या बोलमध्ये एकत्र करावे. नीट मिक्स करावे. गुठळ्या राहू देऊ नयेत.

• मिश्रण २ ते ३ मिनिटे मायक्रोवेव करावे. दर ५० सेकंदानी ढवळा. मिश्रण चांगले उकळले की बाहेर काढावे. आळेस्तोवर मध्येमध्ये ढवळावे.

• मिश्रण जरा आळले कि त्यात लागल्यास थोडी काजू पावडर घालावी. नीट मिक्स करून कणिक जेवढी घट्ट असते तसा गोळा तयार करावा.

• पोळपाटाला किंवा फ्लॅट सरफेसला तुपाचा हात लावून घ्यावा. त्यावर मिश्रणाचा गोळा लाटून जाडसर पोळी लाटावी. 

• चांदीचा वर्ख लावून शंकरपाळ्याच्या आकारात वड्या कापाव्यात.

टिप्स: 

• काजूची पूड एकदम बारीक असावी. वाटल्यास बारीक केलेली पूड बारीक चाळणीने चाळून जाडसर काजूची पूड परत बारीक करावी.

• काजू कतली मिश्रणात थोडे केशर घातले तरी रंग आणि चव खूप छान येते. गरम दुधामध्ये २-३ चिमटी केशर भिजवून चिमटीने कुस्करून घ्यावे. आणि हे दुध मिश्रणात घालावे.

• मिल्क पावडरऐवजी हलकासा भाजलेला खवा वापरला तरीही चालेल..    


6.    रव्याचा केक (अंड्याशिवाय) 

साहित्य.   • दीड वाटी रवा

• १ वाटी दूध

• १ वाटी दही

• १ वाटी साखर

• ४ वेलदोडे (पूड)

• ४ काजू ( पातळ काप)

• १० बेदाणे

• ८-१० चारोळ्या (ऐच्छिक)

• अर्धा चमचा बेकिंग सोडा

• १ वाटी लोणी किंवा तूप

• २-३ थेंब केशर एसेन्स किंवा रंग

• पाव चमचा मीठ..    

कृती.    • दही व साखर मिसळून घ्यावे. साखर विरघळली की नंतर त्यात दूध, रवा, वेलचीपूड, चारोळी, मीठ, लोणी, रंग व सोडा क्रमाने घालून चांगले मिसळावे. तासभर झाकून ठेवावे.

• नंतर तुपाचा पातळ हात सारवलेल्या भांड्यात मिश्रण ओतावे. मध्यम गरम ओव्हनमध्ये अर्धा तास ही केक भाजावा. गार झाल्यानंतर खावा..    


0000000000000000000000000000000000000000000000000000000000000


1.   पालकचे ऑम्लेट

साहित्य.   • एक लहान जुडी पालकची पाने
• अर्धा कांदा बारीक चिरलेला
• ४ अंडी
• मीठ
• मिरपूड
• २ चमचे बटर.   
कृती.   • पालकची पाने स्वच्छ करून धुवून ठेवा. पाण्यात मीठ घालून ते उकळा व त्यात पालकची पाने ५ मिनीटे ठेवा.
• नंतर पाण्यातून काढून सुकी करून घ्या. तव्यावर मध्यम आचेवर १ चमचा बटर गरम करा. त्यावर कांदा सोनेरी होईस्तोवर परतवा.
• नंतर तो कांदा आचेवरून काढून पालकच्या पानांमध्ये घाला. त्यात मीठ व मिरपूड घालून चांगले एकत्र करा. एका वाटग्यात अंडी फोडून चांगली फेटून घ्या.
• तव्यावर मध्यम आचेवर उर्वरित १ चमचा बटर गरम करा. ते वितळले की फेटलेल्या अंड्यात घालून एक मिनीट चांगले फेटा. नंतर त्यात पालकचे मिश्रण घालून चांगले एकत्र करा.
• आता हे मिश्रण पुन्हा तव्यावर घालून मंद आचेवर सेट होऊ द्या. पालकचे ऑम्लेट गरमागरम सर्व्ह करा..    

2.   मलबारी मूर्गी
साहित्य.    • १ किलो चिकन
• १० काजू
• ४ कांदे (बारीक चिरलेले)
• १० लसणाच्या पाकळ्या
• १ जुडी कोथिंबीर (बारीक चिरलेली)
• स्वादानुरूप मीठ
• १ चमचा साखर
• अर्धा कप नारळाचं दूध
• १ चमचा लिंबाचा रस
मसाला :
• १० गोवा मिरच्या (गरम पाण्यात ठेवलेल्या)
• १ चमचा हळद.   
कृती.   • काजूसकट सर्व गरम मसाला मिक्सरमधून वाटून घ्या.
• पातेल्यात तूप तापवून त्यात लसूण व कांदा तांबूस रंगावर परतवून घ्या.
• त्यात कोथिंबीर घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या.
• त्यात वाटलेला मसाला व चिकनचे तुकडे घालून परतवा. त्यात हळद घालून चांगले परतवा. गॅस मंद ठेवा.
• त्यात मीठ, साखर, नारळाचे दूध घाला व उकळी आल्यावर चिकन शिजत ठेवा.
• त्यात लिंबूरस एकत्र करून खाली उतरवा.
• चिकन शिजल्याची खात्री करून घ्या व मलबारी मूर्गी गरमागरम सर्व्ह करा..    

3.    हॉट चिली चिकन
साहित्य.   • ६५० ग्रा. चिकन तुकडे
• २ मोठे चमचे टोमॅटो प्युरी
• २ कळी लसुण कापलेली
• २ कापलेली हिरवी मिरची
• २ सुकी लाल मिरची
• १/२ चमचा मीठ
• १/४ चमचा साखर
• १ चमचा मिरची पावडर
• १/२ चमचा तेल
• १/२ चमचे जीरे
• १ कापलेला कांदा
• १/४ चमचे वाटलेली हळद
• ४०० ग्रा. कापलेले टोमॅटो
• ३/४ पाणी
• १ चमचा गरम मसाला
• ४ लांब कापलेली हिरवी मिरची.    
कृती.   • टोमॅटो प्युरी, लसूण, हिरवी मिरची, साबूत, लाल मिरची, तसेच चिकन मसाला ग्राईन्डर मध्ये वाटुन पेस्ट बनवावी.
• मोठ्या गॅस कढईत तेल गरम करून जीरे कडकवावे. नंतर कांदा, तेजपाने टाकुन ४-५ मिनीट फ्राय करावे. ग्राईन्डर मसाला टाकावा आणि हळद टाकावी व २ मिनीटे भाजून टोमॅटो आणि पाणी टाकून कमी गॅसवर घट्ट पेस्ट बनवावी.
• चिकन व गरम मसाला टाकावा आणि कमी गॅसवर २०-२५ मिनीटे किंवा चिकन गळेपर्यंत शिजवावे. नंतर सर्विंग डिशमध्ये काढून वरून लांब कापलेली हिरवी मिरचीने सजवावे व पोळी बरोबर खावे..   

 

4.   चिकन सूप
साहित्य.   • चिकन
• कांदा
• दालचिनी
• काळी मिरी
• मीठ.  
कृती.   • चिकन घ्यावे. स्वच्छ धूवून तुकडे करून त्यातलेच अर्धे घ्यावे.
• ४ कप पाण्यात एका लहान कांद्याचे तुकडे, चिकन, लहानसा दालचिनीचा तुकडा, ४-५ काळी मिरी टालावी. चांगले तासभर चिकन शिजू द्यावे.
• नंतर सूप गाळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ टाकावे.
• थंड झाल्यावर वरती चरबी येईल ती काढून टाकावी व नंतर पुन्हा गरम करुन सर्व्ह करावे.
• आजारी किंवा लहान मुलांना देण्यास योग्य..   

5.   ड्राय क्रिस्पी चिकन 
साहित्य.   • १ किलो बोनेलेस चिकन (२ १/२ इंचाचे तुकडे करून)
• ४ अंडी 
• २ कप ब्रेडचा चुरा 
• ४ चमचे लसून पेस्ट 
• ४ चमचे तिखट
• २ चमचे जीरा पावडर 
• ४ चमचे कोथिंबीर 
• २ चमचे दालचिनी पावडर
• २ चमचे मैदा
• २ चमचे लिंबाचा रस 
• तेल तळण्यासाठी.    
कृती.    • चिकन नीट धुऊन कोरडे करून घ्या.
• काटा चमच्याने त्यावर टोचे मारा. 
• एका बाउल मध्ये लसून पेस्ट, तिखट, जीरा पावडर, कोथिंबीर, दालचिनी पावडर,लिंबाचा रस एकत्र करून घ्या. 
• ह्यात चिकन घोळवून तास-२ तास ठेऊन द्या. 
• मीठ आणि तिखट घालून अंडी फेटून घ्या.
• ब्रेडचा चुरा एका प्लेट मध्ये घ्या. प्रत्येक चिकनचा तुकडा पहिले ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून नंतर अंड्यात घोळवा.
• आणि परत तो ब्रेडच्या चुऱ्यात घोळवा. ह्यामुळे चिकन ला double coat मिळेल.
• तेलावर golden रंगाचे होईपर्यंत fry करा. 
• गरम गरम सर्व करा..    

6.    बांगडा मसाला
साहित्य.    • ४ बांगडे
• १ वाटी खवलेला नारळ
• १ मोठा कांदा
• ५-६ लाल मिरच्या
• थोडी चिंच
• मीठ
• २ मोठे चमचे तेल
• अर्धा चमचा मेथी
• अर्धा चमचा हळद.   
कृती.    • बांगडे कापून त्याचे लहान लहान तुकडे करा. धुवून घ्या.
• नारळ, मिरच्या, चिंच जाडसर वाटून घ्या. कांदा उभा पातळ चिरून घ्या.
• कढईत तेल तापवून त्यात मेथी फोडणीला घाला.
• नंतर हळद, कांदा घालून गुलाबीसर परतवून घ्या.
• त्यात वाटलेला मसाला, मीठ घालून परतवून घ्या.
• त्यात बांगड्याचे तुकडे घाला. पाणी न टाकता बांगडा शिजवा.
• भाकरी किंवा पोळीबरोबर चांगला लागतो..    
===============================================

*स्वभाव पदार्थांचे*
*- नीला महाबळ गोडबोले*

माणसांचे भिन्न स्वभाव असतात, वैशिष्ट्ये असतात. तसेच पदार्थांचेही असते, असं माझं मत आहे.

इडली ही मवाळ प्रवृत्तीची. अगदी लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत कुणाशीही दोस्ती करणारी आणि कुणाबरोबरही संसार थाटणारी. तिला सांबाराचा संग चालतो नि चटणीचीही चटक लागते. लोण्याबरोबर नि लोणच्याबरोबर तिचं तितक्याच आनंदाने जमतं.
तुपाबरोबर नि दुध-गुळाबरोबरही ती सुखाचा संसार थाटू शकते. कधी कुणाला ठसका लावणार नाही नि कधी कुणाला रडवणार नाही. पण एक नंबरची लहरी बरं का ही! कधी आनंदाने फुलेल तर कधी रुसून चपटी होऊन बसेल.

मिसळीचं अगदी उलटं. ही जहाल मतवादी पक्षाची सदस्या! हिच्यात मवाळपणा औषधालाही मिळणार नाही. फक्त तरुणांची सोबत हिला आवडते. बालके नि वृद्ध हिच्या आसपासही फिरकू शकत नाहीत. रूपानं देखणी, लालबुंद वर्णाची ही ललना केवळ दर्शनाने नि गंधाने लाळ गाळायला लावते. पण हिचा स्वभाव असा तिखट की खाणारा कितीही मर्दानी गडी असला तरी पहिल्या घासाला ठसका लागणार, ही काळ्या दगडावरची रेघ!

भेळ नटरंगी. चिंचेच्या चटणीचा आंबटगोडपणा,कांदा - कोथिंबिरीचा स्वाद, फरसाणाचा खमंगपणा, मिरची ठसका लेवून पातेल्यात नाचली की पब्लिकने शिट्ट्या मारत भोवती पिंगा घातलाच पाहिजे.

उप्पीट नि पोहे हे "सामान्य जनता" या वर्गात मोडणारे. म्हणजे अगदी सहनशील! यांच्या वाट्याला कधी कौतुकही येत नाही नि कधी टीकाही येत नाही. ही जोडी लहान, थोर, आजारी आणि सगळ्या भारतवर्षाला चालणारी. सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र यांपैकी कोणताही प्रहर यांना वर्ज्य नाही. पैशाची मुजोरी या द्वयींना नसल्याने गरीबांपासून श्रीमंतांच्या मुखात हे तितक्याच आनंदाने रमतात.

गोडाचा शिरा मात्र जरा खास व्यक्तीमत्त्व... खास प्रसंगांना उपस्थित राहणारं! सत्यनारायणाचा प्रसाद होण्यासारखं भाग्य वाट्याला आल्यानं हा शिरा अगदी "नशीबवान". महाराष्ट्रात हे रव्याचं लेकरू शिरा म्हणून जन्मलेलं तर उत्तरेकडील कणकेचं बाळ "कडा प्रशाद" नावाचं. तर कुठे "सुजी हलवा" नावानं मिरवणारं.. बाळंतिणीच्या खाद्यविश्वातही अधिकारानं शिरलेला हा "शिरा".

वडा, भजी हे पदार्थांमधले हिरो.
लोकप्रिय… पोट भरलेल्यालाही स्वत:कडे आकर्षित करणारे. हे दिसले की लोक यांच्याभोवती जमा नाही झाले तरच नवल! पावाशी लगीनगाठ बांधून पावाचं नशीब उजळवलं ते याच द्वयींनी!

पावावरून आठवण आली ती पावभाजीची. सगळ्यांना सामावून घेणारा हिचा स्वभाव! बटाटा, कांदा, ढबू मिरची, वाटाणा, टोमॅटो, मिरची, आलं, लसूण, फ्लॉवरसारख्या सगळ्या भाज्या, सगळे मसाले, तेल, लोणी यांना एकत्र कुटुंबात 
गुण्या - गोविंदाने नांदवून आपला स्वत:चा चवीचा ठसा उमटवणारी खाद्यविश्वात नाकामागून येऊन तिखट झालेली ही खाद्यसुंदरी!

गोड माणसांची दुनियाही अशीच 
रंगरसीली!

प्राचीन काळापासून अख्ख्या भारतवर्षाची लेक म्हणजे क्षीर ऊर्फ खीर! अगदी सोज्ज्वळ पण विविध पोषाखांची आवड असणारी. कुठे शेवया, कुठे गव्हले, कधी तांदुळाच्या रूपाने पायसम् झालेली तर कधी गव्हाळ वर्णी हुग्गीचं रूप ल्यालेली! शुभकार्य असो की दिवसकार्य ही हजेरी लावणारच...
"मी खीर खाल्ली असेल तर बुड घागरी" म्हणत बालपणीच परिचीत झालेली ही फारशी आवडतही नाही नि नावडतही नाही. पण नसली तर मात्रं नाडवते.

लाडू हा चराचरातून तयार होणारा.
तूप आणि साखर हे याचे प्रमुख कुटुंबीय. हे कुटुंबीय भाजलेल्या बेसनात घालून जन्मणारा बेसन लाडू हा टाळ्याला चिकटून फजिती करणारा. बुंदीचा लाडू शुभकार्यात भाव खाऊन जाणारा. रव्याचा लाडू आपला असाच नारळ घरात आला तर जन्मणारा नि लक्षात येण्याआधी संपून जाणारा. साध्या पोळीपासून ते राजेशाही डिंकापर्यंत कोणत्याही रूपात सादर होण्याची किमया लाडूच करू जाणे! हा बच्चेकंपनीचा लाडका!

पुरणपोळी ही पक्वानांची राणी!
नाजुक-साजुक स्वभावाची.. महाराष्ट्राची नि कर्नाटकाची ही कन्या प्रत्येक सणाची अगदी लाडकी. पण हिच्याशी वागताना थोडी जरी चूक झाली तरी हिचा पापड मोडलाच म्हणून समजा!

जिलेबी...नटरंगी.. पण बिनभरवशाची.. कधी आंबट तर कधी गोड.. आज कुर्र्यात असणारी कुरकुरीत पण नाराज होऊन कधी मान टाकेल ते सांगता येत नाही. पण लग्नाच्या पंगतीची हिला भारी हौस..

वर्ण काळा असला तरी अंगी गुण असले की साऱ्याचे आपण लाडके होतो...हे शिकवणारा गुलाबजाम!

ओठाला मुरड घालून पोटातला आनंद पोटातच ठेवणारी करंजी!

सगळे गुणीजन भोवताली असताना आणि पटकन सांगता येईल असा एकही गुण अंगी नसताना ज्याच्याशिवाय पान वाढलच जात नाही ते म्हणजे पोळी,भाकरी … आत्मविश्वासाचा वारसा घ्यावा तर त्यांच्याकडून..ना रूप, ना रंग, ना ठसा उमटवणारी चव..पण वर्षानुवर्षे त्यांचं महत्त्व अबाधित आहे.

भाताची मात्र कथा आगळीच...
भात मनमिळावू.
भाता तुझा रंग कसा?....
ज्यात मला मिसळाल तसा...
वरणात रंगून पिवळाधम्म होणारा, साखरभातात केशरात केशरी होऊन जाणारा, पुलावात 
रंगीबेरंगी तर दहीभातात पांढराशुभ्र! याला कशाचच वावडं नाही. दहीभात होऊन महादेवाच्या पिंडीवर विराजमान होतो नि चिकन किंवा मटणाशी दोस्ती करून इफ्तार पार्टीतही शामील होतो. सर्वधर्मसमभाव याच्याकडून शिकावा. चटकदार मसालेभाताच्या रूपात, तिखट बिर्याणीच्या थाटात सादर होणारा भात हा गोड केशरी साखरभाताच्या रूपातही प्रकट होतो. रूप, रंग, स्थळ, काळ, वेळ, प्रसंग… कशालाच न जुमानणारा हा भात माणसाला आयुष्याच्या सुरूवातीपासून शेवटापर्यंत आणि त्यांनतरही प्रामाणिक साथ देतो.
म्हणूनच दक्षिण भारतात त्याला "अन्न" म्हणतात. अन्न बनून एकट्याने माणसाला संपूर्ण आयुष्यभर पोसायचं सामर्थ्य भातात आहे. म्हणून तर जन्मापासून सहाव्या महिन्यात भाताच्या पेजेने सुरू होणारी खाद्ययात्रा मेतकूट भात, वरणभात, आमटीभात, मसालेभात, वडाभात, पुलाव, बिर्याणी करत पुन्हा वरणभात, मेतकूटभात, पेज या क्रमाने माघारी येते नि भाताच्या पिंडाने संपते... इहलोकीच्या प्रवासानंतरही वारसदारांनी ठेवलेल्या दहीभाताच्या रूपाने ती अनंतकाळ तशीच सुरू राहते...


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...