Friday, August 19, 2022

 असं कुठं असतं का राव?


चौऱ्याऐंशी लक्ष योनीनंतर
जन्म दिलास माणसाचा
हाच एक जन्म जिथून
मार्ग खुला मोक्षाचा

दिलंस एक मन त्यात
 अनेक विचारांचा वावर
आणि म्हणतोस आता
या विचारांना आवर 

दिलेस दोन डोळे
सौंदर्य सृष्टीचे बघायला
आता म्हणतोस मिटून घे
आणि बघ तुझ्यातल्या स्वतःला 

नानाविध चवी घेण्यास
दिलीस एक रसना
आणि आता म्हणतोस
अन्नावर ठेवू नकोस वासना 

जन्मापासून नात्यांच्या
बंधनात अडकवतोस
बंध सगळे खोटे असतात
असं आता म्हणतोस

भाव आणि भावनांचा
इतका वाढवतोस गुंता
आणि मग सांगतोस
व्यर्थ आहे ही चिंता

संसाराच्या रगाड्यात
पुरता अडकवून टाकतोस
म्हणे शांतपणे ध्यान कर आता
अशी कशी रे मजा करतोस??

मेजवानीने भरलेले ताट 
समोर बघून उपास करायचा
हाच अर्थ का रे
सांग बरं मोक्षाचा?

वर बसून छान पैकी
आमची बघ हो तू मजा
पाप आणि पुण्याची 
मांड बेरीज आणि वजा

माहीत नाही बाबा मला
मिळेल की नाही मोक्ष
*तू जवळ असल्याची फक्त*
*पटवून देत जा साक्ष . . . .*
===========================================


आजच्या पांडुरंगमय वातावरणात कुणीतरी साखरेहून गोड कविता पाठवली आहे पहा.
😊

विठोबाही रुकिमणीला
       खूप कामे सांगतो ,
अन् तिच्यावर थोडा
    रूबाब गाजवतो .

सकाळीच म्हणाला विठुराया
     रुक्मिणी,' जरा आज
नीट कर सडा -सारवण
आपल्याकडे येणार भक्त सर्वजण

विठोबा म्हणतो रुक्मिणीला ,
' भक्तांची विचारपूस
    जरा अगत्याने कर ,
अगं हे तर त्यांच माहेरघर '.

विठोबा म्हणतो , ' जनीची
    कर ना तू वेणी -फणी '
अगं एकटी आहे अगदी
 तिला या जगी नाही कुणी .

रुक्मीणी, उद्या तर घाल तू
     पुरणा -वरणाचा घाट
उदया आहे बार्शीच्या
 भगवंताच्या स्वागताचा थाट

एका मागोमाग सूचना ऐकून
    रुक्मिणी आता रुसली
आणि रागा- रागाने जाऊन
    गाभाऱ्या बाहेर बसली .

सारखंच याचं आपलं
       भक्त अन् भक्त
मी काय आहे
          कामालाच फक्त ?
  
भोवती तर याच्या सारखा
      भक्त आणी संत मेळा
काय तर म्हणे _ 
     विठु लेकुरवाळा .

भक्तांनाही कांही
       माझी गरजच नाही
कारण तोच त्यांचा बाप
    अन् तोच त्यांची आई .

कधीतरी माझी ही 
      कर जरा चौकशी
भक्तांच्या सरबराईत
     दमलीस ना जराशी .

मी आता मुळी
     जातेच कशी इथुन
बाहेर जाऊन याची
      गंमत बघते तिथुन

आता तरी याला
       माझी किंमत कळेल
अन् मग हळूच
     नजर इकडे वळेल

विठू जरी आहे
      साऱ्यांची माऊली
भगवंतांच्याही मागे असते
     ' लक्ष्मीची ' सावली. 🙏🌸🙏
===========================================

लाखो इथले गुरू...!

बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू...
झाडे, वेली, पशु, पाखरे 
यांशी गोष्टी करू!

बघू बंगला या मुंग्यांचा, 
सूर ऐकुया या भुंग्यांचा

फुलाफुलांचे रंग दाखवील 
फिरते फुलपाखरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

सुग्रण बांधी उलटा वाडा, 
पाण्यावरती चाले घोडा

मासोळीसम बिन पायांचे 
बेडकिचे लेकरू...
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

कसा जोंधळा रानी रुजतो, 
उंदीरमामा कोठे निजतो

खबदाडातील खजिना त्याचा 
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ, 
कड्या दुपारी पर्‍ह्यात पोहू

मिळेल तेथून घेउन विद्या 
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा 
लाखो इथले गुरू!

– ग. दि. माडगूळकर

*******
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

💐💐🙏💐💐


शांताबाई शेळके, उषा मंगेशकर, 
पं. हृदयनाथ मंगेशकर यांची माफी मागून 

काय बाई सांगू, कसं गं सांगू

काय बाई सांगू, कसं ग सांगू ? 
मलाच माझी वाटे लाज 
रस्त्यांची चाळण झालीय आज 

उगीच फुगूनी आलं खड्डेफूल
उगीच जीवाला पडली भूल 
या रस्त्याचा, त्या रस्त्याचा 
अंगावर ल्याले मी खड्डे साज 

जरी घाबरी झाले धीट 
बघत राहीले खड्डा नीट 
मुंबईकराची पोर कशी मी 
विसरुन गेले रस्ते छान 

सहज बोलले हसले मी 
खड्डयात जाऊन पडले मी 
एक अनावर कंत्राटदारांची जडली बाधा 
'टक्केवारी'पुढे नाही चालत काही इलाज

तकिया कलम : 'मुंबईकाठचा धोंडी' या आगामी चित्रपटातून साभार
=========================================


ह्याला आयुष्य म्हणावं काय ?
———————————-

पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी
लोळण घेतात पायात
बिल गेटची पत्नी तरीही
का घटस्फोट घेते ह्या वयात ?

शिक्षणाने माणूस समृध्द होतो
आम्ही आहोत अजूनही भ्रमात
उच्चविद्याविभूषकांचे मायबाप
मग का असतात वृध्दाश्रमात ?

हा डिप्रेशनचा शिकार
तो आत्महत्या करतो
ज्याला समजावं सेलिब्रिटी 
तो एकाकीपणात मरतो

ज्यांनी कमावलं नाव
त्याला आनंद का मिळत नाही ?
काय चाटायचं ह्या मोठेपणाला
नातं आपुलकीचं जुळत नाही

जळजळीत वास्तव सांगतो
तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही
गरीब, आडाणी , प्रामाणिक मजूरांचे
मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

असं नाही त्यांचे घरात
नाहीत वादविवाद
पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम
बोटावर मोजण्या एवढे अपवाद

आजारी मायबापांचा ईलाज 
करतात किडूक मिडूक विकून 
पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी
नाळ ठेवली आहे टिकुन

व्यसनी, रागीट,नवरा
त्याला गरीबीची जोड
तरीही त्याची पत्नी बिच्चारी
करतेचं ना तडजोड ?

दु:ख हलकं करतात
एकमेकांना भेटून
एका शिळ्या भाकरीचा तुकडा
खातात सारेजण वाटून

जेवढी लावतात माया
तेवढंच बोलतात फाडफाड
कितीदा तरी भांडतात
पण कुठे येतो ईगो आड ?

ऊशाशी दगड घेऊन
भर ऊन्हातही झोपी जातो
काळ्या मातीत घाम गाळणारा
बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

ना तोल ढळतो ना संयम
दु:खातही सावरण्याची आस
कारण अजुनही ह्या माणसांचा
आहे माणूसकीवर विश्वास

पण हल्ली इन्सस्टंट रिझल्टचे
आले हे दळभद्री दिवस
देव सुध्दा लगेच बदलतात
जर पावला नाही नवस

एकत्रीत कुटूंब हल्ली
सांगा कुणाला हवं ?
कामा शिवाय वाटतं का
आपण कुणाच्या घरी जावं ?

एकदा तरी बघा जरा
आपल्या आयुष्याचा रोड मॅप
कुणाचं कुणाशी पटत नाही
काय तर म्हणे जनरेशन गॅप

सांगा बरं कुणावर ह्या
विकृत विचारांचा पगडा नाही
घर,बंगला, फ्लॅट असु द्या
दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही

बहूत अच्छे, बहूत खुब !
क्या बात है ? बहूत बढीया !
एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया 
जागृत चोवीस तास सोशल मिडीया

आभासी दुनियेची चाले
कोरडी कोरडी ख्याली खुशाली
मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा
मोबाईलवरचं श्रध्दांजली

काय बरोबर ? काय चूक ?
मत मांडण्याचीही सत्ता नाही
तो बंद घरात मरून पडला
वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

मुलं पाठवले परदेशात
आई संगे म्हातारा बाप कण्हतो
अंत्यविधी उरकुन घ्या
पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

लेकराला पाॅकेटमनी ,बाईक 
अन् भलेही दिली जरी कार
किती छान झालं असतं
जर दिले असते संस्कार ?

होस्टेल ,बोर्डींगात बालपणीचं पाठवलं 
तो तुम्हाला का वागवणार ?
जमीन असो की जिवन
येथे जे पेरलं तेच ऊगवणार

जिवशास्र शिकवलं
जिवनशास्त्र शिकवा
चुलीत गेली चित्रकला
सांगा चारित्र्याला टीकवा

त्रिकोण,चौकोन ,छटकोन
ह्याला सांगा विचारेल कोण ?
ज्याचे जवळ नसेल
आयुष्याचा दृष्टीकोन

विपरीत परिस्थीतीतही
जपणूक केली पाहीजे तत्वाची
व्याकरणारणा पेक्षाही अंत:करणाची
भाषा असते महत्वाची

चुकु द्या चुकलं तर
अंकगणित अन् बीजगणित 
माणसांची बेरीज करा
गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

प्राणपणाने जतन करावे
नाते शहर, खेडे ,गावाचे
मेल्यावरती खांदा द्यायला
असावे चारचौघे जिवाभावाचे

मेल्यावर दोन अश्रु 
हीच आयुष्याची कमाई
ज्याने हे कमावलं नसेल
तो आयुष्य जगलाच नाही

मिळून मिसळून वागावं
आनंदानं जगावं
तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं
म्या पामरानं काय सांगाव ?
🌹🌹🌹🌹🌹🌹
*जय श्री कृष्ण*
🌹🌹🌹🌹🌹🌹

      *“मैत्री नको तोडूस”*
                  (..डॉ. स्वप्नील मानकर )

हा आहे खूप फटकळ !
तो आहे फारच खडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

नातेवाईकांसारखा तो !
आयता नसतो मिळत !!
मित्र कमवावा लागतो !
असंच मन नसते जुळत !!
हृदय वेगळे असले तरी !
स्पंदने सोबत धडकतात !!
दोघांच्या ही मनामध्ये !
समान विचार चालतात !!
सॉरी,थँक्सला थारा नसे!
मानाकरिता नको अडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

तू जातो निराशेत कधी !
भकास वाटते सारे रान !!
रडण्यास मिळता खांदा !
निवळतो मनावरील त्राण !!
जिथे कुणी कामी पडेना !
तिथे मित्र हजर असतो !!
आपल्यावर होणारे वार !
लीलया झेलत दिसतो !!
कठीण संकटांना मुळी !
तू एकटा नको भिडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

वादविवाद जेव्हा होतो !
स्वतःहून सॉरी म्हणावे !!
चूक कुणाचीही असो !
आपणच नमते घ्यावे !!
वाद करून जिंकल्यास !
बक्षीस थोडीच मिळते !!
अबोला जास्त लांबला !
की त्याचे महत्व कळते !!
छोड ना यार जाने दे !
चिंध्या नको फाडुस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!*

जीवन एकदाच मिळते !
मनसोक्त घ्यावे जगून !!
मैत्रीला मात्र काळजात !
आजन्म ठेवावे जपून !!
जात, पात, धर्म, लिंग !
या पलिकडले हे नाते !!
सर्व नात्याहूनी जगात !
सर्वश्रेष्ठ समजले जाते !!
तोडण्यापूर्वी कर विचार !
नंतर एकटा नको रडूस !!
            *क्षुल्लक कारणासाठी !*
            *यार मैत्री नको तोडूस ..!!!!*
*************************************************

 *सतत १४ दिवस कोव्हिड वार्ड मधे थांबल्याने एका कोरोना पेशंटला 
सुचलेली समर्पक कविता..**


*बरं झाल देवा, मला कोरोना झाला..*

आयुष्याचा आलेला सगळा माज निघुन गेला..

म्हणत होतो नेहमीच मी माझी गाडी, आंन माझा बंगला..

पन जवा बसलो अंबुलन्समधी आखा जीव उशाला टांगला..

गाडी राहिली बंगल्या बाहेर, आन रस्ता दिसेनासा झाला..

*बरं झाल देवा, मला कोरोना झाला..!*

प्रत्येक खोकल्याच्या उबळीनिशी, केली कर्म आठवत होती..

प्रत्येक अडकना-या श्वासासंगे, माणुसकीची जान साठवत होती..

पुण्यसंचय आला संपत, आणी ऑक्सीजन शॉर्ट झाला..

तेंव्हा कुठ देवा तुझ्यावर भरोसा आला..

*बरं झाल देवा, मला कोरोना झाला..!!*

होती पैशांची मस्ती, आनं पदाचीबी गुरमी..

सगळं संपल देवा आता, आलीया पुरती नरमी..

जवा आता मिळालाय, गरिबा शेजारी खाट..

तवाच माझा जिरलाय, आता समदा थाट..

सगळ आठवुन आता, जीव घाबरा झाला..

*बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!*

नाही दिली कोणा गरिबा कधी रुपया आणीक दमडी..

इथं सुयांच्या भोकानी, थकून गेलीया चमडी..

पै-पै कमावलेला, पैसा ना कामी आला..

*बर झाल देवा मला कोरोना झाला..!!!!*

खर सांगतो मित्रांनो आता, *पद, पैसा आणी खोटी प्रतिष्ठा,* यात काही दम नाही..

कोरोनाच्या बेडवर मात्र फक्त, प्रेमाचं व्हेंटीलेटरच कामी येई..!

नात्यांमधील ऑक्सिजन कधी, कमी होऊ देऊ नका..

*मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले, बोट कधी सोडवु नका..!!*
****************************

 *कळलेच नाही*

वर्षेचे वर्षे निघून गेली, 
धकाधकीच्या जीवनात 
वय केंव्हा वाढले 
कळलेच नाही ! 
     खांद्यावर खेळविलेली मुल, 
     खांद्याएवढी कधी झाली 
     *कळलेच नाही* ! 
     एकेकाळी दिवसा 
     ढाराढूर झोपायचो,
     राञीची झोप 
     केंव्हा उडाली 
     *कळलेच नाही* ! 
ज्या काळ्या केसावर 
भाव मारत होतो, ते 
पांढरे कधी झाले 
*कळलेच नाही* !
     वणवण भटकत 
     होतो नोकरीसाठी,
     रिटायर्ड केंव्हा झालो 
     *कळलेच नाही* !
मुलांसाठी बचत 
करीत होतो,
कधी मुलं दूर गेली 
*कळलेच नाही* !
     आता विचार करतो, 
     स्वतःसाठी काही 
     करायचं पण शरीराने
     केंव्हा साथ सोडली 
     *कळलेच नाही* !
कळलेच नाही, म्हणून 
म्हणतो अजूनही वेळ 
आहे, थोडं तरी जगून घ्या 
सुंदर अशा जगण्याला
डोळे भरून बघून घ्या 
            🙏

         *जिंदगी*
 *ना मिलेगी दोबारा*
===============================================

 बंद देवळा बाहेरून मी
देवाला फुले वाहिली.
हळूच दारा आडून त्याने
भीती माझी पाहिली.

भजन नाही, नाही प्रार्थना
ना म्हंटली कुठली गाणी.
जे सांगायाचे होते मजला
वदले डोळ्यांतील पाणी.

कुठून आला आवाज कानी
चपापून जरा मी पाहिले.
लक्षात आले नैवेद्याचे
ताट आणायचेच राहिले.

घेऊन निघालो होतो देवा
रस्त्यात भेटला भुकेला.
नैवेद्याचा घास तुझा मी
त्याला मग देवू केला.

चेहऱ्यावरती दाटून आले
भाव तयाचे भोळे.
उपकाराची जाणिव त्याचे
बोलत होते डोळे.

हळूच दिली तृप्तीची ढेकर
त्या खंगलेल्या पोटाने.
अस्फुट आशीर्वादही दिले
रखरखीत त्या ओठाने.

क्षमस्व देवा नैवेद्य तुझा
आणू न शकलो इथे.
अरे वेड्या, देव म्हणाला
ग्रहण केला मीच तिथे.

येवू नको मंदिरात माझ्या
तू घरामध्येच थांब.
आयुष्याची दोरी तुझ्या
बघ होते कशी लांब.

लहान मुलांत शोध मला
असेन मी फुला पानांत.
सापडेन तिथेच तुला मी
दिन दुबळ्यांच्या मनांत.

मलाही झालाय नकोसा
ह्या मंदिरातला थाट.
गरिबांच्या रुपात तुझी
मी बघत राहीन वाट.🙏
==================================

📘📕📗📘📗📕📘
 *बापाचं मन* 
*घरामधला कर्ता बाप,*
*जेंव्हा येतो बाहेरून |*
*पाळलेली मांजर सूद्धा,*
*आनंदाने जाते शहारून |*
*मॅव मॅव करत बिचारी,*
*फिरते सा-या घराला |*
*पण ते प्रेम कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*मालकाला बघून कूत्रा,*
*झेपाऊन घेतो ओढ |*
*साखळी दाटे मानेला,*
*कमी होत नाही वेड |*
*शेपटाचा गोंडा घोळून,*
*घूटमळते ते दाराला |*
*पण ती ओढ कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*दूर बघून मालकाला,*
*हंबरते गोठ्यात गाय |*
*वळवळ करते जागीच,*
*तान्ह्या वासराची माय |*
*वासराच्या आधी चाटे,*
*ती मालकाच्या ऊराला |*
*पण ती माया कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*बांधा वरचा बैल सूद्धा,*
*हाक ऐकून परत वळतो |*
*रागाची हाक असुनही,*
*गप गुमान रानात पळतो |*
*आपुलकीचा राग सुद्धा,*
*कळतो मुक्या ढोराला |*
*पण तो राग कळत नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*जीव लावला जनावराला,*
*लेकरावानी वागत आली |*
*पोटची लेकरं मात्र कशी,*
*परक्यावानी जगत आली |*
*बाप लेकाचा सुर कधीच,*
*जुळला नाही सुराला |*
*जीव लावनं कळंलं नाही,*
*पोटच्या त्या पोराला |*

*बाप असतो जरा जरा,*
*नारळाच्या फळा वानी,*
*बाहेरून कठोर भासे,*
*आतमध्ये गोड पाणी |*
*पावसाचं महत्व सुद्धा,*
*कळेना झालंय मोराला |*
*तसाच बाप कळत नाही,*
*जीवंत पणी पोराला |*


*तुमच्या बापासाठी तुमच्या मनात आहे पण बोलु शकत नाही अशा सर्वासाठी*
📘📕📗📘📗📕📘

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...