सोपं नसतं झाड होणं
मातीमध्ये रुजून येणं
एका एका श्वासासाठी
आभाळाचं ऋण घेणं....
सोपं नसतं झाड होणं!
☀️सूर्य डोई घ्यावा लागतो
तशात कोणी सावली मागतो
बसेल त्याला झुळूकभर
वारासुद्धा द्यावा लागतो
सोपं नसतं मागेल त्याला
मागेल ते ते देत जाणं....
सोपं नसतं झाड होणं!
🍃तळाखालच्या कातळाशी
लढता येत नाही
घाव दिले कोणी तरी
रडता येत नाही
सोपं नसतं ओठ शिवून
सगळं सोसत जाणं...
सोपं नसतं झाड होणं!
🌱नव्यासाठी जुनं निमूट
सांडून द्यावं लागतं
ऋतू-ऋतू म्हणेल तसं
जगून घ्यावं लागतं
सोपं नसतं आयुष्याचं
खोल गाडून घेणं
सोपं नसतं झाड होणं!
No comments:
Post a Comment