विचार बनाये जिंदगी!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – मनःशांती देणारा कॅरीअर फॉर्म्युला!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ---------
अंदाजे शंभर वर्षांपुर्वीची घटना आहे,
विलीज कॅरीअर नावाचा एक इंजिनीअर होता, नुकतीच त्याने गॅस क्लिनींग करणारी करणारी यंत्रणा बनवली होती.
तो एका कंपनीमध्ये कामाला जात होता, आणि ती यंत्रे मार्केटमध्ये हळुहळु लोकप्रिय होत होती,
त्याने एक लाख डॉलर्सच्या एका मोठ्या प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली, अत्यंत परिश्रमपुर्वक सारी यंत्रे बनवली आणि ठरल्याप्रमाणे त्या क्लायंटच्या फॅक्टरीमध्ये बसवुन दिली,
त्या काळात तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होते,
जेव्हा तो क्लायंट आपल्या कारखाण्यात एअर कंडीशन यंत्रणा वापरु लागला, त्याला हवे तसे रिझल्ट मिळेना,
तात्काळ त्याने कॅरीअरला कळवले, तुमची एवढी महागडी यंत्रणा काम करीत नाही, त्याची दुरुस्ती करा, मला हवे ते टेंपरेचर मिळालेच पाहीजे.
कॅरीअर लगेच साईटवर पोहोचला, त्याने त्रुटी तपासल्या, त्याला धक्काच बसला.
त्याची बाजारातली सगळी पत प्रतिष्ठा धोक्यात आली होती,
कॅरीअरचे अवसान गळाले, आता काय करावे त्याला काहीच सुधरेना,
त्याच्या शब्दात सांगायचे तर, “मी माझ्या अपयशामुळे व्यथित झालो होतो, जणुकाही कोणीतरी माझ्या डोक्यावर हातोड्याने घाव घालत होते.”
कॅरीअर ऑफीसमध्ये कित्येक तास शुन्यामध्ये नजर लावुन बसुन राहीला,
त्याला कसला म्हणजे कसलाच मार्ग सुचत नव्हता,
कुठलाच आशेचा किरण दिसत नव्हता,
पुढचे कित्येक तास त्याने जेवण केले नाही, त्याला झोपही आली नाही,
आणि अचानक, त्याने निराशेच्या गर्तेत जाणार्या मनावर नियंत्रण मिळवले,
“आणि माझी सदसदविवेक बुद्धी कामाला आली,”
नुसते बसुन, विचार करुन, चिंता करुन आणि दुःख करुन काहीच होणार नाही,
ह्या समस्येवर उपाय मलाच शोधायचा आहे, त्याने स्वतःला बजावले,
त्याने एक कागद घेतला, त्यावर तीन प्रश्ण लिहले,
१) जास्तीतजास्त वाईट काय घडणार आहे?
- कॅरीअरने विचार केला, माझ्या यंत्रात त्रुटी असल्यामुळे कोणी मला फासावर लटकवणार नाही, ना कोणी माझ्यावर गोळ्या झाडणार आहे. अगदी कोर्ट केस झालीच तरी माझ्या चुकीबद्द्ल मला कोणी तुरुंगात डांबणार नाही.
- झालेच तर कंपनीतुन त्याला काढुन टाकले गेले असते, झालेच तर कंपनीचे वीस हजार डॉलर्सचे नुकसान झाले असते. ही नुकसानभरपाई कॅरीअरकडुन करण्यात आली असती.
- एकदा इथपर्यंत पोहचल्यावर कॅरीअरच्या मनावरचा ताण नाहीसा होवु लागला.
२) स्वीकार करा.
- तणावमुक्त जे काही घडेल, त्याचा स्वीकार करण्याची त्याने स्वतःला परवानगी देऊन टाकली.
- नौकरीवरुन काढुन टाकले गेले, तर हे अपयश माझ्यासाठी धक्का असेल, पण असेही घडेल की मालकांना समजेल की तंत्रज्ञानात प्रयोग करावे लागतात, कित्येकदा अपयशे येतात, त्यामुळे ते सहानभुती दाखवतील.
- वाईटात वाईट गोष्ट गृहित धरुन आणि ती स्वीकारण्याची मनाला परवानगी दिल्यावर त्याला एकदम हलके वाटु लागले, आणि कित्येक दिवसांची हरवलेली मनःशांती त्याला मिळाली.
३) परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल.
- आता त्याने नुकसान कमी करण्याचे मार्ग आणि उपकरणे शोधण्याचे प्रयत्न सुरु केले.
- अनेक प्रयोग करुन पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की पाच हजार डॉलर्सचे एक उपकरण बनवुन त्या यंत्रणेला जोडले, तर समस्येचे निराकरण होईल.
- आणि त्याने ही कल्पना आपल्या मालकासमोर मांडली, व मालकाने त्याला सहमती दिली.
अशा प्रकारे कॅरीअरला दिवसरात्र छळणारी समस्या सुटली, पण जाता जाता तिने एका फॉर्मुल्याला जन्म दिला. “कॅरीअर फॉर्म्युला”
- प्रश्णांवरुन मन वळवुन उत्तरे शोधण्याकडे लक्ष वळवणारा कॅरीअर फॉर्मुला!
- निष्क्रिय बसुन राहण्यार्यांना कृती करण्यासाठी रस्ता दाखवणारा, प्रोत्साहन देणारा कॅरीअर फॉर्मुला!
पुढे हा कॅरीअर फॉर्मुला डेल कार्नेजींनी आपल्या पुस्तकात छापला, आणि लढण्याची शक्ती गमावुन बसलेल्या शेकडो लोकांनी तो वेळोवेळी वापरला, आणि स्वतःला अडचणीतुन बाहेर काढले.
मलाही त्या फॉर्मुल्याने अनेकदा मदत केली.
इट रिअली वर्क्स!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------
तीन वर्षांपुर्वी मला एक बांधकामाचे एक कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते,
आमच्या साईटच्या शेजारी राहणार्या व्यक्तीने पुर्ववैमनस्यातुन आमची तक्रार जिल्ह्याच्या कलेक्टरकडे केली.
कलेक्टरने मला भेटायला बोलवले, आणि सरळ सरक धमकी दिली.
“मि. कोटलवार, नियमबाह्य असल्यास मी तुमचे बांधकाम बुलडोझर लावुन पाडुन टाकीन, आणि तुमचे आर्किटेक्चर सर्व्हिसचे लायसन्स कॅंसल करीन.”
इतका मोठा माणुस इतक्या धमक्या देतो, आता काय होईल, ह्या विचाराने माझी तहानभुक हरपली.
सणकी माणुस म्हणुन त्या कलेक्टरची प्रसिद्धी होती,
त्याने बांधकाम ठप्प केले, लाखो रुपये अडकले,
काहीच कळेना, कोणाकडे मदत मागावे कळेना, जेवण गोड लागेना, झोप येईना, विचार करुन करुन अक्षरशः वेडं होण्याची वेळ आली.
मग मला संकटामध्ये हमखास तारणहार ठरणारा कॅरीअर फॉर्मुला आठवला.
एका कागदावर मी लिहले,
१) वाईटात वाईट काय होईल?
- मी नियमबाह्य नव्हतो, त्यामुळे कोर्टात माझी बाजु निर्दोष सिद्ध झाली असती.
- आर्थिक नुकसान झाले तर माझ्यापेक्षा जास्त ते मालकाचे झाले असते, माझे प्रॉफीट मी कमी झाले असते तरी माझे नुकसान झाले नसते हेही नसे थोडके!
२) स्वीकार करा. –
- सोन्याला झळाळी येण्यासाठी तापवलं जातं, तसंच माझ्यासोबत काही घडलंच तर मी तयार आहे,
- लायसन्स कॅंसल केलं तरी मी हार मानणार नाही, आणि उपाशीही मरणार नाही,
- इथुन पुढे बांधकाम पुर्ण करण्यासाठी जी काही आव्हाने येतील ती मी अंगावर झेलीन, मी स्वतःशीच निर्धार केला.
- काहीवेळा मोठमोठ्याने स्वतःशीच असे बोललो, आणि भीती पळुन गेली.
३) परिस्थिती सुधारण्यासाठी काय करता येईल?
- आम्ही बांधकाम बंद असल्याचा दिखावा केला.
- रात्रपाळीत वेगाने, आणि चुपचाप काम करायची सुरुवात केली.
- मालक अडकला होता, त्याने मागेल तितके पैसे दिले.
- पुढे सगळ्या भीती, शंका हे सगळे फक्त मनाचे खेळ ठरले, काहीच झाले नाही.
- बांधकाम झाले, मालकाला बिल्डींगचा ताबा देऊन मी सुखरुप सुटलो.
- ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मला चांगला फायदाच झाला.
------------------------------ ------------------------------ -----------------------------
तेव्हापासुन आजतागायत मी जेव्हा जेव्हा गोत्यात येतो, तेव्हा प्रत्येक वेळी मी हा कॅरीअर फॉर्मुला वापरतो.
आणि त्याने मला कधीही निराश केले नाही,
एखाद्या संकटात सापडलो की, बहुतांश माणसांना उगीच नको तो विचार करुन टेंशन घ्यायची सवय असते.
आपण समस्येला मोठे करुन पाहतो, आणि तिला आपल्या मनाचा ताबा देऊन टाकतो.
त्यामुळे उत्तरे शोधण्याची आपली शक्ती गमावुन बसतो.
‘कॅरीअर फॉर्मुला’ आपले लक्ष प्रश्णांवरुन उत्तरे शोधण्याकडे वळवतो, एकाग्र करतो.
मनःपुर्वक आभार आणि शुभेच्छा!
No comments:
Post a Comment