The uncommon story of the common man!...
------------------------------थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – मुंबईचे डब्बेवाले!
------------------------------
असं म्हणतात, की मुंबई कधी थांबत नाही, पण मुंबईमध्ये असेच कधीही न थांबणारं एक सैन्य आहे, फक्त पाच हजार लोकांची डोक्यावर पांढरी टोपी घातलेली आगळीवेगळी सेना, न थकता, लोकांची सेवा करत आहे.
मुंबईचे डब्बेवाले दररोज दोन लाखाहुन अधिक टिफीन सकाळी घरातुन कलेक्ट करतात, ज्याचा त्याचा टिफीन त्या त्या ऑफीसमध्ये बिनचुक पोहचवतात, आणि नंतर रिकामे डबे जमा करुन, ज्याच्या त्याच्या घरीही घरीही पोहोचते करतात.
एकशे सत्तावीस वर्षांपासुन हे लोक भुकेच्या वेळेला डबे पोहचवण्याचं काम, नेटानं करत आहेत. तुलनेनं अडाणी असणार्या, निरक्षर लोकांचं व्यवस्थापन इतकं उत्कृष्ट आहे की ह्यांच्या मॅनेजमेंट आणि टिमवर्कला पाहुन जग थक्क होतं. यांचं कौतुक इंग्लंडचा राजकुमार प्रिंस चार्ल्स केलं, व्हर्जिन ग्रुपचे मालक रिचर्ड ब्रॅंन्सन ह्यांनी सुद्धा डबेवाल्यांची प्रत्यक्ष भेटुन स्तुती केली. जगातली टॉपची विश्वविद्यालये सुद्धा ह्यांची केसस्टडी करतात. चला, आपणही जाणुया, मुंबईच्या डबेवाल्यांनी असे कोणते मॅनेजमेंटचे फंडे वापरले, ज्यांचा वापर केल्याने त्यांना जगभर प्रसिद्धी मिळाली.
------------------------------
१) टाईम मॅनेजमेंट –
जेवणाचा डबा जेवणाच्या वेळेत पोहोचला तरच त्याला महत्व आहे. मुसळधार पाऊस पडो, महापुर येवो किंवा महाभयंकर ट्रॅफिक जाम असो, डबेवाले कधीही लेट होत नाहीत. ठरलेल्या वेळी ते डबा कलेक्ट करतील, ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी ते डबा पोहचवतीलच.
कामातला हा चोखपणा त्यांची वेगळी ओळख निर्माण करतो.
डबावल्यांचे दिवसातले कामाचे तास म्हणजे फक्त सहा घंटे आहेत. पहील्या तीन तासात ते घरातुन डबे जमा करतात. नंतरच्या तीन तासात ते ऑफीसातुन डबे घेऊन घरी वापस देतात. कधीही, कसल्याही परिस्थीतीत डबेवाले आपल्या वेळेची मर्यादा तोडत नाहीत, म्हणुनच की काय एका टिफीनवर सुरु झालेली ही सेवा आज दोन लाख डब्यांवर पोहोचली आहे.
ह्यात खुप महत्वाचं सुत्र दडलेलं आहे,
“जर तुम्ही वेळेचं व्यवस्थापन करु शकत नसाल, तर तुमच्या आयुष्यात काहीही मॅनेज करु शकत नाही.”
------------------------------
२) शिस्त –
डबेवाले स्वतःतर शिस्त पाळतातच, त्यासोबत ग्राहकांनाही शिस्त लावतात. एखाद्या घरी डबा घेण्यासाठी गेल्यास तो डबेवाला मोजुन चार मिनीटे डब्याची प्रतिक्षा करतो, आणि पाचव्या मिनीटाला तो घर सोडतो. त्यांच्या ह्या शिस्तीमुळे ग्राहक आपापले डबे तयार ठेवुन त्यांची वाट बघतात.
जे ग्राहक वारंवार उशीर करतात, त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात, आणि अशा कस्टमरला सेवा देणे डबेवाल्यांकडुन थांबवले जाते. मुंबईच्या ट्रेनमध्ये डबे घेऊन जाणं आणि वापस आणणं अतिशय अवघड आहे, आपसुकच लोकांकडुनही डबेवाल्यांच्या ह्या शिस्तप्रियपणाचा मान राखला जातो.
शिस्त असल्याचा अजुन एक फायदा आहे, हे लोक नेहमी व्यस्त असतात. जे लोक शिस्तीत जगतात, त्यांच्या जीवनात फालतुचे टेंशन नसतात, त्यांचं पुर्ण लक्ष त्यांच्या कामावर असतं. एकाग्रतेमुळे उत्पादनक्षमता वाढते. शिस्तप्रिय लोकांचं समाजात कौतुक होतं. अशा लोकांवर, त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवला जातो.
------------------------------
३) निष्ठा –
मागच्या एकशे सत्तावीस वर्षांपासुन फक्त आणि फक्त एकच काम. डबे पोहचवण्याचं. संपुर्ण फोकस त्या एकाच कामावर. त्यामुळेच की काय, ते हे काम अतिशय उत्कृष्ट्पणे करत आहेत. कुठलाही धंदा तेव्हा अपयशी होतो, जेव्हा आपल्या मुळ हेतुपासुन तो दुरावतो. काम सुरु करताना एक उदात्त हेतु डोळ्यासमोर ठेवलेलं असतं, पण तो हेतु विसरताच, कामातला अनोखेपणा, विश्वासार्हता आणि गुडविल हरवायला लागतं.
एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे डबेवाल्यांची सेवा इतकी जलद आणि अनोखी बनलीय की त्यांचा सिक्स सिग्मा सर्टिफिकेट देऊन गौरव केला गेला आहे. याचा अर्थ त्यांचा एरर रेशो हा सोळा मिलीयन ला एक असा आहे.
म्हणजे एक करोड साठ लाख डबे डिलीव्हरी केल्यास त्यात फक्त एक चुक व्हायची शक्यता आहे. कल्पना करा, दोन लाख डबे, सतत ऐंशी दिवस दिल्यास, एका चुकीची शक्यता, म्हणजे जवळ जवळ झीरोच, नाही का?
आपणही आपल्या आयुष्यात हा ‘वन पॉईंट फोकस’ ठेवणं अत्यावश्यक आहे. काम सुरु करताना ज्या भावनेनं सुरुवात केली होती, ती कधीही विसरली नाही, तर आपणही सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्कृष्ठ ठरु, यात काही शंकाच नाही.
आपणही विचलित न होता, नेटाने हातातलं काम करत राहीलो, मग ते अभ्यास असो वा नौकरी, उद्योग असो वा व्यापार, करीअर असो वा नातेसंबंध, समाजसेवा असो वा संस्था चालवणं, आपल्या मुळ उद्देश्यांना सतत लक्षात ठेवुन काम करत राहीलो तर दिमाखदार यश आपल्याही पदरात पडेल.
------------------------------
४) कामावर प्रेम करा. –
बहुतांश डबेवाले हे वारकरी संप्रदायाला मानणारे असतात. भुकेलेल्यांना अन्न पोहचवणे हे खरोखर पुण्यांचं काम! भक्तीभावाने ते हे काम मनापासुन करतात, म्हणुन उन्हातान्हात काम करताना ते त्रासुन जात नाहीत, थंडी पावसात काम करताना ते कुरकुरत नाहीत. खचाखच भरलेल्या लोकलचाही त्यांना त्रास होत नाही, कारण विठ्ठलाच्या नामस्मरणातुन त्यांना उर्जा मिळते. डबा पोहचवणं, ही त्यांच्या लेखी एक प्रकारची भक्ती आहे. म्हणुन सेवाभावाने ते काम आनंदाने करतात.
आपल्या प्रोफेशनबद्द्ल आपल्याला सन्मान असावा, आपलं आपल्या कामावर मनापासुन प्रेम असावं, ते काम करताना वेळेचं भानही जाणवु नये, पॅशनने केलेल्या कामात यश मिळतचं मिळतं.
------------------------------
५) टीमवर्क –
दोन लाख डब्यांची देवाणघेवाण शक्य कशी होते, त्यासाठी प्रत्येक डब्यावर एक कोड असतं, तो इतका अवघडही नाही की नवख्या माणसाने गोंधळुन जावे पण तो इतका विशीष्ट नक्कीच आहे, की ज्याचा त्याला डबा बरोबर मिळतो.
प्रत्येक डबेवाला आपापल्या एरीयातले डबे एकत्र करतात आणि स्टेशनला पोहचवतात, काही मिनीटात त्या त्या कोडवरुन डब्यांची सॉर्टींग केली जाते, ज्या त्या भागातले डबे त्या त्या लोकलमध्ये ठराविक डबावाल्यांकडे दिले जातात,
जो तो डबेवाला आपापल्या एरीयातले डबे घेऊन आपल्या एरीयात जातो, आणि डबे पोहचवतो. हा सारा प्रवास सायकलीवरुन आणि लोकलच्या डब्यांमधुन केला जातो. ह्या साखळीमध्ये टीमवर्कला अफलातुन महत्व आहे.
कोणत्याही यशस्वी कंपनीचं रहस्य त्यांच्या टीमवर्क मध्येच असतं, कृष्णाने पाच हजार वर्षांपुर्वी सांगुन ठेवलं होतं, संघः शक्ती कलियुगे!
चांगली टीम बांधण्याची कला असली की अशक्य गोष्टीही शक्य होतात, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवुन दिलं!
म्हणुन माणसं जोडा, पैसे आपोआपच जोडले जातील.
डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचं हे तंत्र, हे कसब, आपल्या व्यवसायातही आपल्याला खुप मार्गदर्शनपर ठरो, अशा मनःपुर्वक प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!..
No comments:
Post a Comment