Tuesday, July 19, 2022

आसान है!..’

 Life is waiting for you; give your best shot!..

-------------------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – आसान है!..’
-------------------------------------------------------
तो एका उच्चमध्यम वर्गीय सुखी घरात जन्माला आला होता.
पण वयाच्या चौदाव्या वर्षी दहावीला असताना, त्याच्या वडिलांचा भांडी विकण्याचा बिजनेस आर्थिक अडचणीत आला.
कोवळ्या वयात त्याच्या कुटूंबावर एकामागोमाग एक संकटे कोसळली.
तो हातपाय गाळुन रडत बसला नाही, त्याने कॉलेज शिकता शिकता अनेक धडपडी करायला सुरुवात केली.
कुटुंब चालवण्यासाठी त्याच्या आईने अगरबत्ती विकल्या, खजुरांच्या पानांचे औषधी विडे बनवुन विकले, पिसीओ चालवला.
एकेक रुपया मिळवण्यासाठी, संघर्ष अनुभवला.
बारावीत असतानाच त्याने करिअर गायडन्स करण्याचे सल्लागार केंद्र उघडले.
नाजुक आर्थिक परिस्थितीमुळे त्याने स्वतःहुन कॉलेजचे शिक्षण अर्ध्यावर सोडले,
अनेक छोटेमोठे बिजनेसचे अनुभव घेत, त्याने मल्टी लेव्हल मार्केटींग कंपनी जॉईन केली, तिथे तो बेक्कार अपयशी ठरला,
मग त्याने स्वतः लिक्विडसोप तयार केली, त्याचे पॅकेजींग करुन विक्री केली, तिथेही त्याला यश मिळाले नाही,
त्याने अजुन एका नेटवर्क मार्केटींग कंपनीत काम केले, मन रमेना म्हणुन तिथुनही तो बाहेर पडला,
त्याने एक पुस्तक लिहले, ते त्याच्या लिक्विडसोप सारखेच फुसके निघाले, कोणी विकतच घेतले नाही,
तो रुबाबदार होता, नशीब आजमवण्यासाठी त्याने मॉडेलिंगही करुन बघितले, पण त्यातही त्याचे मन रमले नाही.
त्याने काही दिवस इव्हेंट मॅनेजमेंट करुन पाहीले, तिथेही त्याच्यासोबत जबरदस्त फसवणुक झाली.
त्याने पार्टनरशिपमध्ये एक कंपनी उघडली, ती चांगली चालु लागली, पण वैभवाच्या शिखरावर असताना त्याच्या पार्टनरनी त्याला धोका दिला,
सगळे पैसे लुबाडुन कंपनी बंद केली. तो पुन्हा एकदा रस्त्यावर आला. एकदम कफल्लक झाला.
एकंदरीत तो इतक्या वेळा अपयशी झाला, की यावेळी आपल्या अनुभवांवर त्याने एक पुस्तकच लिहुन काढले, पण दुर्दैवाने तेही अपयशी ठरले.
मॉडेलिंग करताना त्याला एक गोष्ट लक्षात आली की फोटोशुट करणाऱ्या कंपन्या मॉडेल्सच्या पोर्टफोलीओ बनवण्यासाठी त्यांना लुटत आहेत.
इतरांना मदत करण्याच्या सवयीमुळे त्याने स्वतःच मित्रांचे फोटो काढायला सुरुवात केली. गंमतीत गंमतीत सुरु केलेला हा उद्योग त्याला चांगले उत्पन्न देऊ लागला, इथे त्याची रुचीही वाढु लागली.
ह्या क्षेत्रात आगळेवेगळे स्थान निर्माण करण्यासाठी त्याने एक मोठ्ठा डोळे दिपावुन टाकणारा गिनीज बुक रेकॉर्ड करण्याचे ठरवले.
2003 मध्ये दहा तास पंचेचाळीस मिनीटात, एकशे बावीस मॉडेल्सचे, लगातार, दहा हजार फोटो शुट केले.
त्यानंतर टेक्नॉलॉजीचा वापर करुन त्याने इमेजेस बजार नावाची वेबसाईट सुरु केली. सुरुवातीच्या अपयशानंतर, ही वेबसाईट फ्री मोडेल्सच्या फोटोजसाठी, जगातली सर्वात जास्त वापरली जाणारी वेबसाईट ठरली.
प्रवास इथे थांबला नाही, त्याचा प्रवास तर इथुन सुरु झाला.
सातत्याने इतकी अपयशे पचवणारा हा लढाऊ योद्धा, एकेक वार सोसुन हिर्‍यासारखा उजळुन निघाला,
संपुर्ण भारतात, मोठ्या मोठ्या संख्येने फ्री सेमिनार घेत सकारात्मक विचारांचा जागर त्याने सुरु केला.
रोज लाखो-करोडो तरुण तरुणींना आपल्या बोलण्याने तो भुरळ घालतोय.
त्याला एकवेळ भेटण्यासाठी, डोळे भरुन पाहण्यासाठी, त्याची सकारात्मक उर्जा अनुभवण्यासाठी लोक वेडेपिसे होतात, असे स्वतःचे उत्साहाने सळसळणारे व्यक्तिमत्व त्याने निर्माण केले आहे.
एका अभ्यासानुसार, जगभरातील अंदाजे पंचेचाळीस कोटी तरुण तरुणी आज युट्युबवर त्याचे व्हिडीओ बघतात.
लाखो लोकांना त्याने नव्याने आयुष्य सुरु करण्याची प्रेरणा दिली आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष करण्यासाठी जिद्द निर्माण केली आहे.
बिझनेसपासुन मेडीटेशन पर्यंत आणि आरोग्यापासुन नातेसंबंधापर्यंत, प्रत्येक विषयात त्याची मास्टरी आहे,
आसान है! हा त्याचा मुलमंत्र!
तोच आपला सर्वांचा लाडका संदीप महेश्वरी!
गप्पाटप्पात जीवनाचं गहन तत्वज्ञान समजवण्याची अदभुत क्षमता लाभलेला संदीप महेश्वरी!
स्वतःची दुःखं आतल्या आत दडवुन, जगाला खळखळुन हसायला भाग पाडणारा, मुक्तहस्ते आनंद वाटणारा, संदीप महेश्वरी!
जगण्याचा उत्सव करा, उत्साहाने जगा, सगळं काही सोपं आहे, असं मनावर बिंबवणारा संदीप महेश्वरी!
पैशापासुन अध्यात्मापर्यंत आणि कलेपासुन तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रावर अदभुत पकड असणारा संदीप महेश्वरी!
आपल्या वागण्याबोलण्याने, आपल्याला आपल्याही नकळत, जिंकुन घेणारा संदीप महेश्वरी!
एक पैसाही न घेता, लाखो लोकांना जगण्याचा नवा दृष्टीकोन देणारा, आपले बहुमुल्य अनुभव फुकट वाटणारा, संदीप महेश्वरी!
तो समोर आल्याक्षणी आपल्या मनमोहक पण उत्साहाने फसफसलेल्या विलक्षण आकर्षक आणि जादुई व्यक्तिमत्वाने, तो उपस्थित दर्शक आणि श्रोत्यांमध्ये आगळ्यावेगळ्या उर्जेचा संचार करतो.
त्याचे व्हिडीओ बघत बघतच माझ्यासारख्या धडपडणार्‍या लाखो तरुणांची जडणघडण होते आहे.
एक माणुस दृढनिश्चयाने कंबर कसुन कामाला लागला, आपल्या ध्येयाप्रती समर्पित झाला, तर काय काय चमत्कार घडवु शकतो, याचं जिवंत उदाहरण आहे, संदीप महेश्वरी!..
आधुनिक भारतातल्या गोंधळलेल्या, चंगळवादी आणि पथभ्रष्ट झालेल्या तरुणाईला, योग्य मार्गावर आणण्यासाठी देवाने पाठवलेली भेट आहे, संदीप महेश्वरी!..
तो आपल्या सर्वांसाठी दोन्ही हाताने भरभरुन ज्ञान आणि प्रेम वाटतोय,
ते ही आपल्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता,
अगदीच हेवा करावा, असं त्याचं उत्तुंग जीवन आहे.
सतत चालत रहा असा संदेश देणार्‍या त्याच्या ह्या ओळी रोज एकदा मोठ्याने म्हणायला हव्यात,
“गिर गया तो क्या हुवा,
गिरता वही जो चलता है,
बस, इतना सा करना है,
उठकर फिरसे चलना है!.....”
आणि उत्सुकता असेल तर ह्या ओळींना युट्युबवर सर्च करुन संदीपच्याच खड्या आवाजात वारंवार ऐकायला हवे,
एके दिवशी आपण सर्वांनीही त्याच्यासारखं भव्य दिव्य आनंदी आयुष्य जगावं, ह्या प्रार्थनेसह,
आभार आणि शुभेच्छा!..

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...