(२०१८ मध्ये लिहलेला एक लेख)
Think Big, Think fast, Think Ahead; Ideas are no one’s monopoly!..
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – The Great risk taker! धीरुभाई अंबानी!
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
२००२ वर्षाच्या जुन महिन्याचा तो शेवटचा पंधरवडा होता.
ब्रीच कॅंडी हॉस्पीटलच्या चौथ्या मजल्यावर चांगलीच वर्दळ वाढली होती,
वेगवेगळे सेलेब्रेटीज, सिनेस्टार आणि उद्योगपती पेशंट बनुन येणं, हे ब्रीच कॅंडीसाठी रोजचचं होतं,
पण यावेळी भारतातल्या लाखो लोकांचं बारीक लक्ष ब्रीच कॅंडीमध्ये होणार्या हालचालींवर होतं,
भारतातल्याच नाही तर भारताबाहेरचा मिडीयाही हॉस्पीटलमधुन येणार्या बातम्यांसाठी तिथेच ठिय्या मांडुन बसला होता.
त्याला कारणही तसंच होतं,
नुकताच त्यांच्या आय सी यु मध्ये एक व्हि. व्हि. आय. पी पेशंट दाखल झाला होता,
ज्याने भारतात उद्योगजगताचा पाया रचला,
आपल्या प्रखर आंतरिक उर्जेने आणि भव्य दिव्य स्वप्नांनी, शुन्यातुन सुरुवात करुन ज्याने भारताची प्रस्थापित पण मरगळलेली अर्थव्यवस्थाच उलथुन टाकली,
आपल्या ध्येयाप्रति अखंड श्रद्धा आणि चिकाटी ठेवुन, मार्गातल्या एकेक पर्वतासमान अडथळ्यांना बाजुला सारुन लाखो लोकांना रोजगार देणारा, स्वतःबरोबर लाखो भांडवलदारांना श्रीमंत बनवणारा, तो महान उद्योजक धीरुभाई अंबानी, आज वयाच्या सत्तराव्या वर्षीही मनात रक्ताचं पाणी करुन उभा केलेल्या आपल्या रिलायन्स कंपनीचा आणि आपल्या गुंतवणुकदारांचाच विचार करत होता.
त्या दिवसातही त्यांची मृत्युशी अखंड झुंज चालली होती,
लढाऊपणा धीरुभाईंच्या रक्तातच होता, आयुष्यभर धीरुभाई झगडलेच तर होते,
------------------------------ ------------------------------ ------------------------------ --------------------
धीरुभाईंच्या खडतर प्रवासात प्रत्येक निसरड्या वळणावर खंबीर आणि तोलामोलाची साथ देणार्या त्यांच्या प्रिय पत्नी कोकीलाबेन तिथेच आय. सी. यु. मध्ये मुक आधार बनुन धीरुभाईंना बळ देत होत्या.
हॉस्पीटलच्या तिसर्या मजल्यावर अंबानी परिवाराचे सदस्य हळव्या आणि उदास मनाने, धीरुभाईंच्या प्रकृतीची विचारपुस करायला येणार्या, देशविदेशातुन येणार्या महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या शुभेच्छा स्वीकारण्यात व्यस्त होते,
दिवसेंदिवस हॉस्पीटलच्या बाहेर धीरुभाईंच्या प्रशंसकांची गर्दी वाढतच होती,
बातम्यांसाठी भुकेल्या मिडीयासाठी ‘धीरुभाई मरणाच्या दारात’, ही फक्त एक सनसनाटी आणि ब्रेकिंग न्युज होती,
एकीकडे पत्रकार, टी. व्ही. कॅमेरे सगळ्यांच्या नजरा येणार्या प्रत्येक बातमीवर रोखलेल्या होत्या,
अपडेटच्या नावाखाली एकामागोमाग एक बेधडक बातम्या देऊन ते खळबळ उडवुन देत होते,
प्रत्येक वाईट बातमी बरोबर अख्खा शेअरबझारच हेलकावे खात होता,
पण दुसरीकडे लाखो कर्मचार्यांचा शिस्तबद्ध रिलायंस समुह मात्र जणु काही घडलेच नाही अशा अविर्भावात काम करण्यात नेहमीप्रमाणेच मग्न होता,
ह्या एवढ्या धावपळीत सुद्धा, धीरुभाईंची मुले मुकेश आणि अनिल अंबानी दोघेही एका ग्लोबल पेट्रोकार्पोरेशनसोबतच्या महत्वाच्या आणि पुर्वनियोजित बैठकीमध्ये सहभागी झाली होती,
आपला बाप मृत्युशय्येवर पडलेला असताना देखील, ‘शो मस्ट गो ऑन’ ह्या न्यायाने काळजावर दगड ठेवुन निग्रहाने पुढची वाटचाल करत राहणं,
ही अनोखी शिस्त, हा निश्चय, आणि ही बांधिलकी हेच रिलायंसच्या आजच्या यशामागचं गमक आहे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------
धीरुभाईसारखं रोमाचंक आयुष्य, आणि धीरुभाईंसारखी अफाट लोकप्रियता एखाद्याच्याच वाट्याला येतं,
ते लोकांना आवडायचे कारण हिमालयाएवढे उत्तुंग असुनही ते लोकांना आपल्यातलेच एक वाटायचे,
रस्त्यात येईल त्या संकटाला आडवं करुन पुढे पुढे जाण्याची धमक असणरा हा यशस्वी बिजनेसमॅन कोट्यावधी लोकांसाठी रोल मॉडेल होता, आजही आहे,
आपला पहिला पगार तीनशे रुपये असणारा व्यक्ती मृत्युसमयी तब्बल ऐंशी हजार करोड रुपयांचा मालक होता,
धीरुभाईंकडे अशी कोणती गुप्त शक्ती होती की ज्याच्या जोरावर धीरुभाईंनी हे सर्व साध्य केले?
त्या विधात्यानं धीरुभाईंना संपन्नतेचं वरदान दिलं होतं, ते आपल्यालाही अवगत करता येईल का?
----------------------------- ------------------------------ ------------------------------ ----------------------
१. त्यांनी स्वतःमधली असीम उर्जा ओळखली होती. –
चोरवाड नावाच्या एका छोट्याश्या खेड्यात, एका शिक्षकाच्या पोटी धीरुभाईंचा जन्म झाला, पाच भावंडामध्ये ह्यांचा तिसरा क्रमांक!
पुढे देशाला हजारो, एमबीए, एमटेक आणि सीए देणारे, आणि अनेकांना बिजनेसचं गुढ तंत्र मुक्तहस्ताने शिकवणारे धीरुभाई स्वतः मात्र मॅट्रीकपर्यंतच शिकले होते,
सतरा वर्षाच्या अपरिपक्व वयात, रमणिकलाल ह्या आपल्या मोठ्या भावाच्या बोलवण्यावरुन धीरुभाई ब्रिटीशांची वसाहत असलेल्या एडन ह्या शहरात जातात.
तिथे त्यांना तेलविक्री करणार्या कंपनीत तीनशे रु पगारीची कारकुनाची नौकरी मिळते,
जेव्हा दिवसभर काम करुन इतर भारतीय आणि धीरुभाईंचे सहकारी विरंगुळा म्हणुन करमणुकीच्या साधनांकडे वळायचे तेव्हा धीरुभाई पार्ट टाईम नौकरी करायचे.
आणि फावल्या वेळात विमा सल्लागार बनुन ते कमिशनसुद्धा कमवत होते,
आपल्या मित्रांपेक्षा खुप जास्त पैसे कमवुन सुद्धा धीरुभाईंच्या मनात आपली नौकरी सलत राही, ती सल ते वारंवार आपल्या निकटच्या मित्रांकडे बोलावुन दाखवत,
“पैसा कमवायचा असेल तर नौकरी नाही, स्वतःचा व्यवसायच करा!”
“संपन्नतेचं सुख आपल्या मातीत, आपल्या मित्र परिवारातच आहे, परदेशात नाही.”
वयाच्या सव्वीसाव्या वर्षी, एका मुलाला आपल्या मांडीवर आणि दुसरा आपल्या आईच्या गर्भात असताना, १९५८ साली व्यवसायाचा श्रीगणेशा करण्यासाठी धीरुभाई स्वदेशी परतले.
भुलेश्वर येथे जयहिंद सोसायटीच्या चौथ्या मजल्यावर एका छोट्याशा फ्लॅटमध्ये त्यांनी संसार थाटला.
रिलायंस कमर्शिअल कार्पोरेशन नावाने मस्जिद बंदर येथे त्यांनी एक ट्रेडींग फर्म स्थापन केली,
१५००० रु रोख पुंजी, एक टेबल, दोन खुर्च्या आणि एक पी पी फोन एवढ्या अपुर्या भांडवलावर त्यांनी खाडी देशांना मसाले पुरवण्याची सुरुवात केली. त्याच सोबत फॅब्रिक्स ही निर्यात करु लागले.
आपल्या धडाकेबाज आणि प्रामाणिक वृत्तीमुळे अगदी थोड्याच दिवसात ते जेठा मार्केटच्या व्यापार्यांमध्ये ‘किंग ऑफ पॉलिस्टर’ ह्या नावाने ओळखले जाऊ लागले.
सुरक्षित नौकरी सोडुन, क्षणोक्षणी अनिश्चितता असलेल्या व्यवसायात उडी मारण्याचं धाडस ते करु शकले कारण,
कारण त्यांनी स्वतःमधल्या असीम उर्जेला ओळखले होते,
तुम्ही कधी स्वतःच्या आतमध्ये डोकावुन पाहिले आहे काय?
तुम्हाला आयुष्याच्या शेवटी काय एचिव्ह करायला आवडेल ते तुम्ही स्वतःला विचारले आहे का?
तुम्हाला आपल्या आतमधल्या सळसळणार्या उर्जेची तुम्हाला ओळख झाली आहे का?
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ------------
२. त्यांच्या स्वप्नांना सीमा नव्हत्या, त्यांच्या क्षितीजांना मर्यादा नव्हत्या. –
- मसाल्यांच्या व्यवहारात चांगला जम बसलेला असतानाही, १९६६ मध्ये धीरुभाईंनी एक नवे धाडस केले, अहमदाबादपासुन ३० किमी दुर असलेल्या एक लाख फुटाच्या जागेवर चार अत्याधुनिक मशिन्स लावुन त्यांनी टेक्सटाईल मिल चालु केली,
- सत्तरच्या दशकात त्यांनी रशिया, पोलंड, जाम्बिया, युगांडा, सौदी अरब ह्या देशांना निर्यात करुन भरपुर पैसा मिळवला.
- देशासाठी संपत्तीचं निर्माण करायचं असेल तर देशाबाहेर सेवा पुरवली पाहिजे, हे गुपित त्यांनी जाणलं होतं.
- तुम्हालाही जर तुमच्या क्षेत्रात अत्युच्च ठिकाणी झेप घेण्याची तीव्र इच्छा असेल तर विकसित देशांमध्ये तुमच्या क्षेत्रात चाललेल्या घडामोडींना तुम्ही आवर्जुन भेटी दिल्या पाहिजेत.
- त्यांच्यासारखाच काळाच्या पुढचा विचार करायला आपणही शिकलं पाहिजे.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ ----------------------
३. ते चुंबक बनुन पैसा खेचुन घ्यायचे. –
- धीरुभाईंना वाढत्या उद्योगासाठी भांडवल अपुरे पडु लागले, तेव्हा त्यांनी बॅंक व इतर वित्तीय संस्था ह्यांच्याकडे अधिकच्या रकमेची मागणी केली,
- पण धीरुभाईंच्या हितशत्रुंच्या दबावामुळे किंवा लाल फितीच्या कारभारामुळे, धीरुभाईंना आवश्यक पैसा पुरवण्यासाठी बॅंकानी नकार दिला.
- अडचण आली म्हणुन थांबतील, माघार घेतील ते धीरुभाई कसले?
- नोव्हेंबर १९७७ मध्ये २८ लाख शेअर्सचा पहिला पब्लिक इश्शु मार्केटमध्ये आणला.
- एका दिवसात अठावन्न हजार लोकांचं भाग्य धीरुभाईंशी जोडलं गेलं,
- माणसांचा विश्वास जिंकण्याची, माणसं जोडण्याची कला तुम्ही डेव्हलप केली आहे का?
- लायझनिंग, लॉबिंग, मनमिळाऊपणा आणि मार्केटींग ह्या चारही कलांमध्ये धीरुभाई निष्णात होते,
- त्यांच्यासारखी नेत्रदिपक प्रगती करायची असल्यास आपल्यालाही ह्या चार स्किल्समध्ये लक्षणीय प्रगती करावी लागेल.
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------
४. त्यांनी उदार हस्ताने वाटले, म्हणुन त्यांना भरभरुन मिळाले.
- धीरुभाईंनी रिलायन्सचे यश व आर्थिक समृद्धी आपल्या शेअरधारकांमध्ये इतक्या उदारहस्ते वाटली, की गुंतवणुकदारांसाठी रिलायन्स एक डार्लिंग शेअर झाला.
- शंभर कोटींचा टप्पा गाठायला टेक्सटाईल जगतात दिग्गज असलेल्या बॉम्बे डाईंग, जे के सिन्थेटिक्स अशा कंपन्यांना शंभर शंभर वर्ष लागली होती,
- सहासष्ट लाख रुपयांपासुन सुरु झालेला धीरुभाईंचा वार्षिक टर्नओव्हर पुढच्या पंचवीस वर्षात तब्बल एकशे पंचावन्न कोटी रुपयांपर्यंत कसा पोहचला, ह्याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांना माहित होते, “द्या म्हणजे मिळेल.”
------------------------------ ------------------------------ ------------------------------ -----------------------
आजही रिलायन्सचा वाटा भारताच्या अर्थव्यवस्थेत साडेतीन टक्क्यांहुन जास्त आहे.
भारत सरकारला सर्वात जास्त कर भरणारी कंपनी आजही रिलायंसच आहे,
रिलायंसने एका नव्या स्वप्न पाहणाऱ्या पिढीला जन्म दिला आहे,
“मी करु शकतो, तर तुम्हीही तुम्हाला जे जे हवे आहे, ते साध्य करु शकता, हा विश्वास धीरुभाईंनी प्रत्येक भारतीयामध्ये रुजवला आहे.”
एका जाहीर भाषणात आपला जीवनपट थोडक्यात मांडुन धीरुभाई म्हणाले होते, “जर एक धीरुभाई हे सर्व करु शकतो, तर विचार करा हजारो धीरुभाई आपल्या देशासाठी काय करु शकतात?”
ह्या महान माणसाचा चैतन्यमयी जीवनपट एका लेखामध्ये पुर्ण होणार नाही,
ह्या लेखाचा उत्तरार्ध घेऊन लवकरच भेटेन!
उघडया डोळ्यांनी स्वप्न पाहण्यासाठी आणि आपल्यामध्ये लपलेल्या एका वेड्या, स्वप्नाळु, कणखर धीरुभाईला रुजवण्यासाठी,
आभार आणि शुभेच्छा!
(२०१९ मध्ये झालेल्या ‘शुन्यातुन शिखराकडे’ या माझ्या व्हॉटसएप कोर्समधील पहिला लेख)
No comments:
Post a Comment