------------------------------ -----------------
मागच्या वीसपंचवीस वर्षात आपल्या सर्वांच्या जीवनशैलीत खुप बदल होत आहेत. माझ्या लहानपणी पेनमधली शाई संपली की पेन फेकुन द्यायची पद्धत नव्हती, आम्ही कांडी म्हणजे रिफील विकत आणायचो, एकच पेन सहा महिने, वर्षभर चालवायचो, आजकाल मात्र ‘युज एंड थ्रो’ चा जमाना आला आहे.
आजकाल कपडे घेतानाच सहाआठ महिने टिकले, तरी पैसे वसुल झाले, अशी भावना असते. त्याच त्या कपड्यांना आपण फार लवकर कंटाळतो., म्हणुन कपड्यांनी खचाखच भरलेले कपाट असुनही ‘माझ्याकडे चांगले कपडेच नाहीत, अशी भावना बळावते. आपल्याला सतत नवे काहीतरी हवे असते.
बुट, पाकिट, पर्स, चष्मा, घड्याळ, इतकेच काय, मोबाईल हॅंडसेटसुद्धा लवकर लवकर बदलण्याकडे आपला कल वाढत चालला आहे.
पण या ‘वापरा आणि फेका’ या मानसिकतेमुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होते.
कधी ‘मागणी तसा पुरवठा’ ह्या तत्वाप्रमाणे. अगदी तकलादु, न टिकणाऱ्या वस्तु ‘स्वस्त आणि मस्त’ ह्या गोंडस नावाखाली ग्राहकाच्या गळ्यात मारल्या जातात. पुढच्या काही महिन्यात त्या वस्तुंची रवानगी एकतर घरातल्या अडगळीच्या ठिकाणी होते किंवा त्या वस्तुंचे कचऱ्यामध्ये रुपांतर होते.
सणावाराचे दिवस आले की आपल्या सगळ्यांच्या हौशेला उधाण येतं, दसरा दिवाळी आली की शहाराच्या मध्यवर्ती बाजारपेठा एकदम नव्या नवरीसारखी सजतात.
छोटी छोटी दुकाने असो वा शॉपिंग मॉल, प्रत्येक ठिकाणी आकर्षण सजावट आणि रोषणाई केली जाते. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्ल्रुप्त्या वापरल्या जातात. स्किम्स काढल्या जातात. जाहिरातींचा पुर येतो. ऑनलाईन कंपन्या डिस्काउंट सेल जाहीर करतात.
ग्राहक सुद्धा मोठ्या हौशेने, आनंदाने ह्या खरेदी सोहळ्यामध्ये सहभागी होतो.
पण कोणतीही खरेदी करण्याआधी आपण स्वतःशी एक प्रामाणिक प्रश्ण विचारायला हवा, की ही वस्तु आपल्यासाठी खरचं तितकी आवश्यक आहे का?
आपण फक्त मनाची भुक भागवण्यासाठी तर ही खरेदी करत नाहीयेत,
आपण जाहिराती बघुन तर अनावश्यक वस्तु खरेदी करण्याच्या सापळ्यात तर अडकत नाहीयेत?
‘एक ना धड भारंभार चिंध्या’ या अवस्थेपासुन आपण चार हात लांबच रहायला हवे,
गरजा आणि मौज यामध्ये एक फरक असतो, तो वेळीच ओळखता आला नाही तर नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण, चंगळवाद, कचरा असे अनेक पर्यावरणाचे शत्रु जन्म घेतात.
गेल्या काही दशकात काही मुठभर हुशार लोकांनी आपल्या सुंदर निसर्गरम्य जगामध्ये एक बजबजलेला बाजार मांडला,
स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्यांनी एक प्रकारचा उच्छाद मांडला,
जगातला प्रत्येक देशातला प्रत्येक नागरिक त्यांच्या दृष्टीने फक्त एक ग्राहक होता,
जाहिरातींचा मारा करुन वस्तुंची मागणी तयार करायची आणि, माल विकायचा, एवढेच एकमेव त्यांचे ध्येय होते.
लोकांना आपल्या उत्पादनाची गरज आहे की नाही, त्यांच्या दृष्टीने प्रश्णच नव्हता,
ग्राहक तयार करण्याचे हुकुमी तंत्र त्यांनी अवगत केले होते, आपल्या उत्पादनांची मागणी कशी वाढवायचे याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले होते.
वस्तुंचे अतिरिक्त उत्पादन आणि अनिर्बंध वापर करण्यामुळे पर्यावरणाची बेसुमार हानी झाली.
आणि नजर लागण्याएवढी सुंदर असलेल्या आपल्या सृष्टीचं ते हळुहळु एका विशालकाय कचराकुंडीमध्ये रुपांतर करु लागले.
अनेकदा कंपन्याच मुद्दामहुन अशा अल्पायुषी वस्तु तयार करतात, की त्या जास्त दिवस टिकुच नयेत, आणि त्यामुळे कंपन्याच्या तडाखेबंद विक्रीचे आकडे दरवर्षी वाढतच राहतील.
आज पन्नाशी पार केलेल्या पिढीसाठी दुचाकी,चारचाकी गाड्यांनी प्रवास करणे, ही मौज आणि चैन करण्यासारखी गोष्ट होती, आजची फास्ट फुड पिढी मात्र दर दोनपाच वर्षात गाडीचं कोणतं मॉडेल नवं आलंय, याच्या शोधात असते.
प्रत्येक नवी वस्तु खरेदी केल्याक्षणी एका नव्या कचऱ्याला जन्म देते.
त्यामुळे गरज नसताना कोणतीही वस्तु खरेदी करायची नाही, असा निर्धार आपण प्रत्येकाने करायला हवा.
‘युज एंड थ्रो’ करण्यापेक्षा पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तुंचाच वापर करण्यावर भर द्यायचा.
जाहिराती आणि डिस्काऊंट पाहुन खरेदीसाठी तौबा गर्दी करण्याऱ्या ग्राहकांच्या भाऊ गर्दीत सामील होणार नाही, असा निश्चय आपण प्रत्येकाने करायला हवा.
(संपर्क - ७०३८६९३७२४)
No comments:
Post a Comment