मित्र हो, मला अनेक कार्यकर्त्यांचे फोन येतात.
माहिती अधिकार कार्यकर्ता झाल्यावर आम्हाला पैसे मिळतील का ?
माहिती अधिकार वापरून पैसे मिळवता येतात का ?
पैसे मिळणार नसतील तर काय उपयोग ?
आज काल पैशाशिवाय पान हलत नाही. इत्यादी इत्यादी....
आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा. मग प्रतिक्रिया द्या.
अतिशय खेदाने व शरमेनं मला हे कबुल करावं लागतं आहे की आज काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराला उपजिविकेचं साधन बनवलं आहे.
महिती अधिकार अर्ज करायचा व सरकारी अधिकारी लोकांकडून पाच-दहा हजार रूपये उकळायचे हा त्यांचा पोटापाण्यांचा धंदा बनला आहे.
हे सत्य आहे व सत्य नाकारले किंवा लपवून ठेवलं तरी ते सत्य लपून राहत नाही.
भ्रष्ट माहिती अधिकार कार्यकर्ते व भ्रष्ट शासकीय अधिकारी हे दोंघेही समाजाचे समान शत्रू आहेत.
सगळेच शासकीय अधिकारी काही सज्जनतेचे पूतळे नाहीत, सरकारी तिजोरीची चोरी करून आपले बंगले बांधणारे अधिकारी भरपूर आहेत.सरकारी बाबू या बंगल्यात चोरी केलेला माल ठेवतात मग या चोरांच्या बंगल्यात चोरी करणारी नवी चोरांची जमात निर्माण झाली आहे.
मित्रहो माहिती अधिकार अर्ज करून कोणाकडून पाच-दहा हजार मिळवणं ही काय अभिमानाची बाब आहे का ?
चोर बनण्यात कसला आलाय अभिमान ?
स्वतः होऊन स्वतःला भ्रष्ट करणं हे काय जीवनाचं ध्येय असू शकतं का ?
तुमचे बाबा काय करतात असं तुमच्या मुलांना पुढे मागे कोणी विचारलं तर त्यांनी काय उत्तर द्यायचं ?
मित्र हो स्पष्ट सांगतो. माहिती अधिकार हे क्षेत्र काही पैसे कमविण्याचे क्षेत्र नाही.
माहिती अधिकाराच काम करणं ही शुद्ध समाजसेवा आहे.
समाजसेवा हे व्रत्त आहे.
समाजसेवा ही बांधिलकी आहे.
समाजसेवा स्वतःहोऊन स्विकारलेलं समर्पण आहे.
माहिती अधिकार ते समाज बदलाच साधन आहे. ते सामाजिक क्रांतीच शस्त्र आहे.
हा पैसे मिळवायचा प्रांत नाही.
ज्यांना पैसेच कमावायचे आहेत. त्यांनी अन्य व्यापार व व्यवसाय करावा. कष्ट मेहनत सचोटी आधुनिक तंत्रांचा वापर करून भरपूर पैसे कमावावेत.
आज बदललेल्या जगात इतक्या चांगल्या संधी निर्माण झाल्यात की तुम्ही थोडे जरी कल्पक असलात तर पैसे कमवून खूप खूप श्रीमंत होऊ शकता. मग तुम्ही तिकडे लक्ष केंद्रीत करा. माहिती अधिकार मग थोडा बाजूला ठेवा.
पण दुसरा एक पर्याय आहे तो तुम्हाला सांगतो.
काही दिवसापूर्वी एक कार्यकर्ता मला म्हणाला सर मला माहिती अधिकारात खूप मोठं काम करायचं आहे. तर त्यासाठी पैसे तर लागतील ना ? तुम्ही तर पैशांचा विरोध करीत आहात.
मी म्हटलं पैशाचा विरोध करीत नाही. मी भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवण्याचा विरोध करीत आहे.
काहीतरी तडजोड करण्याची अट असलेला पैसे मी नाकारतो.
पण एक गोष्ट लक्षात घ्या.
पैसा हे जीवन व्यवहाराचं एक अप्रतिम साधन आहे. मी पैशाचा सन्मान करतो.
गुंड मवाली व भ्रष्ट लोकांनी दिलेला पैसा मी नाकारतो.
पैसा मी मुळीच वाईट समजत नाही. फक्त तो शुद्ध मार्गाने आपल्याकडे आला पाहिजे.
या बाबत मी महात्मा गांधीचा आदर्श मानतो. ते म्हणाले होते की साधनाची शुचिता नसेल तर तुम्ही करता ती समाजसेवा निव्वळ पाखंड आहे. निरर्थक आहे.
भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा किंवा अन्य साधन तुम्ही स्विकारलं की त्याच क्षणी तुम्ही भ्रष्ट होता.
जेव्हा आपणच भ्रष्ट होतो मग भ्रष्टाचाराविरोधातली लढाई कशी लढणारं ?
परंतु सामाजिक क्षेत्रात काम करताना कोणतीही अट न घालता आपल्यावर खूष होऊन व विस्वासाने लोकांनी दिलेला पैसा व अन्य साधनं तुम्ही जरूज स्विकारा.
आपलं काम शुद्ध शुद्धतम पातळीवर करा .सामान्य माणसांमध्ये कामाचा विस्तार वाढला करा. तर मग आपल्याकडे येणारी साधनं ही वाढतील.
चांगल काम करणारांना समाजातील चांगले लोक काहीही कमी पडू देत नाहीत. हे सत्य आहे.
आणि तुम्ही सत्यावर जरूर विस्वास ठेवा.
मित्रहो हे ही लक्षात ठेवा की .....
माहिती अधिकार व समाजसेवा या क्षेत्रात पूर्ण वेळ काम करायचे तर खूप मोठी संधी आहे.
मित्र हो देशात आणि महाराष्ट्रात अनेक उत्तम समाजसेवक कसं काम करतात.त्यांचा अभ्यास करा.
अण्णा हजारे यांचा राळेगण सिद्धी, पोपट पवार यांच हिवरे बाजार, विकास आमटे यांचं आनंदवन, प्रकाश आमटे यांच हेमलकसा , अभय व राणी बंग यांच शोधग्राम अहमदनगर येथील गिरीष कुलकर्णी यांच स्नेहालय, लातूर येथील रवी बापटले यांचा सेवालय, सांगली जिल्हात चेतना गाला यांचा महिला ग्रामीण बँकेच काम.सिंधूताई सकपाळ यांचा ममतालय, अशी कितीतरी उदाहरण देता येतील.
जनतेकडून मदत घेऊन असे कितीतरी चांगले समाजसेवेच प्रकल्प महाराष्ट्रात चालू आहेत.
हे महाराष्ट्राच सामाजिक वैभव आहे.
तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करायचं अंतरातली आस असेल तर तुम्ही या सर्व प्रकल्पांना भेटी द्या.
तुम्हाला ज्यातून सर्वाधिक प्रेरणा मिळेल. सर्वाधिक प्रभाव पडेल. ज्यानं तुम्ही झपाटून जालं अशा कोणत्याही एका कामाची कॉपी करा.
तुमची अतःप्रेरणा जागी असेल तर .......
चांगल्या गोष्टीची नक्कल करणं चांगल असतं.
नेहमी खूप मोठ्ठ स्वप्न बघा. विचार नेहमी उंच करायचा. विचार नेहमी दीर्घ करायचा. विचार नेहमी सखोल करायचा. विचाराला नेहमी कृतीची जोड द्यायची.
या वरील सर्व समाजसेवकांनी जनतेकडून लाखो करोडो रूपयांच्या देणग्या व साधने मिळवली आहेत.
जर तुमचं ध्येय उदात्त असेल.
जर तुम्ही चांगल व परिणामकारक काम करीत असाल.
जर तुम्ही मिळालेल्या पैशाचा इष्टतम वापर करीत असाल.
जर तुम्ही मिळालेल्या पै अन् पै चा हिशोब आपल्या देगणीदारास देत राहाल तर ......
तर लोक तुम्हाला भरपूर पैसा,भरपूर साधंन व भरपूर प्रेम मिळतं. हे सिद्ध झालेलं आहे.
तुमच्या स्वप्नांतून व तुमच्या विचारातूनच उद्याचे अण्णा हजारे , उदयाचे पोपट पवार, उद्याचे अभय बंग , उद्याची चेतना गाला तुमच्यातूनच जन्माला येणार आहे.
-सुभाष बसवेकर
No comments:
Post a Comment