*'मुलास पत्र'* (पाचवे पत्र) .. अवश्य वाचा.. Reply and share plz
*लेखक-* विश्वास सुतार
*'तुझ्या बरोबरीची पिढी डिंक फॅमिली (DINK Family) होण्याची भीती आम्हाला वाटते आहे. परदेशात किंबहुना भारतातही मेट्रो शहरांमध्ये 'डिंक फॅमिली' ही नवी नकारात्मक संकल्पना रुजते आहे. खरंतर माणसांच्या समूहासाठी आणि नात्यांच्या भावबंधासाठी ही धोक्याची घंटा आहे. ही संकल्पना नव्या पिढीने टाळायलाच हवी. पैसा आणि करियर ही अंतिम उद्दिष्टे असू नयेत. वयानुरूप निसर्गाचा नैसर्गिक क्रम चालवणे माणसाचेही कर्तव्य आहे...'*
दि. २४ एप्रिल, २०२१
प्रिय विनायक,
अनेक आशीर्वाद !
पत्र मालिकेतील हे पाचवे पत्र तुला लिहीत तुझ्याशी संवाद साधताना मला मनोमन आनंद होत आहे. या पत्र मालिकेच्या निमित्ताने मला तुझ्यासारखे अनेक विनायक आणि त्यांचे पालक भेटत आहेत. त्या अर्थाने ही पत्र मालिका आता तुझ्यासह सर्व पालक आणि विद्यार्थी-मित्रांना दिशादर्शक आणि संवाद सूचक ठरेल, अशी आशा वाटते.
सध्या एप्रिल महिन्याचा उत्तरार्ध सुरू आहे. गेले वर्षभर COVID-19 या महामारीने थैमान घातले आहे. आतातरी रुग्णांची संख्या कैकपटीने वाढली आहे, वाढत आहे. सध्याची आरोग्यविषयक समस्या खूपच गंभीर वाटते. तू तुझ्या ठिकाणी स्वतःसह इतरांच्याही आरोग्याची काळजी घेशील, याची खात्री वाटते.
शासन-प्रशासन covid-19 या महामारीशी लढा देण्यासाठी नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नये, म्हणून आवाहन करीत आहे. प्रसंगी कायदा आणि नियमांचा कठोरपणे अंमल करीत आहे. पण नागरिकांचे स्वयंनियंत्रण हाच प्रभावी उपाय आहे. परवा सहजच श्रेष्ठ *कवी गुलजार* यांची कविता माझ्या वाचनात आली. वर्तमान स्थितीवर भाष्य करणारी ही दूरदर्शी कविता कवी गुलजार यांच्या लेखणीतून अक्षरशः वास्तवतेने अवतरल्याचे तुझ्या लक्षात येईल. कवी गुलजार आपल्या कवितेच काय म्हणतात बघ.
*'बे वजह घर से निकलने की जरूरत क्या है।'*
*'मौत से आँखे मिलाने की जरूरत क्या है॥'*
*'दिल बहलने के लिये घर में वजह हैं काफी।'*
*'यूँ ही गलियों में भटकने की जरूरत क्या है॥'*
गुलजार यांची कविता मानवी भाव-भावनांचे अनोखे चित्रण करते. कधीतरी वेळ काढून गुलजार समजून घे. येत्या सुटीत यु ट्युबवर गुलजार सर्च कर. तुला खूप चांगलं ऐकायला आणि पाहायलाही मिळेल. उर्दू आणि हिंदी गझल, कविता, गीते, मुक्तके यांचा मुक्त संचार गुलजार करतात.
खरं तर माणसानं बहुभाषिक असले पाहिजे. भाषेच्या बाबतीत भारत हा वैविध्यतेचा देश आहे. भारताच्या संविधानाने बावीस भारतीय भाषांना मान्यता दिली आहे. याशिवाय प्रादेशिक आणि बोलीभाषा आहेतच. आपल्याला मराठी वाचता-लिहिता येत असेल *तर आपण हिंदी, इंग्रजी भाषी साहित्याचेही वाचन केलं पाहिजे.* यामुळे आपण भाषिक समृद्ध तर होतोच, पण आपली वैचारिक क्षमताही विकसित होते.
विनायक, तुझं इंग्रजी वाचन चांगले आहे. तुझ्याकडून प्रेरणा घेऊन मी इंग्रजी वाचन पुन्हा सुरु केलंय. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची 'The Girl In Room 105' ही कादंबरी सध्या मी वाचतोय. अरे हो, चेतन भगत हे दिल्ली येथून आय. आय. टी. झाले आहेत. भरभक्कम पगाराची नोकरी सोडून ते पूर्ण वेळ लेखन करू लागले. त्यांचे लेखन बहरले. ते आज जगप्रसिद्ध लेखक आहेत. त्यांची वरील कादंबरी २० भाषांमध्ये अनुवादीत झाली आहे. तू ही लिहिता व्हावास, असे वाटते. असो.
तुला आजच्या पत्रात *'DINK FAMILY' (डिंक फॅमिली)* ही संकल्पना मला समजून द्यायची आहे. बघ ना, सध्याचा माणूस जगाच्या पटलावर सर्वत्र संचार करतोय. तंत्रज्ञानाच्या आधारे हा संचार आभासी (Virtual) रूपात अधिकतर होतोय. परंतु त्याचबरोबर माणूस संकुचित होतानाही दिसतो आहे. माणूस आत्मरत, आत्मकेंद्री होत आहे. त्याचे वर्तुळ तो स्वतःपुरते आखताना दिसतो आहे. समूहगततेकडून माणूस व्यक्तिगततेकडे चालला आहे. याचे कारण तो अधिकाधिक स्वावलंबी, स्वयंपूर्ण होतो आहे. हे ठीक आहे. पण कुटुंब संस्थेबाबत तो बेफिकीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुझ्या बरोबरीची पिढी डिंक फॅमिली (DINK Family) होण्याची भीती आम्हाला वाटते आहे. परदेशात किंबहुना भारतातही मेट्रो शहरांमध्ये 'डिंक फॅमिली' ही नवी नकारात्मक संकल्पना रुजते आहे. खरंतर माणसांच्या समूहासाठी आणि नात्यांच्या भावबंधासाठी ही धोक्याची घंटा आहे. ही संकल्पना नव्या पिढीने टाळायलाच हवी. पैसा आणि करियर ही टोकाची अंतिम उद्दिष्टे असू नयेत. वयानुरूप निसर्गाचा नैसर्गिक क्रम चालवणे माणसाचेही कर्तव्य आहे. त्यात वावगे असे काही नाही. पती-पत्नी म्हणून एकत्र आलेल्या स्त्री-पुरुषांनी सहजीवनाबरोबर वंशवृद्धीचे कर्तव्य बजावायलाच हवे. राष्ट्र केवळ पैशाने नव्हे; तर सक्षम आणि समृद्ध माणसांनी बनते, याचे भान नव्या पिढीने ठेवायलाच हवे. मी म्हणतोय ती डिंक फॅमिली थोडी समजून स्पष्ट करतो.
माणसाची उपजत वृत्ती ही समूहात राहण्याची आहे. अश्मयुगातील माणूस भटकंती करायचा. अन्य प्राण्यांप्रमाणेच लाखो वर्षे माणसाने भटकंतीत घालवली. पुढेपुढे माणसाची विचारशक्ती आणि भाषा कौशल्य विकसित होऊ लागले, तसा तो नव्या जीवनाचा शोध घेऊ लागला. तो नदीच्या खोऱ्यात राहू लागला. सुमारे बारा हजार वर्षापूर्वी माणसाला शेतीचा शोध लागला आणि माणसाची भटकंती थांबली. माणूस समूहाने राहू लागला. माणसांच्या टोळ्या झाल्या. स्त्री-पुरुषांच्या परस्पर जोड्या होऊन ते आपल्या अपत्यांसह एकत्र राहू लागले. अशाप्रकारे कुटुंब व्यवस्था आकाराला आली. माणूस कुटुंब, नातेवाईक आणि समाजातील नाती जोडू लागला. भारतात 'एकत्र कुटुंब पद्धती' आदर्श संस्कृतीचे निदर्शक मानले जाते. एकाच कुटुंबात वीस- पंचवीस माणसांचा राबता असायचा. मुलांना नाती आणि समाजाचा सहसंबंध जोडणे सुलभ व्हायचे.
जागतिकीकरण आणि भारतातील लोकसंख्या वाढीमुळे कुटुंब व्यवस्था चौकोनी होऊ लागली. 'हम दो- हमारे दो' ही घोषणा गाजू लागली. भौतिक समृद्धी जशी येऊ लागली तशी माणसं संकुचित होऊ लागली. ती स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचाच विचार करू लागली. एकविसाव्या शतकाच्या आरंभी पुढची घोषणा आली - 'हम दो- हमारा एक'. धावपळीच्या जीवनात एकुलत्या एक बाळाला कुटुंबातील नात्यांची ओळख आणि सामाजिक भान कसे यावे, हे एक आव्हानच ठरतंय. एका मुलाचे पालन- पोषण, शिक्षण करताना आई- बापाची तारांबळ उडाल्यासारखी परिस्थिती होते आहे. याच्याही पुढे जाऊन युवक-युवती वेगळाच विचार करताना दिसतात. मेट्रो सिटीजमध्ये दोघेही करिअरच्या मागे धावत आहेत. पैसा मिळवण्यासाठी नोकरी, व्यवसाय करत आहेत. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभावही आकर्षित करतो. अशा परिस्थितीत होणाऱ्या मुलाचा सांभाळ कसा करावा, त्याची जबाबदारी कुणी घ्यावी? हा प्रश्न नव्या जोडप्याच्या समोर येतो. मग लग्न ठरताना अट घातली जाते- मूल होऊ न देण्याची. दोघेही मिळवते आहेत (Double Income), परंतु यांना मूल जन्माला घालायचे नाही(No Kid). किंवा मुलाचा विचार नंतर करू वगैरे वगैरे... असे हे मूलविरहित कुटुंब म्हणजे डिंक फॅमिली (DINK- Double Income No Kid).
स्वतःच्या करिअरची अनिश्चितता, आर्थिक कोंडी, मोठ्या शहरातील असुरक्षितता आणि पाश्चात्यांचे अंधानुकरण अशा कारणांमुळे लग्नाळू वा लग्न झालेल्या तरुण-तरुणींमध्ये ही संकल्पना रुजते आहे. अशाने कुटुंब व्यवस्था धोक्यात येते.. त्यामुळे भविष्यात माणसाचं सहजीवन अस्थिर होऊन जाईल. मला वाटते, वीस-पंचविशीतील वर्तमान पिढीने तंत्रज्ञानाबरोबर याही गोष्टीचा विचार करावा. *प्रेम आणि पैसा* या दोन मूलभूत गोष्टी संतुलित पद्धतीने मिळवाव्यात आणि त्या पुढच्या पिढीला आणि समाजालाही द्याव्यात.
तुझ्यासाठी हे थोडं जास्तच बौद्धिक आहे, असे तुला वाटेल. परंतु वयाच्या या टप्प्यात हे विचार तू समजून घेशील, पुढच्या वाटचालीत तुला ते अधिक मार्गदर्शक होतील. किमान नव्या दृष्टीने तुझ्यासारखे विद्यार्थी विचार तर करतील. 'सावध ऐका- पुढल्या हाका' इतके कळले तरी पुरे.
कोरोना संकटामुळे तुझी बारावीची परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. परंतु तू अभ्यासात सातत्य ठेव. या काळात धीर आणि संयम ठेवावा.
विवेकला नववीतून दहावीत वर्गोन्नती मिळाली आहे. त्याने दहावीचा अभ्यास सुरुही केला आहे. तुम्हा दोघानांही अभ्यासाबाबत काही सांगावे लागत नाही. अगदी मनापासून करताय. सर्वच मुलांनी असे केले, तर पालकांच्या कितीतरी तक्रारी कमी होतील. अर्थात पालकांनीही मुलांच्या कलाने घ्यायला हवे, हेही तितकेच खरे !
पुढच्या पत्रात नव्या विषय संवादासह भेटू... तोवर अल् विदा !!
तुझे,
बाबा
*विश्वास सुतार,*प्र.गटशिक्षणाधिकारी, गगनबावडा
शिक्षण विस्तार अधिकारी, करवीर जिल्हा- कोल्हापूर
९४२०३५३४५२
No comments:
Post a Comment