Sunday, December 11, 2022

*आईचं प्रेम म्हणावं की भगवंताचा चमत्कार*


ती नऊ आठवड्यांची गरोदर असताना तिला मेंदूत रक्तस्राव झाला; डॉक्टरांनी प्रयत्न करूनही तिला वाचवण्यात यश आलं नाही. तिला ‘ब्रेन डेड’ घोषित केलं गेलं मात्र तिच्या गर्भाशयात त्यावेळी दोन चिमुकली हृदयं धडकत होती; हो तिला जुळं होणार होतं. सीटी स्कॅन, सिडेटिव्हस यांच्या माऱ्यामुळे आणि आता तर तिच्या मेंदूने साथ सोडल्यामुळे तिचे गर्भ वाचणे शक्यच नव्हते. ४८ तासांनी ही हृदयं काम करणं बंद करतील आणि मग आई आणि तिची दोन्ही मुलं अशी तीन शवं आम्ही तुम्हाला देऊ असं हॉस्पिटलमधुन तिच्या नवऱ्याला सांगण्यात आलं.
 
४८ तासांनी तपासल्यावरदेखील दोन्ही हृदयं धडकत होती; किंबहुना उत्तम प्रकारे कार्यरत होती. अजून चोवीस तास थांबण्याचं ठरवण्यात आलं. चोवीस तासांनीदेखील परिस्थिती जैसे थे. विशेष म्हणजे तिच्या मेंदूने कार्य करणं बंद केलं होतं मात्र बाकी सगळे अवयव सुरळीतपणे सुरू होते! डॉक्टरांसाठीही हा धक्काच होता. आता मात्र त्यांनी त्या दोन्ही जीवांना जगवायचे ठरवले; कदाचित तिची शेवटची इच्छा हीच असावी! तिची ICCU खोली सजवण्यात आली. गर्भातल्या जुळ्यांकरता हॉस्पिटलचे कर्मचारी रोज नित्यनेमाने गाणी गाऊ लागले, वाद्य वाजवू लागले. काही नर्सेस तिच्या पोटाला रोज कुरवाळत होत्या. थोडे थोडके नव्हे तर पुढचे तब्बल १२३ दिवस तिला कृत्रिमरीत्या जिवंत ठेवण्यात आलं आणि दोन गोंडस जुळ्यांना जन्म देण्यात आला. त्यांच्या जन्मानंतरच तिला मृत म्हणून घोषित करून शव कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं गेलं.

नाही; ही कल्पनारम्यता नाही. ही सत्यघटना आहे!! ब्राझील येथील फ्रँकलिन दा सिल्वा जम्बोली पाडील्हा असे त्या मातेचे नाव असून ती जग सोडून गेली तेव्हा तिचं वय होतं अवघं एकवीस वर्षं. या घटनेला आईचं प्रेम म्हणा वा भगवंताचा चमत्कार; वैद्यकीय क्षेत्रातली ही अनोखी घटना आहे खरी. तिचे डॉक्टर आणि हॉस्पिटलचे सर्वच कर्मचारी यांचं करावं तितकं कौतुक कमीच. अश्वत्थाम्याच्या अस्त्राच्या प्रभावाने मृत जन्माला येऊनही भगवंताच्या आशीर्वादाने प्राणप्राप्ती झालेल्या परीक्षिताची कथा आपण महाभारतात ऐकतो तेव्हा कित्येक बुद्धीवादींचा त्यावर विश्वास बसत नसतो. मात्र फ्रँकलिनसारख्या अनुभवांवरून आपली बुद्धी हे सर्वोच्च साधन नसून तिच्या पलिकडे बरंच काही अस्तित्वात आहे याचीच जाणीव ठळकपणे अधोरेखित होते. 

- वैद्य परीक्षित शेवडे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...