Sunday, December 11, 2022

"न हारणारी होडी"


पावसाळा ऋतू म्हणजे अनेक गमती जमातींचा ऋतू...बरेचदा न उघडणारा पाऊस त्रास वाटतो, तर तो २-३ दिवस आला नाही कि हुरहूर पण वाटते.. कोरोना नंतरच्या अनिश्चिततेच्या वातावरणात आपण अनिश्चितता स्वीकारली असं म्हणता येईल कदाचित..
याच वातावरणात आपणही आपल्या बालपणातील अनेक आठवणींना उजाळा देत असतो..अशीच एक आठवण म्हणजे " होडी " शाळेत असताना हस्तकला हा विषय जरी असला तरी त्यात जे शिकलो त्यात लक्षात राहिलेली आणि अजून हि तयार करता येणारी कागदाची होडी हा नेहमीच आवडता उद्योग..
याच उद्योगाचा भाग म्हणून वेदांत आणि तन्मयला घेऊन मागच्या रविवारी कागदाच्या होड्या बनविण्याचा बेत पूर्ण झाला. कार्ड शीटच्या होड्या, वृत्तपत्राच्या कागदाच्या होड्या तर काही पेपरात येणाऱ्या जाहिरातींच्या होड्या... 
पुढचा बेत होता त्या सोडण्याचा.. पण आता होड्या झाल्या पण आधी अतिवृष्टी मुळे आणि नंतर पाऊस बंद यामुळे.. पुन्हा एकदा अनिश्चितता आणि हुरहूर याचा अनुभव घेत वेदांत तात्यांनी प्रश्न सुरु केले.. कधी आणि कुठं सोडायच्या होड्या??
आज उद्या करत अखेर मुहूर्त लागला, वेदांत आणि मी मुठा नदीकडे मोर्चा वळवला, नदी आणि पाणी याच आपल्या शहरी भागातील मुलांना कुतुहूल तर असणारच... म्हणून आधी नांदेड सिटी पुलावरूनच बोटी सोडू असं ठरलं पण, विचार केला पुलावरून टाकली तर बुडेल कि काय म्हणून बाजूने नदीपात्रातील खडकांवर दोघेही उतरलो, एकमेकाना आधार देत शेवटी कसे बसे पोचलो पात्राजवळ... आता तात्या मूड मध्ये होते होड्या पाण्यात टाकण्याच्या... १-२ होड्या सोडल्या पण त्याचा पहिला अनुभव असल्या मुळे एक होडी उलटी झाली तर दुसरी कशी बशी पुढे मार्गक्रमण करू लागली.
होडीच्या प्रवासाचा आनंद घेत वेदांतने कार्डशीट ची बनवलेली होडी सोडली आणि अपेक्षेप्रमाणे ती भराभर पुढे हि गेली...आधीच्या १-२ होड्या मात्र अडखळत मागे पडल्या होत्या.. वेदांत मला विचारात होता त्या का पुढे नाही जात आहेत..मी बोललो जातील तू त्या पुढे गेल्या आहेत त्या बघ...
इतक्यात आपल्या स्वतंत्र भारतातली सुजाण नागरिकाने घरचे पिशवीभर निर्माल्य पुलावरून नदीत फेकले.. वेदांत मला सांगू लागला किती कचरा टाकला त्या काकांनी आता त्या १-२ होड्या अडकतील ना? मी हि त्याला पुन्हा त्या पुढे गेलेल्या होड्या दाखवत घराचा रस्ता धरला.. 
घरी आलो तर तन्मय शेठ नाराज, त्यांना बरोबर नेलं नाही म्हणून ..साहेबांची नाराजी दूर करण्यासाठी पुन्हा ३-४ होड्या बनवून आमच्या तिघांचा मोर्चा पुन्हा मुठा नदी नांदेड पुलाकडे वळला.. आता नदीपात्रात उतरताना वेदांताचा आत्मविश्वास पहिल्या पेक्षा वाढला होता, झटक्यात पुन्हा होडी सोडण्याच्या पॉइंटला आलो आणि पुन्हा होड्या सोडायला सुरुवात करणार तोच वेदांतच लक्ष मघाशी सोडलेल्या पण बाजूला आलेल्या त्या एका होडीकडे गेले. आपण घरी जाऊन आलो तरी ती तिथंच कशी 'पप्पा?? 
मी त्यांना बोललो आरे नवीन होड्या सोडा आधी मग आपण बघू... तोवर नव्या होड्या मुठेच्या प्रवाहात मिसळल्या आणि छान मार्गक्रमण करत गेल्या सुद्धा...
आता ती बाजूला आली होडी बघून तन्मय ने ती बाहेर काढली आणि पुन्हा पाण्यात सोडली, थोडी गचके खात ती थोडं पुढे गेली आणि परत थांबली. परत थोडं पुढं गेली आता पुलाखालून येणार एक जोरदार प्रवाह येऊन तिला धडकला आणि तिने २-३ गिरक्या घेत आपला मुठा नदीतील प्रवास पुढे सुरु केला.. नजर वळेपर्यंत तिने जोरदार प्रवास सुरु केला होते...
स्कुटीला स्टार्टर मारत मी मुलांना बोललो... कधी कधी काही गोष्टी उशिरा सुरु होतात पण थांबत नाहीत.
सुरुवात हळू झाली म्हणजे पराभव नाही, तर जिंकण्याची संधी असते.. असे अनेक अनुभव येतील पण न थांबता प्रयत्न करा, विजय हा ठरलेलाच आहे..

राहुल भोईटे 🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...