Thursday, December 22, 2022

*शितला देवी मंदिर*

शितला देवी मंदिर

माहिम, मुंबई

संकलन - सुधीर लिमये पेण

भारतात बऱ्याच राज्यात शितलादेवीची मंदिरे आहेत. पालघर जिल्ह्याच्या पालघर तालुक्यात केळवे गावात एक पुरातन मंदिर आहे. तसेच मंदिर मुंबईत माहीम भागात आहे. पश्चिम रेल्वेच्या माहीम रेल्वे स्थानकावर उतरून पश्चिमेला लेडी जमशेटजी रोडवर हे मंदिर आहे. माटुंगा रेल्वे स्थानकावर उतरून सुध्दा येथे जाता येते. पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकावरून वांद्र्याला जाणाऱ्या बेस्ट बसेस शितलादेवी मंदिर बसथांब्यावर थांबतात.

मौखिक परंपरेनुसार पोर्तुगीज काळात या देवतेची स्थापना इथे झाली आणि तिचे मूळ स्थान पालघर तालुक्यातील केळवे-माहीम केळवे गावात आहे असे म्हटले जाते. मुंबईतील ह्या शितलादेवी मंदिराच्या दर्शनी स्थापत्यावरून त्याचे प्राचीनत्व सिध्द होऊ शकत नाही. परिसरात असलेल्या मूर्तीचे भग्नावशेष ११ व्या ते १३ व्या शतकातले असावेत. महिकावतीच्या बखरीमध्ये शितलादेवीच्या मंदिराचे उल्लेख आहेत. हे मंदिर साधारण १७ व्या शतकातील असावे. मंदिराचा अनेकदा जिर्णोद्धार झाला आहे.

प्रवेशद्वारात एक प्रचंड दगडी दीपमाळ आहे. परिसरात एक दगडी देवळी आहे. ती चारही बाजूंनी उघडी आहे. शितला देवीचे मंदिर साधे पण मोठे आहे. मोकळा मंडप आणि नेटके गर्भगृह हे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. 

मंदिराच्या आवारात मारुती, खोकलादेवी, कालिकामाता, भगवान शंकर, गणपती, स्वामी समर्थ, शांतादुर्गा आणि विठोबा या देव-देवतांची मंदिरे असल्यामुळे येथील वातावरण प्रसन्न असते. येथे दर मंगळवारी व शुक्रवारी देवीला सोन्याचा मुकुट चढवला जातो. मंदिरानजीक पुरातन विहीर आहे. फार दूरवरून लोक याठिकाणी स्नानासाठी येतात. त्या विहिरीतील पाण्याने आंघोळ केली असता त्वचेसंबंधी उद्भवणारे रोग नाहीसे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराच्या आवारात खोकलादेवीच्या कृपाप्रसादामुळे खोकल्याचे रुग्ण बरे होतात. अनेक धार्मिक सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने येथे पार पाडले जातात. नवरात्रीच्या अष्टमीला मोठा हवन मंदिरात केला जातो. शिवाय माघ महिन्यातील नवरात्रोत्सवात देखील देवीला सोन्याचा मुकुट चढवला जातो. तसेच यज्ञ, अभिषेक केले जातात. मंदिरात दररोज सकाळी ८.३० वाजता आणि रात्री ७.३० वाजता आरती केली जाते.

परिसरात नंदी, विहीर, दीपमाळा, वृक्षांभोवती बांधलेले पार आहेत. गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टकडून कारभार पाहिला जातो. कोळी, भंडारी, पाठारे प्रभु, पाठारे क्षत्रिय, सोमवंशी क्षत्रिय आणि गौड सारस्वत असे अनेक लोक येथे दर्शनासाठी येत असतात. 

आजूबाजूच्या परिसरात प्राचीन मंदिरांचे अवशेष सापडले होते. काही अवशेष माहीम पोलीस ठाण्यामध्ये पाहायला मिळतात. जवळच ७०० मीटर अंतरावर असलेल्या साती आसरा मनमाला मंदिरात प्राचीन मंदिरांचे काही अवशेष आहेत. महिकावतीच्या बखरीत बिंबाराजाची राजधानी म्हणून महिकावतीचा उल्लेख येतो.भाभा अॅटोमिक रिसर्च परिसरात नुकताच सापडलेल्या एका शिलालेखात मुंबईचा माहीम बिंबस्थान असा उल्लेख आहे. शितलादेवीची मूर्ती मंदिराच्या परिसरातील विहिरीत सापडली होती असे म्हटले जाते. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आपले सांस्कृतिक अस्तित्व जपणाऱ्या अनेक स्थानिक जनजातींचे हे श्रध्दास्थान आहे.


स्त्रोत - गुगल/विकिपीडिया

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...