*विचार हा शब्द वाचताच,*
*आपल्या मनात असंख्य विचार येऊ लागतात.*
*आता कोण,कधी, कुठे,कोणता, कसला,कुणाचा,किती,*
*व कसा विचार करेल,*
*ते काही सांगता येत नाही.*
*काही माणसं क्षुल्लक गोष्टींचा,*
*अती विचार करतात,*
*तर काही गंभीर...*
*आणि महत्त्वाच्या गोष्टींचाही,*
*फारसा विचार करताना दिसत नाहीत.*
*बरेचदा चिंतन करण्यापेक्षा,*
*चिंताच जास्त करतात.*
*हल्ली माणसं एवढी विचारमग्न झालीत की,*
*रस्त्याने चालताना,वाहन चालवताना,हातवारे करणे, मान हलवणे,*
*किंवा स्वतःशीच पुटपुटणे असे प्रकार दिसायला लागलेत.*
*विसरणं,स्वमग्न होणं,*
*एखाद्याला खरेदीनंतर पैसे न देताच निघणं,*
*किंवा पैसे परत न घेता जाणं,*
*असेही प्रकार वाढत आहेत.*
*हल्ली मला खूप टेंन्शन आलंय,*
*नुसता येड्याचा विचार झालाय,*
*विचार करूनबी काहीच उपयोग होईना.*
*असे शब्द वा वाक्ये ब-याचदा लहानथोर माणसं बोलताना आपण पाहतो.*
*कधीकधी मागचापुढचा विचार न करता,*
*एखाद्या गोष्टीचा निर्णय घेतल्यानं,*
*आपण अडचणीत येतो.*
*तर कधी आपण विचार करतो एक,*
*आणि होतं दुसरंच.*
*काहीजण आजच्या जगण्याचा आनंद घ्यायचा सोडून,*
*अनेक पिढ्यांची सोय पाहण्याने अडचणीत येतात.*
*जरा विचारपूर्वक विचार करा.*
*मृत्यूनंतर आपण सोबत काय घेऊन जाणार आहोत.*
*तेंव्हा इतकंच पसरा की,*
*आवरायला सोपे जाईल.*
*आपल्याशी असंबंधीत गोष्टींचा फारसा विचार करू नका.*
*गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा काय कामाच्या,*
*विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा,*
*तरूणांनी व मध्यम वयीनांनी कामाचा,*
*व वृद्धांनी आहे ते छान मानत,*
*चित्ती असू द्यावे समाधान,*
*असे राहणे याचा विचार करावा.*
*चांगल्या विचारानं माणूस जसा घडतो,*
*तसा अती विचारानं बिघडतोही.*
*तेंव्हा सुखदुःखे समं कृत्वा ।*
*असं राहण्याचा विचार करावा.*
*उद्याच्या विचारात आजचं जगणं संपवू नका.*
*इतरांप्रमाणे बनण्याचा वा मुलांनाही इतराप्रमाणे बनवू नका,*
*इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्यासाठीच,*
*तर तुम्हांला विधात्याने वेगळं बनवले आहे,*
*याचा नीट विचार करा.*
*आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडू.*
*कोणी जर चुकत असतील तर माफ करू.*
*कोणी चांगलं करत असेल तर शुभेच्छा व आशीर्वाद देवू.*
*जमेल तेवढी सेवा करीत राहू.*
*स्वतःसाठीही थोडंसं आनंदाने जगणं जपणं,*
*आणि छंद जोपासण्याचा विचार करू.*
*तरच आमचं जगणं आधिक सुंदर होईल.*
*तुम्हीही अंतर्मुख होऊन, विचार करून पहा.*
*हाच आहे आपल्या जगण्याचा,*
*खरा जीवनविचार...!!*



No comments:
Post a Comment