चला करूया प्रकाशमय जीवन.
(०१) “एका मेणबत्तीने दुसरी मेणबत्ती पेटवली तर पहिल्या मेणबत्तीचे काहीही नुकसान होत नाही.”— (जेम्स केलर)
(०२) "Thousands of candles can be lit from a single candle, and the life of the candle will not be shortened.” — (Buddha)
मित्रांनो, उपरोक्त दोन्ही वाक्यांमध्ये किती सुंदर संदेश दडलेला आहे ना! आयुष्य जडणघडणीचा मोठा सारच आलाय यात. नवे संकल्प आखताना वा योजताना यापेक्षा अधिक सुंदर संदेश काय असू शकतो? आपले संकल्प पूर्ण व्हावेत, ठरविलेले ध्येय, उद्दिष्ट्ये, आखलेल्या योजना पूर्ण व्हावेत म्हणून आपण सातत्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतो. पण नुसता संकल्प व केवळ ध्येय, उद्दिष्ट्ये ठरवून चालणार नाही, तर ते कसे पूर्ण होईल या संदर्भाने जाणीवपूर्वक विचार करून त्यासाठी प्रामाणिक कार्य करणे आवश्यक आहे. दिव्याने दिवा पेटवण्याचा संकल्प केला तर किती अधिक बरे होईल बरं! हा दिवा मात्र ज्ञानाचा, प्रेमाचा, आपुलकीचा, सहकार्याचा, विश्वासाचा, विवेकबुद्धीचा, बंधुभावाचा, बांधिलकीचा, नव्या विचारांचा, नैतिकतेचा, संविधानिक तत्त्वांचा आणि स्व: जाणीवेचा असावा.
इतरांना निखळ आनंद देण्यासारखे सुख दुसरे कुठलेच नाही. ही अशी एक गोष्ट आहे,
की कितीही वाटली तरी कमी होत नाही(Happiness never decreases by being shared). उलट आनंद तर उत्तरोत्तर वाढतच जातो. आपण सतत अनेक चांगल्या गोष्टी करत राहतो. सत्याच्या, तर्काच्या, अनुमानाच्या व विवेकाच्या आधारावर पडताळून पाहत असतो आणि याच आधारावर सतत काही ना काही मिळवत राहतो, मग असा विचार करूया की, या गोष्टी जर आपण इतरांना सातत्याने, अनवरत देत राहिलो, तर काय बर होईल? नक्कीच आपला आनंद तर द्विगुणीत होईलच, पण समोरची व्यक्ती देखील आपल्या आनंदात सहभागी होईल. तसेच त्यांच्याकडील ज्ञान, अनुभव, कौशल्ये यांचा सुद्धा आपल्याला चांगला फायदा होईल. अशा प्रकारे चांगल्या व विवेकी विचारांच्या माणसांची छान शृंखला निर्माण होण्यास मदत होईल. अशा मिळून सोबत जाणाऱ्या माणसांमुळे समाज पुढे जातो. राष्ट्र प्रगत होते. समाजहित, देशहित जपल्या जाते आणि त्यामधून वैश्विक बंधुभाव वाढीस लागतो, विश्वसनिय नात्यांचे जाळे निर्माण होते.
माणूस हा सृजनशील व बौध्दिकदृष्ट्या गतीशील असा सामाजिक प्राणी आहे. तो सतत नव्याचा शोध घेत असतो. स्वत:ला फुलवत असतो, घडवत असतो, नवे निर्माण करत असतो. आपला जन्म हा अनेक चांगल्या कल्पना, चांगल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी झाला आहे असे आपण मानतो व म्हणतो सुद्धा. स्वप्न साकार करण्यासाठी व चांगल्या प्रकारे योग्य आकार घेण्यासाठी आपल्याला अनेक क्षमता लाभल्या आहेत, चांगली कौशल्ये अवगत/प्राप्त आहेत, चला तर मग एकमेकांच्या सहकार्याने, प्रत्येकाच्या चांगल्या कार्याची, कामगारीची दखल घेऊन त्यांचा योग्य व अचूक वापर हे जग अधिक प्रकाशमय व सुंदर होण्यासाठी करूयात.
लेखन~ संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा.
No comments:
Post a Comment