Thursday, December 22, 2022

सारे ओके नाही...

 *सारे ओके नाही...*


ना झाडी ओके आहे, ना डोंगर ओके आहे,
सत्तेसाठी हपापलेले, हे सारे बोके आहे...

हॉटेलात काय जातात, दारू काय पितात,
फुटू नये आमदार म्हणून, पैसे काय खातात,
निर्भीड छाती नाही, जनतेची भीती नाही,
अश्रू पुसण्या गरिबांचे, वागण्यात निती नाही,
व्हेंटिलेटर लोकशाहीचे, हे शेवटचे ठोके आहे...
सत्तेसाठी हपापलेले, हे सारे बोके आहे...

सुसाट बोलत सुटले, यांनीच पुरते लुटले,
मोर्च्यातील चेल्यावरती, न्यायालयाचे खटले,
हरलेला डाव आहे, रक्ताने भिजले गाव आहे,
अघोरी कर्मावर, संपत्तीचा घेराव आहे,
करणारे कोण अन कोणाचे हे डोके आहे...
सत्तेसाठी हपापलेले, हे सारे बोके आहे...

मस्तकात यांच्या दुरावे, सापडेना काही पुरावे,
परिवर्तनाची वाट पाहून, खंगुन खंगुन मरावे,
प्रवृत्ती यांची गुन्हेगारी, वृत्ती तशीच अहंकारी,
असेच करत राहिलो तर, डाव साधतील शेजारी,
अकलेचा पत्ता नाही, वरचे सारे खोके आहे...
सत्तेसाठी हपापलेले, हे सारे बोके आहे...

पोरांहाती बंदुका, कंगालाच्या उदरी भुका,
उघड्या डोळ्यांनी दिसूनही, चौथा स्तंभ मुका,
स्वातंत्र्याचा हाहाकार आहे, बुक्क्यांचा मार आहे,
अविवेकाने विवेकावरती, केलेला हा वार आहे,
एकाच नाण्यांच्या बाजू असुनि दावी दोन टोके आहे...
सत्तेसाठी हपापलेले, हे सारे बोके आहे...

पुन्हा पुन्हा येतील, आश्वासने देतील,
निवडून आले की, वाटून वाटून खातील,
अधांतरी वर्तमान आहे, नेता पुण्यवान आहे,
जातीयतेच्या तटबंदीतील, माझा देश महान आहे,
दर पाच वर्षाने, सत्तांतराचे मोके आहे...
सत्तेसाठी हपापलेले, हे सारे बोके आहे...

*कवी:*
*डॉ. अमित झपाटे*
*नागपूर*
*दि. ०५/०७/२०२२*


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...