चौथा महिना चालू झाला तरी
Lockdown संपत नाही
June संपत आला तरी रिमझिम
काही होतं नाही
का ते देवा देतोस आम्हाला
एवढी मोठी शिक्षा
पुरे झाली आता ही
आमची सत्व परीक्षा
ऐकले होते जीवन हे
फ़ार सुंदर आहे
ऐकले कसले आम्ही तर ते
अनुभवलेही आहे
कबूल आहे पृथ्वीवर
वाढला आहे भार
म्हणून काय तू चांगल्याना
वेठीस धरणार फ़ार
अजून आमची मुळे बाळे
सुरु करताहेत आयुष्य
त्यांच्या माथी मारणार का तू
हे विषाणू चे धनुष्य ?
आधी कोरोना मग वादळ
चंद्र ग्रहणही झाले
आघाडीवर कुरापतींनी
सैन्य हैराण झाले
त्यात जगतोय कसेबसे तर
नोकरीं नाही राहिली
खावे काय प्यावे काय
भ्रांत आम्हाला पडली
उ रावरचे ओझे मोठे जगू देत नाही
लाईट बिल चा बोंब त्यावर
मारा करीत राही
खरे तर यावेळी थंड सुगंधी
हवा असते
आषाढातल्या मेघांनी शीतल
बरसात केली असते
आज आहे कांदे नवमी
करूच आम्ही साजरी
असेल त्यात सुख मानण्याची
आमची तऱ्हाच न्यारी
आवर आता देवा तुझी
शिक्षा झाली पुरे
पथ्य तुझे सोडून आता
कांदाभजी खायला ये बरे
--- अमृता कुलकर्णी
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
वर्ष उरलेलं ...
वर्ष सरलं अर्ध
उरलं अर्ध
सरल्या क्षणांची
उजळणी करून
उरला प्रवास
गाठायचाय अजून
माणूस म्हटल्यावर
हमखास चुकणार
आता, एक छोटी चूक
फक्त जीवावर बेतणार
आपला जीव तर
आहेच मोलाचा
पण जे विसंबून
त्यांचा लाख मोलाचा
तेव्हा बाबांनो,
जसं जिंकल वर्ष
सरलेलं
तसंच जिंकुया
वर्ष उरलेलं
@निनाद शेट्ये 



===============================================
विठ्ठल
भौतिकाच्या बंधनांचा
फार झाला त्रास आहे
मुक्त त्यातून होण्या
प्राण कासावीस आहे
चंद्रभागी नाहण्याची
जागी झाली आस आहे
पंढरीच्या विठ्ठलाचा
लागला ध्यास आहे
कटीवर कर त्याचे
विटेवरी वास आहे
देखणी ती रूख्माई
शोभते बाजूस आहे
काय वर्णू रूप त्याचे
सामर्थ्य न वाणीस आहे
वैष्णव भक्तिची तेथे
वेधक आरास आहे
दर्शनाने धन्य झाला
आज हर एक श्वास आहे
कैवल्याची शांती जणू
गवसली जिवास आहेत
डाॅ अमिता गोसावी
===================================================
अवघीच तीर्थे घडली एकवेळा!
चंद्रभागा डोळा देखलिया!!
अवघीच पापे गेली दिगंतरी!
वैकुंठ पंढरी देखलिया!!
अवघिया संता एकवेळा भेटी!
पुंडलिक दृष्टी देखलिया!!
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक !!
विठ्ठलची एक देखलिया!!
आषाढी एकादशी निमित्ताने शुभेच्छा 





==============================================
बंद देवळा बाहेरून मी
देवाला फुले वाहिली.
हळूच दारा आडून त्याने
भीती माझी पाहिली.
भजन नाही, नाही प्रार्थना
ना म्हंटली कुठली गाणी.
जे सांगायाचे होते मजला
वदले डोळ्यांतील पाणी.
कुठून आला आवाज कानी
चपापून जरा मी पाहिले.
लक्षात आले नैवेद्याचे
ताट आणायचेच राहिले.
घेऊन निघालो होतो देवा
रस्त्यात भेटला भुकेला.
नैवेद्याचा घास तुझा मी
त्याला मग देवू केला.
चेहऱ्यावरती दाटून आले
भाव तयाचे भोळे.
उपकाराची जाणिव त्याचे
बोलत होते डोळे.
हळूच दिली तृप्तीची ढेकर
त्या खंगलेल्या पोटाने.
अस्फुट आशीर्वादही दिले
रखरखीत त्या ओठाने.
क्षमस्व देवा नैवेद्य तुझा
आणू न शकलो इथे.
अरे वेड्या, देव म्हणाला
ग्रहण केला मीच तिथे.
येवू नको मंदिरात माझ्या
तू घरामध्येच थांब.
आयुष्याची दोरी तुझ्या
बघ होते कशी लांब.
लहान मुलांत शोध मला
असेन मी फुला पानांत.
सापडेन तिथेच तुला मी
दिन दुबळ्यांच्या मनांत.
मलाही झालाय नकोसा
ह्या मंदिरातला थाट.
गरिबांच्या रुपात तुझी
मी बघत राहीन वाट.
========================================
सलाम सलाम सलाम
तुमच्या माझ्या डॉक्टरला सलाम..
रात्रपाळीला, के इ एमच्या वॉर्डमध्ये, एखाद्या दारुड्याच्या शिव्या खात, त्याच्या जखमा साफ करणाऱ्या आणि सकाळी एच ओ डीच्या राउंडला डोळे चोळत उभ्या राहणाऱ्या रेसिडन्टला पहिला सलाम..
अर्ध्या रात्री अडलेल्या गर्भवतीसाठी, झोपेत गाडी चालवत दवाखाना गाठणाऱ्या गायनोकॉलॉजिस्टला सलाम,
जगातल्या सगळ्या आजारांवर सलाईन लावणे हा एकमेव उपाय करणाऱ्या आमच्या गावच्या LCEH डॉक्टरला सलाम
रात्री अडीच वाजता ओपन हार्ट सर्जरी करून एक लार्ज पेग भरत गप्पा मारायला बसलेल्या सर्जनलाही सलाम,
एकाच वेळी बुरखा घातलेल्या पाच महिला पेशंटना आत बोलावून, त्यांना बाळ न होण्याची कारणं समजावून सांगणाऱ्या obs & gyn लेडी डॉक्टरला सलाम,
प्रत्येक आजारावर औषध लिहिताना, न चुकता महागडे मल्टीव्हिटामिन लिहिणाऱ्या, आणि मग दर तीन महिन्यांनी दुबई थायलंडला जाणाऱ्या GP ला सलाम,
PHC मध्ये कधीतरीच येणाऱ्या आणि ग्रामीण आरोग्याचा भार वाहणाऱ्या सरकारी डॉक्टरला सलाम,
कित्येक मैल लांब फटफटीवर जाऊन, गरीब म्हाताऱ्याचा दुवा घेणाऱ्या आणि सॅम्पलचे औषध जपून ठेवून त्याला देणाऱ्या साध्याशा डॉक्टरला सलाम,
सगळे प्रयत्न करूनही लढाई हरलेल्या आणि उगाच मार खाणाऱ्या डॉक्टरला सलाम,
एकही बेड रिकामे राहू नये म्हणून पेशंटचे सशुल्क आतिथ्य सांभाळणाऱ्या हॉस्पिटलला सलाम,
उन्हाळ्यात टाय लावून फिरणाऱ्या, मॅनेजरच्या शिव्या खात, मेडिकलवाल्याची दाढी खाजवणाऱ्या, दिवसरात्र टारगेटच्या चिंतेत असलेल्या MR ला सलाम,
ललिता पवार टाईप नर्सला सलाम, अरुणा शानभागला आणि तिच्या मैत्रिणींना सलाम,
तीन दिवसांच्या अर्भकाची नस शोधून त्याचे रक्त तपासणीसाठी काढू शकणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियनला सलाम,
घणाघणा वाजत जीवाच्या आकांताने धावणाऱ्या Ambulance ला सलाम,
इन्शुरन्स आहे का हे विचारणाऱ्या Reception ला सलाम, फोन बंद ठेवा या बोर्डला सलाम,
कोणतेही दुखणे कॅन्सरशी जोडू शकणाऱ्या गुगलला सलाम,
डॉक्टरने कॅबिनमध्ये बोलावल्यावर दहा जणांच्या टोळक्याने आत जाणाऱ्या नातेवाईकांना सलाम,
त्या लाल औषधांच्या वासाला सलाम, त्या ऑपरेशन थिएटरमधल्या थंड श्वासाला सलाम,
आणि शेवटचा सलाम, ह्या समाजाइतक्याचं गहाळ, भ्रष्ट, संवेदनशील आणि मानवी सिस्टिमला,
ज्या सिस्टिमने मागच्या 70 वर्षात सरासरी आयुष्यमान 25 वर्ष वाढवून दाखवले त्या सिस्टिमला त्रिवार सलाम..
सलाम सलाम सलाम..
- शैलेंद्र कवाडे
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
वाली तूची
शेकडो वर्षाची | असे परंपरा |
सांगती ते जरा | अनुभव ||
आषाढे कार्तिकी | दोहो एकादशी |
विठू दर्शनासी | जात होतो ||
उन पावसात | पडला ना खंड |
चाललो अखंड | वारी संगे ||
मुघल, इंग्रज | होते गादीवरी |
चुकली ना तरी | वारी कधी ||
घरदार सारे | विठुच्या हवाली |
तोच एक वाली | असतसे ||
भय 'कोरोना'चे | ऐसे झाले देवा |
कैसा येऊ गावा | पंढरीसी ||
वारी बंदी आली | दिस कसे आले |
घरात कोंडले | वैष्णजन ||
तुझे नाम घेतो | घरात राहून |
नियम पाळून | मान्य कर ||
विनवतो तुला | दूर करी हल्ला |
सांभाळ जगाला | तूच वाली ||
- ©® मनमोहन रो.रोगे
आषाढी एकादशी,०१ जुलै २०२०
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++
सांभाळू कशाला गर्दीत खिसा रे
देवळात लपला तो चोर आहे
रांगेत दर्शनास थांबू कशाला?
युगे अठ्ठावीस तो माझ्यात आहे
तरलेल्या गाथेत सापडेल कसा रे
पाखरांच्या चोचीत तुकाराम आहे
कुराणाचे गाणे वारीतही गावे
पंढरीतही एक रहीम आहे
जात्याजवळ बैसलो जनीच्या
दळलेल्या पीठात तु कुठेच नाही
पळवताना तुकडा भाकरीचा
पाहीले मी आता तुलाच आहे
नाचते उगाच लांडोर भोवती
अश्रू लपवणारा मी मोर आहे
गळ्यात ही माळ लाखमोलाची
चोरणारा कोण दरोडेखोर आहे
जन्म ते मृत्यू अंतर वारीचे
पावसाच्या थेंबाला भुकेला चकोर
विटेला व्हावा स्पर्श एकदाचा
काळजाला फक्त हाच घोर आहे
नितीन चंदनशिवे
दंगलकार
कवठेमहांकाळ
जि.सांगली
7020909521 व्हाट्सअप साठी
**********************************************
पाखरांचं बरं असतं
निव्वळ पोट भरणं
पिलांपुरता निवारा
तात्पुरता ऊभारणं
पंख फुटले
बंध तुटले
पाश संपले
मोकाट सुटले
माणसाचं काही
खरं नाही
मिळतं त्यात
सुख नाही
शाळा हवी
शिक्षण हवं
बिग्री हवी
डिग्री हवी
नोकरी द्या
बायको हवी
बायकोलाही
नोकरी हवी
घर हवं
घरात हवं
सारं काही
नवं नवं
गाडी महागडी
सोन्याच्या लगडी
हे हवं ते हवं
हव्यासातून झगडी
सतत भोग
सतरा रोग
नाही योग
जगण्याचा
पाखरांचं बरं असतं
संसाराचं सार नसतं
जीत नाही हार नाही
जगणं जगणंच असतं
..........अजित राऊळ. .........
No comments:
Post a Comment