*''दिवस तुझे हे फुलायचे! झोपाळ्या वाचून झुलायचे"!!*
या गाण्याचे विडंबन.
दिवस कधी हे सरायचे,
घरातल्या घरात फिरायचे।।
कामवालीची झाली मजा,
घरात मी भोगी सजा।
घरकाम किती मी करायचे,
घरातल्या घरात फिरायचे।।
कधी ना घासली भांडी,
झाडून कधी ना काढी।
बोळ्याने फरशीला पुसायचे,
घरातल्या कामात रमायचे।।
कपडे हे धुता धुता,
दमले गं बाई मी आता।
पसारा कितीदा आवरायचे,
घरातल्या घरात दमायचे।।
बाहेरचे खाण्याचा छंद,
हॉटेल बेकऱ्या बंद।
उपवास किती मी करायचे,
घरात उपाशी मरायचे।।
स्वयंपाकाचा येई मज आळस,
बाई येईना स्वयंपाकास।
वरण भाताने पोट हे भरायचे,
घरातल्या घरात गिळायचे।।
कुणाकडे नसे जाणे,
कुणीच घरी ना येणे।
व्हाट्सऍप हाती धरायचे,
घरातून साऱ्यांशी बोलायचे।।
बाहेर कोठे ना जाऊ,
टीव्हीवर रामायण पाहू।
उरलेल्या वेळात घोरायचे,
घरातल्या घरात रहायचे।।
कधी होईल करोनाचा नाश,
कधी सुटेल मृत्यूचा पाश।
प्रतीक्षा करत जगायचे,
घरातल्या घरात झुरायचे।
No comments:
Post a Comment