Wednesday, August 17, 2022

कवितेचं शिर्षक: बाप माझा.



बाप माझा परत -परत शिवलेल्या चपला घेऊन जातो मोच्याकडे

तेव्हा मोचीही मान खाली घालतो


बाप माझा लाकडं फोडून ढीग रचतो

उन्हाने घामाळलेलं त्याचं कपाळ थबथबतं भेगाळलेल्या जमिनीवर

तेव्हा तिही दचकते

बापाचा माझ्या घामाटलेला वास येताच तिला मळमळून येतं
माशा घवघवतात त्याच्या उघड्या घामट अंगावर

तेव्हा तो उधळून लावतो त्यांना

आणि मनात म्हणतो असल्या केसाळ छातीवर काय रंगीबेरंगी फुलपाखरं भिरभिरणार आहेत?


बाप माझा पुन्हा तुटून पडतो लाकडांवर
तेव्हा एक लाकडाचं फळकुट झोपाळ्यावर लोळत पडलेल्या मालकाच्या टाळक्यात आपटतं

तेव्हा त्याच्या शिव्यांची लाखोली तो आतल्या आत पचवत राहतो


डोक्यात त्याच्या गरम अंगार भडकत राहतो

दारिद्र्याच्या मात्रा मोजत बाप माझा रस्त्यावरून चालत राहतो

तेव्हा...
गावातला एकुलता एक
रस्ताही त्याच्या डोळ्यातील आसवात
हरवून जातो...

कवयित्री सौ. स्नेहा समीर राणे
संपर्क: ९८६९६९४०७५
=======================================

 क्षमा करी हरी| चुकली पायी वारी
संकट आले भारी | करोना रूपे ||

काय पाप केले| संकट ओढावले
 रस्ते बंद झाले| माहेराचे||

काय अपराध झाला| का कोणी शाप दिला
तेणे कोप ओढावला | करुणा रूपे ||

आगा विठुराया | येऊ दे गा दया
सोडवी महा भया | पासूनीया ||

देह असे घरी | मन करी वारी
सुनी ही पंढरी | दिसत असे ||

पंढरीची वाट | वैष्णवांचा थाट
 दिसे दिवेघाट || सुनासुना ||

भजन कीर्तन| टाळ मृदुंगाची धून
 दिसेना रिंगण | कोठे काही ||

पंढरी वैकुंठ | रिते वाळवंट 
दाटला से कंठ| पांडुरंगा ||

आता घरीच बसुनी| करू तुझे ध्यान 
लावूनिया मन| तुझे पायी ||

  *🌹🌹 राम कृष्ण हरी🌹🌹*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...