देवगडच्या श्री प्रमोद जोशी यांच्या बागेत५०.. ६० वर्षे वयाचा माड आहे. त्या माडावर सुतार पक्षांनी १.२ नाही १७.१८ भोके पाडली आहेत. तरीही अजून माड नारळ देतोच आहे.
सोबत माडाचा फोटो आणि जोशींनी त्या माडावर स्वतः केलेली (माडाचे मनोगत) ही कविता पाठवत आहे.
आवडेल अशीच आहे.
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!
माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!
त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!
वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!
जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!
वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!
घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!
सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!
पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!
जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!
प्रमोद जोशी.देवगड.9423513604
============================================
"मन"
मन म्हणजे काय हो ? ,
त्याला कोणी पाहिलं नाही ,
कसं असते ते माहीत नाही,
पण त्याला खूप मान्सनमान असतो.
कधी ते लिक्विड असतं,
"मन भरलं नाही" असं म्हणतो आपण,
कधी ते सॉलिड असतं, "मनावर खूप ओझं आहे",
कधी ते घर होतं, "मेरे मन में रहने वाली",
कधी ते तहानलेल असतं, "मेरा मन तेरा प्यासा" ,
कोणी त्याला मोरा ची उपमा देतं, "मन मोराचा कसा पिसारा फुलला".
असं हे मन आयुष्य भर आपल्याला झूलवत ठेवतं ,
कधी स्वतःच्या मनाने तर कधी दुसऱ्या च्या मनाप्रमाणे आपण वागत असतो,
हे "मन" कधीच स्थिर का बरं नसतं ? ,
ते कधी प्रेयसी च्या तोंडातून मंदिर रूप धारण करतं
आणि ती म्हणते "मन में तुझे बिठाके ..."
काही जण असतात की त्याच्या "मनात"काही रहात नाही तर काही "मन कवडे" असतात.
मन दिसत तर नाही
... पण त्याने ठरवले तर ते हरवून टाकतं
तर कधी शक्ती नसताना जिंकून ही देतं.
"मनात आणलं तर काहीही होऊ शकतं .."
जरी त्याला कोणी पाहिलेले नाही तरी ते जर चांगलं असलं तर आपण आनंदी राहतो ,
दुसऱ्या च भलं करतो, म्हणुन म्हंटलं जातं, "मन चंगा तो .."
कधी हे खूप डेंजर असतं ,
स्वतः कडे राग तिरस्कार साठवून ठेवतं आणि "मनातील" राग दुसऱ्याचे नुकसान करतं .
याचा वेग मोजण्याच यंत्र अजून अस्तित्वात आलेल नाही,
तरी लोकं म्हणतात, "मनाचा ब्रेक , उत्तम ब्रेक".
"मन" दिसत नसलं तरी तेच आपणाला घेऊन फिरत असतं , कधी घरी , कधी डोंगरदऱ्यांत, कधी आकाशात, पण ते निर्मळ असतं, पारदर्शक असतं ,
म्हणुन च आपण म्हणू शकतो की "मोरा मन दर्पण कहलाये."
अशा या न दिसणाऱ्या पण सर्वस्व असणाऱ्या "मनाला" काबूत ठेवण्याचा अनेकजण प्रयत्न करतात
पण "मनाप्रमाणे" जगता आलं नाही तर
त्याला काही अर्थ आहे का ?
मग ...
"मनसोक्त" जगा ! ! आणि त्यासाठी...
*मनापासून" शुभेच्छा*
=====================================
क्षणात भारले मला तिने
वयात आणले मला तिने
मलाच आतला कळे न मी
दुरून जाणले मला तिने
कळी न राहिली कळी अता
दिलेत दाखले मला तिने
कधी नजर कधी अधरमिठी
तिचाच मानले मला तिने
कधीच छेडले न मी तिला
भरीस पाडले मला तिने
…..
(जयंत कुळकर्णी)
==============================
मास्तरच्या लेखणीतून एक दुःखद सत्य :
*

**विद्यालयाच्या जागेपायी*
*कुणीच इथं भांडलं नाही*
*अन्..देवालयाच्या जागेसाठी*
*रक्त इथं कमी पडलं नाही...*
*माझाच देव मोठा म्हणण्यात*
*रक्ताच्या नद्या वाहील्या*
*ज्ञानगंगा कोरडी पडत*
*ओसाड शाळा झाल्या...*
*शाळा अजुनही तशीच*
*पडक्या,तुटक्या भिंतीची*
*गरीब माझ्या देशामधी*
*उभी मंदिरं सोन्याची...*
*शाळे मधली दानपेटी*
*भरलेली कधी पाहिली नाही*
*अन् मंदिराची दानपेटी*
*रिकामी कधी राहिली नाही...*
*शाळेतला पालक मेळावा*
*पालकांवाचून राहून गेला*
*देवालयात चेंगराचेंगरीत*
*माणुस मात्र तुडवून मेला...*
*विद्येचं ज्ञान देऊन*
*गुरूजी गरीबच राहीला*
*अन्'अंधभक्तांचं’ दान घेऊन*
*पुजारी धनवान झाला...*
*खरंतर धर्म नावाचं पुस्तक*
*शाळेत कधीच उघडत नाही*
*अन् धर्माच्या नावाशिवाय*
*देशात पानही हालल नाही...*
*
मास्तर...*
मास्तर...*
========================================
*मैत्र*
एक सुंदर अभिव्यक्ती....



असंच एकदा बोलण्याच्या ओघात, कौटुंबिक गप्पांत मी म्हणाले होते,
'त्याचं नि माझं मैत्र आहे.'
त्याचं म्हणजे नवऱ्याचं.
त्यावेळी एक मैत्रीण एकदम फुसकारली,
'काय मैत्र? तू मराठीची पीएच.डी. आहेस, तुला मैत्री म्हणायचंय ना?'
'नाही गं, मला 'मैत्र'च म्हणायचं आहे.
मैत्री आणि मैत्र यात एका 'इ'काराचा फरक दिसत असला तरी अर्थाच्या दृष्टीने अधिक सखोलता आहे.'
'ती कशी काय?', ती फणकारली.
मैत्री होत असते, ठरवून करता येत नाही आणि मैत्र सहानुभूवाने आपोआप जाणवायला लागतं.
ज्ञानेश्वरांनी पसायदानात 'भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे', असं म्हटलं आहे आवर्जून. त्यांना 'मैत्री' हा शब्द माहीत नव्हता की काय? असं वाटतंय का तुला?
ती गप्प झाली आणि मी सांगू लागले. प्रेम जसं आपोआप होतं तशीच मैत्री होते. एक क्षण पुरे मैत्रीला. समान स्वभाव, आवडी-निवडी यातून मैत्री, कळीचं अलगद फूल व्हावं तशी होते.
*सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं.*
हे फुलणं जाणिवेच्या पल्याड असतं. 'शब्दांवाचून कळते सारे शब्दांच्या पलीकडले', असं घडतं. मैत्रात देणं, घेणं, मागणं हे काहीच नसतं. असतं ते केवळ संवेदन.
त्यासाठी जवळ असण्याची ही गरज नसते, तर असते फक्त एकरूपत्व.
*पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो.*
नाही तर असतोच फाटका. पाठीमागून पाहणारासही दुसऱ्याच्या मनातली खळबळ किंवा आनंद कळतो. ते असतं आपापसांतील मैत्र. सख्यभावात मैत्र अनुस्यूत असतं.
पत्नीच्या सांगण्यावरून सुदामा श्रीकृष्णाकडे, द्वारकेला गेला; पण काही मागावे असे त्याला वाटलेच नाही.
कृष्णाने मैत्रभावाने जाणलं होतं.
त्यानं मागितलं नाही, यानं दिलं नाही; *पण मिळालं मात्र आपोआप.!*
असं मैत्र ईश्वराशी जोडलं गेलं पाहिजे आपणा सर्वांचं. जो कोणी त्याच्याजवळ मैत्रभावाने जाईल, त्याच्याशी त्याचं मैत्र जुळतं.
मैत्र म्हणजे एकरूपता असं साध्या शब्दांत म्हणता येईल. ईश्वरभक्ताचा 'शब्देविण संवाद' होत असतो, ते असतं मैत्र.
असं मैत्र विश्वात व्हावं, अशी ज्ञानेश्वरांची इच्छा त्यांनी व्यक्त केली. विश्वातील चराचरामध्ये मैत्रभाव निर्माण झाला तर अवघं विश्व सुखानंदाच्या सरोवरात विहार करील.
महनीय श्रेष्ठ व्यक्तींचं वागणं, बोलणं, आचरण सारंच दैदीप्यमान असतं.
सामान्य माणसांना त्यापर्यंत जाणं दुरापास्त असतं. विश्वचराचरात मैत्रभाव निर्माण करणं सर्वसामान्यांसाठी सहज साध्य नाही. आपल्या परीनं प्रयत्न करून आपल्यासोबतच्या छोट्याशा परिघात का होईना, मैत्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करावयास काय हरकत आहे.
त्यासाठी आपल्या मनाला समजावलं पाहिजे, की हे मना! तू कुणाचा द्वेष, कुणाची ईर्षा, कुणाशी वैर करू नकोस. हे जर आपल्याला थोड्या प्रमाणात जमलं तर आपण 'मैत्र' शब्दाच्या अर्थाजवळ जाऊ शकू, असा विश्वास वाटतो.
*मैत्रभावाने विश्व जवळ येऊ शकते.*

शुभ रात्री

No comments:
Post a Comment