Friday, August 19, 2022

*माझी मुलगी*


पहाट होवून उगवते
माझी मुलगी
स्वप्नवत मधाळ हसते
माझी मुलगी
फुलाफुलांतून बहरते
माझी मुलगी
गार वार्याची झुळूक होते
माझी मुलगी
विराणी होवून काळजात उतरते
माझी मुलगी
निघतांना परदेशी पावलात अडखळते
माझी मुलगी
एअरपोर्टवर मला बिलगते
माझी मुलगी
म्हातारपणात हक्काचं माहेर होते
माझी मुलगी.
चांदण्याचे गोड गारुड
माझी मुलगी
गाभुळ चिंचेचे बुटूक
माझी मुलगी
सखी,सोबती प्रेमळ
माझी मुलगी
शीतल मनकळी कोवळी
माझी मुलगी
अशी आहे जगावेगळी
माझी मुलगी.

*स्नेहा राणे/बेहेरे.*
===========================================

"आम्ही सुखरूप आहोत..."*
*कवयित्री- कांचन समीर बर्वे-चांदोरकर...*

"सरकारी" नजरेच्या पलीकडचे नुकसान.....
पण आम्ही सुखरूप आहोत...

हां थोडं पाणी भरलं घरात ...
उध्वस्त वाडी बघत आहोत...
तसं नूकसान झालंय थोडंफार 
पण आम्ही सुखरूप आहोत...

त्या बाळू च्या घरावर म्हणे
परसातला फणंस आला..
आणि तात्या चा तो माड 
नशीबाने वाड्याच्या कडेला पडला 
चार दिवस झाले विहीरीतला 
पाला पाचोळा काढत आहोत...
तसं नुकसान झालंय थोडंफार 
पण आम्ही सुखरूप आहोत...

घोंघावत आलं वारं आणि 
झोडपून काढलं पावसानं
फाटकं घर ठिगळं लावून 
शिवणार तरी कुठं कुठं? 
धान्य थोडं भिजलं आहे 
उरलं वाचलं निवडत आहोत
तसं नुकसान झालंय थोडंफार
पण आम्ही सुखरूप आहोत...

समुद्राचा वारा इतका बोचरा 
असतो हे हल्लीच कळलं मला...
किनाऱ्याच्या बनानं जेव्हा
धरणीला टेकला माथा...
काही नाही आता घरातून
थेट समुद्र न्याहाळत आहोत 
तसं नुकसान झालंय थोडंफार
पण आम्ही सुखरूप आहोत...

सोशल मिडीयावर आपुलकी
ओसंडून वाहात आहे..
नेते मंडळींनी म्हणे आपापली पेज
सहानुभूतीने भरली आहेत ..
परिस्थितीचा आढावा द्यायला
इथं रेंज थोडी शोधत आहोत 
तसं नुकसान झालय थोडंफार
पण आम्ही सुखरूप आहोत..

सरकारची वाट न बघता जेव्हा
गावातला तरुण पुढे आला,
आज तुझं , उद्या माझं करत
घर घर सांधत गेला...
माणूसकी गावातच खरी
हेच खरं ठरवत आहोत...
तसं नुकसान झालंय थोडंफार 
पण आम्ही सुखरूप आहोत.

शेवटी आले काही राजकारणी 
जागवून कसलीशी संवेदना
आढावा घेतला म्हणे सारा
जमवून कार्यकर्त्यांचा गोतावळा..
भिक नको साहेब , मनगटात 
अजून ताकद राखून आहोत 
तसं नुकसान झालंय थोडंकार
पण आम्ही सुखरूप आहोत...

सरकार म्हणे झाडामागे काही
रुपये देणारे नुकसानीचे
आंबा ,फणस, माड ,पोफळी
आणि परसातल्या केळीचे
कोकणच्या या मेव्याची किंमत
कवडी मोलाने तोलत आहोत
तसं नुकसान झालंय थोडंकार 
पण आम्ही सुखरूप आहोत...

लाल मातीने या कोकणच्या
अपयश कधी शिकवलं नाही
असेल कोकणी थोडा उर्मट
पण गळफास कधी घेतला नाही
होतंच काय या वाडीशीवाय
त्याचाच हिशेब मांडत आहोत 
तसं नुकसान झालंय थोडंकार
पण आम्ही सुखरूप आहोत...

अभिमान वाटतो कोकणी माणसां
हिम्मत तूझ्या बाहुत आहे 
नसेल कुणी पाठीराखा वाली ,
तुला परशुरामाची साथ आहे..
" फक्त लढ म्हणा" म्हणत 
उद्याची चिंता वाहतो आहोत
तसं नुकसान झालंय थोडंफार
पण आम्ही सुखरूप आहोत...

*कांचन समीर बर्वे-चांदोरकर...*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...