Tuesday, August 16, 2022

बरे वाईट अनुभव देत,

उद्या एकदा वर्ष सरेल!
तरीसुद्धा निरोप द्यायला,
एकदा पापणी पूर्ण भरेल!

हवं वाटलं तरी पुन्हा,
कधीच भेटणार नाही वीस!
पंखात पुन्हा येत नाही,
एकदा उडून गेलं पीस!

प्रतिक्रिया आठवते पण,
आपली क्रिया विसरतो!
कायम निसर्गाच्या आधी,
आपलाच पाय घसरतो!

एकवीस साल,एकवीस दुर्वा,
सुरुवात होईल नविन पर्वा!
"चुका टाळीन!" हाच निश्चय,
अगदी सुखात ठेवील सर्वा!

काळोख दिसतो,चांदण्यांचा...
मात्र कसा विसर पडतो?
आपल्याच कोत्या वृत्तीजवळ,
आपला कोता पाय अडतो!

शतकानंतर साथ येते,
केवढं सगळं उदार आहे!
तरी आपल्या स्वार्थावरती,
आपली क्रूर मदार आहे!

"पसायदान"जगून बघा,
प्रत्येक दिवस मुक्तीचाच!
गाभाऱ्याहून मनात हवा,
दरवळ निखळ भक्तीचा!

एक आजार आला आणि,
लाख आजार गप्प झाले!
हवा शुद्ध झाली कारण,
धूर काढणे ठप्प झाले!

पोटाएवढीच तिजोरीत,
चला साठवून ठेऊ भूक!
कसं हवं वागायला हे,
सांगून गेलं वीस अचूक!

-प्रमोद जोशी.देवगड.
9423513604

=========================================


,,,,,,,,,, ठसे ........ 👣

गळून गेल्या पाकळ्यांतही गंध कालचा उरेल बाकी
सरुन गेल्या वर्षाचेही,ठसे राहतील असेच हृदयी.


स्वप्नाहूनही सत्य विलक्षण,असे बदलले सारे जगणे
अस्तित्वाला दिले हादरे,निव्वळ एका सूक्ष्म जीवाने
अहंकार मातीत मिसळला,वृथाच ठरली धनसंपत्ती
धडपडणे श्वासांचे सांगे,पराधीन तू आहे जगती.


निसर्ग देतो मुक्तकराने,ओरबाडणे तरी हव्यासी
बंदिवान मग क्षणांत एका झाली उंच नी मुक्त भरारी
जरा साचता गाळ तळाशी,निर्मळ नितळ झाले पाणी
वसुंधरेने श्वास मोकळा घेता किलबिल आली कानी.


जरा थांबता कळून आले फक्त धावणे आहे निष्फळ
खूप न लागे जगण्यासाठी,थोडेसेही ठरते पुष्कळ
खरी कमाई आरोग्याची अन् संपत्ती माणुसकीची
खरा देव या हृदयामधला उभा राहिला ठायी ठायी.


काय मिळवले,काय हरवले,जमाखर्च हा मोठा अवघड
आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास यंदा होता खडतर
कुणा मिळाले दान जीवाचे,सर्वस्वाला कुणीतरी मुकले
प्राणांहून अनमोल काही ना,अनुभवातुन कळुन चुकले


म्हणूनच साधे सरळ जगावे,कृतज्ञतेचे भाव असावे
नववर्षी या पुन्हा मुळांनी मातीमध्ये घट्ट रुजावे.

🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...