*प्रत्यक्ष वेळ येता कोणी नसे कुणाचे ।।*
कन्या स्नुषा नृपांची, प्रत्यक्ष रामभार्या ।
पिचली क्षणाक्षणाला, कारुण्यरुपि सीता ।
कामी तिच्या न आले, सामर्थ्य राघवांचे....
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे ll १ ll
त्यागून सूर्यपुत्रा, कुंती पुन्हा कुमारी ।
कर्णास अनुज माता, सारेच जन्म वैरी ।
कौतूक का करावे, त्या रक्तबंधनाचे ....
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे ll २ ll
केली द्युतात उभी, साक्षात कृष्णभगिनी ।
सम्राट पांडवांची, रानावनात राणी ।
पति पाच देवबंधू , तरि भोग हे तियेचे.......
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कुणाचे ll३ll
ठेवू नको अपेक्षा, असल्या जगाकडूनी ।
निरपेक्ष आचरी तू, कर्तव्य, प्रेम दोन्ही,
मग चालूदे सुखाने, अव्हेरणे जगाचे ।।४।।
प्रत्यक्ष वेळ येता, कोणी नसे कोणाचे...
*अप्रतिम कविता...*
*अगदी चपखल उदाहरणांनिशी जीवनातलं कटु सत्य उलगडले आहे या कविने !!*
No comments:
Post a Comment