पर्यावरण दिनाच्या निसर्गाला मनापासून शुभेच्छा आणि कृतज्ञता!
फळं हवीत,सावली हवी,
चुलीसाठी सरपण हवं!
वासे,आडं,रिफा,दारं,
निवाऱ्याला घरपण हवं!
करवती नि कुऱ्हाडीनी,
कृतघ्नताच जपली आपण!
वेळोवेळी जखमेवरची,
खरवडलीच की खपली आपण!
तरीसुद्धा राग विसरून!
निमूट सरण होतात झाडं!
झाडापेक्षा कठीण तरी,
राख होतात शेवटी हाडं!
आपण प्राण घेतो त्यांचा,
तरी प्राणवायूच देतात!
कधी झाडं औषध होतात,
कधी झाडं चंदन होतात!
झाडाजवळ उभं ऱ्हाताच,
मनात एक खंत दाटते!
कृतज्ञता-कृतघ्नता,
जवळजवळ नको वाटते!
हायवे वरून धावताना तर,
झाडांचा मी ऐकतो टाहो!
"सावली दिली..जगणं दिलं!"
त्याचा सूड घेता का हो?"
असं वाटतं कोट्यावधी,
प्रेतांवरून धावत आहे!
स्तन्य प्यायचं सोडून माणूस,
स्तनानाच का चावत आहे?
आपली गरज..त्यांचा खून,
कधी थांबणार आहे संहार!
आपले शंभर फटके सोसून,
विनाशाचा एकच प्रहार!
©️प्रमोद जोशी.देवगड.9423513604
No comments:
Post a Comment