Tuesday, August 16, 2022

||`मी ||


मी आज जो आहे जसा
तसाच उद्या मी राहीन |
आनंदाच्या उत्साहात
मजेत गीत गाईन ||

कोण काही बोले मला
पर्वा मजला नसेल | 
मन हे माझे प्रसन्न
उद्याही गीत गाईन ||

भीतीदायक विचार
शिवणार ना मनास
दुष्ट सा-या विचारांना
गीत माझे ऐकवीन ||

सोबती असो वा नसो कोणी
मार्गी एकटा चालेन |
जीवनी ध्येय गाठीन
गीत माझे मी गाईन ||


चालताना रस्त्यातूनी
बंंधुभाव वाढवीन |
बोधामृत पाजण्याला
अभंग तेथे गाईन ||

अनंत देवघरकर
अलिबाग.९४२०६४५७२८

===========================================

 टवटवीत अन छान म्हणाला
मला फुलांचे रान म्हणाला!

आयुष्याच्या डायरीतले
तू सोनेरी पान म्हणाला !

जवळ घेउनी लेकीला तो
हा माझा अभिमान म्हणाला!

वयात येणाऱ्या इच्छेला
नसते कुठले भान म्हणाला!

झोप लागते पडल्या पडल्या
ही जगण्याची शान म्हणाला!

लाख जिभा या गर्दीला पण
नसतो हल्ली कान म्हणाला!

जपतानाही अहं जगाचा
राख स्वतःचा मान म्हणाला!
©वैशाली माळी
************************************************************

देवही भयभीत झाला ||

देव उशिरा जागा झाला 
डोळे चोळत चोळत ऊभ राहिला 
झटकून आळस उघडले डोळे 
मंदिर दिसले त्याला रिकामे
देवळात तो एकटाच विचारमग्न 
असे काय घडले ? मी एकटाच कसा ?
भक्तगण आले की नाही ?
काकड आरती झाली की नाही ?
देव जागेवरून हलला, पाय मोकळा झाला 
समोरच्या दारापलिकडे कोणी दिसेना 
आणि देवाला एकाकीपण जाणवू लागले 
त्याने टी.व्ही. लावला 
" कोरोनाने जगभर हाहाकार माजवला आहे 
अनेकांनी मृत्युला कवटाळले आहे "
( देवाच्या हृदयात कळ आल्याचे त्याला जाणवले )
तो ऐकू लागला...
शिंका येतात, खोकला येतो, ताप भरतो 
आणि कोरोना शरिरात प्रवेश करतो 
सर्वांनी एकमेकांपासून दूर रहावे 
तोंडाला रुमाल बांधावे
जमावात जाऊ नये, हस्तांदोलन करू नये 
हात जोडून दुरूनच दुस-याला नमस्कार करावा 
ताप येताच इस्पितळात जाणे टाळू नये 
बातम्या संपल्या.
देवाला थंडी वाजू लागली, घाम फुटला 
अंग थरथरू लागले, खोकला सुरू झाला
आता मला कोण वाचवील ? 
या विचाराने तो भयभीत झाला 
आणि टी.व्ही वर निवेदन करण्यात येत होते
" जमावात जाऊ नका, एकटे रहा मग तुम्हाला 
कोरोनाची बाधा होणार नाही 
देवाने निवेदन लक्षपूर्वक ऐकले मात्र 
तो निश्चयाने धीट झाला 
त्याची थंडी गेली. खोकला गेला 
तापही नाहीसा झाला
त्याला कळाले तो एकटाच होता 
" बरे झाले भक्तगण आले नाहीत"
असे बोलून तो महादेवाकडे गेला 
महादेवाशी हस्तांदोलन न करताच
एक फुटावर उभा राहिला 
त्यास दोन्ही हात जोडून त्याच्याकडे
" जमावबंदीचा आदेश मागितला "
महादेवानेही आपल्यावर काही 
आपत्ती येऊ नये म्हणून "तथास्तु " म्हटले
देव देवळात आला. त्याने दरवाजावर
जुनीच पाटी " अंदर आना मना है "" लावली
आणि निर्धास्तपणे पुन्हा 
त्याच्या जागेवर उभा राहिला..

श्री अनंत केशव देवघरकर 
९४२०६४५७२८.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 मुलगी मोठी होतेय ! 

गुरूजनांच्या डोळ्यांतला 
    आत्मीय स्पर्श आणि
थरथरणार्या हातांचा स्पर्श 
     तिला सुखावू लागलाय 
मुलगी आता मोठी होतेय.

प्रेमळ मातेचा स्पर्श 
      आणि पित्याच्या जरबेतला 
स्पर्शही तिला कळतोय 
       मुलगी आता मोठी होतेय 

अनामिक स्पर्शाची हुरहुरही 
       तिच्या मनात 
       वस्तीला येतेय 
मुलगी आता मोठी होतेय 

टाळावासा वाटणारा आणि 
        नकोसा स्पर्शही तिला 
कळायला लागला आहे 
खरंच , मुलगी आता मोठी होतेय !


स्नेहा राणे/बेहेरे.ठाणे/वेंगुर्ला.
*************************************************************

 मित्र.मैत्रिणी वेडेच असतात !!
   केव्हाही येतात केव्हाही जातात
   मनाची दारं उघडीचं टाकतात  
आपल्या सुखात खळखळूनहसतात
आपल्या दुःखात पिळवटून रडतात
मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!
     जवळची नातीसुद्धा परकी होतात 
      दिलं ,घेतलं हिशाोबातअडकतात
      तिथं हेच सावरायलाच असतात
  सावरलंकीअलगद बाजुलाहीसरतात
मित्र मेैत्रिणी वेडेच असतात.!!
         रक्ताच्या नात्याचे नसतात .
       अग्निसमक्ष जोडलेले नसतात
       एखादया अवचित हळवया क्षणी
       अद्वैत साधून मनात शिरतात
   मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!
       सारे माझे तयांना ठाऊक असते
      सारे तयांचे मला ठाऊक असते
      कोठे काय बोलायचे उमजलेले असते
      काय ओठांच्या आत हवे माहित असते.
मित्र मैत्रिणीं वेडेच असतात.!!
        बालपणीचे निरागस बंध
         तारुण्यातील उनमत्त गंध
          ‌प्रौढपणीचा समजदार संग
          अवघे आयुष्य माझे रंगारंग 
   मित्र मैत्रिणी वेडेच असतात.!!
मैत्री खरंच अशीअनमोल असते. 
प्रत्येक जीवाने अनुभवायाचीअसते.
पण....पण.....
खुळ्या सोनेरी उन्हासारखी
 आयुष्यात मैत्री जुळावी लागते.

🧡❤️💛💚💙💜🖤
@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@

 घरे गेली अंगणे गेली
नाती गोती फाटत गेली.. 
प्रेम, जिव्हाळा,माया, ममता
सारी सारी लुप्त झाली.

चार-चार बेडरूम्सची घरे झाली!
पण आई वडिल,वृद्धाश्रमी गेली..
आई-वडिलांचे कष्टं.. ऋणं..
सारे मुले विसरून गेली.. 

आजीआजोबांची नातवंडं
पाळणाघरातली children झाली
सोडायला बाई, आणायला बाई
घरच्या मायेला पारखी झाली..

सारी 'extremely busy' झाली
विचारपूस करी ना कोणी..😷
रक्ताचीही नाती आता
WhatsApp मध्ये बंद झाली..!

प्रत्येकाची वेगळी खोली
प्रत्येकाला स्पेस झाली
घरातल्याच माणसांमधल्या
संवादांची होळी झाली..

हॉटेलिंगची फॅशन आली 
घरची जेवणे बंद झाली..
Modular च्या kitchen मध्ये
सगळी..बाहेरच जेवुन आली !

खोल्यांची संख्या वाढत गेली
माणसे मात्र कुढत गेली..
मी, मला, माझे माझे 
स्वार्थामुळे ममता गेली

चिमुकल्यांची मनेच तुटली..
पैशामुळे नीती गेली..
नीतीमुळे मती गेली..
अहो पैशासाठी माणसाने
माणुसकी सोडून दिली

फेसबुक, गुगल, सगळे असून
का डिप्रेशन ची पाळी आली? 
प्रत्येकाला शुगर, बीपी .. 
हार्ट चीही गोळी आली ! 

इंटरनेट ने क्रांती केली ! 
मोबाईल ने जादू केली ! 
स्वत:च्याच कोषामध्ये
माणसे आता मग्न झाली.. 

माणसे जाऊन यंत्रे आली !🖥
यंत्रांची मग तंत्रे आली ! 🤕
यंत्रे-तंत्रे सांभाळताना
माणुसकीची फरफट झाली..

सुखं सांगायला कोणी नाही..
दु:ख ऐकायला कोणी नाही..
'Sharing' च्या या जमान्यात
माणुसकी मात्र उरली नाही

चला यंत्र थोडी बाजूला ठेवूया
विचारपूस करण्या घरी जाऊया
नाती गोती सांभाळुनी 
आपण थोडे जवळ येऊया.
=========================================

साहेब, ही बाई हरवली आहे

काय चेष्टा करता ताई,
हा फोटो तुमचाच आहे, 
विस वर्षांपूर्वीचा.

हो साहेब
विस वर्षांत मीच हरवले आहे.

नात्यांच्या घोळक्यात
मुलांच्या गलक्यात
सासरच्या धाकात
अखंड स्वयंपाकात
                      मी हरवले आहे

स्वत:च्या घरात
प्रपंचाच्या चाकात
प्रेमहीन संसारात
वासनेच्या अंधारात
                         मी हरवले आहे

मृगजळाच्या फंदात
हव्यासाच्या नादात
सुखाच्या शोधात
नशिबाच्या सौंद्यात
        . मी हरवले आहे

नव-याच्या मर्जित
मागण्यांच्या गर्दीत
अपेक्षांच्या झुंडीत
उपेक्षेच्या गंजीत
       ‌. मी हरवले आहे

साहेब
ती सागरगोटे खेळणारी मुलगी शोधा
ती स्वप्न पाहणारी मुग्धा शोधा
ते उगाचच फुटणारे हास्य शोधा
ती हृदयाची धडधड
ती पापण्यांची फडफड
ती अर्थहीन बडबड
कुठे गेली शोधून काढा साहेब

ती शृंगाराची ओढ शोधा
ती समर्पणाची उर्मी शोधा
तो स्वच्छंद पक्षी
निळ्या नभावरील केशरी नक्षी
सात पावलांची अग्निसाक्षी
कुठे गेली ते शोधून काढा,
साहेब..?? 

अंधाराकडून
प्रकाशापुढे.

 ‌‌
------------------------------------------------------------------

जन्माला आला तो
वंशाचा दिवा झाला 
पहिल्याच दिवशी त्याला
जबाबदारीचा शिक्का लागला 

थोडा मोठा झाला तो
भावंडांचा भाऊ झाला 
आपल्या खेळण्यातला
अर्धा हिस्सा वाटू लागला 

वयात आला तो
बहिणीचा रक्षक झाला 
रक्षाबंधनाला तर
स्वतःची मनिबॅंक ही फोडू लागला 

कॉलेजला गेला तो
मैत्रिणींचा मित्र झाला 
तिच्या सुख दुःखाचा
आपसूक वाटेकरी बनला 

लग्नामध्ये त्याच्या तो
नवरदेव झाला 
बोहल्यावरच्या रुबाबतही
जबाबदारीचा पुतळा ठरला 

लग्नानंतर मात्र तो
दोन भूमिकेत आला 
बायकोचा नवरा की आईचा मुलगा यात अडकला 

आई बापाच्या उतारवयात
त्यांच्या काठीचा आधार झाला 
स्वतः साठी कमी अन
घरासाठी जास्त जगू लागला 

बाळाच्या चाहुलीने तो
बाप झाला 
छकुलीच्या हास्यासाठी
रात्रंदिवस झटू लागला 

छकुलीच्या लग्नामध्ये तो
वरबाप झाला 
सगळ्यांच्या आनंदासाठी
आपले अश्रू लपवू लागला 

नातवंडांच्या मेळ्यामध्ये तो
आजोबा झाला 
दुधापेक्षा साईला
तळहाताच्या फोडासारखा जपू लागला 

आत्ता कुठे त्याला
थोडा निवांतपणा मिळाला 
जोडीदाराचा हात त्याने
खूप घट्ट पकडला 

तो पर्यंत त्याच्या
पिंजऱ्यातील पिल्ले उडून गेली 
बायकोची आणि त्याची
हाडेही आत्ता थकून गेली 

मनात असतानाही तो
मनाप्रमाणे जगला नाही 
ठाम मते असतानाही
मत आपले मांडले नाही 

आज देवाकडे तो
साथ फक्त मागतो आहे 
बायकोच्या आधी ने मला
देवाला म्हणतो आहे 

आजपर्यंत आयुष्यभर तो
घरासाठी झटला आहे 
स्मशानात जाताना मात्र
रित्या ओंजळीने जातो आहे 

ओंजळ रिकामी असली तरी
मन त्याचे भरले आहे 
अंत्यविधीची गर्दी पाहून
माणुसकीचे फळ मिळाले आहे 

जाता जाता सगळ्यांना
एकच तो सांगतो आहे 

*_पैशापेक्षा माणसांना किंमत द्या म्हणतो आहे.....👍✌☑

**********************************************

# रावण !
        जळत असतांना रावणाने
  हसून गर्दीकडं बघीतलं
         तपासा स्वतःच्या चारित्र्याला
  मोठ्यानं त्यानं विचारलं.

         केलाय मी गुन्हा
  सीतेच अपहरण करण्याचा
         प्रयत्न नाही केला
  मर्यादेची सीमा ओलांडण्याचा.

         दिवसाढवळ्या रस्त्यावर
  अब्रूची लचके तोडतात
         सभ्यपणाचा आव दाखवून
  दरवर्षी मला जाळतात.

         तुम्हां मानवा पेक्षा
  राक्षस ठरलो भारी
         केला नाहीं अपमान
  सीतेचा माझ्या दारी.

         हुंड्याच्या लालसेपोटी
  हजारो सीता जाळल्या
         वंशाच्या दिवट्या साठी
  गर्भात कळ्या मारल्या.

        हक्क नाही तुम्हांला
  मला बदनाम ठरवण्याचा
        प्रयत्न करा तुम्हीं
  स्वतःच चारित्र्य सुधारण्याचा!

           प्रा.पंजाबराव येडे

++++++++++++++++++++++++++++++

 छे ती कुठे 
माझी मुलगी

ती तर आहे 
श्वास माझा

उद्या मनांवर 
राज्य करेल

स्वप्नं नाही 
विश्वास माझा...

वडील होण्या इतपत जगात
कोणताच प्रचंड आनंद नाही
नि कन्या झाली तर कोणतचं सुख
त्याहून बेधुंद नाही...
.
मुठ आवळून तू बोट धरतेस
तो हरेक क्षण माझा खास होतो
तुझ्या इवल्या इवल्याश्या मुठीत
मला जग जिंकल्याचा भास होतो...
.
माझ्या गाण्यापेक्षा बेडकाचं
किंचाळणं जरी मधूर आहे
माझ्या अंगाईने झोपतं पिल्लू माझं
हे समाधान भरपूर आहे...
.
असावं लागतं पुण्यवान,
नि त्याही पेक्षा खूप भाग्यवान
ज्या पित्याचे हात उरकती
सर्वात श्रेष्ठ कार्य कन्यादान...
.
मुला-मुलीत भेदभावाचा
तो प्रश्नच मी उगारत नाही
वडीलांचं मुलीवर प्रेम जास्त
हे सत्यही मी झुगारत नाही...
.
संसारात रमण्या पेक्षा मी
मुलीच्या भातुकलीच्या खेळात रमतो
भावनांच्या खेळात आई नंतर
मुलीचाच तर क्रम येतो...
.
बाबा म्हणत माझ्या मुलीचे
जसे नाजूक ओठ हलू लागतात
समाधानाची इवली इवली फुलं
ह्या निवडुंगाच्या देहावर फुलू लागतात...
.
तू सुखी राहावीस
देवाकडे एवढचं मागणं आहे
म्हणूनच तुझ्या भविष्यासाठी
दिवसरात्र झिजणं, जागणं आहे...
.
आनंदाचे अगणित क्षण तिच्या
नाजूक हास्यात दडले आहेत
तिला कायम हसतं ठेवण्यासाठी
मलाही प्रयत्नांचे वेड जडले आहे...
.
भाग्य ज्याला म्हणतात ते
माझ्या मुलीतच सापडलं आहे
माझ्या ग्रहांचे मन कदाचित
तिच्याच पायांशी अडलं आहे...
.
मुलगी सासरी जाण्याचा क्षण
वडीलांसाठी मोठी अग्नीपरीक्षा असते
स्वतःच्या काळजा पासून दुरावणं
जगातली सर्वात मोठी शिक्षा असते...
.
आभाळा एवढं सुख काय ते
मुलगी झाल्यावर कळतं
एक वेगळच आपलेपण
तिचं प्रत्येक हास्य उधळतं...
.
इतरांचे नशीब घेऊन येतात
त्या बाबतीत मुली माहीर आहेत
मुलगी म्हणजे धनाची पेटी
हे सत्यही तसं जग जाहीर आहे...
.
मुलींचे एक छान असतं
मुलगी असण्याचा अभिमान असतो
त्यांचा अभिमान वडीलांसाठी
मान, शान व सन्मान असतो...
.
छे ती कुठे माझी मुलगी
ती तर आहे श्वास माझा
उद्या मनांवर राज्य करेल
स्वप्नं नाही विश्वास माझा...

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...