Friday, August 19, 2022

*निर्जिवांची व्यथा*

 *मूळ कवी / कवयित्री : अज्ञात 

 शेअरिंगचं सौजन्य : नीता मनोज पुरंदरे—केळवे रोड*


*निर्जिवांची व्यथा*

सततच्या लॉकडाऊनला फक्त,
माणसेच नाही कंटाळली,
घरातल्या गोष्टींनीही,
त्यांची व्यथा मांडली।

घरातील भांडीकुंडी, त्यांची 
रया घालवून बसली,
सततच वापराने,
आंतरबाह्य कालवंडली।

विळी,सुरी मिक्सरच्या हालाची,
कशी करावी गिनती,
जिभेचे चोचले पुरवताना,
झिजली त्यांची पाती।

कुकरची शिट्टी देखील
पहिल्या सारखी वाजत नाही,
शिट्टी वाजवण्याचा आनंद
तीही आताशा घेत नाही।

डायनिंग टेबलच्या खुर्च्या,
डाफरल्या सगळ्यांवर
ऊठसूट खादाडीसाठी,
येऊन बसतात उरावर ।

घरातला फ्रिजदेखील 
थंडावा द्यायचे विसरुन गेला.
ढिगभर साठवलेल्या गोष्टींमुळे,
त्याचाच जीव गुदमरला।

हॉलमधल्या सोफाखुर्च्या,
मनोमन वैतागल्या 
सततच्या बसण्याउठण्याने,
सगळ्या बाजूने दबल्या।

बेडरूममध्ये जाताच,
पलंगावरची गादी, 
उशीच्या कानात कुजबुजली, 
वेडेवाकडे बसून झोपून
सगळ्यांनी माझी, 
फिगरच बिघडवली।

खोल्यांमधील पंखे देखील
थोडे थोडे मंदावले.
सततचे फिरुन फिरुन
त्यांची गतीच हरवून बसले।

कपाटातील पुस्तके मात्र
मनापासून सुखावली.
या निमित्ताने का होईना
आपल्यावरची धूळ झटकली

निर्जिवांची व्यथा, मला
शब्दाविना समजली.
मला जशी भावली,
 तशी तुम्हाला पाठवली।

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...