Tuesday, August 16, 2022

       माझे माझे चे गाठोडे     

        तुझ्या चरणाशी वाहिले
        तुझे तुझे म्हणताना
        किती मोकळी मी झाले ।।

        माझे माझे गणगोत
        चिंता सर्वांची वाहिली
        तुझे तुझे म्हणताना
        गुंतागुंत ती सुटली ।।

        माझा माझा रे संसार
        करिता आयुष्य हे गेले
        तुझे तुझे म्हणताना
        मुक्त मनोमनी झाले. ।।

        माझी माझी मुलेबाळे
        मोह सुटता सुटेना 
        तुझे तुझे म्हणताना
        चिंता काहीच वाटेना ।।

        माझे माझे हे वैभव
        हाच ध्यास जीवनात
        तुझे तुझे म्हणताना
        मन झाले हे निवांत ।।

        माझे माझे हे चातुर्य 
        करी सदा रे विवाद
        तुझे तुझे म्हणताना
        ऐकू येई अंतर्नाद ।।

        माझे माझे म्हणताना 
        मोह माया ताप जाळी
        तुझे तुझे म्हणताना
        लागे ब्रह्मानंदी टाळी ।।

        माझे माझे मी पण
        तुझ्या चरणी वाहिले
        तुझे तुझे म्हणताना
        तुझ्यातच विलोपले ।।



+++++++++++++++++++++++++++++++++++++++++

अशाच एका नीवांत क्षणी
माझ्याच मनात डोकावताना
ह्रदया जवळचे अनेक कप्पे
दिसले मलाच खुणावताना

जन्मदाते आई बाबा
पहिल्या कप्प्यात होते बसले
त्यांच्या सवे घालवलेले बालपण
मला बघुन खुदकन हसले

दुसऱ्या कप्प्यात होती शाळा
भाऊ,बहिणी, मैत्रीणी गोतावळा
डोकावून बघताच सारे जण
आठवणीच्या रुपात झाले गोळा

तिसऱ्या कप्प्यात होते तारूण्य
उत्साहाने सजलेले पण
वखवखलेल्या नाजरांमुळे
होते काहीसे हिरमुलेले

स्वप्न आणि परंपरा
ह्यातील दऱ्या संधात होते
नकळत माझ्या भोवतालच्या
भिंती मीच बांधत होते

सासर माहेर नवरा मुले
चौथ्या कप्प्यात होती गर्दी
नकळत साऱ्या जबादार्यांची
अंगावरती चढली वर्दी😊

चित्रफीत या आयुष्याची
सरसर पुढे सरतच होती
अनुभवांची शिदोरीही
कणाकणाने भरत होती

ह्याच कप्प्यात दिसली मला
एक छोटीशी जागा रिकामी
तीला बघताच मागे फिरले
वाटले ही तर आहे निकामी

का कोणास ठाऊक 
हा कप्पा जरा नाराज दिसला
मला वळताना बघुन
किंचितसा खिन्न हसला😢

साऱ्यांसाठि जगुन झाले
आता तरी येऊदे भान
ह्या छोट्याश्या कप्प्यात तरी
दे जरा स्वतः ला स्थान

साऱ्यांच्या भावना जपताना
काय लागले हाताला
आता मात्र मैत्रीच्या डोहात
दे झोकुन स्वतःला

ठाऊक नाही श्वास आता
किती उरलेत आयुष्याचे
आता तरी या कप्प्यात
स्थान जप स्वतःचे
स्थान जप स्वतःचे

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...