कुणा अनामिकाची सुंदर रचना 
जाणं येणं वाढलं की
आपोआप प्रेम वाढेल ,
गप्पांच्या मैफिलीत
दुःखाचा विसर पडेल !
महिन्यातून एखाद्या दिवशी
अंगत-पंगत केली पाहिजे ,
पक्वान्नाची गरजच नाही ,
पिठलं-भाकरी खाल्ली पाहिजे !
ठेचा किंवा भुरका केल्यास
बघायचंच काम नाही ,
मग बघा चार घास ,
जास्तीचे जातात का नाही !
सुख असो दुःख असो
एकमेकांकडे गेलं पाहिजे ,
सगळ्यांचं चांगलं होऊ दे ,
असं देवाला म्हटलं पाहिजे !
एखाद्या दिवशी सर्वांनी
सिनेमा पहावा मिळून ,
रहात जावं सर्वांशी ,
नेहमी हसून खेळून !
काही काही सणांना
आवर्जून एकत्र यावं ,
बैठकीत सतरंजीवर ,
गप्पा मारीत बसावं !
नवरा बायको दोन लेकरात
"दिवाळ सण" असतो का ?
काहीही खायला दिलं तरी
माणूस मनातून हसतो का ?
साबण आणि सुगंधी तेलात
कधीच आनंद नसतो ,
चार पाहुणें आल्यावरच ,
आकाश कंदील हासतो !
सुख वास्तूत कधीच नसतं
माणसांची ये-जा पाहिजे ,
घराच्या उंबरठ्यालाही ,
पायांचा स्पर्श पाहिजे !
दोन दिवसासाठी का होईना
जरूर एकत्र यावं ,
जुने दिवस आठवताना ,
पुन्हा एकदा लहान व्हावं !
वर्षातून एखादी दुसरी
आवर्जून ट्रिप काढावी ,
"त्यांचं आमचं पटत नाही"
ही ओळ खोडावी !
आयुष्य खूप छोटं आहे
लवकर लवकर भेटून घ्या ,
काही धरा काही सोडा ,
सगळें वाद मिटवून घ्या !
पटलं तरच पुढे पाठवा ,
तसेच आपल्या हृदयातही
साठवा !

--- कवी अनामिक


$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
कधीकधी...
मी एकटीच माझी असते कधीकधी
गर्दीत भोवतीच्या नसते कधीकधी
येथे न ओळखीचे कोणीच राहिले
होतात भास मजला नुसते कधीकधी
जपते मनात माझ्या एकेक हुंदका
लपवीत आसवे मी हसते कधीकधी
मागेच मी कधीची हरपून बैसले
आता नकोनकोशी दिसते कधीकधी
जखमा बुजून गेल्या साऱ्या जुन्या तरी
उसवीत जीवनाला बसते कधीकधी
गझलकार - सुरेश भट
&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&
बरं झालं...
या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो...
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन...
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन...
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा..."
आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील...
माझ्या पानांतून वाट काढणार्या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन...
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा...!"
माझ्या अंगाखांद्यांवर
आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील...
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील...
ती म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं...
नाहीतर सगळा रखरखाटच होता !
याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळसळवत कुजबुजीन -
"बरं झालं मी झाड झालो...
वेडा कवी होण्यापेक्षा"
आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लागेलही...
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढाळतील;
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल,
आणि...
माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
"बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा..."
माझ्यावरती 'कोणी मी'
जळून राख बनताना
धूर सोडत म्हणेन -
"बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मरण्यापेक्षा..."
कवी - संदीप खरे
No comments:
Post a Comment