*ऊसाच्या मुलांची लग्न* 
*कुणी लिहिले आहे माहीत नाही पण खूप छान आहे वाचा सर्वानी एकदा* 



ऊसाला झाली दोन दोन पोरं,
मोठा मुलगा *'गुळ'*
अन्
अन् धाकटी मुलगी *'साखर'* 

साखर दिसायला गोरीगोमटी अन् सुंदर,
गुळ मात्र ओबडधोबड अन् काळा कलुंदर 

साखर तशी स्वभावाला गोड,
तिच्यात उणेपणा शोधणं अवघड 

गुळ मात्र स्वभावाला चिकट,
समोर दिसला की ईतरांना वाटे संकट 

साखर तशी मनमिळाऊ, जेथे जाई तेथे मिसळुन जाई,
गुळ पण गेला ईतरात मिसळायला,पण त्याला ते जमलेच नाही 

साखरेला गर्दीत शोधणे असे फार अवघड,
गुळ मात्र गर्दीत लगेच दिसे, कारण तो होता 'ओबडधोबड' 

साखरेचे रव्यावर प्रेम जडले,
बापाने लगेच् दोघांचे लग्नच् लावुन टाकले 

तीला झाला एक मुलगा
दिसायला होता तो गोरागोरा,
यथावकाश बारसे झाले, नांव ठेवले *'शिरा'* 

ऊसाला आता काळजी वाटु लागली गुळाची,
त्याच्या साठी मुलगी कशी अन् कुठे शोधायची ? 

ऊसाला होते माहीत, आपल्या मुलाला ना रुप ना रंग,
सतत काळजी वाटायची, कसा जाईल काशीला हा संग 

बर्याच मुली पाहील्या, कोणी त्याला पसंत करीना,
काळजी वाटे ऊसाला रात्री झोप येईना 

ऊसाला मित्र एक होता, नांव त्याचे तूप 

त्याने प्रयत्न केले खुप,
अन् ऊसाला आला हुरुप 

त्याने मुलगी सुचविली गव्हाची,
जी दिसायला होती बेत्ताची 

धान्यकुळीत उच्च गव्हाचे घराणे,
होते ऊसाच्या तोलामोलाचे,
ऊस म्हणे मागणी घालणे मुलीला, नाही ठरणार फोलाचे 

अंगाने ती होती लठ्ठ नी जाडजुड,
रुपाला साजेसे, नांंव होते तीचे *'भरड* 

गव्हाला मुलीच्या रुपाची होती कल्पना,
तो कशाला करतो नसत्या वल्गना ? 

होकार दिला कारण, गुण दोघांचे जुळले,
लग्न जमले अन् सारे तयारीला लागले 

किचन ओटा झाला,
लग्नासाठी बुक,
स्वयंपाकघर पण सजविले खुप 

'भरड' ला तूप कढईत घेउन गेले,
तेथेच् तीचे खरपुस मेक-अप पण केले 

भरपुर लाजली 'भरड', अन् झाली गुलाबी,
गरम पाणी कढईत शिरले, अन् भरड झाली 'शराबी' 

लग्नाची तयारी पहायला आलेले दुध सुद्धा कढईत शिरले,
अन् हळुच् त्याने गुळाला कढईत पाचारीले 

गुळाने केला कढईप्रवेश, अन् उकळ्यारुप मंगलाष्टकांना आला आवेश 

मनाने दगड असलेल्या भावनाशुन्य गुळाला,
'भरडी' चे रुप पाहुन, वेळ नाही लागला पाघळायला 

काजु बदाम किसमीच्या पडल्या अक्षता,
कढईचे झाकण लावण्याची भटजीने घेतली दक्षता 

काळांतराने मुलगी झाली त्यांना, सुंदर गोड अशी,
थाटामाटात बारसे झाले,
नांव ठेवले *लापशी* 

आवडली ना 

===============================================
*आनंदाची गोड बातमी....*
तिसऱ्या फडताळामधील खालच्या कप्प्यातील साखरेवर पहिल्या फडताळामधील वरच्या कप्प्यातील रव्याची नजर होती...

रवा सारखा सारखा खाली वाकून वाकून साखरेकडे पहायचा...

मधल्या फडताळामधील मधल्या कप्प्यातील साजुक तूपाला ही भानगड़ माहित होती...
रव्याचे हे साखरेवर लाइन मारणं बघून तूप गालातल्या गालात मिश्किलपणे हसत होते.....
रव्याचे हे साखरेवर लाइन मारणं बघून तूप गालातल्या गालात मिश्किलपणे हसत होते.....
ते तूप रव्याच्या सारखे मागे लागायचे की तू धाडस कर
आणि
साखरेला मागणी घाल, पण रव्याची काही हिम्मत व्हायची नाही...

साखरेचा खर तर होकार होता पण ती रव्याच्या विचारण्याची वाट पाहत होती..

एक दिवस रवा, तूप आणि साखर खाली किचनपाशी आले...तूप रव्याला चिथावून साखरेला प्रपोज करण्यासाठी मागे लागले होते, पण रवा काही धजावेना..

बाजुलाच कढ़ईची वेदिका तयार होती....अग्निकुंड पेटलेले होतेच....तूपाने रागात त्या अग्निकुंडावरच्या कढ़ई मध्ये उड़ी घेतली....
ते आता रागाने चांगलेच उन उन झाले होते...
त्याने रव्याला आपल्या जवळ खेचले आणि त्याची खरड़पट्टी काढायला सुरुवात केली....त्याला असा उभा आडवा करत त्याचा चांगला ब्रेन वॉश केला...
आणि
त्याला साखरेला मागणी घालण्यास तयार केले...रवा आणि तुप या दोघांच्या झटापटीची वार्ता खमंग वासाने सर्वदूर पसरवली होती...

रव्याने मग जरा हिम्मत करुन कढईतून हलकेच वर डोके बाहेर काढत घाबरत जरा दबक्या आवाजात वाटीतल्या साखरेला मागणी घातली.....
रव्याच्या सुवासिक खमंग सुगंधाने साखरेला भुरळ पाडली व वाटीतल्या वाटीत कडेकडेने लाजत साख़रेने होकार दिला....

तिचा होकार समजला तसा रवा लाजून लाजुन पार गुलाबी लालसर झाला...

उगाच नंतर विचार बदलायला नको म्हणून रवा आणि साखरेचा लगोलग तिथेच लग्नाचा घाट घातला गेला...

पण त्यात पुन्हा विघ्न आले...बाजूलाच का कुणास ठाऊक तापलेले पाणी त्याला विरोध करत खदखदायला लागले....

त्याने कढ़ईत उड़ी घेत रव्याशी दोन हात करायला सुरुवात केली....तापलेल्या दुधाने थोड़ी मध्यस्ती करायचा प्रयत्न केला ....पण पाण्याचा फार काळ निभाव लागला नाही...पाचच मिनिटात पाणी धारातीर्थी पडले...

या विजयामुळे रव्याच्या अंगावर मुठभर मांस चढल....विजयाने त्याचा उर भरून आला....
मग साखरेने अलगद कढ़ईत प्रवेश केला.... रव्याचे आणि साखरेचे लग्न लागू लागले....विलायची पावडरच्या अक्षदा टाकण्यात आल्या; या आनंदाच्या भरात कापलेल्या बदामाच्या कापांची, काजूंची, मनुक्यांची मनसोक्त उधळण करण्यात आली....आणि रव्याचे अन साखरेचे लग्न लागले....साखर लाजत मुरडत अलगद रव्यात सामावून गेली... रवा आणि साखर अखेर एकरूप झाले...
पै पाहुणे डबे, चमचे, चिमटे, चाकू ई आपापल्या घरी निघाले...अग्निकुंड ही थंडावले होते...
झाकण नावाचा दरवाजा लावून रवा आणि साखर आपल्या विश्वात एकांतात रममाण झाले....
मिनिटा मागून मिनिटे निघून जात होती...
रवा आणि साखर आपल्या संसारात मस्त होते आणि ....तो क्षण आला....
दरवळणाऱ्या साजुक तुपाने आपल्या सुवासिक सुगंधाने घरभर रवा आणि साखरेकड़े आनंदाची गोड बातमी आहे अशी वर्दी दिली...मग क़ाय घरभर उत्साह पसरला...सर्वत्र आनंदी आनंद झाला... जो तो उत्सुकतेने वाट पाहू लागला.....
आणि बरोबर नऊ मिनिट आणि नऊ सेकंदाला त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला त्याचं नाव....
*शिरा.....
*


*


No comments:
Post a Comment