Wednesday, August 17, 2022

 कृष्ण आठवांची हंडी,

कृष्णप्रेमाचेच लोणी!
नामजपाच्या थरात,
कुणी पेंद्या,कृष्ण कोणी!

त्याचे चरित्र आठवू,
त्याला हृदयी साठवू!
तुळशीचे एक पान,
त्याला भक्तीने पाठवू!

उपासनेसाठी सांगा,
हवा कशाला उन्माद?
मन अनन्य करोनी,
थेट कान्हाशी संवाद!

देवा आवडे शांतता,
मग का हो कोलाहल?
तोच अमृत करतो,
भक्ता ओठी हलाहल!

नको देहांची ही गर्दी,
करू भावनांचे ऐक्य!
देव अवतार घेणे,
तेव्हा सहजची शक्य!

उन्मादाचा भरामधे,
पापावर उभे पाप!
चौऱ्यांशीच्या फेऱ्यामधे,
पुन्हा जातो आपोआप!

डोळे विचारांचे करू,
आणि चला पाहू प्रथा!
तिथे नक्की आढळेल,
फक्त श्रद्धेचीच कथा!

प्रथा सांगती वेगळे,
आम्ही वागतो वेगळे!
कृष्ण कथा आठवाया,
जमू एकत्र सगळे!

सदिच्छांच्या थरावर,
असे कल्याणाची हंडी!
तिथे सारेच गोपाळ,
नाही कुणीच पाखंडी!

प्रमोद जोशी.देवगड.9423513604
=========================================

अलवार वाजवित वेणू 
तो स्वप्नफुलांवर आला 
अन रंग सावळा माझ्या 
डोळ्यांवर सोडून गेला. .
क्षितिजावर निळसर रेघा 
गोंदून जराश्या हलक्या 
सांजेचे लेऊन पंख 
तो कृष्ण किनारी आला. . .
मी तिथेच होते तेंव्हा 
थांबले मंदिरापाशी 
तो सोनखुणांचे पाऊल 
वाळूवर उमटत आला. . .
भरजरी शुभ्र वस्त्रांवर
नाजूक कशिदा त्याच्या 
हातात कडे सोन्याचे 
मनमोहन लेऊन आला. .
बैसला जरा बाजूला 
मंदिरी पायरीपाशी 
डोळ्यात पाहुनी माझ्या 
डोळ्यात हरवुनी गेला. . .
हातात घेऊन हात 
मज म्हणे, सखे जाऊया. !
मी लाजून हसता गाली 
गालांवर उमटत गेला. . .
मज झाली सावळबाधा 
मी झाले ना रे राधा. . ?
तो ऋतू जीवघेणा पण,
स्पर्शात शहारून गेला. . .
ती शामनिळाई ल्याली 
वेगळीच होती सांज 
तो कातरवेळी ऐसा 
मोरपीस फिरवून गेला. . .
मी ओढून घ्यावा म्हणून 
जाताना माझ्यासाठी 
कालिंदीच्या काठावर 
तो शेला विसरून गेला. . .

                    इंदिरा संत.
=================================



No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...