# विनंती पावसाला
शेतकऱ्यांचे शेतामधले
पिक गेले सडून
वेडा झाला पाऊस आता
शेत गेले बुडून ||१||
पाणी पाणी झाले सारे
शेत झाले तळे
पिक दिसेना शेतामधले
पाण्यामध्ये बुडे ||२||
शेतकरी तो बांधावरती
दुःखीकष्टी उभा
दरवर्षी हे असेच रडणे
नको कोपू रे नभा ||३||
माझ्यावरती तुझा राग का ?
पाऊस घे माघारी
गरजे पुरता मला हवा मग
आनंद होईल घरी ||४||
देतो सारे घेऊन जातो
असे तुझे दातृत्व
जगण्यासाठी आम्हास देतो
काय तुझे हे तत्व ||५||
तळेच आले शेतामध्ये
मला विचारी पुन्हा
इथे भेटला पुन्हा नको तू
करू नको रे गुन्हा ||६||
शेतही नेतो माती नेतो
नेतो सारे पिक
दगडही ने तू उरलेसुरले
बाजारी तू विक ||७||
नको मला ती शेती पावसा
नको मला ती माती
कितीही राबूनी शेतामध्ये
उरे ना काही हाती ||८||
प्रेम तुझ्यावर माझे आहे
कधी कळेल रे नभा
कसे जगू मी तुझ्याविना ते
नको हा सवतासुभा ||९||
अखेरीस तुज एक विनंती
जगू दे सजीव सारे
पडू नको तू अति पावसा
जगू कुणा आधारे ||१०||
जगन्नाथ काशिनाथ
सुरवाडे सर मुंबई
No comments:
Post a Comment