गोडी गुलाबीच्या संसाराला
नेहमी नेहमी अर्थ नाही
भांडण तर व्हायलाच हवं
त्याशिवाय संसारात मज्जा नाही
व्हायला हवाच अबोला
एकमेकांवर रुसून
फिरवलंच पाहीजे तोंड
एकाच सोफ्यावर बसून
व्हायला हवा वाद
गलथानपणा करुन
व्हायलाच हवा विसंवाद
फिरायला जाण्यावरुन
बारीकसारीक खटके असे
उडायलाच हवेत
रुसवा घालवायला मग तो
घेईलच की कवेत
संसाराला हवीच की हो
तिखट मिठाची गोडी
प्रेमही हवं तितकंच
की आपोआप विझते काडी
खूप खूप भांडल्यावर
व्हायला हवा त्रास
आणि नकळत वाटायला हवी
एकमेकांची आस
कितीही झालं भांडण तरी
टोक गाठायचं नाही
एकमेकात सामावताना
अढी ठेवायची नाही
हे नातंच किती छान
असं सजायलाच हवं
गोडी गुलाबीच्या संसारात
भांडण हे व्हायलाच हवं..........
=====================================
मी पेपर उघडला,,!!
त्यात मीच दिलेली
जाहिरात होती,,



हरवला आहे .. "आनंद "
पत्ता विसरण्याचा त्याला आहे छंद ...



रंग ... दिसेल तो
उंची ..भासेल ती,,

कपडे सुखाचे
बटण दुःखाचे,,,!!
कुणाला न सांगता घरातून गेला आहे निघून
थकलो आहोत सगळीकडे शोधून,,,!!
"आनंदा " परत ये,,,
कुणीही तुझ्यावर रागवणार नाही,,
तुझ्यावर कसलीही सक्ती करणार नाही,,

घरातले सगळे आसुसून बघताहेत तुझी वाट
दार उघडं ठेवलंय वाढून ठेवलंय आशेचं ताट,,

शोधून आणणाऱ्याला दिलं जाईल इनाम
मग म्हटलं आपणच करावं हे काम,,

*काय आश्चर्य .. सापडला की गुलाम ..*



एका नव्या कोऱ्या पुस्तकाआड,,
एका जुन्या गाण्याच्या अर्थाच्या पल्याड,,

आठवणींच्या मोरपिसात,,
अगरबत्तीच्या मंद वासात,,

मोगऱ्याच्या मखमली स्पर्शात ...
अवेळी येणाऱ्या पावसात,,

त्यानेच मारला पाठीत धप्पा,,
जुन्या मैत्रिणीशी मारताना गप्पा,,

मी म्हटलं अरे , इथेच होतास ,उगाच दिली मी जाहिरात
तो म्हणाला वेडी असता तुम्ही माणसं,,



बाहेर शोधता .. .मी असतो तुमच्याच मनात ... !





No comments:
Post a Comment