Wednesday, August 17, 2022

 प्रेम कशावर करावं ?
प्रेम कशावरही करावं .
प्रेम , 
घट्ट सायीच्या केशरी श्रीखंडावर करावं,
टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्यांवर करावं,
साजुक तुपातल्या नाजुक शिऱ्यावर तर जरूर जरूर करावं ...
प्रेम , 
चारोळी घातलेल्या दाट बासुंदीवर करावं
नारळाच्या करंजीवर , मोतीचूर बुंदीवर करावं झणझणीत चिवडा न् खुसखुशीत चकलीवर अगदी करावं....
कंटाळून मागवलेल्या नगदी पावभाजीवर सुद्धा करावं हो....
प्रेम कशावरही करावं ...
साबुदाणा खिचडीवर , काकडीच्या पचडीवर,
चटकदार चटणीवर ,आमटीच्या चुर्र फोडणीवर,
पोळीतल्या पुरणावर, वाफेच्या भातवरणावर
करावंच करावं....
प्रेम ,
मऊशार इडलीवर , कडक दोशावर का करावं ?
कधीतरी साटोरी व अनरशावरही करावं....
कचोरीसमोशावर करावंच , पापलेटमाशांवरही करावं...
प्रेम कशावरही करावं...
पाकातल्या चिरोट्यांवर, मेथीच्या परोट्यांवर, कुरकुरीत तळलेल्या मूगपकोड्यांवर करावं...
नाटकाच्या मध्यंतरातल्या बटाटेवड्यावर तर नक्कीच करावं.....
प्रेम ,
कांद्याच्या थालीपिठावर / पिठल्यावर जसं भरभरून करावं ,
लुसलुशीत उपमा , घावनघाटल्यावर तसंच हरवून जाऊन करावं....
झकास भेळेवर , फर्मास मिसळीवर आणि चवळीच्या चमचमीत उसळीवरही करावं.
प्रेम सगळ्यांवर करावं...
प्रेम ,
डाळिंब्या वालाच्या बिरड्यावर करावं,
शेतातल्या कोवळ्या हुरड्यावर करावं,
मऊसूत धिरड्यावर , कर्रमकुर्रम कुरड्यांवर,
क्वचित कधी हवाबाण हरड्यावरही करावं....

प्रेम ,
विदुराघरच्या पोटभरीच्या कण्यांवर करावं,
यशोदेने घुसळून काढलेल्या लोण्यावर करावं,
गोपींच्या माथ्यावरच्या मडक्यातल्या दह्यावर,
सुदाम्याच्या कनवटीच्या पुरचुंडीतील पोह्यावर
खुश्शाल करावं......
प्रेम त्यावर करावं , प्रेम ह्यावर करावं....
प्रेम ,
खव्याच्या मेव्यावर , गाजराच्या हलव्यावर , गुलाबजाम रसमलाईवरही करावं....!

*पण त्याहीपेक्षा जास्त*
*करून खाऊ घालणाऱ्या*
*हाताच्या कलेवर* *करावं.......!!*
सर्व सुगरणींना समर्पित

🙏🏻🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻🙏🏻

*मैत्रांगण,,*

 *कधी कुणी एकत्र येऊन*
*ग्रुप मैत्रांचा केला स्धापन*
*केले त्याचे नामकरण*
*म्हणती याला मैत्रांगण ।।*

*विविध क्षेत्री रमुनी येती*
*सगळे येथे विश्रांतीला*
*सुख दुःखे ही वाटून घेती*
*आधार देती परस्पराला ।।*

*कुणी टाकतो समर्थवाणी*
*कुणी मराठी हिंदी गाणी*
*कधी गीता अन् कधी कविता*
*तर कधी तुकयाची अभंगवाणी ।।*

*कधी हळहळ तर कधी अभिनंदन*
*स्मृतीदिनी कधी थोरा वंदन*
*कधी किस्से,कधी वार्ता ताजी*
*समजून येते,होते रंजन ।।*

*कधी चालते खेचाखेची*
*कधी शब्दांनी बाचाबाची **
*कुणी कधी बसतो रागावून*
*आणती त्याला प्रेम परतून ।।*

*नकोच ईर्षा नको आगळिक*
*करु कागाळ्या लाडिक लाडिक*
*लगेच पण त्या विसरुन जाऊ*
*एकमेका समजून घेऊ ।।*

*मित्रांची या तऱ्हाच न्यारी*
*कुणी लावती नित्य हजेरी*
*कुणी मधे जाती डोकावून*
*कुणी ठेवती लक्ष दुरुन।।*

*किती किती हे रंग वेगळे*
*प्रत्येकाचे ढंग आगळे*
*या सगळ्यांना सामावून*

 *झुलत राहुदे मैत्रांगण ।।*
*फुलत राहू दे मैत्रांगण ।*
-----------------------------------------------------------

🙏 आई🙏

🌿काहीच बोलता न येणारी बाळं
       बोलायला शिकतात
बोलायला शिकवलेल्या आईला
      कधी कधी खूप खूप बोलतात🌿

🌿मान्य आहे पहिला संघर्ष 
       आईशीच असतो
बोलताना , तिच्या भावनांचा अर्थ 
     समजून का घ्यायचा नसतो ?🌿

🌿नको म्हणा , रागवा , तिरस्कार करा
    हवे तसे बोला , मस्करी करा
ती कायम तुमच्या पाठीशीच असते
    कारण ती वेडी असते🌿

🌿नाही जेवला , अभ्यास नाही केला
    लवकर नाही उठला , नाराज दिसला
सतत विचारपूस करत राहते
   कारण ती वेडी असते🌿

🌿तुम्हाला रागावते पण तीच रडते
      मोठे व्हावे तुम्ही म्हणून सतत झटते
स्वतःला विसरते , तुमच्या विश्वात रमते
     कारण ती वेडी असते🌿

🌿जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते
    हरला तर खंबीर बनवते
तुम्ही असाल कसेही , जीवापाड जपते
     कारण ती वेडी असते🌿

🌿ती नाही कळणार , नाही उमगणार
  तीच्यामुळे आपण काहीसे घडलो
हे आज नाहीच आपल्याला पटणार
  कारण ती वेडीच वाटणार🌿

🌿खरं तर ती वेडी नसतेच कधी
     मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत
स्वतःला ही नव्यानं फुलवत असते
    स्वप्नातील दिवस तुमचे
 वास्तव स्वीकारुन बघत असते
    कारण ती "आई "असते🌿

🌿ती उमगू लागते तेव्हा आपण
  मागे जाऊ शकत नसतो...
ती असेपर्यंत थोडीशी समजली तरी
    यासारखा खरा आनंद नसतो,,,🌿

💐🙏 सर्व आईंना समर्पित🙏💐 

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...