विषय:-मन हे फुलपाखरू
मन हे फुलपाखरू
कसे आवरू आवरु |
राही ना कधीच स्थिर
मन हे फुलपाखरू ||
मना सावरण्यासाठी
सतत चाले मनन |
नित्य देवाचे चिंतन
मंदिरी चाले कीर्तन ||
तरी सुकर ना सावरु
मन हे फुलपाखरु |
मना गुंतविण्यासाठी
पहा जग टीव्हीवरी
गोड बोला फोनवरी |
फेरफटका सागरी
फिरणे नदीकिनारी ||
तरी मन धावे तुरूतुरू
मन हे फुलपाखरू ||
अनंत देवघरकर.
अलिबाग
९४२०६४५७२८.
===========================
मजेशीर कविता....



चाल चाल चालले, तरी वजन कमी होईना
धाव धाव धावले, तरी काटा काही हलेना
सकाळी उठल्यानंतर भूक लागली फार
चहात बुडवून खाल्ली बिस्किटं फक्त चार
मग मारल्या थोड्या, दोरीवरच्या उड्या
चवीसाठी खाल्ल्या दोन खोबऱ्याच्या वड्या
योगासने करायची मग झाली वेळ
पटकन खाऊन घेतली हेल्दी डायेट भेळ
व्यायामाच्या घाईत सकाळ गेली टळून
जेवणासाठी घेतले गरम वडे तळून
मुखशुध्दीसाठी खाल्ले काजू-बदाम
मनःशांतीसाठी केला थोडा आराम
संध्याकाळ होताच जॉईन केले जिम
घाम आला म्हणून खाल्ले आइसक्रीम
वजन घटण्यासाठी चालत गेले घरी
डीनरसाठी केला बेत श्रीखंड आणि पुरी
दुस-या दिवशी सकाळी वजन करू म्हटले
इतक्या मेहनतीने बघू वजन किती घटले
कालच्यापेक्षा आज वजन वाढले थोडे
वजनकाटा चुकला कसा?
मला पडले कोडे !


मला पडले कोडे !


******************************************
*उपासतापास*..( विनोदी टाईमपास )
आत्म्यास आनंदी ठेवायचे
उपासतापास करायचे ॥
सकाळीच पावशेर दाणे
सोबतीस काजूगर खाणे
खाऊन खाऊन माजायचे
उपासतापास करायचे ॥
न्याहरीस पोळ्या फक्त आठ
आणिक चारच ते ऑम्लेट
एवढ्याने पोट भरायचे
उपासतापास करायचे ॥
दुपारच्या जेवणाचा थाट
पदार्थांनी भरलेले ताट
चवीने यथेच्छ जेवायचे
उपासतापास करायचे ॥
शतपावलीचाही कंटाळा
झोप काढण्या एक झोपाळा
तासभर उगा पडायचे
उपासतापास करायचे ॥
चहाची आवड किती भारी
खाण्यास गोड बिस्किटे खारी
मजेत घुटके ते घ्यायचे
उपासतापास करायचे ॥
आवडती टी.व्ही च्या मालिका
सांगा, पहायच्या नाहीत का?
मनोरंजनात दंगायचे
उपासतापास करायचे ॥
संध्याकाळी भोजन हलके
साजूक तूपातील फुलके
फळेच खाऊन पेंगायचे
उपासतापास करायचे ॥
स्वतःस सतत जपायचे
आरोग्य उत्तम राखायचे
आत्म्यास आनंदी ठेवायचे
उपासतापास करायचे ॥
अनंत केशव देवघरकर
अलिबाग
९४२०६४५७२८.
===================================
*महान सण दिवाळी*
सर्वांना काम लावते आई
होते सर्वांचीच फार घाई
जसजशी जवळ येते दिवाळी
आकाशदिवा प्रत्येकाच्या दारी
रांगोळी छान दिसते घरोघरी
शोभतात घरे दिवाळीच्या वेळी
गोडधोड तिखट पदार्थ बनती
त्यांची नांवे सांगू तरी किती
मिष्ठान्न तिखट खाती वेळी अवेळी
रात्री फटाक्यांची आतिषबाजी
हजारो दीप घरी-अंगणी जळती
प्रकाशाचा सण असा हा दिवाळी
गोधन, कुबेर, श्रीकृष्ण, लक्ष्मी
पुजूनी पुजती बलराम, बळी
सणांचा राजा सण हा दिवाळी
आधारे उभयता फुलवती संसारवेली
पाडव्याला पत्नी पतीला ओवाळी
प्रेम,त्याग,सेवाभाव वाढवे दिवाळी
भाऊ जाती भाऊबीजेस बहीणी घरी
बहीण भावाला यमद्वितीयेला ओवाळी
असा सहा दिवसांचा सण महान दिवाळी
- © मनमोहन रो.रोगे
नोव्हेंबर २०२०
========================================
उत्तरा....इतक्याचसाठी..वेगळा मी.
प्रश्न आला..जर भुकेचा..जोंधळा मी.
तू भलेही छाटल्या फांद्या व्यथेच्या,
कोंब आहे त्या व्यथेचा कोवळा मी.
वाटतो तुटलो तुला पण धार आहे,
काढतो बघ दुश्मनांचा कोथळा मी.
दूध मांजर पीत होते..पीत आहे,
राहिलो आजन्म येथे आंधळा मी.
मी गळा माझा जरासा दाबला अन्,
हाय झालो कोकिळेचा कावळा मी.
जाणतो धोका पुढे प्रेमात आहे,
पण तिला पाहून होतो..वेंधळा मी.
मी कशी स्पर्धा करू वेगा तुझ्याशी,
रांगणारा एक स्पर्धक पांगळा मी.
शब्द माझे सारथी अन् सोयरे ही,
अक्षरांच्या भोवती गोतावळा मी.
मी उन्हाळा,पावसाळा,अन् हिवाळा,
नेहमी वाटे ऋतुंचा सोहळा मी.
जीवन मोहन धेंडे (कासारी)
बार्शी 8007837652
No comments:
Post a Comment