Friday, August 19, 2022

" गोपाळकाला "


गोपाळ (जन्माला) का आला?
काला करण्यासाठी आला... 
जगात सगळीकडे हा आनंदाचा गोपाळकाला दिसतो.

पृथ्वी, पाणी, सुर्य, हवा, आकाश ह्या सर्वांचा सुंदर काला सर्व विश्वात आहे. 
ह्या गोपाळकाल्याचे सुंदर प्रगटीकरण म्हणजे प्राणी, पक्षी, वृक्ष, वेली, फुले, नद्या, नाले, डोंगर, पर्वत...

अनंत रुपे अनंत वेषे। देखियेले त्याशी।

सर्व विश्वात असणारी विविध रुप, रंग, गंध, सुंदरता, रचना, योजना, कल्पकता, सहजता, अचूकता पाहिली की मन थक्क होते. 

प्रत्येक शरीर (उपाधी) हे गोपाळाचे गोकूळ असून तो त्या शरीरातून आनंदाची उधळण करत असतो.

पण आपल्या ठिकाणी अज्ञानामुळे निर्माण झालेला कल्पनारुपी कंस आपल्या मन रुपी यमूनेत अहंकार रुपी कालीयाच्या द्वारे विषमतेचे विष ओकत असतो.

म्हणून जीवनाचे द्वेष, मत्सर, तिरस्कार, हेवे-दावे, दंगे-धोपे, बलात्कार, भ्रष्टाचार, दहशतवाद ह्या अराजकतेत रुपांतर झाले आहे. 

वास्तविक वासनारुपी गायी गोप म्हणजेच इंद्रियाना सतत आपल्या मागे धावायला लावतात त्यामुळे थकलेली ही इंद्रिय जेव्हा या गोपाळाकडे जातात तेव्हा ही हाव धाव थांबून ते निवांत होतात. 

ज्या प्रमाणे कृष्णाच्या बासुरीने आपोआप गायी जवळ येतात व गोपी तल्लीन होतात त्याप्रमाणे इष्ट वासना (इच्छा) आपोआप पूर्ण होतात हवं ते सर्व मिळते व प्रेरणा रुपी गोपी स्वत:ला विसरून त्या देवाशी एकरुप होऊन जातात. 

काम क्रोध लोभ निमाले ठायीची।
अवघी आनंदाची सृष्टी झाली।।
 
शरीर रुपी गोकूळात कल्पनारुपी कंस मरुन त्याचा अहंकार रुपी कालीयाचे मर्दन होते व त्याचे दु:ख रुपी विष संपून स्वानंदरुपी गोविंद प्रगट होतो व आनंदरूपी गोपाळकाला सगळी कडे दिसू लागतो.

" आनंदाचे डोही आनंद तरंग।आनंदचि अंग आनंदचि॥ "

अशी अवस्था निर्माण होणे म्हणजेच खरा गोपाळकाला.


  *संग्रहित*

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...