Tuesday, July 5, 2022

माणसं अशी कां वागतात?

माणसं अशी कां वागतात?  

एकाची निंदा दुसऱ्यापाशी करतात ।
नको तेंव्हा, नको तेथे, नाही ते बोलतात ।
गोड-धोड दिसलं की नको तेवढं खातात ।। 

माणसं अशी कां वागतात?
आवडली मुलगी म्हणून लग्न करतात।
थोडे दिवस गेलें की कुरापती काढतात । 
जमत नाही घरी म्हणून घटस्फोट मागतात ।

माणसं अशी कां वागतात?
दारूच्या नादाने व्यसनाधीन होतात । सोन्या सारख्या संसाराचे वाटोळे करतात । 
पत्नी असली सुंदर, तरी बाहेर लफडी करतात ।। 

माणसं अशी कां वागतात?
थोरांच्या पुण्याईने,भले झाले म्हणतात । 
आई वडील असले कीं, रागराग करतात । 
मृत्यूनंतर त्यांच्या, सारे सोपस्कार करतात ।। 

माणसं अशी कां वागतात?
नातेवाईकांची अधी-मधी विचार पूस करतात । चांगले चालले असले कीं, मनातून जळतात । 
मात्र "ऐकून बरे वाटले" वर वर म्हणतात ।। 

माणसं अशी कां वागतात?
पाहुणा कोणी आला कीं, "या बसा" म्हणतात । 'काय काम काढलं ' म्हणून हळूच विचारतात । येण्याच्या आनंदापेक्षा - जाण्याची वाट पहातात ।। *

माणसं अशी कां वागतात?
दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा 
करतात । 
इतरांच्या कामी यावे - नेहमीच सांगतात । 
कुणी कांही मागितलं कीं, असून नाहीं म्हणतात ।। 

माणसं अशी कां वागतात?
कुठलाही माल उधारीने मागतात । 
चार दिवसांत "पैसे आणून देतो" म्हणतात । 
एकदा घेऊन गेलें कीं तोंड काळे करतात ।।

माणसं अशी कां वागतात?
गया वया करून,पैसे उसने मागतात । 
वेळेवर परत देण्याचा " वायदा " करतात । 
एकदा काम झालें कीं, विसरून जातात ।। 

माणसं अशी कां वागतात?
- समक्ष भेटीत, खूप गोड बोलतात । 
नेहमीच आठवण येते "वर वर म्हणतात "।
पत्र,अथवा फोनचा, खर्च मात्र टाळतात ।। 

माणसं अशी कां वागतात?
कुणी कधी विचारलं तर,घेत नाहीं म्हणतात । फुकटची मिळाली की,भरपूर पितात । 
जेवायचं असलं तरी,भूख नाहीं म्हणतात ।। 

माणसं अशी कां वागतात?
माणूस कोणी मेला कीं गळा काढून रडतात । गोडवे त्याच्या मोठे पणाचे तोंड भरून गातात । 
मात्र त्याच्या हयातीत,नेहमी शिव्या घालतात ।। 

माणसं अशी कां वागतात

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...