ऋणानुबंध...
कधीकधी योगायोगाने नकळत,
आपण कुणाशी तरी जोडले जातो.
अगदीच अपरिचीत असणारी व्यक्ती,
आपलं त्याच्याशी कुठलेही नातं नसतानांही,
खूपच जवळची वाटू लागते.
आचार विचार,
आवडी निवडी जुळू लागतात.
संवाद साधला जातो.
सुर तालाचा घट्ट मेळ बसू लागतो.
खरंतर ती व्यक्ती,
आपल्या जीवनात नसताना,
आपलं काहीही अडत नसतं.
सर्व काही व्यवस्थित,
आणि वेळेवर सुरू असतं.
परंतु त्या व्यक्तीचा आपल्या जीवनात शिरकाव झाल्यावर,
मात्र काहीतरी कमी होतं असं कुठेतरी वाटू लागतं.
त्याच्या साथ सोबतीची इतकी सवय होऊन जाते की,
त्याच्या विरहित आयुष्य बेचव वाटू लागतं.
स्त्री पुरुष,
जातीभेद, वय, पैसा, सुख सोई,
ह्या सर्व गोष्टी मागे सोडून,
मनाने मनाशी जोडलेलं,
जुळलेलं ते खरं नातं असतं.
निस्वार्थ आणि पवित्र.
आणि मानवी मनाची खरी पराकाष्ठा,
त्या वेळी होते.
ज्या वेळी काही अपरिहार्य कारणांनी,
ह्या नात्याला एकमेकांच्या सान्निध्यातून,
दुर व्हावं लागतं,
अगदी कायमचं.
दुर होण्याची कारण अनेक असू शकतात.
मुळ भावना वा आतल्या मनाला एकमेकांच्या पासून दुर जायचेच नसते.
अशा नात्यांची मनं दुर जातचं नाहीत.
फक्त शरीरं, देह दूर होतात.
उर्वरित आयुष्यात आपण एकमेकांना कधीच भेटणार नाही आहोत.
संगत, साथ सुटणार आहे.
ह्या विचारानेच मनात प्रचंड पोकळी निर्माण होते.
घालमेल होते.
मन आक्रंदुन रडू लागतं.
पण दूर होणं अनिवार्य असतं.
भावी आयुष्याची ती गरज असते.
आणि तो दिवस उजाडतो.
ज्या क्षणी आपण निरोप घेणार असतो.
मनात भावनांची प्रचंड उलथा पालथ सुरू असते.
नको त्या क्षणाला सामोरे जाव लागतं.
कृत्रिम बळ ओढून ताणून उभे असतो.
समोरचाच्या सुखासाठी आपलं मन मारून,
आपण उसनं हसून निरोप घेतो.
समोरच्या व्यक्तीची परिस्थिती ह्याऊन वेगळी नसते.
चलबिचल मनांनी,
डबडबल्या डोळ्यांनी,
खोटं हसत ती विलग होते.
नवा प्रवास सुरू होतो.
आपण परत कधीतरी नक्की भेटूच,
ह्या पोकळ आश्वासना सोबत...!!
No comments:
Post a Comment