Friday, July 1, 2022

कधीतरी दत्तगुरुं जवळ नुसते बसावे


असे वाटते
देवघरातल्या
दत्तगुरुंच्या तसबिरीला पहावे
व कधीतरी दत्तगुरुंजवळ
नुसते बसावे

मुलगी जशी दिवसभरातून
थोडा वेळ आईजवळ बसते
दिवसभराचा थकवा
आई नुसत्या प्रेमळ नजरेने घालवते
तसे या गुरूमाऊलीचे प्रेम
हृदयात साठवावे
कधीतरी दत्तगुरुंजवळ
नुसते बसावे

काही मागू नये
काही सांगू नये
सारे संभाषण
नुसत्या नजरेतून व्हावे
कधीतरी दत्तगुरुंजवळ
नुसते बसावे

आपल्या गुरूमाऊलींकडून 
डोक्यावरून पाठीवरून 
हात फिरवून घ्यावे
मनाला विलक्षण शांती देणाऱ्या
स्पर्शाला अनुभवावे
कधीतरी दत्तगुरुंजवळ
नुसते बसावे

शांतपणे
दत्तगुरुंकडे पहात रहावे
या सगुणरूपी चैतन्यातील
आनंद व समाधान अनुभवावे
कधीतरी दत्तगुरुंजवळ
नुसते बसावे

दत्तगुरुंजवळ बसून
नामस्मरण करावे
अद्वैताचा अनुभव घेऊन
त्यात विलीन होऊन जावे
आपोआपच आपल्या "मी" चे
विसर्जन व्हावे
कधीतरी दत्तगुरुंजवळ
नुसते बसावे
त्यांच्याजवळ
नुसत्या बसण्याने काय मिळते
हे ज्याचे त्यानेच अनुभवावे
दररोज थोडा वेळ तरी
आपल्या दत्तगुरुंजवळ बसावे!!
*।। जय श्री  गुरुदेव दत्त ।।*🙏

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...