Tuesday, July 19, 2022

पेरावे ते उगवते.

 Be the reasons for someone smile today.

------------------------------------------
थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – पेरावे ते उगवते.”
------------------------------------------
“सर, या प्रेमाचा गैरफायदा घेतला जाईल असे मला वाटते, कारण चांगुलपणाला मुर्खता समजणारे खुप जण आपल्या आजुबाजुला असतात,”

“त्यांच्याशी कसे वागावे?”

काल मी ‘प्रेम करा’ अशा आशयाचा लेख पाठवला होता, तो लेख वाचुन आपल्या ग्रुपमधील एक सदस्य सहज आपल्या मनातील एक भाबडी शंका विचारुन गेला,

आणि जाता जाता मला आजच्या लेखासाठी एक विषय देऊन गेला.

“आपण चांगले वागुनही लोक आपल्यासोबत वाईट वागतात, मग मी त्याच्यासोबत चांगलं वागल्याचा फायदाच काय?” ह्या प्रश्णानं आपल्या सर्वांनाच कधीनाकधी सतावलं असेल, छळलं असेल.

“जे लोक कपटी असतात, दुष्ट आणि दुर्जन असतात, जे निरापराधांना त्रास देतात, ते भराभर प्रगती करतात, आणि जे वर्षानुवर्ष, इमानेइतबारे, प्रामाणिकपणे वागतात त्यांचं मात्र शोषण होतं,”

असं तुम्हालाही वाटतं का?

ह्या जगाला नियंत्रित करणारी एक अदभुत शक्ती आहे, प्रत्येकाला आपापल्या कर्मांचा हिशोब इथेच फेडावा लागतो, ह्या सत्याची प्रचिती तुम्ही सर्वांनी कधीनाकधी घेतलीच असेल,

‘पेरावं तेच उगवतं’ हा अनुभव देणारी एखादी घटना नक्की पाहिली असेल, अनुभवली असेल.
----------------------------------------------------------------------------------------------------
आज मी तुम्हाला अमेरीकेमध्ये १८९३ साली घडलेली एक सत्य घटना सांगतो.

‘बिलीव्ह इट ऑर नॉट’ ह्या अमेरीकन सिरीअल मध्ये ह्याच्यावर एक डॉक्युमेंट्री बनवण्यात आली आहे.

हेन्री नावाच्या एक तरुणाचे ज्युली नावाच्या एका मुलीसोबत प्रेमप्रकरण होते,
हेन्रीने ज्युलीला लग्नाचे वचन दिले होते, ज्युली हेन्रीवर जीवापाड प्रेम करत होती,
ज्युली प्रेग्नंट झाली, तेव्हा तिने हेन्रीला लग्न करण्यासाठी तगादा लावला, मात्र हेन्रीने तिला धोका दिला.
 एकदा ज्युली हेन्रीला भेटायला गेली, हेन्रीने तिला मारहाण केली आणि ‘तुझं तोंड मला दाखवु नकोस’ असा अपमान करुन तिला घराबाहेर काढले.
रडत रडत ज्युली आपल्या भावाकडे जाते, त्याला आपली कर्मकहाणी सांगते,
ज्युलीच्या भावाला आपल्या बहिणीचा अपमान जिव्हारी लागतो, सहन होत नाही,
ज्युलीचा भाऊ संतापतो,
रिव्हॉल्व्हर घेऊन तो हेन्रीला मारण्यासाठी निघतो, हेन्रीच्या घरी जाऊन तो हेन्रीला शोधत शोधत त्याच्या बागेत जातो,
हेन्री दिसताच रागाच्या भरात त्याच्यावर एक गोळी झाडतो.
गोळी हेन्रीला चाटुन जाते, हेन्रीच्या मागे असलेल्या झाडाच्या बुंध्यामध्ये ती बंदुकीची गोळी अडकुन बसते.
घाबरलेला हेन्री खाली पाडुन मेल्याचे नाटक करतो.
आपण हेन्रीला मारले, असा समज होवुन, आता ज्युलीच्या भावाला प्रचंड अपराधी वाटायला लागते.
आपण आपल्या बहिणीच्या प्रियकराला मारले, ही डाचणी आपल्या मनाला त्रास देत राहील, आयुष्यभर ही घटना आपल्याला छळत राहील, असे त्याला वाटते,
आपण केलेल्या हत्येचे प्रायश्चित म्हणुन ताबडतोब बंदुकीतील दुसरी गोळी ज्युलीचा भाऊ स्वतःवर झाडुन घेतो.
आपला भाऊ आणि प्रियकर दोघेही मेले, हे पाहुन तिथे पोहोचलेली ज्युलीही आत्महत्या करते,
पण कुटील हेन्री मेलेलाच नसतो, तो मेल्याचे नाटक करत पडलेला असतो.
आता मला कोण काय करणार अशा अविर्भावात तो जगायला लागतो.
पुढे काही दिवसांनी तो घराचे बांधकाम करण्यासाठी बागेतले ते मोठे झाड काढुन टाकायचे ठरवतो,
त्या झाडाला डायनामाईट असलेला बॉम्ब लावुन हेन्री सावधपणे, दुर सुरक्षित अंतरावर उभा राहतो,
पण नियती आपला न्याय पुर्ण करते,
शक्तीशाली बॉम्बचा स्फोट होताच, त्या झाडामध्ये रुतुन बसलेली गोळी पुन्हा एकदा हेन्रीच्या दिशेने जाते.
त्याच्या कपाळाच्या मधोमध जाऊन त्याला लागते,
हेन्रीला आपल्या पापाची शिक्षा मिळते.
‘पेरलं ते उगवतं’ हा कर्माचा सिद्धांत पुन्हा एकदा जगापुढे स्पष्टपणे अधोरेखित होतो, दृढ होतो.
----------------------------------------------------------------------------------------------------
१. जे द्याल तेच मिळेल. –

- असं समजा, हे ब्रम्हांड एका बॅंकेसारखंच काम करत आहे,
- बॅंकेत सहा टक्के व्याजानं पैसे वाढवुन मिळतात, पण केव्हा? आधी त्यासाठी आपलं मुद्द्ल बॅंकेला द्यावं लागतं तेव्हाच!
- बॅंकेत पैसे गुंतवताना आपण निःशंक असतो, की बॅंक माझे पैसे आणि ठरलेले व्याज देईल, मग कर्माच्या बॅंकेत चांगली कर्म जमा करताना आपण एवढे संशयी का बनतो?  
- जे आपण दुसर्‍याला देऊ, तेच शंभरपटीने आपल्याला मिळेल, हेच ह्या विश्वाचं उघड गुपित आहे.
- प्रेम ‘देणं’, सेवा करणं  ही जगातली सर्वात सुंदर कृती आहे!
- देणारे कधीही फायद्यात राहतात. जसं की आपल्या हाताने अत्तर दुसर्‍याला लावलं की नकळत त्याचा सुगंध दिवसभर आपल्याही हाताला दरवळतो.
- शुद्ध, पवित्र, निर्मळ मनानं ‘देणार्‍यांना’ भरभरुन मिळतंही,
- छानसं स्मितहास्य दिलं की समोरुनही मनःपुर्वक स्वागत होतं,
- आपलेपणाने मदतीचा हात दिला की आपोआप त्याबदल्यात ह्र्दयपुर्वक आभार आणि सकारात्मक स्पंदनेही मिळतात,
- आपलेपणा, जिव्हाळा आणि प्रेम दिलं की आपण दिलेलं सारंकाही कित्येक पटीने आपल्याकडेच वापस येतं,
- आकर्षणाच्या सिद्धांताचा हा सर्वात महत्वाचा भाग आहे,
- ज्या ज्या लोकांना हे जमलं, त्यांना लॉ ऑफ अट्रॅक्शन तात्काळ फळं देऊ लागतो.
- सतत एखाद्याचा द्वेष करुन, एखाद्याला पाण्यात बघुन, दिवसरात्र एखाद्याविषयी वाईट विचार करुन तुम्ही कधीही यशस्वी होवु शकत नाही.
- स्वतःच्या मनःशांतीकरीता तरी तुम्हाला आपल्या शत्रुंना माफ करावेच लागेल.

- त्यांच्याविषयीची कटुता दुर सारल्याशिवाय मनात गोडवा निर्माण कसा होईल?
- “सगळे माझेचं आहेत, मी सर्वांचा आहे.” हा भाव मनी बाळगणार्‍यांच्या प्रार्थना निसर्ग लवकरात लवकर पुर्ण करतं.
- संकुचित आणि कोत्या मनोवृत्तीच्या लोकांना कुठल्याही कामात यश मिळत नाही, हे तुम्हीही पाहतच असाल.


२. यशस्वी होण्यासाठीही प्रेम आणि सेवा आवश्यक आहे. –

- नौकरी करत असाल तर आपल्या संस्थेवर मनातुन प्रेम करा.
- शंभर टक्के समर्पण भाव देऊन सेवा करा.
- व्यापार, व्यवसाय करत असाल तुमच्या कस्टमरवर मनातुन प्रेम करा.
- स्वतःच्या नफ्याला धोक्यात न आणता त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल, ते बघा.
- आपोआपच तुमचंही आर्थिक उत्पन्न भरघोस पटींनी वाढायलाच पाहिजे.
- व्यवहार द्क्ष अवश्य रहा, कोणी आपला गैरफायदा घेईल, आपल्याला लुबाडेल इतके भोळे नक्कीच राहु नका.
- पण त्यासोबतच मनातल्या मनात का होईना, आपल्या ग्राहकाला, आपल्या अन्नदात्याला, देव मानुन, त्याला मनोभावे, योग्य ती सेवाही द्या.
- कोणत्याही संत, किंवा महापुरुषांचा जीवनाचा, त्यांच्या विचारांचा अभ्यास केला तर तुम्हाला त्यात एक साम्य दिसुन येईल. त्या सर्वांनी आपल्याला हा एकच संदेश दिलेला आहे, असे तुम्हाला दिसुन येईल.
- प्रेम देण्यामध्ये, आणि सेवा करण्यामध्येच जीवनाचं सार्थक आहे, त्यातच जीवनाचा खरा आनंद लपलेला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------

३. देणाऱ्यालाच पुन्हा मिळतं. –

- एका गुरुंनी आपल्या आश्रमातल्या सर्व शिष्यांना त्यांचे शिक्षण पुर्ण झाले म्हणुन घरी जाताना प्रत्येकाला एकेक गाय आशिर्वाद म्हणुन दिली,

- सर्वजण गायी घेऊन निघुन गेले. एक शिष्य मात्र गाय घेऊन गेला नाही.

- तो म्हणाला, “गुरुजी, आपण इतके मौल्यवान शिक्षण दिलेत की मी तुमच्याकडुन अजुन काही घेऊ शकत नाही, गुरुदक्षिणा म्हणुन मलाच तुम्हाला काहीतरी द्यायला पाहीजे, तेव्हा मला दिलेली ही गाय तुम्ही आश्रमासाठीच राहु द्या.”

- त्याचे हे औदार्य पाहुन गुरुजी प्रसन्न झाले, म्हणाले, “आश्रमातल्या सार्‍या गायी मी तुला आशिर्वाद रुपाने देत आहे, आता तुला ह्या सांभाळाव्याच लागतील. हा माझा आदेश समज.”

- मग शिष्य म्हणाला, आपला असाच आदेश असेल तर मी आजीवन आश्रमातच राहुन ह्या सर्व गायी सांभाळीन.

- शिष्याचे ते शब्द ऐकुन गुरुच्या डोळ्यात पाणी आले आणि आश्रमाला नवा उत्तराधिकारी मिळाला.

आपल्या सर्वांचे हात ‘घेणारे’ नाही तर ‘देणारे’ बनो, ह्या एका सदभावनेसह,
आभार आणि मनःपुर्वक शुभेच्छा!
 
(जुलै २०१९ मध्ये झालेल्या व्हॉटसएप कोर्समधील एक लेख)

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...