Tuesday, July 19, 2022

वेदनांचा उत्सव!

 --------------------------------------------------

थेट पंकज कोटलवारच्या लेखणीतुन – वेदनांचा उत्सव!
--------------------------------------------------

काल ऑफीसमध्ये काम करत असताना ‘अर्थ’ नावाचा हिंदी सिनेमा पाहिला.

तसा हा ‘अर्थ’ चित्रपट बर्‍याच जणांना माहित असतो,  

“जगजितसिंगचे तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो!” आणि कोई ये कैसे बताये, की वो तन्हा क्यों है?”

जगजितचे फॅन असाल, तर तुम्ही हे काळीज चिरत जाणारे जगजितचे आर्त शब्द हजारो वेळा ऐकले असतील!

‘अर्थ’ 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता,

पण ही कथा आजही तितकीच ताजीतवानी, टवटवीत आणि एकदम रिलिव्हंट आहे,

ही गोष्ट आहे पुजा (शबाना आझमी), इंदर (कुलभुषण खरबंदा) आणि कविता संन्याल (स्मिता पाटील) ह्या त्रिकोणाची!

पुजा एक अनाथ मुलगी आहे, तर इंदर एक टॅलेंटेड फिल्म मेकर आहे, इंदर आणि पुजा एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात,

इंदरचा स्वभाव चिडखोर असल्यामुळे त्याचे व्यावसायिक करिअरची गाडी डळमळत चालली आहे. त्यामुळे दोघांनाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.

लग्नाला काही वर्ष झाली आहेत, इंदर हेच पुजाचे विश्व आहे. कितीही भांडणे झाली तरी ती भाबडी आपल्या नवर्‍यावर, मनापासुन निःस्सीम प्रेम करतीये!

अशातच राहते घर सोडण्याची वेळ इंदरवर येते, इंदर पुजाच्या रोजच्या कटकटींना कंटाळुन विलक्षण आणि मादक सौंदर्य असलेल्या कविताकडे आकर्षित होतो.

कविता गर्भश्रीमंत आहे, ती इंदरला नवा अलिशान फ्लॅट घेण्यासाठी पैसे देते आणि त्याबदल्यात जणु काही त्याला खरेदीच करते.

काही दिवस इंदरच्या मनात द्वंद्व असतं, मात्र एके दिवशी तो पुजाला सोडुन कायमचा कविताकडे राहण्याचा निर्णय घेतो.

पुजाच्या पायाखालची जमिन हादरते. अनाथ पुजाला हा धक्का सहन होत नाही. ती रडते, पडते, करुणा भेकते, दयेची भीक मागते, सुन्न होते, उद्धस्त होते, इंदरच्या आणि कविताच्या पाया पडते,

“माझं सुख ओरबाडून घेऊ नका, माझा सुखाचा संसार मोडु नका!” असा टाहो फोडते,

पण शारिरीक आकर्षणात अडकलेल्या इंदरला आणि ‘मला हवं ते मी मिळवतेच’ अशा अट्टहासाला पेटलेल्या कविताच्या ह्रद्याला, काही केल्या पाझर फुटत नाही,

तिची अवहेलना करुन इंदर आणि कविता एकमेकांशी लग्न करायचे ठरवतात, इंदर पुजाला घटस्फोट मागतो.

पुढे निराश पुजाच्या आयुष्यात देखणा, राजबिंडा आणि खेळकर स्वभावाचा राज (राजकिरण) येतो,

स्वभावाने हलकाफुलका राज, तिच्या चेहर्‍यावर हसु फुलवतो.

तो खुप मोठा सिंगर होतो,

लाघवी, निरागस, निष्पाप स्वभावाची पुजा त्याला वरचेवर खुप आवडायला लागते,
 
अखेर न राहवुन, एके दिवशी तो पुजाला लग्नासाठी मागणी घालतो, पण पुजा त्याला नम्र नकार देते.

कारण पुजा आपल्या भुतकाळाला, आपल्या वैवाहिक अपयशाला कवटाळुन बसलेली असते,

कविता –इंदरने दिलेली प्रत्येक मदत नाकारुन तिचा जगण्याचा संघर्ष सुरुच असतो.

तिची एक कामवाली बाई आहे, (रोहिणी हट्टंगडी)!

ह्या क्रुर जगात तिच एकमेव तिची म्हणावी, अशी जिवलग मैत्रिण आहे,

पण तिचा नवरा रोज दारु पिऊन मारहाण करतो,

आपल्या मुलीच्या फिससाठी जमवलेले पैसे चोरले म्हणुन सहन न होवुन ती कामवाली एके दिवशी चक्क आपल्या नवर्‍याचा खुन करते, आता तिला जन्मठेप होणार आहे.

“आता माझ्या मुलीचा सांभाळ कोण करील?” असा आर्त टाहो ती माऊली फोडते आणि अचानक पुजामधलं मातृत्व जागं होतं!

“मी सांभाळीन तुझ्या मुलीला, तु निर्धास्त रहा!” ती निर्धाराने म्हणते!

तिला तिच्या जगण्याचा अर्थ गवसतो.

तिने ज्या क्षणाला एक ध्येय स्वीकारलं, त्या क्षणी तिच्या चेहर्‍यावर आनंद झळकु लागला,

एका अनाथ मुलीसाठी एक पाऊल टाकलं, त्या क्षणी तिच्या आयुष्याला एक नवा अर्थ प्राप्त झाला,

तिची सारी दुःखे छुमंतर होतात,

आता आपली पुजा पुर्वीसारखी नाचु बागडु लागते,

आता खुष आनंदी होण्यासाठी तिला कोणाचीही गरज नसते,

ती स्वतःवर आणि त्या मुलीवर जीवापाड प्रेम करु लागते, आयुष्यावर प्रेम करु लागते,

अर्थ सिनेमा संपतो,

जाता जाता आपल्या डोळ्यात पाणी, आणि डोळ्यात अनेक प्रश्ने शिल्लक ठेवतो,

आपणही का बरं आपली दुःखं, तात्पुरती अपयशं कवटाळुन बसतो?

का आपल्याला आपल्या जगण्याचा उत्सव साजरा करता येत नाही?

चित्रपट संपताना, ‘अर्थ’ आपल्या मनात एक प्रश्ण मागे ठेऊन जातो,

तुझ्या मनात ज्या वेदना साठवलेल्या आहेत. त्या वेदनांचाच उत्सव तुला साजरा करता येईल का?...

तर कदाचित तुझ्याही जीवनाला अर्थ येईल.

-----------------------------------------------
काही वर्षांपुर्वी मी आमच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या हॉस्पीटलमध्ये, प्रत्यक्ष डिलीव्हरीच्या वेळी, काही हवं नको, बघायला थांबलो होतो, तेव्हाची गोष्ट!

डिलीव्हरी क्रिटीकल होती,

समोर लिहलेले होते, लेबर रुम! त्या गर्भवती स्त्रीचा नवरा प्रचंड अस्वस्थ होवुन चकरा मारत होता, आणि त्या ताई जोरजोरात किंचाळत होत्या, प्रचंड ओरडत होत्या,

कित्येक मिनीटे त्या आरोळ्या पुर्ण हॉस्पीटल मध्ये घुमत राहील्या. प्रत्येक किंकाळी आमच्या काळजाचे ठोके चुकवत होती.

आणि कित्येक मिनीटे वेदनादायी गेल्यावर एक शांतता पसरली, एक जन्म झाला!

मला त्याच क्षणी समजले, जिथे प्रचंड वेदना होत असतात, तिथे लवकर नवा जन्म होतो.

जसे प्रत्येक गंभीर प्रश्नामध्ये त्याचे उत्तरही लपलेले असते.

--------------------------------------

ह्या व्हॉटसएप कोर्समध्ये अनेक लोक मला त्यांचे प्रश्ण लिहुन पाठवतात,

“सर!, मला आर्थिक समस्या आहेत”,

असु दे की! आव्हानंच तर जीवनाला रुचकर बनवतात रे! गरीबीची जितकी धग सोसली आहेस, तिच तुझी सर्वात मोठ्ठी प्रेरणा बनुन तुला दिवसेंदिवस श्रीमंत बनवणार आहे! हा प्रवास, तुझी सक्सेस स्टोरी एके दिवशी तु जगापुढे मांडण्यासाठी तुला ही संधी मिळाली आहे!
डोकं वापर, गरज पडलीच तर कठोर परिश्रम कर, कसा येत नाही पैसा? त्याच्या बापालाही यावं लागेल.

--------------------------------------

“माझं घरातल्या माणसांशी जमत नाही”,

अरे! पण त्या विधात्यानेच तुमची गाठ बांधुन इथे पाठवलं आहे,

बरं! जी माणसं आहेत, ती बदलली म्हणजे तु आनंदाच्या डोहात डुंबशील असे समजत असशील तर तो गैरसमज आहे. कारण आपण सगळे सेमच असतो. प्रत्येक माणसात कसला ना कसला दोष असेलच!

त्यामुळे परफेक्ट रिलेशन हे एक प्रकारचे मृगजळच आहे!

आपली माणसं आईवडील, भाऊ बहीण, मुलं, नातेवाईक, शेजारी, मित्र जशे आहेत तसे त्यांच्यावर मनापासुन प्रेम करु लाग, म्हणजे प्रेमाची चव तुला इन्स्टंट चाखायला मिळेल, कारण आपण जसे वागतो, तेच आपल्याला परत मिळतं, हाच सृष्टीचा नियम आहे.

--------------------------------------

“माझा जीवनसाथी अर्ध्या रस्त्यात साथ सोडून गेला”,

अघटित घडलयं खरं, पण म्हणुन जिवंत प्रेत बनुन केविलवाणं जगु नको ना! प्रत्येकाचे आईवडील, जोडीदार, मुलं सगळे एकेनाएके दिवशी मरतात. पण म्हणुन आपलं जग संपत नाही, ते चालुच राहतं, जे समोर आहे, त्याचा सांभाळ कर, जे जवळ आहेत, त्यांच्यावर प्रेम कर!    

--------------------

“मला किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना आरोग्याचे प्रॉब्लेम्स आहेत.”

अरे! ही तर खुप छान गोष्ट आहे, आता तुला ह्या मौल्यवान आयुष्याची, स्वतःच्या शरीराची खरी किंमत कळेल.

आता एकही दिवस तु वाया घालवणार नाहीस, एकेक सेकंद स्वतःच्या आणि इतरांच्या आयुष्यात हसु फुलवण्यासाठी वापरलेस,

कारण तु काय गमवत आहेस, उद्या तुझ्यापाशी काय नसेल, हे फक्त तुझं तुलाच माहित आहे.

--------------------

शेवटी जाता जाता मी पोटतिडकीने, तुम्हा सर्वांना एकच सांगेन,

मी तुम्हाला तुमच्या सगळ्या समस्यांमधुन मुक्त करीन, असा माझा दावा मुळीच नाही,

पण माझा प्रत्येक लेख तुम्हाला संकटांना झगडण्यासाठी, प्रत्येक वेळी, एक नवं बळ देईल हे मात्र नक्की!..

ये वादा रहा!..

आपल्या सगळ्यांच्या जगण्याला रोज एक नवं ध्येय मिळो, रोज एक नवा अर्थ मिळो, या एकाच मनःपुर्वक प्रार्थनेसह,

आभार आणि शुभेच्छा!..


No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...