Thursday, June 30, 2022

वास्तुशांती

 🏵 नविन घर बांधल्यावर वास्तुशांती केल्याखेरीज त्या घरात रहावयास जाऊ नये, असे म्हणतात. यास काही पर्याय वा परिहार आहेत का ? (१)

            वास्तुशांती विषयक समाजात प्रचलित असणाऱ्या समजुती परस्पर भिन्न व टोकेरी आहेत. मोठ्या शहरातीर गाळे पध्दतीने बांधलेल्या शासकीय, निमशासकीय इमारतीमधील घरात जाताना लोक वास्तुशांतीचा क्षणभरही विचार न करता, बिनदिक्कत रहावयास जातात, हे एक टोक, तर दुसरे टोक म्हणजे स्वतः बांधलेल्या घराची वास्तुशांती होण्यापूर्वी आत सामानसुमान न नेता बाहेर गाडीमध्ये आणून ठेवतात व ग्रहप्रवेश, वास्तुशांती झाल्यावर मगच गृहसाहित्य आत नेतात. वरील दोन्ही टोकेरी मतप्रणालीच्या लोकांना वास्तुशांतीचे महत्त्व, कार्य व नेमका अभिप्राय समजलेला नसतो. त्यामुळे एक अश्रध्द व दुसरा अंधश्रध्द बनतो.

           वास्तविक वास्तुशांती मागील धर्मशास्त्रकारांची तत्त्वप्रणाली अतिशय उदात्त व उच्च पातळीवरची आहे. चराचराला व्यापून उरलेल्या त्या जगदीश्वराचे अणुरेणुतही दर्शन घडते. प्रत्येक लहान-सहान, सजीव-निर्जीव वस्तुमात्रामध्ये परमेश्वर भरून उरलेला असतो. व्याष्टिसमष्टिरूपाने त्याचा आविष्कार होत असतो. तो जाणून कसा घ्यावा, ही प्रक्रिया धर्मशास्त्रकारांनी विशद करून सांगितलेली आहे.

           माणसांमध्ये एखाद्या बालकाचा जन्म होताच त्याच्यावर विविध संस्कार करण्यात येतात. त्यात जातकर्म व नामकरण हे देखील विधी आहेत. पण जातकर्म व नामकरण होईपर्यंत ते बालक एका कोपऱ्यात उपाशी ठेवून ते संस्कार झाल्यावरच त्याला घरात घ्यावे, असा अविचार कुणी करीत नाही. काही वेळा अडघणी उद्भवल्यामुळे नामकरण संस्कार दोन-तीन महिने लांबणीवर पडतो, पण त्या कालावधीतही त्या बालकाची वाढ होत असतेच व त्याच्यावर त्याचे संबंधीत लोक अपरंपार प्रेम करतातच.

           जी स्थिती बालकाची, तीच स्थिती वास्तूची असते. ज्या दिवशी पायाभरणी होते, त्याच दिवशी वास्तुनिर्मितीलाही प्रारंभ होतो. वास्तुनिर्मिती होत असताना विविध कृमी किटक, निरुपद्रवी जंतू व प्राणी , वनस्पती, विविध वृक्ष वा रोपटी यांची अकारण हत्या घडल्यामुळे त्या स्थानावरील शांती ढळलेली असते. शिवाय वास्तुनिर्मिती करणारे कामकरी, कामगार व कारागीर लोक विविध पदार्थांचे पानभक्षण करून आलेले असतात. त्यांच्या मनात चाललेल्या विचारांचे कळत नकळत प्रक्षेपण वास्तुतील कणाकणात संक्रमीत होत असते. या सर्वामुळे त्या वास्तुस्थानातील शांती नष्ट झालेली असते. यास्तव त्या वास्तुस्थानावर शांती प्रस्थापित करावी, यासाठी वास्तुशांती करावयाची असते. (अपूर्ण)
0000



No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...