१) नामस्मरणासाठी निदान ३० मिनिटे दुसऱ्याचा उपसर्ग होणार नाही अशी जागा असावी.
२) बाहेरची गडबड व घरातील धडपड कानावर न येणारी जागा असेल तर उत्तम.
३) सपाट जमिनीवर मऊ आसन असावे.
४) अंगावर वाऱ्याचा झोत येणारा नसावा.
५) मोठा दिवा नसावा.
६) सुगंधी उदबत्ती असावी.
७) जवळ घड्याळ असावे.
८) पवित्र स्पर्श झालेली माळ असावी.
९) दररोज उपासनेची वेळ शक्यतो तीच असावी.
१०) पोट हलके व साफ असावे.
११) भूक लागलेली नसावी. तोंडात काही नसावे. ते स्वच्छ असावे.
१२) डास, चिलटे, माशा यांचा उपद्रव नसावा.
१३) सहजासनावर बसावे. पाठ ताठ ठेवावी. दोन गुडघ्यांवर दोन हात असावे. डोळे मिटलेले असावे.
१४) दृष्टी आतमध्ये गुरुचरणांवर असावी.
१५) प्रथम नाम-मंत्र गुणगुणावा म्हणजे वैखरीने म्हणावा.
१६) नंतर तोंड बंद करून मनातल्या मनात म्हणावा.
१७) मनातल्या मनात असतानाच मनाच्या कानाने ऐकावा.
१८) हा अभ्यास दृढ झाला की श्वासोच्छ्वासामध्ये एक समत्व येते. श्वास सूक्ष्म व मंद चालतो व त्याबरोबर आत नाम चालते.
१९) रोज तास अर्धा तास जरी असे नामस्मरण झाले तरी मनाला एक लक्षणीय समाधान लाभते.
२०) मनाची ही समाधान वृत्ती वर्धमान होत राहणे हे प्रगतीचे चिन्ह आहे.
२१) त्यासाठी दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा कोठेही आतमध्ये लक्ष वळवून नामाच्या नादावर गुंतून जावे. यालाच नामानुसंधान म्हणतात.
२२) हे जर साधले तर सर्व व्यवहार नीट होऊन नामस्मरण अंतरी स्थिरावते.
२३) सबंध शरीर नामाने भरून जाणे हे त्याचे पर्यवसान होय.
२४) शरीर चालताना मी जितका चालतो, तितका भगवंत बरोबर चालतो हे जाणवते.

No comments:
Post a Comment