पावसाळ्यातील आजार कोणकोणते ?
****************************** ******
पावसाळय़ातील आजारांचे स्वरूप मुख्यतः पाण्यावाटे पसरणारे आजार असे मानता येईल. पिण्याचे पाणी हे विविध कारणांनी दूषित बनण्याचा हा काळ असतो. विहिरीत बाहेरचे पाणी पडणे, मुरलेले दूषित पाणी पिण्याच्या पाण्याच्या तलावात पसरणे, वाहते पाणी काठावरची घाण मिसळून प्रदूषित होणे, तरंगणाऱ्या गढुळ पदार्थांवर व त्यांबरोबर येणाऱ्या जंतूंवर नियंत्रण न राखता येणे ही त्याची सामान्य कारणे आहेत. यामध्ये उडणाऱ्या माश्या, त्यांच्यामुळे होणारा रोगजंतूंचा फैलाव, चिलटांचा याच काळात होणारा प्रादुर्भाव व विविध प्रकारच्या जंतांची अंडी याच काळात पाण्याद्वारे फैलावणे यांची भरच पडते.
पटकी विषमज्वर, जुलाब, उलट्या, आव पडणे या नावाने होणारे आजार व विविध जंतांचा प्रादुर्भाव यांनाच आपण सहसा पावसाळी आजार असे म्हणतो. यापैकी पटकी म्हणजे काॅलरा हा व्हिब्रीओकाॅलरा या जंतूंमुळे होतो. दूषित खाद्यपेये हे त्याचे कारण. अर्थातच पटकीचा प्रादुर्भाव जेथे फार मोठ्या संख्येने जनसमुदाय जमतात, अशा यात्रा वगैरेंच्या ठिकाणी नेहमीच होऊ शकतो. भारताच्या पेजेप्रमाणे जुलाब व जोरदार विनासायास उलट्या यांची अचानक सुरुवात हे या आजाराचे प्रमुख लक्षण. यावर आता प्रतिजैविकांचा इलाज तातडीने केल्यास हा आजार पटकन आटोक्यात येतो. मात्र इलाजास उशीर झाल्यास शरीरातील द्रवपदार्थ कमी झाल्याने व जंतूंचे विष शरीरात पसरल्याने मृत्यूही ओढवू शकतो. याचे निदान सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे पटकन होते. रोग्याच्या वांती वा विष्ठेत स्वल्पविरामसारखे जंतू दिसतात. पूर्वी यावरची प्रतिबंधक लस टोचणे हा प्रमुख उपाय मानला जाई. आता मात्र रुग्णांवर तातडीने इलाज व स्वच्छ अन्नपदार्थांचा वापर यावर भर दिला जातो. कारण प्रतिबंधक लस जेमतेम चार ते सहा महिनेच उपयुक्त ठरते. यात्रा मात्र नेहमीच चालू असतात. फार मोठे पूर आलेला भाग सोडला, तर आता कॉलरा रोगाचे गांभीर्य फार राहिलेले नाही.
विषमज्वर हा त्रासदायक आजार असून सालमोनेला टायफी व पॅराटायफी या जंतूंमुळे होतो. क्लोरोमायसेटीन या औषधाचा शोध लागून १९६० च्या दशकात त्याचा वापर सुरू होईतो या आजाराने असंख्य बळी घेतलेले आहेत. ठराविक दिवसांचा ताप असे याचे स्वरूप असल्याने यालाच 'मुदतीचा ताप' या नावानेही ओळखले जाते. लहान आतड्याच्या आतील पापूद्र्यांवर या जंतूंचा हल्ला होऊन तेथे दाह निर्माण होतो. याचा परिणाम अन्नपचनावर होतो. गंभीर अवस्थेत लहान आतड्याला दाहामुळे व पापुद्रे सुटल्याने भोकेही पडू शकतात. विषारी द्रव्यांमुळे ताप येत राहतो. आता या आजारावर अनेक प्रतिजैविके उपलब्ध आहेत. प्रतिबंधक लस व तोंडाने घ्यायच्या प्रतिबंधक कॅप्सूलचा वापर आजही केला जातो. त्याचा उपयोग जेमतेम २ वर्षे होतो. विशेषतः पोहण्यापूर्वी, लांबच्या प्रवासापूर्वी परदेशगमनासाठी हा वापर उपयुक्त ठरतो.
विषमज्वराचा आजार न होता काही व्यक्तींच्या आतड्यात हे जंतू वास्तव्य करतात. आजार बरा झालेल्या व्यक्तीतही हा प्रकार होऊ शकतो. यालाच 'कॅरिअर' किंवा 'जंतूवाहक व्यक्ती' असे म्हटले जाते. त्या व्यक्तीला त्रास होत नसल्याने या व्यक्तीच्या संपर्कातील अन्य व्यक्तींना खाण्यापिण्याची भांडी इत्यादीमधून संसर्ग होऊ शकतो. जंतूवाहक व्यक्ती सार्वजनिक खाणावळ येथे आचारी वाढपी असेल तर मोठाच गोंधळ होऊ शकतो. या रोगाचे निदान विडाल या नावाच्या रक्त तपासणीतून होऊ शकते. आजारी रुग्ण व जंतूवाहक या दोन्हींची तपासणी होकारात्मक येते. त्यानुसार इलाज शक्य होतात.
आमांश, आव पडणे हा आजार फार विस्तृत प्रमाणात आढळतो. अमिबामुळे होणारा एक प्रकार असतो. तर जंतूसंसर्गातून दुसरा होतो. शिगेला, सालमोनेला व इकोलाय या जंतूमुळे होणारा अामांश पाण्यासारखे जुलाब, ताप, उलट्या व पोटात मुरडा धरणे अशा लक्षणांनी सुरू होतो. मोठ्या आतड्याला सूज येऊन त्याचा दाह झाल्याने शौचावाटे चिकट पदार्थाच्या स्वरूपात त्याच्या अंतस्त्वचेचे पापुद्रे पडतात. अमीबामुळे होणाऱ्या अमांशात वरचेवर शौचाला होणे, अपचन व तीव्र मुरडा व थोडा ताप ही लक्षणे असतात. दोन्हींवर करण्याचे उपाय हे औषध स्वरूपातच करावे लागतात. पचनावर परिणाम झाल्याने रुग्णाचे वजन प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता विशेषत: वाढत्या वयात जास्त असते. अमांश हा आजार वरचेवर उद्भवून त्यातून दूरगामी स्वरूपाचा कोलायटिस हा मोठ्या आतड्याच्या दाहाचा आजार सुरू होऊ शकतो.
विविध प्रकारचे जंत आतड्यात वाढतात. आपण खाल्लेले अन्न तेच खाऊन फस्त करतात. त्यामुळे शरीरक्रियाच मंदावते. मुलांच्या वाढीवर परिणाम होतो. उलट्या, पोटात दुखणे, झोपेत दात खाणे, रक्तक्षय ही लक्षणे दिसतात. पाण्यातील जंतांच्या अंड्यांमुळेही बाधा होते. सर्व प्रकारच्या जंतांवर सध्या औषधे उपलब्ध असून ती सहजपणे जंतांचा नायनाट करतात.
पाणी उकळून व गाळून पिणे हा पारंपरिक उपाय पाण्यात टाकण्याच्या क्लोरीनच्या गोळ्या वा थेंब हाही एक उपयुक्त उपाय. अॅक्वागार्डसारख्या अत्याधुनिक आयनीकरणाने पाणी शुद्ध करण्याचा तिसराही उपाय. घरगुती फिल्टरेशनची पद्धत वापरणे हाही एक परिणामकारक उपाय अनेक प्रकारच्या पावसाळी आजारांना दूर ठेवू शकतो.
*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
या पेजला लाईक करा आणि मिळवा रोजच्या रोज दिनविशेष आणि विज्ञानविषयक माहिती.whatsapp किंवा Telegram वर रोजच्या रोज माहिती मिळविण्यासाठी 9049491631 या नंबरवर 'Request' टाइप करुन *(फक्त whatsapp किंवा Telegram वरच)* पाठवा.
No comments:
Post a Comment