२०१२ वर्षाखेर ची ही गोष्ट : संगणक अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षातच पहिल्याच सत्रात ३ विषय लागलेत!
गणित १ (M1) (१०० पैकी १८)
विद्युतीकरण (Basic Electrical) (१०० पैकी २१ ) आणि
संगणक भाषा (Fundamental Programming Languages) (५० पैकी फक्त ८)
विषय लागण्याचा त्रास खूप जास्त होता कारण आतापर्यंत म्हणजेच सुरुवातीपासून १२ वी पर्यत मी सगळ्यांचा बाप होतो, कमीतकमी मी तरी स्वतःला तसे मानायचो - आणि अचानक ३ विषय लागले. घरी सांगितले तरी कोणी विश्वास ठेवणार नाही अशी माझी स्थिती होती - खुप नैराश्य आलेलं.
आपण नेहमी अक्रिय मनस्थितीने जगत असतो. आपल्यासोबत काहीतरी वाईट घडते तेव्हा आपण इतरांना आणि स्वतःला हेच सांगतो की, "माझी थोडे न चूक आहे!! — हे तर माझ्यासोबत त्याचं त्याचं झालंय!!"
मला त्यावेळेस खूप त्रास झाला होता. कशातच रस नव्हता येत, सगळे जग एकदम भकास वाटायचे. रडून रडून किती रडेल? एक वेळ अशी आली की रडायला पण यायचे बंद झाले. मी अभियांत्रिकी सोडायचा निर्णय घेतला आणि स्वतःला समजावून टाकले की, "असं पण आपल्याला कुठे अभियांत्रिकी करायची होती! आपल्याला काय कळतं ह्यातले!" पण मग एकेदिवशी असच बसून विचार करत होतो तेव्हा मनात अचानक एक प्रश्न आला, "यार मी जर अभियांत्रिकी सोडून दुसरे काही करायला घेतले तर ह्याची काय हमी आहे की ते काम मी मध्येच सोडणार नाही?? काय गँरंटी?? आता पळतोय, तेव्हापण पळेल. लहानपणी नवोदय मधून पळालो. आता अभियांत्रिकी म्हणून पळतोय. असं कधी पर्यंत मी पळतच राहील?"
त्यावेळेस एक वेगळीच शक्ती अंगात संचारली. मी उठलो. डोळे पुसले. अंघोळ केली. डायरी काढली आणि स्वतःवरच राग काढत २-३ वाक्य लिहले. ते खाली दाखवले आहेत. (ते वाक्य एकदम असेच नव्हते. परंतु त्यांचा रोष जवळपास असाच होता.)
मी खरंच काहीतरी करायचे ठरवले. पण समजले नाही नक्की काय करू. मग एकदम लक्षात आले, की हे कॉलेज — होस्टेल एकदम भकास वाटतंय. सर्वप्रथम इथून बाहेर पडायचे. मी चपला घातल्या आणि शेजारचे शहर "मंचर" येथे गेलो आणि पुण्याचा नकाशा घेऊन आलो.
पुण्याचा नकाशात जवळपास असलेली सगळी धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे पाहायचा मी निर्णय घेतला आणि एक लिस्ट बनवली. जे ठिकाणे माझ्या "अवसरी" गावाजवळ होती तिथे जायचे मी ठरवले. ती खालीलप्रमाणे :
आळंदी,
देहूगाव,
भीमाशंकर,
लेण्याद्री,
ओझर,
शिवनेरी,
ओतूर.
आणि ठरवले की इथे आपण "एकटेच" जायचे. जे होईल ते पाहून घेऊ. आणि दुसऱ्या दिवशी ओझर, लेण्याद्री गेलो. ST मध्ये बसून फक्त खिडकीतून बाहेर पहायचे, थोडं मिसळपाव खायची आणि उसाचा रस प्यायचा आणि "भटकायचं" एवढाच माझा दिनक्रम होता.
दरम्यान, मी देवासमोर गुडघे टेकणारे पाहिले, लेण्याद्रीचे शेकडो शेकडो पायऱ्या आकांत करून सगळ्यांना चढतांना पाहिले, शिवनेरी किल्ला जे आपल्या "आराध्यदैवतांचे" ठिकाण आहे त्याची झालेली दुर्व्यवस्था पाहिली, देवीदेवतांचे फोटो तिप्पट किमतीने विकणारे पाहिले, मंदिराबाहेर हात पसरवून बसलेली आजीबाई पाहिली. भीमाशंकरला जाण्यात थोडी गडबड झाली — मला खरतरं तिथे जायचा रस्ता माहितच नव्हता परिणामी तिथे कसबसं पोहोचलो आणि खूप उशीर झाला. मी इथेच मंदिराच्या परिसरात रात्र काढण्याचा निर्णय घेतला. अंधार पडले आणि तिथे आरती सुरु झाली. आरतीला खूप कमी जण असल्यामुळे मला चांगली जागा मिळाली. अचानक एक बाबा हृदयाचा झटका येऊन पडले खाली. त्यांना कोणीही उचलत नव्हते. शेवटी ३-४ जणांनी त्यांना उचलून कुठेतरी नेले.
मी त्या रात्री तिथेच बसून शांतपणे मंदिराच्या परिसराला पाहत होतो. मन सैरभैर धावत होते — समोर एक मस्त राधाकृष्णाची मूर्ती होती. भीमाशंकर माझे फिरण्याचे शेवटचे ठिकाण होते. माझे मन आतापर्यंत आपण जे पण फिरलो - जे काही पाहिले त्याचा सारांश करू पाहत होते. ते खाली पडलेले बाबा काही करून डोळ्यासमोरून जात नव्हते.
"ह्या जगात काहीही पर्मानंट नसते. माणसाचे अस्तित्व क्षुल्लक असते. ज्या देवाला दिवसा पाहण्यासाठी गर्दी तुंबते तो रात्री एकटाच असतो तरी कोणी त्याच्याजवळ जात नाही. जे त्याचा नावाचे वस्तू विकतात ते स्वतःचा फायदा पाहतात आणि लोकांच्या श्रद्धेचा चुकीचा फायदा उचलतात. ज्या महान तत्वाने आपल्यांसाठी स्वराज्य स्थापन केले त्याच्या ठिकाणावर अजय लव्ह निशा लिहलेलं असते. देवाला १०० रुपयाचे नारळ, कुंकू, गुलाब वाहणारे बाहेर बसलेल्या आजीला २ रुपये देत नाहीत. बसस्थानकावर असे अनेक जण फक्त बसून असतात ज्यांना काहीही माहित नसते त्यांना पुढे करायचे काय आहे. कोण ४ तास वाट पाहून त्यांना बस मिळत नाही. कोणाला ते ४ मिनिट उशिरा आले म्हणून बस मिळत नाही. काही असंख्य पायऱ्या मेहनत करून चढतात तर काही खालूनच दर्शन घेऊन पाठमोरे होतात. काही माकडांना खायला देऊन त्यांच्यात श्री हनुमानाचे दर्शन घेतात तर काही जन त्याच माकडांना काठीने हाड हाड करतात. आयुष्यभर महादेवाची आरती करणारा बाबा जेव्हा आरतीच्या दरम्यान खाली पडला तर त्याला कोणीही लगेच उचलले नाही."
असे खूप विचार मनात वीज सारखे चमकले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते हे मला खूप वेळानंतर कळले. हुंदका देत मी विचार करू लागलो, "ह्या सगळ्यांसमोर माझे दुखः काहीच नाही. जगात पहिलेच खूप दुखः आहे त्यात माझ्या दुखाःची भर पडली तर काय झाले? असे काय हरवले आहे माझे की मी एवढा आकांत करतोय? माझ्याकडे सगळे आहे — शरीर, शिक्षण, आईवडील मग मी घाबरतो का आहे?"
अचानक मंदिरात गर्दी जमू लागली. तिथेच घड्याळात पाहिले तर पहाटचे ४:३० वाजत होते. बरेच जण आरतीला जमले. मी पण उठलो. तोंडावर पाणी मारले, कपडे झटकले. आरतीला उभा राहिलो आणि महादेवाच्या मूर्तीला पाहून हळूच पुटपुटलो, "तुला सगळे त्यांच्या सोयीनुसार वापरून घेतात नं!! तरीपण तू एवढ्या खंबीरपणे उभा राहतोस!!"
बसमध्ये बसलो. मला एक गोष्ट नीट समजली ती म्हणजे,
"दुखः अनिर्वाय आहे — हे प्रत्येकाच्या वाटेला येत — माझे दुखः इतरांच्या वेदनेपुढे काहीच नाही. मी इतरांच्या तुलनेत जास्त भाग्यशाली आहे."
त्या रात्री माझ्या अंगात काहीतरी होत जे जागे झाले होते — आग लागली होती आतमध्ये — तो एक दिवस आहे आणि एक हा दिवस आहे ती आग काही कमी झाली नाही.
त्यानंतर मी असा अभ्यास केला की ते ३ विषय फर्स्टक्लास मध्ये पास झालो. पुढच्या सगळ्या सत्रात (शेवटपर्यंत) मी "फर्स्टक्लास विथ Distinction" आणले आणि पूर्ण अभियांत्रिकीचे माझे एकूण अनुभव एका पुस्तकात जेरबंद केले. त्याला नाव दिले, "My FootPrints : From Backlog to Distinction", माझ्या पाऊलखुणा : नापास पासून विशेष गुणवत्ता यादीत पर्यंतचा प्रवास!! (हे पुस्तक फक्त माझ्याजवळ आहे. अनुभव स्वतःचे असल्यामुळे ते कोणालाही सांगायला मला ठीक वाटत नाही.)
मूळ प्रश्न : नैराश्यामधून (डिप्रेशन) बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगाल का?
उत्तर तुम्हाला कळलचं असेल. आपल्याला नैराश्य आपण जिथे राहतो तिथे आलेले असते. म्हणून तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी आजूबाजूच्या वातावरणामुळे तुम्हाला अजून वाईट वाटत — त्या सगळ्या व्यक्ती, वस्तू, घटना सतत समोर येतात आणि आपल्याला सगळे आठवते. नैराश्यातून बाहेर पडण्याची पहिली पायरी हिच की ती "जागा सोडा". जेवढ्या लवकर, ज्या पद्धतीने जमेल त्या जागेला तात्पुरते तरी सोडा. मोकळ्या, शांत ठिकाणी जा आणि काहीही न करता फक्त बसून राहा मग तो १ तास, ५ तास, १ दिवस किंवा १ महिनाही असू शकतो.
दुसरी पायरी "आता माझ्याकडे काय आहे हातात? मी काय करू शकतो? मी इतरांपेक्षा भाग्यवान आहे का?" असे प्रश्न स्वतःला विचारा. बसं हे प्रश्न स्वतःला विचारा आणि ह्यांच्या सोबत राहा. मी ह्याला, "Seat\sleep with your thoughts" म्हणतो. उत्तर मिळतात — आपण विचारत नाही स्वतःला!!
नैराश्य सुरुवातीला थोडसंच असते. आपण त्याला मोठे करून देतो. मग लक्षात घ्यायचे की जर आपण नैराश्य मोठे करू शकतो तर त्याला मिटवू पण शकतो. शांत ठिकाणी गेल्यावर आपले विचार बदलतात, थोडं मोकळ आणि हलके वाटते. हीच वेळ असते स्वतःची सुप्त शक्ती जागृत करण्याची!! तिला आव्हाहन करायचे बस. मग काम ती करते — काम "तो" करतो आणि नाव आपले होऊन जाते.
तूच आहेस तुझ्या आयुष्याचा शिल्पकार!! 

उठा जागे व्हा — आणि ध्येय प्राप्ती पर्यंत थांबू नका.
अनेकांच्या विचारातून..
अजय
No comments:
Post a Comment