Wednesday, May 25, 2022

#मुंबई #ची #टायटानिक

भावपूर्ण श्रध्दांजली 💐💐

स्मरण रामदास बोट दुर्घटना 😔

१७ जुलै १९४७ रोजी भाऊच्या धक्क्यावरून निघालेली ‘रामदास’ ही प्रवासी बोट मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या काशाच्या खडकाजवळ वादळात एका महाकाय लाटेची शिकार झाली. त्या करुण दुर्घटनेला आज ७० वर्षे पूर्ण होत आहेत. याच दुर्घटनेची ही स्मरणकथा..

    स्वातंत्र्यपूर्व काळात दळणवळणाच्या साधनांची कमतरता असल्याने सागरी वाहतुकीचा मार्गच जनतेला स्वस्त आणि सोयीचा होता. मुंबई-गोवा हा राष्ट्रीय महामार्ग १९३६ मध्ये तयार झाला तरी जनतेला बोट वाहतूकच सोयीची वाटे. त्याकाळी कोकण किनारपट्टीवरून प्रवासी व मालवाहतूक मोठय़ा प्रमाणावर होत असल्याने नजीकच्या कुलाबा व रत्नागिरी जिल्हय़ातील सर्व छोटी बंदरे बारमाही वाहतुकीमुळे सतत गजबजलेली असणे हेच कोकणचे खरे वैभव होते.

    कोकणातील घरचे कर्ते पुरुष व्यवसायानिमित्त मुंबईत आश्रयाला असले तरी संपूर्ण कुटुंब कोकणात गावाला असल्याने चाकरमान्यांचा प्रवास जलमार्गेच असे. आज नामशेष झालेला गलबत व्यवसाय त्याकाळी व्यापारी मालाची वाहतूक करण्यात आघाडीवर होता. पावसाळय़ात फक्त मुंबई शेजारील जलवाहतूक सुरू असायची. कमी वेळात व पैशात प्रवास घडत असल्याने सतत कुलाबा व रत्नागिरी जिल्हय़ातील आजूबाजूच्या परिसरातील प्रवाशांची ये-जा सुरूच असायची. रेवस, करंजा, उरण, चौल, रेवदंडा, अलिबाग, श्रीवर्धन, दिघी, रोहा, म्हसळा तसेच खेड, मंडणगड, दाभोळ व चिपळूण येथील सर्व मंडळी मुंबईत गिरगाव, भायखळा, लालबाग व परळ या गिरणगावात आश्रयाला होती. परिणामी दर आठवडय़ाला त्यांचा बोटीने गावाला येण्या-जाण्याचा प्रवास असे, तोही रामदासच्या शनिवारच्या विशेष फेरीने!

      कोकण किनारपट्टीवर मुंबई ते गोव्यापर्यंत बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन (बी.एस.एन.) या कंपनीद्वारे रामदास, रोहिदास, जयंती व चंपावती या बोटी प्रवासी वाहतूक करीत असत. रामदास बोट मुख्यत: मुंबई ते गोवा मार्गावर नियमित फे-या करीत असे. तर शनिवारी फक्त रेवसची छोटी फेरी करीत असे. अशातच भारतीय स्वातंत्र्याच्या एक महिना अगोदरची सकाळ मात्र कोकणवासीयांवर घाला घालणारी ठरली. तो दिवस म्हणजे १७ जुलै १९४७, शनिवार व दीप अमावस्येचा होता. गटारी अमावस्या असल्याने प्रवाशांची गावाला जाण्यासाठी गर्दी झाली होती. सुमारे ६७३ तिकिटे संपली होती. अधिक खलाशी, हॉटेल कर्मचारी व अधिकारी मिळून ७० जण, त्याचप्रमाणे ऐन बोट सुटताना उडय़ा मारणारे फुकटे प्रवासी व तान्ही बालके आदींसह सुमारे ८०० प्रवासी बोटीत होते.

    ‘रामदास’ ही उच्च खानदानीतील १९७९ फूट लांब, २९ फूट रुंद व ४०६ टन वजनाची. १९३६ मधील स्कॉटलंड बनावटीची, १९४२ मध्ये युद्धकार्यासाठी सरकारने घेतली होती. पावसाळी दिवस असूनही स्वच्छ हवामान असल्याने बोट नेहमीप्रमाणे आपल्या रेवसच्या सफारीला मुंबईहून सकाळी ८.३० वा. निघाली. बोटीचे कप्तान सावंतवाडीचे मुरब्बी दर्यासारंग शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई त्यांच्या दिमतीला होते. त्यांनी आपल्या अन्य सहका-यांच्या मदतीने धक्क्याला अलविदा करीत रेवसच्या दिशेने कूच केली. वाफेवर चालणा-या या बोटीने सुमारे ९ सागरी मैल अंतर पार करून अर्धा तास झाला होता. बोट खुल्या समुद्रात मार्गक्रमण करताना काहीशी तिरकी चालत होती.

    नेमके याच वेळी काळाने घाला घातला. अचानक हवामानात बदल झाल्याने ताशी ५० मैल वेगाने जाणारे चक्रीवादळ निर्माण झाले. परिणामी जोरदार लाटा, वेगवान वारा व पाऊस यांनी रौद्र रूप धारण केले. बोटीचे कापडी पडदे फाटून त्यातून पावसाचे पाणी आत येऊ लागले. लाटांची उंची व जोर वाढून मुसळधार पावसामुळे पुढचे काहीच दिसनासे झाले. कॅप्टनसमोर कोणताच पर्याय उरला नव्हता. अशातच बोट करंजा खडकाजवळील ‘बॉय’जवळ आलेली. त्यामुळे त्याने रेवस बंदर गाठण्याचा निर्णय घेतला. परंतु करंजा बॉयजवळ समुद्रात कुठून तरी वाहत आलेली तेलाची काही रिकामी पिंपे तरंगताना दिसल्याने कॅप्टनने पिंपांना टाळण्यासाठी जरासा वळसा घेताना बोट काहीशी जास्त कलली. दुर्दैवाने त्याच वेळेस एक प्रलयकारी लाट बोटीवर आदळली.. आणि बोट कलंडली. बोट कलंडल्याने सर्व प्रवासी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावत बोटीच्या एका टोकास व कुशीस जमू लागल्याने बोट आणखी कलंडली. प्रवाशांची आरडा-ओरड व आर्त किंकाळय़ांनी बोटीचा परिसर गलबलून गेला. त्यातच पिंपे चुकविण्याच्या प्रयत्नात बोट थेट काशाच्या खडकावर जाऊन आदळली.

    दरम्यान, दुसरी लाट येण्याच्या काळात बोटीचा तोल न सावरल्याने, काय होते हे कळायच्या आतच बोटीत पाणी शिरले व बोट बुडून समुद्रतळाच्या दिशेने जाऊ लागली. क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. सुमारे ६२५ जण बुडून मरण पावले व २३२ प्रवाशांचा सुर्दैवाने जीव बचावला. ज्यांना पोहता येत होते त्यांनी कशाचा तरी आधार घेतला तर काहींनी लाईफ जॅकेट घातली. सुमारे ७५ प्रवाशांचे प्राण तेथील स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. बोटीत अनेक स्त्रिया, पुरुष व बालके होती. दुर्घटनेतील मृतांचे मृतदेहदेखील सापडले नाहीत. ज्यांचे सापडले त्यांची ओळख पटत नव्हती, तर अनेक मृतदेह माशांनी खाल्ले होते. बोटीचे कप्तान शेख सुलेमान व चीफ ऑफिसर आदमभाई खिडकीतून बाहेर पडल्याने वाचले. शेख पोहत रेवसला गेले व तेथून अलिबाग गाठून त्यांनी मुंबई कार्यालयात तार केली. त्याच दरम्यान पांडू कोशा कोळी हा प्रवासी पोहत मुंबईला पोहोचला.

    जानू चांगो रोहेकर या महापालिका कर्मचा-याचे प्रेत मच्छीमारांनी आणले. तर बारक्या मुकादम या १२ वर्षे वयाच्या मुलाला कस्टम अधिकारी बेशुद्धावस्थेत लाईफबॉयवर तरंगताना आढळल्याने किना-यावर घेऊन आले. तेव्हा रामदास सागरात बुडाल्याचे निश्चित झाले. आज अलिबागचे बारक्याशेठ मुकादम सुमारे ८० वर्षाचे असून पेणचे गजानन मुंबईकर देखील हयात आहेत. बोट बुडाल्याची बातमी संपूर्ण मुंबईत वा-यासारखी पसरताच प्रवाशांच्या नातलगांनी धक्क्यावर तुफान गर्दी करून कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरत प्रश्नांचा भडिमार केला होता. अखेर पोलिसांनी जमावाला शांत केले. त्याच वेळी उरणच्या दौ-यावर असलेले ना. गणपतराव तपासे यांनी जिल्हाधिका-यांमार्फत मदतकार्य करताना सोबत प्रभाकर कुंटे व वांद्रेकर यांना घेतले. तर मुंबईत स्थानिक पुढारी स. का. पाटील, मारोरजी देसाई, मुंबईचे शेरिफ व रा. स्व. संघ आदींनी मोलाचे सहकार्य केले.

    सदर दुर्घटनेची कमोडोर मिल्स यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली. बी. एस. एन. कंपनी पुढे सिंदिया कंपनीत विलीन करण्यात आली. बोटीवर वायरलेस यंत्रणा नसल्याचे सिद्ध झाले. परिणामी नंतर मात्र दूरसंचार उपकरणे प्रवासी बोटींवर दिसून आली. तसेच नारळी पौर्णिमेपर्यंत मच्छीमारी बंदीचा कायदाही सरकारने केला. या भीषण दुर्घटनेचे सागरीशास्त्रीय विश्लेषण सागरी जीवनाला वाहिलेले पहिले मराठी मासिक ‘दर्यावर्दी’ने आपल्या ऑगस्ट-सप्टेंबर १९४७च्या दोन अंकातील लेखांमध्ये केले होते. प्रख्यात चित्रकार रघुवीर मुळगावकर व दीनानाथ दलाल हे दोघे ‘दर्यावर्दी’चे मुखपृष्ठ तयार करीत असत. रामदासच्या दुर्घटनेपूर्वी १९२७ मध्ये तुकाराम व जयंती या बोटींनाही अशाच प्रकारे जलसमाधी मिळाली होती. यात एकूण २ हजार प्रवासी सागराच्या उदरात गडप झाल्याने टायटॅनिकची आठवण येते. सागरी अभ्यासकांनी यावर संशोधन करावे, हीच अपेक्षा.

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...