Thursday, December 8, 2022

 *एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये ! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत आहे. ही सर्व प्रतिभा त्या त्या कवींची आहे. मराठी भाषेबद्दल आदर वाढविणाऱ्या या प्रयोगाबद्दल सर्वांचे आभार* 

*मकरंद करंदीकर*
(हिंदी - इंग्रजी आणि कन्नड भाषांमध्ये ही अनुवाद आहे 😊 👍


विंदा करंदीकर यांची मूळ कविता (जी मुळात लईभारी हे :-) ). मराठीच्या बहिणी असलेल्या अनेकानेक भाषांमधे. 

🙏🏻 *विठ्ठल* 🙏🏻  
     (मूळ कविता)
पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥
✍️ *©️विंदा करंदीकर*
================
      🎯 *इट्टल*
(नगरी बोली)
पंडरपुरच्या येसिपासी
हाये येक छुटी साळा
सर्वी पोरं हायेत गुरी
योक मुल्गा कुट्ट काळा
दंगा कर्तो मस्ती कर्तो
खोड्या कर्ण्यात बी आट्टल !
मास्तर म्हंती करनार काय ?
न जानू ह्यो आसन इट्टल !!! 
🖊 *काकासाहेब वाळुंजकर*
     - अहमदनगर
=================
    🎯 *इट्टल*
(मराठवाडी बोली)
पंडरपूरच्या येशीपशी
हाय बारकी साळा एक
सगळी पोरं हायत गोरी
कुट्ट काळं त्येच्यात एक
आगावपणा करतंय पोराटगी करतंय
आवचिंदपणाबी करण्यात हाय 
आट्टल...
गुरजी मनत्यात करावं काय?
एकांद्या टायमाला आसंलबी इट्टल!
🖊 *डॉ.बालाजी मदन इंगळे*
        - उमरगा
=================
 🎯 *इठ्ठल*
(लेवा गणबोली)
पंढरीच्या येशीपाशी
आहे एक छोटुशी शाया
सर्वे पोऱ्हय गोरे
एक पोऱ्या कुट्ट काया 
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या कऱ्यात आहे अट्टल
मास्तर म्हने करे काय
न जानो अशीन इठ्ठल
🖊 *प्रशांत धांडे*
       - फैजपूर
=================
   🎯 *ईठ्ठल* 
(अहिराणी रुपांतर)
पंढरपूरना शीवजोगे
एक शे धाकली शाया;
सम्दा पोरे शेतस गोरा
एक पोर्‍या किट्ट काया ||
दांगडो करस, मस्त्या करस
खोड्या कराम्हा शे अट्टल;
मास्तर म्हने काय करो ?
ना जानो हुई ईठ्ठल ||
  ✍️ *नितीन खंडाळे* 
            चाळीसगाव
=================
🎯 *इठ्ठल*
 (तावडी अनुवाद)
 पंढरपूरच्या येसजोय
 आहे एक छोटी शाया
 सम्दे पोरं आहेती गोरे
  एक पो-या कुट्ट काया ll
 दंगा करतो मस्ती करतो
 खोड्या क-यामधी आहे अट्टल
 मास्तर म्हनता करनार काय?
ना जानो असीन इठ्ठल ll
 ✍️ *प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे*
        - जळगाव
=================

🙏🏻 *विट्टल* 🙏🏻  

(आदिवासी बोली. केळवे, पालघर.)
     
पंढरपूरचं येशीपाय
हाय एक बारकुशी शाला
सगली पोरं हाईत गोरी
एक पोर तं काला कुट ॥
दंगा करं मस्ती करं
खोड्या कराया तं अट्टल
मास्तर सांगं करशी काय..?
कलंssहू नाय आसल विट्टल ॥

विकास पाटील.
कृषिन, केळवे.

======((((======

     🎯 *इठ्ठल*
(बागलाणी अहिराणी) 
पंढरपूर नी येसपन
शे एक उलशी शाळा
सर्वा पोऱ्या गोरापान
येकच पोरगा कुट्ट काळा!
दंगा करस मस्ती करस
खोड्या काढा मा शे अट्टल
मास्तर म्हणतस करवा काय
न जाणो व्हयी इठ्ठल!
  🖊 *वैभव तुपे*
        - इगतपुरी 
=================
🎯 *इठ्ठल*
(आदिवासी तडवीभिल
बोली)
पंढरपूरची शिवंजवळं
ह एक लहानी शायी
सबन पोऱ्हा हती गोऱ्या
एक पोऱ्या ह कायाकुच
गोंदय करतो मस्ती करतो
खोळ्या करवात ह अट्टल
मास्तर म्हणतंहती करशान काय ?
कोणाल माहित हुईन इठ्ठल
🖊 *रमजान गुलाब तडवी*
- बोरखेडा खुर्द ता. यावल
=================
  🎯 *विठ्ठल*
( वऱ्हाडी बोली )
पंढरपूरच्या येशीजोळ
लहानचुकली शाळा हाये;
सबन लेकरं हायेत उजय
यक पोरगं कायंशार॥
दांगळो करते, मस्त्या करते
खोळ्या कर्‍याले अट्टल.
गुर्जी म्हंतात कराव काय?
न जानो अशीन विठ्ठल ॥
✍️ *अरविंद शिंगाडे*
           - खामगाव
=================
 🎯 *इठ्ठल*
 (वऱ्हाडी अनुवाद)
पंढरपूरच्या वेसीजोळ
आहे एक लायनी शाळा
सारी पोर आहेत गोरी
एकच पोरगा डोमळा ॥
दंगा करते, दांगळो करते
खोळ्या करण्यात आहेत
पटाईत...
मास्तर म्हणते कराव काय
न जाणो अशीन इठ्ठल ।।
✍️ *लोकमित्र संजय*
            -नागपूर
=================
     🎯 *इठ्ठल*
      (आगरी अनुवाद)
पंढरपूरचे येशीजरी
यक हाय बारकीशी शाला
सगली पोरा हायीत गोरी
यक पोऱ्या कुट काला।।
दंगा करतंय मस्ती करतंय
खोऱ्या करन्यान हाय
अट्टल...
मास्तर बोलतान कराचा काय?
नायतं तो हासाचा इठ्ठल!
✍️ *तुषार म्हात्रे*
     पिरकोन (उरण)
=================
    🎯 *इट्टल*
(मालवणी अनुवाद)
पंडरपूराच्या येशीर 
एक शाळा आसा बारकी।
एकच पोरगो लय काळो:
बाकीची पोरां पिटासारकी।।
दंगो करता धुमशान घालता;
खोड्ये काडण्यात लय अट्टल।
मास्तर म्हणतंत करतंलास काय?
हयतोच निगाक शकता इट्टल।।
✍️ *मेघना जोशी*
         - मालवण
=================
  🎯 *इठ्ठल*
(पारधी अनुवाद)
पंढरपूरना आगंमांग
छ येक धाकली शाया ;
आख्खा छोकरा छं गोरा
यकजच छोकरो कुट्ट कायो!!
वचक्यो छं मस्त्या करस 
खोड करामं छं अट्टल 
मास्तर कवस करानू काय ? 
कतानै आवस व्हसो तेवतो इठ्ठल !!
✍️ *प्रविण पवार* 
             धुळे
=================
   🎯 *इठ्ठल*
(बंजारा अनुवाद)
पंढरपूरेर सिमेकन,
एक हालकी शाळा छ!
सारी पोरपोऱ्या गोरे,
एक छोरा कालोभुर छ!
दंगो करचं मस्ती करचं!
खोडी करेम छ अट्टल!!
मास्तर कचं कांयी करू?
काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!
✍️ *दिनेश राठोड*
 *चाळीसगाव*
=================
    🎯 *विठ्ठल*
(वंजारी अनुवाद)
पंढरपुरना हुदफर 
हे एक बारकुली शाळ
हंदा पाेयरा हे गाेरा 
एक पाेयराे निववळ काळाे
केकाटत ,मसती करत
खाेडयाे करवामा हे अटट्ल
 मासतर केत करवानाे काय
 न जाणाे हिवानाे विठठ्ल
✍️ *सायली पिंपळे*
            - पालघर
=================
  🎯 *विठ्ठल*
      (हिंदी अनुवाद)
पंढरपूर नगरमें द्वारसमीप
है एक अनोखी पाठशाला
सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के
एक बच्चा भी हैं काला...।
उधम मचाये मस्तीमे मगन
है थोड़ा सा नटखटपन
गुरुजन कहे क्या करे जो
हो सकता हैं विट्ठल...।
✍️ *सुनिल खंडेलवाल*
       पिंपरी चिंचवड़, पुणे
=================
  🎯 *विट्टल*
      (कोळी अनुवाद)
पंढरपूरश्या वेहीवर , 
एक हाय बारकी शाळा।                           
 जखली पोरा गोरी गोरी।     
त्या मनी एक हाय जाम काळा।      
दन्गो करता न मस्तीव करता        
खोडी करनार अट्टल।    
न मास्तर हानता काय करु            
न जाणो यो हयेन विट्टल।   
✍️ *सुनंदा मेहेर*
   माहीम कोळीवाडा मुंबई
=================
  🎯 *इठ्ठल* 
   (आगरी अनुवाद)
 पंढरपुरचे हाद्दीव,
 हाय येक बारकीच शाला.
 सगली पोरा हान गोरी,
 येक पोर जामुच काला.
 उन्नार मस्ती करतय जाम,
 खोऱ्या करन्यान वस्ताद हाय.
 गुरूजी सांगतान करनार काय,
 नयत त आसल तो इठ्ठल.
 ✍️ *निलम पाटील* बिलालपाडा,नालासोपारा
=================
     🎯 *विट्टल*
(झाडीबोली)
पंढरपूराच्या सीवेपासी
आहे एक नआनसी स्याळा
सर्वी पोरे आहेत भुरे
एक पोरगा भलता कारा 
दंगा करतो मस्ती करतो
गदुल्या करण्यात अव्वल
मास्तर म्हणत्ये करणार काय ?
न जानो असल विट्टल !
✍️ *रणदीप बिसने*
       - नागपूर
=================
       🎯 *इठ्ठल*
(परदेशी बोली)
पंढरपुरका येशीपास
हय एक छोटी शाळा
सब पोर्ह्यान हय गोरा 
एक पोऱ्यो कुट्ट काळो
दंगा करं मस्ती करं
खोड्या करबामं हय अट्टल
मास्तर कहे कई करू ?
कोनकू मालूम व्हयंगो इठ्ठल 
🖊 *विजयराज सातगावकर*
         - पाचोरा
=================
🎯 *विठ्ठल*
(पोवारी बोली )
पंढरपूरक् सिवजवर
से एक नहानसी शाळा
सप्पाई टुरा सेती गोरा
एक टुरा से भलतो कारा
दिंगा करसे मस्ती करसे
चेंगडी करनो मा से अव्वल
मास्तर कव्हसे का आब् करू?
नही त् रहे वु विठ्ठल !!
✍️ *रणदीप बिसने*
     - नागपूर
=================
🎯 *विठ्ठल*
(कोकणी सामवेदी बोली)
पंढरपूरश्या वेहीपा
एक बारकी शाळा हाय
आख्ये पोरे गोरेपान
पान एकूस काळोमस
खूप दंगोमस्ती करत्ये
खोडयो काडण्यात अट्टल
मास्तर हांगात्ये,
का कऱ्यासा,
कुन जाणे, ओस हायदे विठ्ठल ??
🖊 *जोसेफ तुस्कानो*
           - वसई

=================
(झाडीपट्टी)
पंढरपूरच्या शिवं जवडं
यक छोटी शाडा
सर्वे पोट्टे हायेत भुरे
यक पोट्टा कुट्ट काडा
धिंगाने करते,मस्ती करते
खोड्या कराले हाये अट्टल
मास्तर म्हनतेत का करू बाप्पा
कोन जानं असन विट्टल।।
-माधवी
≠===================
पंढरपुराच्यें बाहांर आहें
बारकी एकुस साला
आखुटच पोयरें पांडरे-गोरे
एकुस होता काला
भरां करं मस्ती हों तों
भरां करं दंगल
गुर्ज्या म्हन् करांस काय?
आसंल जर्का विठ्ठल
 (वारली)
...मुग्धा कर्णिक
=======================
विठ्ठल
(चित्पावनी)

पंढरपुराचे शीमालागी
से एक इवळीशी शाळा
सगळीं भुरगीं सत गोरीं
एक बोड्यो काळीकुद्र कळा

बोव्वाळ करसे, धुमशाणा घालसे
किजबिट्यो काढसे हो अव्वल
मास्तर म्हणसे कितां करनार?
देव जाणे, सएल विठ्ठल

- स्मिता मोने अय्या (गोवा)
======================

पंढरपुरश्या येहीवर 
हाय एक बारकी हाळा
तटे हात जकली पोरं गोरी
एक पोरं घणा काळा
दंगा करते मस्तीव करते
खोड्या करव्या हाय अट्टल
मास्तर बोलते करव्याह का?
कोणला माहीत अहेल इठ्ठल।।

-वाडवळी बोली 
-केळवे माहीम
-- गौरव राऊत.
======================

ही दखनीत : (जिला बागवानी म्हणूनही ओळखतात इथे.)

पंढरपूरके हदकने
हय एक न्हन्नी इस्कूल
सब छोरदा हय गोरे
एक हय काला ठिक्कर
दंगा कर्ता मस्ती कर्ता
खोड्या कर्नेमें हय आट्टल
मास्तर बोल्ता कर्ना क्या
भौतेक इनेच आचिंगा इठ्ठल 

--इर्शाद बागवान
 आदिलनिजामकुतुबशहा जेथे होते तेथे ही भाषा तेथील मुस्लिम समाजात बोलली जाते.
यातील पेठी वर्जन म्हणजे हैदराबादेतले मुसलमान आपसात बोलतात ती भाषा (धर्माचा उल्लेख केवळ भाषा कुणाच्यात बोलली जाते याकरता) असं म्हणतात. दखनीभाषेत साहित्यनिर्मितीही झालेय. 
====================
आदिवासी पावरी बोली..
(नंदूरबार जिल्हा, धड़गाव तालुका 
आदिवासी पावरी बोली)
पंढरपूरन हिवारोपर,
एक आयतली शाला से 
अख्खा पुऱ्या 
काकडा से 
एक सुरू से 
जास्ती (जारखो) काल्लो 
कपाली करतलो, 
मस्ती करतलो 
चाड्या करण्याम
 से आगाडी पे !
काय करजे ?,
मास्तर कोयतलो,
काय मूंदु ,
ओहे इटलो ? (विठ्ठल)
- योगिनी खानोलकर
≠====================

आऊटसाइड पंढरपुर
देर इजे स्मॉल स्कूल
ऑल द किड्स आर व्हेरी फेअर
एक्सेप्ट फॉर वन ब्लॕक डुड
फनी अँड ट्रबल मेकर
ही इजे ब्रॕट ऑफ हायेस्ट ऑर्डर 
टीचर सेज व्हॉट टु डु?
माइट बी अवर ओन विठु

भाषांतरकार समीर आठल्ये
+91 98926 73624: 

कन्नड ( ग्रामीण ) मध्ये

पंढरापूरद अगसी हत्तीर
ऐतेव्वा वंद सण्ण सालीमठा
एल्ल हुड्रू बेळाग सुद्द
वब्बन हुडगा कर्रगंद्र कर्रग ||
गद्दला माडतान,धुम्डी हाकतान
तुंटतना माडोद्राग मुंद भाळ
मास्तर अंतार एन माड्ली ?
इवनं इद्रू इरभौद इटूमावली ?

- डॉ प्रेमा मेणशी
 बेळगावी
कर्नाटक
+91 98926 73624: 

विठ्ठल 

आगरी बोलीभाषा
============
पंढरपूरशे हद्दीन
हाय एक बारकी  शाला
बिजी पोरा गोरी
त्यामन एकस यो काला

दंगा करतं नावटीगिरी करतं
खोड्या कर्णेन जाम अट्टल
गुरजी हांगतं काय करणार
काय माहीत आहेल विठ्ठल

●श्री अनंत पांडुरंग पाटील
   उमरोळी पालघर

 *जय हरि..!!* 

१] पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे = सोलापूर
२] पंढरपूरस्थित मंदिराचे नाव = श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर
३] विठ्ठल कुणाचे देवरूप आहे = श्री विष्णू (कृष्ण)
४] विठोबा द्वापारयुगामध्ये कितवा अवतार मनाला जातो = दुसरा
५] त्याला दशावतारातील कितवा अवतार मानले जाते = नववा
६] शास्त्र पुराणातील विठ्ठलाचे नाव = बौद्ध/बोधराज
७] महाराष्ट्रातील विठ्ठलभक्त संप्रदाय = वारकरी
८] कर्नाटलातील विठ्ठलभक्त संप्रदाय = हरिदास
९] विठ्ठलमंदिर कोणत्या नदीकाठी वसले आहे = भीमा
१०] या नदीला या ठिकाणी कोणत्या नावाने ओळखतात = चंद्रभागा
११] विठ्ठलाला कशाचा हार घातला जातो = तुळशी व मंजिरी
१२] तुळस हे कोणाचे प्रतिक मानले जाते = श्री लक्ष्मी
१३] मुख्य मंदिराची निर्मिती कोणत्या शतकात झाली असावी = १२ वे शतक
१४] कोणी केली/कोणाच्या कालखंडात झाली असावी = देवगिरीचे यादव प्रशासक
१५] विठ्ठलाचे पंचाक्षरी नाव = पंढरीनाथ
१६] पंढरपूर चे मूळ कानडी नाव = पंडरगे
१७] त्यावरून विठ्ठलाला हे नाव पडले = पांडुरंग
१८] त्या शब्दाचा अर्थ काय/म्हणजे कोणता रंग = शुभ्र रंग
१९] विठ्ठलाच्या गळ्यातील हार कसला बनविलेला आहे = कौस्तुभमणी
२०] विठ्ठलाला विटेवर उभे करणारा भक्त कोण = भक्त पुंडलिक
२१] विठ्ठल किती काळ विटेवर उभा आहे = २८ युगे
२२] संत ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाची कोणती 2 विशेषणे वापरली आहेत = कानडा व कर्नाटकु
२३] श्री विष्णूच्या 24 अवतारात किंवा सहस्त्रनामात उल्लेख नसल्यामुळे संत मंडळी त्याला कोणत्या 2 शब्दांनी संबोधतात = चोविसावेगळा व सहस्त्रांआगळा
२४] वारकरी संप्रदायाचे दुसरे नाव = विठ्ठलसंप्रदाय
२५] वर्षभरातील 2 प्रमुख वाऱ्या कोणत्या = आषाढी व कार्तिकी एकादशी
*विठ्लाचे नामस्मरण करा।आनंदी व सुखात रहावे आपल्या घरा।।*

*🙏🏻🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🏻*

 *शरीर ओके तर ठिकाणावर डोके,*

*एक लक्षात असु द्या...*
*आपल्या वडिलांचे*  
*नांव व संपत्ती,*
*आपल्याला मिळू शकते,*
*पण आरोग्य,शरीर,*
*आपले आपल्यालाच कमवावे लागते,*
*ते वारसाहक्काने मिळत नाही.*
*आत्तापर्यंत पैसा श्रेष्ठ होता,*
*पण...*
*इथुनपुढे ज्याचं आरोग्य उत्तम,*
*तोचं खरा श्रीमंत...*
*असचं म्हटलं जाईल...*
*प्राॅपर्टी,पैसा,समृद्धी,खुप आहे,*
*पण खाता येत नाहीये,*
*हे सर्वात मोठं दुर्दैव आहे,*
*म्हणून शरीर,आरोग्य हे जपा..!!*
*पण त्याचबरोबर..*
*चांगली माणसं ही जपा...*
*कारण...*
*जसे उत्तम शरीराशिवाय,*
*आनंद नाही,*
*तसेच चांगले नातेवाईक,*
*जिवलग मित्र-मैत्रीण शिवाय,*
*जीवन नाही...*
*जगताना स्वतःच्या बोलण्यात,*
*इतका सरळपणा ठेवा...*
*की,वाईट लोकांना किंवा चांगल्या लोकांना त्यात 
आपले पणा वाटला पाहिजे* 
 *प्रत्येकाच्या जीवनात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात,*
*"प्रेम, काळजी आणि आदर"..*
*पहिल्या दोन तुम्ही दिल्या कि तिसरी तुम्हाला आपोआपच मिळते...*
*कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलयं*, *प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं*.. 
*पाण्यापेक्षा* *तहान* *किती आहे याला जास्त किंमत असते* 
*मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते*  
*या जगात नाते तर सर्वच जोडतात*.. 
*पण नात्यापेक्षा* *विश्वासाला* *जास्त किंमत असते*
*मोठ्यामोठ्या शब्दांनी नातं टिकत नसतं तर छोट्या छोट्या भावना समजून घेतल्या तर नातं घट्ट होतं.* 
*आरश्याची किमंत भलेही हि-यापेक्षा कमी असेल, पण लाखभर हि-याचे घातलेले दागिने पाहायचे तर शंभर रुपयांचा आरसाच लागतो*
*शब्द देवुन "आस" निर्माण करण्यापेक्षा,,,,,*
*साथ देऊन विश्वास निर्माण करा*

 🌺

*आत्मसुखाकडे कस जायचं.?*
*त्यासाठी सद्गुरूंनी दोन मार्ग सांगितले.*
*एक direct,*
*आणि दुसरा indirect,*
*डायरेक्ट मार्ग सर्वाना झेपेलच,*
*असं नाही.*
*कारण...*
*दिव्य साधना समजणं,*
*आणि स्वरूपाचं भान घेणं,*
*त्या स्वरूपापर्यंत जाणं हे सोपं काम नाही.*
*सद्गुरूंनी सर्वसामान्य माणसाचा विचार केला.*
*साक्षात्कार होणारे फार कमी लोकं असतात.*
*पण सद्गुरूंनी.*
*सुखाचा अनुभव सामान्य लोकांसाठी,*
*खुला केला,*
*त्या मार्गाने गेलात तर हे जग सुद्धा सुखी होईल.*
*संपूर्ण विश्वात क्रांती करण्याची ताकद,*
*या मार्गात आहे.*
*सद्गुरूंनी सांगितलं की,*
*खरं सुख हे आत मध्येच असतं.*
*जाणिवेतच असतं.*
*हे सुख आपल्याला बाहेर विषयांच्या मार्फत मिळतं.*
*आपण समजा सिनेमाला गेलो,*
*त्यातून जो आनंद मिळतो,*
*तो त्या सिनेमातून मिळत नसतो,*
*तो आनंद आतूनच येत असतो.*
*खरा आनंद आत्मानंद्च असतो,*
*पण ते आपल्याला विषयाच्या आधारे मिळतं.*
*विषयसुख हे आत्मसुखच आहे.*
*पण ते विषयाच्या आधाराने मिळाल्यामुळे,*
*आपण विषयावर अवलंबून असतो,*
*विषय गेला की ते सुख गेलं,*
*कारण...*
*विषय हा कायम स्वरूपी नसतो.*
*जर तुम्ही विषयावर अवलंबून राहिलात,*
*तर तुम्ही कधीच...*
*सुखी होऊ शकणार नाही...!!*

                 🙏🏻🌹🙏🏻

Saturday, November 12, 2022

--चिंतन--


*देवा तुझी लिला अगाध आहे.........रे*

*काय गंमत आहे बघा जगण्याची. माणसांमध्ये आपलं वैभव दाखविण्याची जणु स्पर्धाच लागली होती.*

*लग्नसमारंभ....*

*लाखो , करोडो रुपयांचा चुरा. लग्नात मोठमोठ्या राजकारण्यांचे आशीर्वाद . चमकदार देखावे. तुरे असलेले शेकडो फेटे , डीजेचा धिंगाणा तर विचारुच नका. मादक पेयांचा महापुर , जेवणातले विविध पदार्थ , त्यात अन्नाची प्रचंड नासाडी, विजेची रोषणाई. महागडे कपडे , दागदागिन्यांचं प्रदर्शन आणि श्रीमंतीचा माज काही आगळाच. बरं , यात गरीबही मागे नव्हते . कर्ज काढणं का होईना पण लगीन....थाटातच. आणि अशाच थाटापायी शेकडो कुटुंब आर्थिकदृष्ट्या देशोधडीला लागली. बरं सृष्टीकर्त्याच्या दृष्टितुन ही बाब सुटते थोडीचं. आता बघा ना...माणसं तीही फक्त ५०...जास्तीचा गाजावाजा नाही. शांततेत लग्न सोहळे पार पडताहेत. आता जनावरं सोबतीला चालतील पण माणसं नको रे बाबा अशी अवस्था झालीय. सगळा झगमगाट गळुन पडला. मादक पेयाने झिंगणारी तरुण पिढी काही अंशी का होईना थोडी थंड पडलीय. ना गाजावाजा ना हजाराची लग्नपत्रिका. तरीही लग्न होताहेतच ना...आता गरीब..श्रीमंत सगळे एकाच मापात. माणसांना खाडकन जागं केलंस रे....कलियुगाचा अंत तर नाही ना....देवा?????*

*सत्यनारायण..,जागरण गोंधळ*

*हे तर आता जवळ जवळ लोप पावत चाललय जणु. लग्न झालं की सुरु झालं सत्यनारायण आणि जागरण गोंधळाचा धडाका. ब्राम्हणांनी कमवले पैसे आणि टेचित तुप भातावर ताव मारताहेत. आणि आम्ही आपलं कण्हत कण्हत जगतोय पिठलं..चटणी खाऊन. मला कधी कधी विचार पडतो जगातील प्रगतीपथावर असलेल्या देशात सत्यनारायण , जागरण , गोंधळ अशा धार्मिक भानगडीत शास्रज्ञ गुंतले तर मग शोध कोण लावणार. जपान , अमेरीका , चीन , जर्मनी यासारख्या देशात कुठ आहे असल्या बारा भानगडी. तरीही देश प्रगतीपथावर ...आपण मात्र आपलं तोकडं यश दाखविण्यात मस्तवाल...पण आता सृष्टीकर्त्याच्या पुढं काय......बसावं लागतय ना घरात...*

*वास्तुशांती..*

*घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती.....आपण मात्र सिमेंटचा चंकुबा उभा करुन बंगला अस नाव देऊन मोकळे झालो. लाखो कोटींचे महाल उभे राहीले. लोकांना घरातलं चकचकतं सगळं दाखविण्याची प्रचंड स्पर्धा. लाखांचे बेड , लाखांचे बाथरुम , बापरे...काय रंगरंगोटी विचारु नका. प्रचंड मोठी घरं बांधली. लोकांना फक्त आपली फुशारकी दाखविण्याचा प्रयत्न म्हणुन .....काय तर वास्तुशांती...अरे घरं जेवढी मोठी झाली ना...तेवढी माणसं लहान झाली. मोठमोठ्या घरात माणसं मात्र हरवली. लाखाचं टॉयलेट बांधलं. पण सकाळी तंबाखु खाऊन , सिगारेट ओढुन , मशेरी लावुन , गरम पाणी पिऊन , लिंबु पाणी पिऊन तासनतास बसतय तरी पोट साफ होत नाही. कारण जिथं मन साफ नसतं तिथं पोट कधीच साफ होत नाही. रस्त्यानं चालता चालता जनावरं आपलं पोट साफ करतात.. त्यांना कुठं तंबाखु , सिगारेट, मशेरी ...लिंबुपाणी , गरमपाणी प्यावं लागतं...तुम्ही लाख कोटी खर्च करुन बंगले बांधा. हवेच्या गाद्या आणा पण झोपेचं काय...रस्त्यावर तंबुतलं पोरगं ढाराढूर झोपतंय....ना पंखा ना एसी....तरी कोणताच रोग शिवत नाही...इथं कोटीच्या घरात मलेरीया डेंग्युचं थैमान....काय भयान वास्तव आहे. आता सागळंच बंद...देखावा दाखवायचा कोणाला....राजकारणी लोकांना आणण्याच्या शर्यतीचं काय?,?*

*अंत्यविधी...दशक्रीया*

*एकदा असंच वाचनात आलं होतं की एका गावात एका पठ्ठ्यानं आईचं प्रेत सरणावर ठेवलं तरी पेटवुन द्यायला गडी तयार नव्हता. कारण तो म्हणत होता थांबा आमदार साहेब आल्याशिवाय अग्निडाग द्यायचा नाही...काय हा अतिरेक...लग्न ..इतर समारंभात भाई...दादा...नेते....साहेब मिरवायचे पण आता स्मशानभुमीचा पण ताबा घेतलाय बहादरांनी. समाज मोठेपणा मिरवण्यात कोणत्या थराला जाईल भरवसाच नाही. पण आता फक्त २०...तरी काही महाभाग बापाला घरी ठेवतील पण आईच्या मयताला साहेबांना बोलावतील भरवसा नाही रे बाबा...देवा आता तुच वाचव..*

*वाढदिवस....*

*आयुष्यातलं एक वर्ष संपलं...तो दिवस म्हणजे वाढदिवस. पुर्वी स्वतःलाच माहीत नसायचं आपण कधी झालो. पण आता एक नवीनच फॕड घुसलय टाळक्यात...वाढदिवस धुमधडाक्यात झाला पाहीजे. किलोकिलोचे केक....पार तलवारीने कापण्यापर्यंत मजल...छत्रपतींना सुध्दा हे पाहुन किळस वाटत असेल...कुठं माझा ताना..बाजीप्रभु....आणि आताचे हे आधुनिक मावळे. फेसबुक आणि व्हॉटसअॕपवर झळकण्यासाठी किती चढाओढ...पण आता तेही जवळ जवळ बंद होण्याच्या मार्गावर....*

*देवा तुझी लिला अगाध आहे...विज्ञानानं भयंकर प्रगती केली. पुर्वी पायात चपला नसायच्या तरी पायाला काटा रुतत नसायचा आणि आज पायालाच वात झोंबलाय तर घरातच चपला घालायची वेळ आलीय...मिक्सरचा गरगोट खाऊन किळस आली की काय..परत बायका पाटा वरवंटा शोधायला निघाल्यात. चुलीचा धुर नको म्हणणारे आता चुलीवरचं खाणं किती छान हे दाखवायला पुढं सरसावलेत. काम करुन करुन पोटं पाठीला चिकटलेली असताना कधीच सकाळीच उठुन पळायची वेळ येत नसायची. आता जो तो सकाळी सकाळी भल्या मोठमोठ्या ढेरी हालवत पळताना दिसताहेत...देवा तुझी लिला अगाध रे बाबा...ज्या घरात कोणता पदार्थ खायला निवडावा हा प्रश्न तिथं मात्र पोरांची वाणवा आणि रस्त्यावर तंबुत वर्षाला पाळणा हलतोय.*

*लोप पावत चाललेल्या सायकली पुन्हा बाहेर निघायला लागल्यात. लाखो करोडोच्या अलिशान गाड्या सोडून लोकं सायकलवर यायला लागलेत...खरंच देवा तुझी लिला अगाध आहे.. लाखो..करोडोची शहरात घरं असुनही आता खेड्यात फार्म हाऊस बांधायला निघालेत....*

*आज होळी....रंगांची उधळण....खरं तर वाईट विचारांची होळी करण्याची गरज असुन ..अहंमभाव रुपी रावणांचं दहन करुन माणुसकीच्या रंगाची उधळण करत जगण्याची गरज आहे.....खरंच देवा तुझी लिला अगाध आहे.....*

*होळी आणि धुळवडीच्या मनःपुर्वक शुभेच्छा......💐*

*लेखक....श्री. किसनराव बाजीराव पावडे-पाटील*
*शिक्षण निरीक्षक*
*बृहन्मुंबई महानगरपालिका*

*हा मेसेज स्वलिखित असुन आपण कॉपी पेस्ट केला तरी चालेल पण आवडला तर नक्कीच इतरांना पाठवा.....काय सांगावं....विचार बदलुही शकतील...पण खरंच देवा तुझी लिला अगाध आहे....धन्यवाद*

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...