Wednesday, February 8, 2023

करोनाचा निर्दयी खेळ


करोनाची महामारी पुण्याभोवतीचा विळखा घट्ट करत असताना, या शहराचा आणि जगाचा स्वभाव एकदम बदलत आहे, याची दिवसागणिक जाणीव होत आहे. रोजच्या रिपोर्टिंगच्या अनुभवामध्ये ही गोष्ट प्रकर्षाने समोर येते. आजही संध्याकाळपर्यंत अंकासाठी कोणती स्टोरी करायची, हाच विचार करत होते. तेवढ्यात फोटोग्राफरचा फोन आला आणि त्याने ‘टीप’ दिली. ‘वैकुंठ स्मशानभूमीत ‘कोविड’ची बॉडी येणार आहे आणि इथे कर्मचाऱ्यांना पीपीई कीट नाहीत. ते बॉडी कशी उचणार?’ हे तो सांगत होतो, त्यातून एकूण परिस्थितीचा अंदाज येत होता. त्यामुळे, ‘तिथेच थांब, मी आले,’ असे सांगून मी फोन ठेवला आणि १५ मिनिटांत वैकुंठ गाठले. 
पत्रकार म्हणून बातमी मिळाल्याचा स्वार्थी विचार मनामध्ये येत होताच. ‘मस्त एक्सक्लुझिव्ह स्टोरी आहे. महापालिकेला ठोकायला मिळेल, नातेवाइक बोलतील, त्यांचेही अनुभव लिहिता येतील. जोडीला फोटो आहेतच. चला, आजचा दिवस मार्गी लागतोय,’ असे विचार वैकुंठापर्यंत पोहोचेपर्यंत मनात येत होते. तिथे पोहोचल्यानंतर अन्य स्पर्धक दैनिकांच्या पत्रकारांपैकी कोणी नव्हते, म्हणजे ही बातमी फक्त माझ्या एकटीचीच असणार, ही गोष्टही जाणवत होती. बॉडी यायला आणखी वेळ होता. आजूबाजूला पाहात होते, त्यात स्मशानाची शांतता भेसूर वाटत होती.
वेळ होता म्हणून हात मोबाइलकडे जाणार एवढ्यात हुंदका ऐकायला आला. पलिकडेच एका झाडाखाली एक ५५ वर्षांची बाई साडीच्या पदरात डोके लपवून रडत होती. ‘काकू काय झालं? तुम्ही इथं काय करताय?’ मी दबक्या आवाजातच विचारलं. ‘नवऱ्यासाठी आलेय ताई. माझे मालक गेले. करोना झाला होता त्यांना,’ हुंदके देत ती बाई जाणवत होती. तिच्याशी बोलत असतानाच, ‘बाकी कोण आलं नाही का? तुमची मुलं कुठं आहेत? कोणत्या हॉस्पिटलमध्ये होते?’ अशी चौकशी केली. त्यावर, ती बाईही बोलू लागली. ‘ससून हॉस्पिटलमध्ये त्यांना अॅडमिट केलं होतं. आता कोणीच नाही. दोन मुलींची लग्नं केली. एक मुलगा आहे, पण तो वेगळा राहतो. बापाला बघायला पण आला नाही..’ ती एवढं बोलली आणि गेटमधून अॅम्ब्युलन्स आत आली. विद्युतदाहिनी असलेल्या इमारतीसमोर अॅम्ब्युलन्स थांबताच फोटोग्राफर सरसावले. कोविड बॉडीचे अंत्यसंस्कार कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. 
इतक्यात दाहिनीजवळ काम करणारा एक कर्मचारी धावत आला आणि त्याने विचारले, ‘मॅडम. तुम्ही पत्रकार आहात का?’ मी हो म्हणताच, त्याने त्याचं मन मोकळं करण्यास सुरुवात केली. ‘मॅडम, बॉडी आली, पण उचलणार कोण? आम्ही दोघेच कर्मचारी आहोत. महापालिकेतून सांगितलं, की चार लोक येणार आहेत. पण कोणीच आलं नाही. नातेवाइकपण आले नाहीत. आम्हाला ज्या किट दिल्या आहेत, त्या पीपीई किट नाहीत. त्या एचआयव्ही किट आहेत.’
त्या बाईचे हुंदके डोक्यातून जात नव्हते, तोच नवीन चित्रसमोर येत होतं. त्याचं म्हणणं नीट टिपून घ्यावे, म्हणून नोटपॅड काढला आणि त्याचे नाव विचारले. ‘मनोज, मॅडम तुम्ही महापालिकेत फोन करता का,’ त्यानेच आमच्याकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली. मनोजशी बोलताना समजलं, ‘करोनामुळे मृत्यू झालेले मृतदेह (जो प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अतिशय घट्ट बांधून ठेवलेला असतो) फक्त अॅम्ब्युलन्समधून बाहेर काढून विद्युतदाहिनीपर्यंत घेऊन जायचा असतो. यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात आणि रक्ताची नातीही जवळ येत नाहीत. परवा एक बॉडी खाली पडली, पण कोणी नातेवाइक मदतीला आला नाही.’
संताप व्यक्त करत मनोज दाहिनीच्या दिशेने निघून गेला. मी महापालिका आयुक्तांना फोन केला, तर त्यांनी मनुष्यबळाची अडचण सांगितली. आजूबाजूला सुकलेले हार, फुलं, मडक्यांची खापरं पडली होती. इतरवेळी अंत्यसंस्कारांना दिसणारा गोतावळा, कुटुंबांचे आक्रोश, ब्राह्मण, मंत्रोपचार, शेवटचा नमस्कार या गोष्टी आता नव्हत्याच. एरवी भेसूर असणाऱ्या स्मशानातही करोनाची दहशत दिसत होती. 
दोन तास उलटून गेले होते, तो मृतदेह अॅम्ब्युलन्समध्येच पडून होता. किट घातलेले दोन कर्मचारी अजूनही प्रशासनाच्या मदतीची वाट पाहात होते. ती बाई कोपऱ्यात बसून अॅम्ब्युलन्सकडे पाहात होती. तिच्या एकटक डोळ्यांमध्ये लग्न, संसार, मुलं, त्यांची शिक्षण, मुलींची लग्न हा प्रवास आणि त्यामध्ये नवऱ्याने खाल्लेल्या खस्ता, याच गोष्टी दिसत होत्या. शांतता, हतबल कर्मचारी, सारखा घड्याळात बघणारा अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर आणि निपचित मृतदेह हीच गोष्ट उरली होती. घड्याळाचा काटा तीनवरून सहावर आला होता आणि या तीन तासांमध्ये अंत्यसंस्कारांची वाट पाहणारा मृतदेह आणि त्याची असहायता पाहून हसणारा करोनाच मला दिसत होता.
अखेरीस साडेसहा वाजता काही कर्मचारी आले, त्यांनी अॅम्ब्युलन्समधून मृतदेह बाहेर काढला आणि तीन मिनिटांमध्ये तो दाहिनीपर्यंत नेला. स्ट्रेचरवर निपचित पडलेल्या आपल्या नवऱ्याचा हा अखेरचा प्रवास पाहून, त्या बाईचा बांध फुटला... 
साहजिक होते आणि तीन-चार मिनिटांमध्ये दाहिनीत त्या मृतदेहाच दहनही झाले. मात्र, एक गोष्ट लक्षात येत होती, ती म्हणजे, करोनापुढे मृत्यूही थरथरत होती. दाहिनीमध्ये जळणारा मृतदेह पाहून करोनाची भीषणता जाणवली. क्राइम रिपोर्टरमधून काम करताना खून, अपघात, बॉम्बस्फोट अशा अनेक घटना कव्हर केल्या. अनेक गोष्टी डोळ्यांनी पाहिल्याही. मात्र, करोनामुळे आलेला हा मृत्यू आणि त्यानंतरचा त्याचा प्रवास अधिक भीषण होता. 
या महामारीचा सामना करणारे प्रशासन, एकेक जीव वाचविण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारे डॉक्टर, कायदा-सुव्यवस्था सांभाळतानाच, गरिबांपर्यंत जेवण पुरविणारे खाकी वर्दीतील देवदूत, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणारे हजारो हात.. या सर्वांनी करोनाला आव्हान दिले आहे. आज हे शहर करोनाशी लढत आहे, ते या योद्ध्यांमुळेच. या सर्व योद्ध्यांच्या हिमतीला माझा सलाम.


- अर्चना मोरे,
पुणे मिरर,
टाइम्स ऑफ इंडिया
[5/17/2020, 10:15 AM] +91 95036 45430: *विसरू नये असेही*

🌿 आज १६ मे 🌿

गानकोकीळा पद्मश्री माणिक वर्मा यांची ९४ वी जयंती.🌿

खरंतर कुठल्याही पक्षाच्या आवाजाची किंवा कुठल्याही श्रेष्ठ गायकाच्या आवाजाची उपमा देता येऊ नये असा हा दैवी वात्सल्यपूर्ण आवाज.
लहानपणापासून आकाशवाणी आणि माझी आई ह्यांच्यामुळे हा आवाज मनात रुजला कारण आईला माणिकबाईंचे गाणे खूप आवडतं असे.

ज्येष्ठ गायिका आणि आई हिराबाई दादरकर(माई) यांनी दिलेलं आणि गुरू जगन्नाथ बुवा पुरोहित यांनी घडविलेलं गाणं उरात जपत आपल्या अप्रतिम मधुर, नादमय, स्वर्गीय आवाजात जगाला अनेक वर्षे त्या विनासंकोच देत राहिल्या.

सावळाच रंग तुझा' म्हणून त्या कृष्णाच्या सावळ्या रंगात लाखो रसिकांना अडकवत गेल्या.
आणि.....
 'अमृताहूनी गोड नाम तुझे देवा' ह्या ओळीतून अलगद आपल्याला त्या परमेश्वराच्या कुशीत सोडून आल्या.

असंख्य गाणी आणि मैफिलींमधून लाखो रसिकांना संगीताचा गोडवा बहाल करणाऱ्या माणिकबाईंना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 अशा ह्या गंधर्व गायिकेला आणि तिच्या दैवी गाण्याला तिच्या वाढदिवसानिमित्त अमृतमयी प्रणाम.🌿🍁
मुक्त पत्रकार:
पुरुषोत्तम नगरकर
🙏🏻☺️🙏🏻

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...