जे प्लॅस्टिक सध्या चर्चेचा विषय बनले आहे त्याचा शोध 1885 साली अलेक्झांडर पार्क याने लावला व त्याला सुरुवातीला पार्कसाईन असे संबोधले गेले. त्यानंतर त्याला सेल्युलिड असे म्हटले गेले.1965 ते 1985 या दरम्यान इंजिनिअरींग प्लास्टिकचा उदय झाला.प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी विकास आणी तन्त्रज्ञात मोठा बदल झाला. चांगला टिकाऊपणा व जुळवून घेण्याची क्षमता यामुळे प्लास्टिकची मागणी वाढली.
प्लॅस्टिक हा एक उपयुक्त पदार्थ आहे. तो पेट्रोरसायन व्यवसायातील टाकाऊ गोष्टीतून निर्माण करण्यात आला.प्लॅस्टिकमुळे लाकूड , धातू व काच याचा वापर कमी होऊ लागला.त्यामुळे बरीच वृक्षतोड थांबली. खनिज संपत्तीची बचत झाली.इतर वैज्ञानिक व्यापारी आणि औद्योगिक उपयोग लक्षात घेता प्लॅस्टिक मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला.
प्लॅस्टिकने गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आकृष्ट केले. पावसाळ्यात अनेकांच्याझोपडय़ांवर प्लॅस्टिक पेपर आढळू लागले. अनेकांच्या पायात प्लास्टिकच्या चपला दिसू लागल्या.प्लास्टिकपासून देवाच्या गळ्यातील हार बनवले जाऊ लागले. यावरून अल्पावधीत प्लॅस्टिकने सर्वसामान्य माणसाच्यापायापासून देवाच्या गळ्यापर्यंत स्थान पटकावले.
अनेक वर्षांपासून प्लास्टिकने सर्वांचेच जीवन व्यापून टाकल्यामुळे सध्याचे युग हे *प्लॅस्टिक युग* आहे असे वाटू लागले.प्लॅस्टिकचा शोध जरी 1855 साली लागला असला तरी भारतात त्याचा वापर शंभर वर्षांनंतर म्हणजे अंदाजे 1955 नंतर होऊ लागला. प्लॅस्टिक जसे मानवाला वरदान ठरले तसेच त्याच्या अतिवापरामुळे ते शाप ठरले आहे. ' अति तेथे माती ' असे म्हटले जाते ते खरे आहे. वापरून टाकलेले प्लॅस्टिक हजारो वर्ष मातीत गाडले गेले तरी ते नष्ट होऊन मातीशी एकरूप होत नाहीत. ते नष्ट तर होत नाहीचउलट जमीन नापीक करते. प्लॅस्टिक जाळून नष्ट करायचे म्हटले तर त्यामुळे हायड्रोकार्बन इत्यादी विषारी वायू तयार होतात. ते मानवासाठी धोकादायक असतात.
*प्लॅस्टिक निर्मूलन भारतापुढे आव्हान*
परदेशात कोणत्याही वस्तूची निर्मिती करतानाच त्याची विल्हेवाट कशी लावायची ? याबाबत विचार केला जातो. जगात 1855 पासून प्लॅस्टिकचा वापर सुरू असला तरी प्लास्टिकचा सुयोग्य वापर , पुनर्वापर व कचऱ्याची विल्हेवाट या संदर्भात योजना आखल्या आहेत. तेथील कायदे जसे कडक आहेत तसे नागरिक सुज्ञ तर आहेतच परंतु पर्यावरण रक्षणास प्राधान्य देणारे असल्याने प्लॅस्टिकमुळे फार मोठ्या समस्या निर्माण होत नाहीत.याउलट भारतात 1955 पासून प्लॅस्टिकचा वापर सुरू झाला असला तरी इतर देशांपेक्षा भारतात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.
प्लॅस्टिकच्या पातळ पिशव्या ही भारतासाठी डोकेदुखी ठरली आहे.एका पाहणी नुसार नुसत्या मुंबईत एका दिवसात शंभर दशलक्ष पिशव्या वापरल्या जातात. वापरून झाल्यानंतर या पिशव्या कचऱ्यात टाकल्या जातात. देशात दररोज पंधरा हजार तीनशे बेचाळीस टन इतका प्लॅस्टिक कचरा निर्माण होतो.त्यापैकी चाळीस टक्के प्लॅस्टिक कुठेहीसंकलित न होता निसर्गात पडून राहते. इतके प्लॅस्टिक इतरत्र पसरले तर किती भयानक स्वरूप प्राप्त होईल याची जाणीव झाल्यामुळे देशात 2000 साली घनकचऱ्याचे व्यवस्थापन व हाताळणी कायदा आणि 2011 साली प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन व हाताळणी कायदा अस्तित्वात आला आहे. त्यानुसार पातळ पिशव्यांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.तरीसुद्धा अशा पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कचऱ्यात टाकलेल्या हया पिशव्या गटारातून समुद्रात जातात.गटारे तुंबतात. 25 जुलै 2005 रोजी मुंबई परिसरात जो महाप्रलय झाला त्याचे प्रमुख कारण पातळ पिशव्याच होत्या. या महाप्रलयात अनेकांचे बळी गेले व त्यानंतर रोगराई पसरली.
अनेकजण घरातील उरलेले अन्न प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून कचऱ्यात टाकतात. गाई - म्हशी कचऱ्यात पडलेल्या पिशव्यांसह अन्न खातात. त्यामुळे प्राण्यांच्याजिवाला धोका निर्माण होतो. काही वर्षापूर्वी राजस्थानमध्ये जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्यामुळे दहा हजार जनावरे मृत्युमुखी पडली. आपण गाईला देव मानतो.एखाद्या ठिकाणी गोहत्या झाली तर दंगल उसळते. मग आपल्या हातून गोहत्या होऊ नये असे वाटत असेल तर उरलेले अन्न कागदात गुंडाळून कचऱ्यात टाकावे.प्लॅस्टिकच्या पिशव्यांपासून मासे , समुद्रपक्षी यांना सुध्दा धोका निर्माण होतो. लहान मुलांना प्लॅस्टिकची खेळणी दिली तर त्यांच्या आरोग्यासधोका निर्माण होतो.खाद्य पदार्थ प्लॅस्टिकच्या भांड्यात ठेवल्यास ते आरोग्यास धोकादायक ठरतात.
*आनंदवन प्लॅस्टिकमुक्तीचे नंदनवन*
अगदी प्लॅस्टिकची निर्मिती पूर्णपणे बंद केली व यापुढे प्लॅस्टिक वापरायचे नाही असे जरी कोणी ठरवले तरी यापूर्वी उत्पादन झालेले व वापरात असलेल्या तसेच वर्षानुवर्ष समुद्रकिनारे , नदीकिनारे , मैदाने , झाडे - झुडपे यामध्ये असलेले प्लॅस्टिक कसे नष्ट करायचे याबाबत ठोस उपाय योजणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ विकास आमटे यांनी आनंदवनात प्लॅस्टिकनगरीची स्थापना केली आहे.येथे प्लास्टिकचे तुकडे , सलाईन , सिरिंज , आइस्क्रीमचे कप , एक्सरे फिल्म , गुटख्याची रंगीबेरंगी वेष्टन , गाड्यांचे टायर , ट्यूब असा शहरातील घनकचरा म्हणून ज्यांची ओळख होते असा कचरा प्लॅस्टिक नगरीत जमा केला जातो. तो धुऊन निर्जंतुक केला जातो. यापैकी सलाईन ,सिरिंज आइस्क्रीमचे कप , थर्माकोल यापासून तेथे ' काँक्रिट मड ब्लॉक तयार केले जातात व त्यापासून घरे बांधली जातात. इतर वस्तूंपासून व्हिजिटिंग कार्ड , पडदे , लेटरबॉक्स तयार करतात. गाद्या , लोड बनवले जातात. ज्या कचऱ्याकडे घनकचरा म्हणून बघितले जाते अशा कचऱ्यापासून टाकाऊवस्तूंचा पुनर्वापर केला जातो.त्यामुळे पर्यावरण रक्षण होते , स्वच्छता राखली जाते , अनेकांना रोजगार उपलब्ध होतात.
या उपक्रमातून एकाचवेळी अनेक गोष्टी साध्य होतात.घनकचऱ्याची अल्प खर्चात विल्हेवाट लावली जाते. टाकाऊतून टिकाऊ वस्तू निर्माण होतात.वस्तूंचा पुनर्वापर करण्याची नागरिकांना सवय लागते. वापरा आणि फेकून द्या ही प्रवृत्ती कमी होते. अनेकांना रोजगार मिळतो.कचऱ्यातून गोळा केलेल्या वस्तूंपासून तयार केलेल्या वस्तू वापरण्यास काही जणांना घृणा वाटत असेल परंतु त्या वस्तू स्वतः डॉ विकास आमटे व त्यांचे सर्व सहकारी वापरतात.
अतिशय कमी भांडवलात होणाऱ्या वस्तूंचा वापर सुरुवातीला हॉस्पिटल , रेल्वे स्थानके , बस स्थानके , धर्मशाळा , आश्रमशाळा येथे करून त्याची उपयुक्तता पटल्यानंतर प्रत्येक घरात त्याचा वापर झाला तर प्लास्टिकच्या भस्मासुराला आवर घालणे फारसे कठीण जाणार नाही. प्लास्टिकच्या जाड पिशव्या व इतर प्लॅस्टिक गोळा करून रिसायकलिंग करणाऱ्या उद्योगाला कच्चा माल म्हणून पुरवणारे भारतात दहा लाख व्यक्ती साधारणपणे ऐंशी हजार टन प्लॅस्टिक रोज गोळा करून चार हजार पाचशे रिसायकलिंग करणाऱ्या कारखान्यांना पाठवतात. परंतु पातळ पिशव्या गोळा करून विकायच्या म्हटल्या तर साधारणपणे चार हजार सहाशे पिशव्या गोळा करून साफ करून विकायच्या म्हटल्या तर त्या जेमतेम एक किलो भरतात व त्याचे फक्त दोन रुपये मिळतात. त्यामुळे कोणीही त्या गोळा करत नाहीत व अशा पिशव्याच पर्यावरण व आरोग्यास त्रासदायक ठरू शकतात. यासाठी नागरिकांनी पातळ पिशव्या वापरणे पूर्णपणे बंद करावे. घरात अथवा दुकानात स्टॉक असेल तर तो कचरा वेचणाऱ्या व्यक्तींना द्यावा.
*नागरिकांची कर्तव्य*
आरोग्य संवर्धन व पर्यावरण संरक्षण करायचे असेल तर प्रत्येक नागरिकांनी सरकारला सहकार्य करणे गरजेचे आहे.त्यांनी कापडी पिशव्या वापराव्यात. प्लास्टिकला पर्याय असणाऱ्या वस्तूंचा वापर करावा. सर्व सामाजिक संस्थांनी येत्या सहा महिन्यांत सार्वजनिक मैदाने , समुद्रकिनारे , नदीकिनारे , मोकळ्या जागा , रेल्वे , एस.टी. इत्यादी ठिकाणी अनेक वर्षांपासून पडलेले प्लॅस्टिक गोळा करून आनंदवन सारख्या संस्थाना द्याव्यात. त्या संस्था त्याचा सदुपयोग करतील. असे झाले तर भारतातील कानाकोपरा प्लॅस्टिकमुक्त होईल व ते सर्वांच्या हिताचे ठरेल.
*दिलीप प्रभाकर गडकरी*
कर्जत - रायगड
( 2018 साली *शिवसेनेतर्फे* "प्लॅस्टिक : बंदी व पर्याय " या विषयावर आयोजित केलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्ध्येत मला प्रथम क्रमांकाचे 31000. रुपयांचे पारितोषिक 01- 12- 2018 रोजी शिवसेनाभवन येथे भव्य समारंभात देण्यात आले होते. त्या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या 36 निबंधांचे संकलन श्री हेमराज शाह यांनी पुस्तक रूपाने ऑक्टोबर 2018 रोजी प्रकाशित केले त्यातील हा लेख )
No comments:
Post a Comment