Friday, January 20, 2023

गाव !

 गाव काळीज आहे अन् प्रत्येकजण त्या काळजातलं गाणं ! माणूसकीच्या झऱ्याच्या ओलसर संगीतावर इथले पाखरं,झाडं,पिकं साथ देतात.इथली माती ओंजळीत भरून न्यावी दूर शहरात तरी तिथे एकटं वाटत नाही.गाव घर आहे जिथे मन कायम रेंगाळतं.लोकल गर्दीत लोंबकळत असतानाही करकटकच्या एका टोकासारखं पाय रोवून मन गावातून निघत नसेल.घर गावात असतं तसं गाव नावाचं एक घर मनात वसलेलं असतच असतं.आपली माती आपली माणसं ! कितीही दूर असली तरी याच माणसांसाठी जगायचं अन् शेवटी याच माणसात मरण्याचं स्वप्न उराशी बाळगायचं.गाव म्हणजे बालपण ,गाव म्हणजे आठवण ,गाव म्हणजेच अस्तित्वही ! प्रत्येक माणूस मनाने कुण्यातरी गावात असतोच,कुण्यातरी गावचा असतोच.गाव ही तशी आपल्या आत्म्याची ओळख,खूप खोलवर रूतून बसलेला मोरपंखी स्पर्श म्हणजे गाव ! गाव म्हणजे प्रियशी,आई आणि खरं तर सर्वस्व म्हणजे गाव ! हवीहवीशी वाटणारी अन् दररोज भरणारी यात्रा म्हणजे गाव ! कधीतरी गाव जागा बदलतं पण मन बदलत नाही.गावाला दरवाजा नाही,गाव कुणासाठी दरवाजा बंद करत नसतं.हा आईसारखं थोडसं रागावतं पण लगेच कुशीत ही घेतं.आपण गाणं आहोत,गाव नावाच्या काळजातले ! या काळजाला जपलं पाहिजे.दूर कुठेतरी टिवटिवी टिवटिव करत असलेली पाहून हल्ली त्या काळजातून कळ यायला लागली आहे.कोरोना नावाच्या वावदळाची भयाण चाहूल ! गाव थरारून गेलय.ओस पडलय.गाणं ऐकू येत नाही,संगीतही ऐकू येत नाही.दररोजची यात्रा भरत नाही.गुडूप आहे गाव ! गाव भयाण झालय भयाण! घरट्यातल्या पाखरांच्या काळजीनं कासावीस झालय .सगळी पाखरं परत आलीत का ? गाव विचारतय.सगळी पाखरं सुखरूप आहेत का ? गाव विचारतय.गाव काळजी घ्यायला सांगतय.प्रत्येक घरटं गावासाठी महत्वाचं आहे .या घरट्यांनी मिळूनच तर गाव झालय.गावच एक घरटं आहे.वावदान मोठं आहे.एकदम वेगळं आहे.दिवसही वैऱ्याचा आहे.आपण आपलं आपलं घरटं वाचवू या.आपण आपलं गाव वाचवू या !_


_*#जगदिश_पाटील*_ 
 _*#करजखेडा_उस्मानाबाद*_

No comments:

Post a Comment

  १. केळी- *प्रवासात असताना जर मळमळण्याचा, उलटी होण्याचा त्रास होत असेल तर एखादं केळ खावं. बस स्टँडवर, फळांच्या दुकानात सहजासहजी उपलब्ध असणा...